सद्य परिस्थितीत अतिशय महत्त्वाची आहे, ती राष्ट्रीय एकात्मता. या दृष्टीने इखलास रमजान अंक हा राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेवर आधारित विशेषांक प्रसिद्ध केल्याबद्दल सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन. या विशेषांकात “आमचा वाडा” हा लेख समाविष्ट करण्यात आला आहे. हा लेख बरोब्बर दोन महिन्यांपूर्वी लिहिला असून तो पुढे देत आहे.
— संपादक

आजकाल राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक ऐक्य, बंधुभाव या वर खूप चर्चा होत असते. ती आवश्यकही आहे म्हणा कारण दिवसेंदिवस वातावरण फारच गढूळ होत चालले आहे.
आजच्या या वातावरणात मला सारखा आठवत राहतो, तो म्हणजे मी लहानपणी रहात असलेला आमचा मारवाल वाडा. आम्ही सर्व मारवाल वाड्यात भाडेकरू म्हणून रहात होतो. या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे वाड्यात कधी धर्म, जात, प्रांत, भाषा अशा कुठल्याही कारणाने कधीही भांडण तर सोडाच, वादविवाद, रुसवे फुगवे असेही कधी झाले नाही.
आमच्या एकदम शेजारी ए एस काझी राहायचे. ते रेल्वेत नोकरी करीत होते. उंचेपुरे, धिप्पाड, गोरेपान असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.सर्वच जण त्यांना काझीसाहेब म्हणायचे. ते आमच्या शेजारी रहायला आले आणि जेव्हा त्यांना हे कळाले की, आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत, आम्हाला मांस, मटण, मच्छी यांचा वास सुद्धा सहन होत नाही तर त्यांनी ते जवळपास सात वर्षे तिथे राहिले, तो पर्यंत त्यांच्या घरात कधीच मांसाहारी जेवण बनवले नाही.
काझी साहेबांची दुसरी आठवण म्हणजे माझ्या आईने फोडणीचे वरण बनवले की, त्यांच्या घरात फोडणीचा वास जात असे. फोडणीचा वास आला की, ते सहजपणे वाटी घेऊन पत्नीला किंवा त्यांच्या लहान मुलाला वरण घेण्यासाठी पाठवत. हे माहिती झाल्याने ज्या दिवशी फोडणीचे वरण असेल, त्या दिवशी आई एक वाटी वरण जास्तच बनवायची.
आम्ही सर्व काझी साहेबांच्या पत्नीला भाबी म्हणत असू. त्यांचा मुलगा किरण हा आम्हा सर्व मुलांमध्ये लहान असल्यामुळे सर्वच जण त्याचे लाड करायचो. पुढे त्यांची बदली भुसावळ येथे झाली. तरी कधी कामानिमित्त ते अकोल्याला आले की, वाड्यात एक चक्कर मारून सर्वांच्या गाठीभेटी घेऊन विचारपूस करीत असत.
आमचे इतर काही शेजारी, वाड्यातील इतर मंडळी म्हणजे बोर्डे, तायडे, जयस्वाल, पाताळबंसी, तोंडारे, भोसले आणि वाड्याजवळ राहणारे गुर्जर, रानडे,काळे, साबणाची फॅक्टरी असलेले पटेल असे आम्ही मुले एकत्र खेळत असायचो. तर मुली त्यांच्या त्यांच्यात खेळायच्या. स्त्रिया कामे झालीत की खुशाल एकमेकींशी बोलत बसायच्या. तर पुरुष मंडळी सुद्धा कधी एकमेकांना भेटली की एकमेकांशी नेहमी चांगल्या गप्पा मारत बसायची.
वाड्यात खूप गमती जमती ही व्हायच्या. त्यातील एक गोष्ट आठवली की आता खूप हसू येते. दर वर्षी मॅट्रिक ची परीक्षा आली की, आमच्या वाड्यातील दिवाकर बोर्डे याच्याकडे सकाळ, संध्याकाळ मॅट्रिक ची परीक्षा देणारी मुले आणि त्यांचे पालक खूप गर्दी करीत असत. कारण काय तर दिवाकर ला मॅट्रिक ची परीक्षा सात वेळा देण्याचा अनुभव होता, त्यामुळे तो जे आयएमपी प्रश्न काढतो, तेच परीक्षेत हमखास येतात म्हणे, अशी त्याची महती होती. गंमत म्हणजे तो स्वतः कधीच मॅट्रिक पास झाला नाही. तरी त्याच्या आयएमपी मुळे सर्वांकडून त्याला नेहमी मान मिळत असे.
मी लहान, म्हणजे दहा वर्षांचा असतानाच वडील वारले. हळूहळू आर्थिक परिस्थिती बिघडत गेली. मोटर मेकॅनिक झाले की, खूप पैसे मिळतात म्हणून मी केळकर गॅरेज मध्ये कामाला लागलो. तर आठवडा भर मला केळकरांनी गाडी पुसायचेच काम दिले. आधी गाडी पुसायला शिक, मग पुढे सहा महिन्यांपासून मेकॅनिक चे काम शिकायला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले. आठवड्याचे पैसे दिले, दोन रुपये. हे सर्व मी वाड्यातील माझा मित्र गणेश तायडे ला सांगितले. तर तो म्हणाला, या पेक्षा माझ्यासोबत बिर्ला कंपनीत चल. तिथे तर आठ तासांचे ३.६० पैसे मिळतात. म्हणून मग मी गणशा बरोबर त्या कंपनीत मजुरी करायला जाऊ लागलो. गणशा दहावीच्या पुढे जाऊ शकला नाही. पण त्याचा भाऊ रमशा (रमेश) मात्र शिकून पुढे सरकारी अधिकारी झाल्याचे पुढे कळाले.
वाड्यात एकत्र खेळताना, एकमेकांच्या घरी जाताना, विशेषत: गुर्जर, रानडे, काळे यांच्या सोबत असताना, ते कसे छान बोलतात, तसे आपण बोलले पाहिजे असे वाटून आम्ही त्यांच्या सारखे शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करायचो.
पुढे मी अपेक्षेप्रमाणे दहावीत नापास झालो. सर्वांना तोंड दाखवायची लाज वाटू लागली. म्हणून मग अकोला आणि पर्यायाने वाडा असे दोन्ही सोडले. घरमालक असलेले मारवाल सुद्धा घर खाली करून द्या म्हणून एकेकाच्या मागे लागले. ज्यांनी घरे खाली करून दिली नाहीत, त्यांच्यावर त्यांनी कोर्टात केसेस दाखल केल्या. अशा एक ना अनेक कारणांनी सर्व जण तो वाडा सोडून गेले.
आज मागे वळून बघताना लक्षात येते की, आमचा वाडा हा तर खरे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होता. कारण काझी हे मुस्लिम होते. बोर्डे, भोसले मराठा होते. आम्ही तीनचार मंडळी इतर जातीतील होती. तायडे अनुसूचित जाती चे होते. गुर्जर, रानडे, काळे ही मंडळी ब्राह्मण होती. साबणाचा कारखाना असलेले पटेल गुजराती होते. जयस्वाल उत्तर प्रदेशातून, तर पाताळबंसी हे मध्य प्रदेशातून आलेले हिंदी भाषक होते. पण आमच्या क्रिकेटच्या खेळात, विटी दांडू खेळताना, गोट्या खेळताना, एकमेकांची घरी काही खाताना, एकत्र अभ्यास करताना कधीही आम्ही एकमेकांपासून वेगळे आहोत, असे कधी जाणवलेच नाही. सर्व मंडळी रात्रीबेरात्री सुद्धा एकमेकांचे सुखदुःख आपले समजून सहजपणे साथ द्यायची. काही सामान, वस्तू, कधी दूध, साखर, चहा पावडर असे काही लागले की खुशाल एकमेकांना मागून वेळ भागवल्या जायची.
मला वाटते, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक ऐक्य वगैरे यापेक्षा वेगळे काय असू शकते ?

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
निवृत माहिती संचालक तथा संपादक न्यूज स्टोरी टुडे.
www. newsstorytoday.com
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
✊ उत्तम लेख आणि हीच खरी राष्ट्रीय एकात्मता
हीच खरी एकातमता सरजी