Friday, November 8, 2024
Homeसाहित्यअसे रंगले विदर्भ लेखिका साहित्य संमेलन

असे रंगले विदर्भ लेखिका साहित्य संमेलन

“लेखिका मैत्रिणींनो समाजात वावरताना डोळे कायम उघडे ठेवा .. कुठे काय चाललय.. ते बघा स्त्रियांचे प्रश्न आपल्या लिखाणातून मांडा.. आपल्यासाठी कोणीतरी काही करेल, या भ्रमात राहून नका. म्हणून मला असं वाटतं की तुझी तूच शोध दिशा. इतरांच्या कुबड्यांची गरज तुला नाही..
हे सांगण्यासाठीच …स्त्री सुरक्षा, समस्या व उपाय या विषयाचा उहापोह व्हावा या दृष्टिकोनातून मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान आणि सेवादल शिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित केल्या गेलेले दुसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन मला विशेष महत्त्वाचे वाटते.” असे उद्गार या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष सुप्रसिद्ध कादंबरीकार मा. विजयाताई ब्राह्मणकर यांनी काढले.

संत्रानगरी नागपूर मध्ये आयोजित दुसऱ्या विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर उद्घाटक डॉ. मनीषा यमसनवार, प्रमुख अतिथी मा. हेमांगी ताई नेरकर, स्वागताध्यक्ष मा. वृंदाताई संजय शेंडे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निरुपमा ढोबळे, मराठी विभाग प्रमुख डॉ. सुशील मेश्राम आणि या साहित्य संमेलनाची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळून असलेल्या मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रा. विजया मारोतकर उपस्थित होत्या़. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले परिसर असे नाव देण्यात आलेल्या संमेलनाच्या या परिसरात विदर्भातील नागपूर, वाशिम, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर अकरा ही जिल्ह्यांमधून उपस्थित झालेल्या लेखिकांची मांदियाळी भरली होती. उपेक्षित असणाऱ्या लेखिकाना मंच लाभावा व त्यांचे साहित्य नावारूपाला यावे. हा या साहित्य संमेलनाचा उद्देश होता.

2023 मध्ये अकोला येथे पहिल्या यशस्वि साहित्य संमेलनाच्या आयोजनानंतर दुसरे साहित्य संमेलन भरविण्याचे धाडस करणार्‍या विजया मारोतकर यांच्या धडाडीचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे. कारण साहित्य संमेलन नितांत यशस्वी झाले.

ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. ग्रंथपालखीमध्ये संविधानासह वैचारिक ग्रंथांचा समावेश होता. ज्यामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ होते. ग्रंथदिंडी मध्ये सेवादल महाविद्यालय व शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी आणि समस्त शिक्षक वृंद त्याचप्रमाणे माय मराठी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य सहभागी झाले होते.

महाविद्यालयाच्या परिसरात जबरदस्त वातावरण निर्मिती झाली. या चैतन्यमयी वातावरणात सर्वत्र साहित्य संमेलनाचे फलक लागलेले होते. रस्त्यापासून मुख्य प्रवेश दारा पासून मंचावर पोहोचत पर्यंत लागलेले अनेक आकर्षक फलक लक्ष वेधून घेत होते. आत प्रवेश करताना दोन्ही बाजूला असलेले शुभेच्छा फलक, विदर्भ लेखिका संघटनाच्या सुकाणू समितीचे फलक, अकराही जिल्हाध्यक्ष फलक, महाविद्यालयाचे फलक, याशिवाय एक सेल्फी स्टॅन्ड करून तयार करण्यात आलेला सेल्फी पॉईंट आकर्षणाचे केंद्र होते. यामुळे सारा परिसर नितांत देखणा झाला होता. फुलपाखरासारख्या भिरभिरणाऱ्या मराठमोळ्या वेषभूषातील सेवादल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा वावर नितांत मोहक होता. संमेलन उत्तम व्हावे याच कळकळीने प्रत्येक जण या परिसरात कार्यरत होता. त्यामुळे हे केवळ साहित्य संमेलन राहता एक चळवळ झालेली आहे. असे मुख्य आयोजक विजया मारोतकर यांनी प्रास्ताविकातून प्रस्तुत केले. त्या म्हणाल्या “विदर्भाच्या अकरा ही जिल्ह्यांमध्ये अशी साहित्य संमेलने घेऊन तळागाळातील लिहित्या लेखिकांना बाहेर आणण्याचा आमचा मानस आहे. तिचं जगणं जगापुढे याव याकरता अशा साहित्य संमेलनाची फार गरज आहे. यामुळे तिच्यात एक आत्मिक बळ येते आणि त्या सकारात्मक ऊर्जा तिच्या जगण्याला पुढे नेतात.”

उद्घाटक डॉ.मनीषा एमसनवर यांनी आयोजकांचे तोंडभर कौतुक करत ही आयोजने लेखिकांच्या ,महिलांच्या जगण्याच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे हे विषद केले. मा.हेमांगीताई नेरकर यांनी विदर्भाच्या मातीने मुंबईला साद घातली आणि हा दरवळ तिथपर्यंत आणला याबद्दल आभार मानले.

तर स्वागताध्यक्ष मा.वृंदा संजय शेंडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “अशा प्रकारची संधी मिळाल्यामुळे मला विशेष समाधान लाभले आहे.”

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.निरुपमा ढोबळे यांनी या महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत आपली भूमिका व्यक्त केली.

निशा डांगे यांनी प्रतिष्ठान नागपूरच्या अध्यक्ष मा.शुभांगीताई भडभडे यांनी पाठविलेल्या शुभेच्छांचे वाचन केले. तर डॉ. सुशील मेश्राम यांनी डॉ. यशवंत मनोहर आणि श्री विष्णू मनोहर यांच्या शुभेच्छांचे वाचन केले.

याप्रसंगी डॉ. जयश्रीताई पेंढारकर, जयश्रीताई रुईकर, अंजनाबाई खुणे आणि धनश्री लेकुरवाळे यांना विदर्भ स्त्री रत्न पुरस्काराने पुरस्कृत केले गेले. तर “विदर्भ शलाका” या साहित्य संमेलनाला समर्पित विशेषांकासह पाच पुस्तकांचे प्रकाशन झाले. ज्यामध्ये उज्वला तायडे यांचे “विज्ञानाचे कोडे” हा लेखसंग्रह, विजया मारोतकर यांचा “वेदनांच्या बांधावर “हा काव्यसंग्रह, ज्योती ताम्हणे यांचा “माझी एकाहत्तरी” हा काव्यसंग्रह, साधना काळबांडे यांचा “पाऊलखुणा” हा काव्यसंग्रह तर विजया मारोतकरांचा “ती वाचली पाहिजे” हा कथासंग्रह या पुस्तकांचे दमदार प्रकाशन झाले. या सत्राचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ साधना काळबांडे, निशा डांगे आणि उज्वला इंगळे यांनी केले.

यानंतर संपन्न झालेल्या दुसऱ्या सत्रात “वैदर्भीय लेखिकांचे वैशिष्ट्यपूर्ण लेखन” हा परिसंवादा चा विषय होता. डॉ.भारती खापेकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या सत्राला डॉ.मंदा नांदूरकर, अमरावती या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या सत्रामध्ये पद्मिनी घोसेकर यांनी आहारशास्त्राचे लेखन करणारे लेखिका डॉ. जयश्री पेंढारकर, डॉ. सीमा अतुल पांडे, डॉ. विद्या ठवकर यासारख्या लेखिकांच्या लेखनाची दखल घेतली.

डॉ वैशाली कोटंबे, अकोला यांनी बोलीभाषेचे वैशिष्ट्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखिका उषा किरण अत्राम, अंजनाबाई खुणे यांचा उल्लेख केला. उज्वला पाटील यांनी सामाजिक परिवर्तनाचे भान ठेवत लेखन करणाऱ्या लेखिका संमेलनाच्या अध्यक्ष ज्यांनी नातीगोती सांभाळण्याचा वसा जोपासला अशा विजयाताई ब्राह्मणकर यांचा उल्लेख केला. तर समाजात परिवर्तन घडवण्याकरता ‘पोरी जरा जपून’ चा ध्वज घेऊन धावणाऱ्या प्रा.विजया मारोतकर यांच्या साहित्यिक वाटचालीचा परामर्श घेतला.

निशा डांगे यांनी विदर्भातील कवयित्रींनी निर्माण केलेल्या “काव्यवसा” चा संदर्भ घेत त्यांच्या काव्य लेखना चि वैशिष्ट्यपूर्ण मांडणी केली. तर डॉ. सुनंदा जुलमे यांनी लेखनाशिवाय विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या लेखिकांच्या कार्याचा उल्लेख केला. टाकाऊतून टिकाऊ कला कौशल्य निर्माण करणाऱ्या नीता बोबडे, चित्रपट महामंडळावर संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या माधुरीता, अमरावती विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रमाशी संबंधित असलेल्या डॉ. ममता इंगोले, विमलताई देशमुख यांसारख्या व्यक्तिमत्त्वावर लेखन करणाऱ्या डॉ मंदाताई नांदुरकर यांच्या लेखनाचा उल्लेख केला. या सत्राची सूत्रसंचालन सीमा अतुल पांडे यांनी केले. तर आभार माया दुबळे मानकर यांनी मानले.

तिसऱ्या सत्रात गझल मुशायरा संपन्न झाला एडवोकेट मंगलाताई नागरे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या गझल मुशायरामध्ये एकापेक्षा एक 11 गझलकारांनी मुशायरा रंगदार केला आणि साहित्य संमेलन नितांत उंचीवर नेले ज्यामध्ये
स्मिता भूरकुंडे वर्धा, विजया मारोतकर नागपूर, अरुणा कडू नागपूर, किरण मोरे गोंदिया व अन्य गझलकार यांचा समावेश होता. या सत्राचे अतिशय सुरेख सूत्र संचालन निशा डांगे यांनी केले. आभार प्रदर्शन उज्वला इंगळे यांनी केले.

या संमेलनाचे विशेष आकर्षण असलेले “बाई पण भारी देवा” हे कविसंमेलन अध्यक्ष विजयाताई कडू यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले. मा.पल्लवी परुळेकर, मुंबई या प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होत्या. बाईच्या जगण्याचे विविध पदर उलगडत एकापेक्षा एक दमदार काव्य 30 कवयित्रींनी आपल्या कवितांमधून सादर केले. कोकिळा खोदनकर आणि धनश्री पाटील यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले तर विजया भांगे यांनी आभार मानले.

‘कलारंग’ या सत्रात विदर्भ लेखिकांसह संमेलनास हातभार लावणाऱ्या दोन्ही संस्थांच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला. मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे गोविंद सालपे यांनी राम गणेश गडकरी, डॉ. माधव शोभणे यांनी कुसुमाग्रज तर दशरथ अतकरी यांनी कविवर्य सुरेश भट भूमिका साकार केली. नीता अल्लेवर यांनी बहिणाबाई चौधरी साकार केली. यवतमाळच्या चमूने नितांत सुरेख असे कोलाज नृत्य सादर केले. सेवा दल संस्थेचे अध्यक्ष मा.संजयजी शेंडे यांनी बाबांवर सुरेख गीत सादर केले. तसेच अन्य दोन प्राध्यापकांनीही काव्यगायन केले. मेघा धोटे यांनी’ ती फुलराणी ‘सादर केली. अशा प्रकारे अनेकांनी कलारंग सत्रामध्ये सहभाग नोंदवत सर्वांगाने कलारंग फुलवला.

दुसऱ्या दिवशीची सुरुवात कथाकथन सत्राने झाली. डॉ. ममता इंगोले यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या कथाकथन सत्राला उदगीर लातूर येथून आलेल्या मा.अश्विनी निवर्गी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या सत्रामध्ये डॉ. वैशाली कोल्हे गावंडे, तृष्णा मोकडे, कोकिळा खोदनकर, स्मिता भोईटे यांनी स्त्री सुरक्षा समस्या आणि उपाय या विषयावरील दमदार कथा सादर केल्या. या सत्राचे सूत्रसंचालन विजया भांगे यांनी केले तर आभार डॉ. सीमा पांडे यांनी मानले.

“कौतुकाची पहिली थाप” हे परिसंवाद सत्र मा. स्मिता गोळे यांच्या अध्यक्षतेत पार पडले. या सत्रात स्मिता किडीले, धनश्री पाटील, माया दुबळे मानकर, नीता आलेवर, डॉ. जया जाणे, विजया भांगे, जयश्री जुगादे यांनी आपल्या जगण्याला उभारी देणारी ‘कौतुकाची पहिली थाप’ सुरेख रित्या विषद करताना या कौतुकाचे आयुष्यातील महत्त्व सांगितले. या सत्राचे अध्यक्ष माननीय स्मिताताई गोळे अध्यक्ष भाषण करताना म्हणाल्या की.. लेखिकांनो आपल्या सगळ्यांना कौतुक जरूर हवं असतं परंतु आपण साहित्यिक, कवयत्री आहे याचे भान ठेवा. कथा कविता चोरू नका. अन्यथा कौतुक होत नाही. आजकाल शीर्षकही चोरली जातात. तेव्हा असा प्रकार करून मिळवलेले कौतुक चिरकाल टिकत नसते अशी तंबी ही दिली. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ.वैशाली कोटंबे यांनी केले तर आभार उज्वला इंगळे यांनी मानले.

“जीवन गाणे गातच जावे” दुसरे कवी संमेलन चित्रपट महामंडळ माजी संचालक मा.माधुरीताई आशिरगडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले. या कवी संमेलनाला खामगाव येथील नीताताई बोबडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याही सत्रात जवळपास 30 कवी कवयित्रींनी आपल्या जगण्याविषयीचे सर्व विषय मांडणाऱ्या विविध अंगी कविता सादर केल्या. या सत्राचे सूत्रसंचालन उज्वला इंगळे आणि जयश्री जुगादे यांनी केले तर आभार विजया भांगे यांनी मानले. दोन दिवस चाललेले दुसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाच्या समारोप सत्राचे अध्यक्ष पद आदिवासी साहित्याच्या अभ्यासक उषाकिरण आत्राम यांनी भूषविले. आपले भाषणात त्या म्हणाल्या की, “फार काळ महिलांनी आपले दुःख काळजात लपवून ठेवले. ते दुःख साहित्य रूपाने पुढे येत आहे. हे संमेलन त्याची दखल घेत आहे. लेखिकांना संधी मिळाली तर त्या नक्कीच लिहित्या होतात. मी आता लेखणीची मशाल हाती घेतली आहे. सख्यांनो, तुम्हीही मशाल हाती घेऊन आकाश उजळून टाका”. यावेळी मंचावर संमेलना अध्यक्ष विजया ब्राह्मणकर, स्वागताध्यक्ष वृंदा शेंडे, प्रमुख अतिथी संजय शेंडे सन्ध्या राजुरकर, वामनराव खुणे, एडवोकेट मंगला नागरे, डॉ. सुशील मेश्राम. प्रा.विजया मारोतकर उपस्थित होते. आपल्या मनोगतात डॉ सुशील मेश्राम यांनी देहदान हा साहित्याचा विषय व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली.
श्री संजय शेंडे म्हणाले स्त्रीभ्रूणहत्या समाजाला लागलेला कलंक आहे. स्त्रियांनी लेखणीतून या प्रकारावर घणाघात करावा. संध्या राजुरकर यांनी महिलांनी स्वतःला कधीच लाचार समजू नका असे सांगितले संमेलनाध्यक्ष विजया ब्राह्मणकर यांनी संमेलनाचा आढावा घेत विदर्भाची लेखणी बळकट करण्याचे आव्हान केले.

या संमेलनात विविध ठराव पारित झाले.यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, (संमेलनानंतर भारत सरकारने हा दर्जा जाहीर केला आहेच !) इंग्रजी शाळेत मराठी भाषा अनिवार्य करावी, मराठी भाषा प्राधिकरण स्थापन करावे, माध्यमातील स्त्रियांच्या देह प्रदर्शन थांबावे यासह अकरा ठराव मंजूर करण्यात आले. एडवोकेट मंगला नागरे यांनी प्रस्तावाचे वाचन केले.
संचालन निशा डांगे आणि डॉ. साधना काळबांडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. विजया मारोतकर यांनी केले. अनेक अडचणींवर मात करून नागपूर नगरीमध्ये संपन्न झालेले दुसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन प्रचंड यशस्वी झाले. विदर्भाच्या 11 ही जिल्ह्यांमधून अनेक लेखिका उपस्थित झाल्या तर विदर्भाच्या बाहेरून पुणे, ठाणे, मुंबई, गोवा, वसई, अंबेजोगाई, उदगीर, लातूर येथून प्रमुख अतिथी विदर्भाच्या स्नेहामुळे उपस्थित झाल्या.

साहित्य संमेलन यशस्वी करण्याकरता सेवादल महाविद्यालयाचे प्रचंड सहकार्य लाभले. शेवटच्या क्षणापर्यंत सभागृह भरभरून होते. सभागृहामध्ये असलेला वेगळेच चैतन्य सर्वांनीच अनुभवलं. चिरकाल स्मरणात राहील अशा साहित्य संमेलनातून निरोप घेताना पाऊल जड झाले होते. राष्ट्रगीताने साहित्य संमेलनाचा समारोप झाला. जाताना सर्वांना भाजीपुरीचा टिफिन देण्यात आला आणि निरोप देण्यात आला. चिरकाल अविस्मरणीय राहील अशा साहित्य संमेलनाच्या आठवणी घेऊन विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लेखिका आपापल्या घरी परतल्या.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on मतदान करा हो मतदान…..
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण भाग : २२
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” – १२
माधुरी ताम्हणे on अनुकरणीय “आडे”बाजी !
माधुरी ताम्हणे on
माधुरी ताम्हणे on
विजया केळकर on
Manisha Shekhar Tamhane on
Shrikant Pattalwar on