पूर्णिमा कऱ्हाडे
काही वर्षांपूर्वी आपले भारतीय पदार्थ, पिठं इत्यादी अमेरिकेत मिळत नव्हते. नंतर अनेक भारतीय व महाराष्ट्रीयन गोष्टी पटेल ब्रदर्स किंवा इतर इंडियन स्टोअर्स मध्ये मिळायला लागल्या. पण फक्त महाराष्ट्रीयन पदार्थांचे दुकान नव्हते. ते अमेरिकेतले पहिले महाराष्ट्राचे, अस्सल मराठी पदार्थ मिळण्याचे, दुकान काढण्याचा मान मिळाला आहे पार्ल्याच्या पूर्णिमा वसंत सोमण म्हणजेच आत्ताच्या पूर्णिमा निरंजन कऱ्हाडे हिला ! आज या सदरात आपण तिची ओळख करून घेणार आहोत.
पूर्णिमाने पार्ल्याच्या साठे कॅालेज मधून बी ए केले. निरंजन कऱ्हाडे ह्यांच्याशी लग्न झाल्यावर ९६ साली दोघे अमेरिकेत Connecticut मध्ये आले. निरंजन IT क्षेत्रात काम करणारे आहेत. पूर्णिमाने २००६ पर्यंत सेल्स कोॲार्डिनेटर, इस्टेट एजंट म्हणून काम केले.
२००६ मध्ये ते परत भारतात पुण्यामध्ये आले. २०१८ पर्यंत ते पुण्यात होते. त्यावेळी पुण्यात कॅापिरायटर म्हणून आणि नंतर बी एड झाले असल्यामुळे बाणेरच्या Orchid शाळेत, तिने शिक्षिकेची नोकरी केली.
आत्तापर्यंतचा तिचा प्रवास सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी स्त्री सारखा, संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत, अडीअडचणीतून मार्ग काढत चालला होता.
पूर्णिमाचा खरा प्रवास सुरू झाला २०१८ नंतर, ती परत अमेरिकेत आली तेव्हा ! यावेळी ती Dallas (Texas) मध्ये आली. मुलं शिक्षणासाठी घराबाहेर होती. तिला परत नोकरीत अडकायचं नव्हतं, घरातल्या जबाबदाऱ्या फार नव्हत्या. घरात रिकामं बसायचं नव्हतं ! मग करायचं काय ?…
काही माणसं उद्योगी असतात, जिद्दी , मेहनती असतात, बडबडी असतात, समाजात मिसळायला त्यांना आवडतं. पूर्णिमा त्यातलीच एक ! त्यामुळे तिने स्वतः थोडी माहिती मिळवत, सोशल मिडिया मध्ये शोध घेत, नविन काहीतरी सुरू करायचा प्रयत्न सुरू केला. तिने काही आर्ट्स , आणि क्राफ्ट च्या वस्तू eBay वर विकायला सुरवात केली . नंतर तिची एक नातलग घरगुती पिठं विकत होती. त्यावरून काही आपल्या मराठी गोष्टी आपणही विकूया असा विचार करून तिने हळूहळू त्या विकायला सुरवात केली.

सुरवातीच्या ह्या प्रवासात तिचे वडिल वसंत गोविंद सोमण हे तिच्याच जवळ राहत असल्यामुळे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले. निरंजन ने मार्केट अभ्यासून www.Soulfoodsindia.com ही वेब साईट तयार केली. पंडित फूड च्या साहाय्याने अस्सल महाराष्ट्रीयन जिन्नस आणि स्नॅक्स तसेच गृहपयोगी वस्तू, डेकोरेशनचे सामान, घरगुती शिवलेले छोट्या मुलांचे कपडे, साड्या इत्यादी विकायला लागली. ती सोहम कंपनीची डॅलस विभागाची वितरक आहे.
काही दिवसातच चांगला प्रतिसाद मिळतोय हे पाहून पौर्णिमाने आर्ट आणि क्राफ्टच्या वस्तू विकण्यासाठी, Soulartsindia.com.ही दुसरी कंपनी सुरू केली. हळूहळू तिचा जम बसत गेला वेबसाईट तयार करणे, कायदेशीर आणि आर्थिक बाजू सांभाळणें, इम्पोर्ट, एक्स्पोर्ट ची कायदेशीर माहिती मिळवणे ह्या सर्व बाबतीत निरंजनची तिला भक्कम साथ आहे. लोकांना जसजसे समजत गेले तसतसा ५०० ग्राहकांचा वॅाट्सॲप ग्रुप तयार झाला त्यांच्याशी संपर्क करत, काहीही व्यवसायाचा अनुभव नसतांना, बोलक्या, स्वभावामुळे तिला गिऱ्हाईकं मिळत गेली. गेल्या वर्षी 2023 गणपती ते दिवाळी मिळून तिने इतर अनेक वस्तूंबरोबर चितळ्यांची मिठाई मागवली आणि पूर्ण नॅार्थ अमेरिकेत त्याचे वितरण तिने केले. जवळ जवळ १००० किलो तिने त्यावेळी चितळ्यांचे पदार्थ विकले.
घरातच हॅालमध्ये, एका शेल्फ वर सामान ठेऊन तिने या व्यवसायाला सुरवात केली होती. कोविड नंतर लोकं तिच्या घरी येऊन सामान घेऊन जाऊ लागले. ती भारतातून नविन नविन पदार्थ मागवायला लागली. भाजणी, पिठं, कोकणातले पदार्थ, तळणीचे पदार्थ, खानदेशी पदार्थ, असे इतर दुकानात न मिळणारे पदार्थ तिच्या इथे मिळायला लागले. ती पदार्थ निवडीच्या बाबतीत काटेकोरं आहे. नीट पारखूनच ती चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी निवडते. त्यात अजिबात तडजोड करायची नाही. त्यामुळे तिच्याकडे मागणी वाढली आणि ध्यानी मनी नसतांना एक मोठी उडी त्यांनी घेतली. जवळपास काही भारतीय लोकांची मोठी स्टोअर्स असतांना, त्याच भागात एक दाक्षिणात्य माणसाचे दुकान विकायचे आहे असे कळले आणि मागणी वाढल्यामुळे, “घरातली जागा कमी पडते आहे तर घेऊया का हे दुकान विकत ?“ हा विचार मनांत डोकावायला लागला. “झेपेल कां ? एव्हढी मोठी जोखिम आणि या स्पर्धेच्या वातावरणात जम बसला नाही तर ?” गुंतवणूक मोठी होती, पण “करू याच” ह्या विचारानी पूर्णिमा आणि निरंजनने २०२२ च्या मे मध्ये ५००० स्क्वेअर फूटचे दुकान विकत घेतले. दिवसातले १८/१८ तास मेहनत करून या दोघांनी या २ वर्षात कोटीच्या घरात उलाढाल सुरू केली आहे. सध्या ३५०० प्रकारचे जिन्नस त्यांच्या SoulfoosIndia ह्या दुकानात मिळतात.
पूर्णिमाच्या मेहनतीचे फळ तिला मागच्या वर्षी मिळाले. “उद्योग अनुभव प्रतिष्ठान ठाणे” ह्यांचा “उद्योगदिप्ती” हा मानाचा पुरस्कार तिला मिळाला. तिचे अभिनंदन करतांना मी तिला विचारले, “तुला काय चांगले वाईट अनुभव आले ?” तेव्हा तिने तिच्या सकारात्मक विचारसरणी नुसार सगळे चांगलेच अनुभव आले, लक्षांत राहिले असे सांगितले.

“एकदा दिवाळीत माझा कंटेनर काही कारणांनी उशिरा आला. लोकांनी आधी पैसे भरून ॲार्डर दिली होती .मला खूप टेन्शन आले होते कि आता गिऱ्हाईकं कशी रिॲक्ट होतील ? पण त्यांनी सांगितलं काही हरकत नाही. जेव्हा दिवाळीचे पदार्थ येतील तेव्हा आम्ही दिवाळी साजरी करू हया त्यांच्या विश्वासाने भारावून गेले.“ “ह्याच विश्वासाने एकदा डलास मध्ये मोठे स्नो स्टॅार्म झाल्यामुळे अडकलेल्या UTD च्या विद्यार्थ्यांना मदतीसाठी निरंजन जाणार होता तर त्याच्या मदतीसाठी अनेक जण उस्फुर्तपणे आले, तर काहींनी पैसे पाठवले.”
पूर्णिमाने घेतलेल्या दुकानात किचन होते. त्यामुळे मराठी दुकान आणि त्या दुकानात बटाटेवडा नाही हे शक्यच नाही… त्यामुळे बटाटेवडा, वडापाव, साबुदाणा वडा, कोथिंबीर वडी, कांदेपोहे, साबुदाणा खिचडी, उसळ, मिसळ पाव, पियुष, श्रीखंड, मसाले भात, टॅामॅटो सार असे अस्सल मराठी खाद्य पदार्थ तिच्या दुकानात मिळतात.
सुरुवातीला कोल्हापुरी मालवणी चिकन, फिश हे ही करत होती. पण 2022 पासून Soulfoodsindia हे 100% शाकाहरी दुकान आहे.
“युनिक इंडियन ग्रोसरी स्टोअर्स“ या नावानी तिचे दुकान आता प्रसिध्द झाले आहे.
दुकानाबरोबरच आता शेजारीच एक Soul Arts and Events हा event हॉल घेतला आहे. जिथे डान्स क्लासेस, तसेच वीकएंड ला डोहाळजेवण, वाढदिवस गाणे असे छोटे समारंभ होतात. पार्ल्यातील विष्णू स्टोअर्स मधील गोड पदार्थ तसेच स्नॅक्स तिच्या दुकानात मिळतात.
पुढचे काय प्लॅन विचारल्यावर पौर्णिमाने सांगितले “महाराष्ट्रातील विविध प्रांतांमधील तसेच इतर राज्यातील घरगुती आणि दर्जेदार पदार्थ मला अमेरिकेत आणायचे आहेत. इतर भारतीय grocery store पेक्षा वेगळं पण दर्जेदार पदार्थ मिळणारे दुकान अशी ख्याती मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.“
“पार्ल्याच्या मंदार देशपांडे ह्यांच्याबरोबर “टेस्ट फॉर लाईफ” ह्या त्यांच्या ब्रँडची उत्पादने आता काही दिवसात soulfoodsindia मध्ये येऊ घातली आहेत. चितळ्यांचे काहीच पदार्थ अमेरिकेत मिळत होते . चितळे अमेरिका ह्या अंतर्गत चितळ्यांची उत्पादने आता अमेरिकेत मिळत आहेत. त्यातील निरंजन – पुर्णिमाचे Soul Foods India हे official Chitale outlet आहे .
पूर्णिमा आता “काहीतरी करूया “म्हणता म्हणता ”बरंच काही” करायला लागली आहे.
तिला लहानपणापासून ट्रेकिंगची आवड होती पण या व्यापात तिला वेळ मिळत नव्हता. काही व्यायाम हवा म्हणून तिने काही वर्षांपूर्वी सायकलिंग सुरू केले आणि यावेळी सायकलिंग टूरबरोबर युरोपला रोज ४०/५० किलोमिटर सायकल चालवत तिने २८४ किलोमिटर हे अंतर पार केले. यावेळी ती प्रथमच अशा टूरबरोबर गेल्यामुळे तिने ही टूर ईबाईक वापरून केली. पण तरी तिच्या ह्या नविन उपक्रमाचे मला कौतुक वाटले, कारण कुठल्याही वयात तुम्ही नविन गोष्ट जिद्दीने सुरू करू शकता, एखादं ध्येय समोर ठेऊ शकता.
पौर्णिमाच्या ह्या सर्व यशामध्ये तिच्या इतकाच तिचे पती निरंजन ह्यांचाही वाटा आहे. तिची मुलगी गौरी J W Marriat मध्ये इव्हेन्ट कोॲार्डिनेशर म्हणून काम करते आणि मुलगा एका कंपनीत कॅापी रायटर आणि क्रिएटिव्ह टीम मेंबर म्हणून काम करतो. शिवाय तो शॅार्ट फिल्म्स बनवतो.
पौर्णिमाची अशीच खूप प्रगती व्हावी म्हणून तिला खूप शुभेच्छा !

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Proud Parlekar
👌👏👏👏