हिरव्या गर्द काळोखात
काहीच दिसत कोणा नसते
आदिम ओढीची आस
त्याच्या दर्शनाची असते
पावसाळी कुंद हवा त्यात
धुक्यात हरवते वाट
थोडी थर थर अनामिक हुरहूर
मनीं भयाचे गारुड घाट
सावळे कृष्ण मय चहुकडे
ती अनाघ्रात कोवळी पहाट
सोनेरी किरणांच्या साठी
अंतरंग बघतोय वाट
आल्या टपटप धारा टपावर
जीप चालक जाई सुसाट
सुरक्षित जागी उभी करुनी
झाकण्याचा केविलवाणा थाट
वैदर्भीय ती गम्मत भाषा
काय तू करून राह्यलाय बे
याने सायबा भिजनार ना
फाटके गोणपाट आणलंय हे
अरे, चल आता लौकर बे
सैट सैट न सैट झालाय तो
टाईम उगाच घालू नको
तेथून राजा गेला तर्मग,बोलू नको
त्यांची धडपड पाहुनी आम्ही
नवलाने झालो दिग्मूढ
मनीं तरंग विचारांचे
सैट म्हणजे काय होते गूढ
जंगल झाले ते एकरूप
हिरवा एकांत पर्जन्यमय
चिंब गात्रे, मने ही ओली
जवळ येता दर्शन समय
गारठलेले अंग आमचे
त्यात भरे गाढ हुडहुडी
पण डोळ्यांचे फुलपाखरु
शोधते “त्याला” भिरभिरु
सगळे झाले चिडीचूप अन
आसमंती सारे मौन
देह झाला स्तब्ध अरण्य
नीरवतेत “त्याचे” आगमन
घनदाट झुडुपात,फांद्या कोवळ्या
नव किरणांच्या नक्षी सावळ्या
बघा चाललाय ऐटीने, मस्त
आमचे नयन त्यावर अविरत
जीप चालक होते शांत
सारे राजस दृश्य न्याहाळत
राजबिंडे ते रूप देखणे
अननभूत सौंदर्य पाहणे
सोन्याची रुणझुणणारी किरणं
त्यात “त्याचे” ते लखलखणं
पाडसांचे अवचित घाबरणं
डोळ्यांचे आमच्या पारणे फिटणं
त्या सम्राटाचे चालणे बघावे
जंगलात ” स्व” झोकून द्यावे
शहेनशहाच्या दर्शनाने
जणू जग ही थांबून जावे
मन झाले झाले रानभरी
निसर्गाच्या मी आले दारी
संपृक्ततेची मनें बावरी
आनंदाची दुनिया सारी

— रचना : सौ.स्वाती वर्तक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800