प्रिय आत्मिय सुह्रुद…….
हरी:ओम…..! नर्मदे हर……!
सुप्रभात, सादर स्नेहवंदन……!
आज दिनांक 14 ऑगस्ट…….. आजच्या दिवशी 1947 मध्ये “अखंड भारताचे” विभाजन होऊन आपणास हे “खंडित भारताचे स्वातंत्र्य” प्राप्त झाले .
भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीचा इतिहास हा त्याग, शौर्य, बलिदान व पराकोटीच्या पराक्रमाने भरलेला आहे. राष्ट्रमातेच्या स्वातंत्र्यासाठी बदला आणि बलिदानाची आण घेऊन “आजीवन व्रत” म्हणून लढलेल्या व राष्ट्रमातेच्या चरणी “आहुत” झालेल्या मृत्युंजयी महावीरांचे हे महाभारत आहे.
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना ।
असा भूतकालीन सिद्धांत जाणा ।
स्वराजेच्छुने पाहिजे युद्ध केले ।
रणावीण स्वातंत्र्य कोण मिळाले?।।
हा संदेश सतत जीवनध्येय म्हणून ध्यानी,मनी,चित्ती घेऊन राष्ट्रमातेच्या स्वातंत्र्यासाठी काया वाचा मनाने लढणाऱ्या हजारो, लाखो अनाम राष्ट्रभक्तांच्या “आत्म यज्ञातून” आज हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साकार होत आहे याची विनम्र तरीही सत्यान्वेशी जाणीव आपण सतत अंगी बाळगणे गरजेचे आहे, असे मला वाटते. आपणा सर्वास भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद होत आहे. अखंड भारत स्मृतिदिनाच्या आपणा सर्वास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!
आपण सारे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आत्मीयतेने उत्साहाने व देशभक्तीच्या भावनेने साजरा करीत आहोतच. ज्याला जसे जमेल तशी भारत मातेची काया,वाचा, मनाने अविरत,आजीवन सेवा करणे हिच खरी राष्ट्रभक्ती……! क्रांतिकारकांचे राजपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याविषयी आपणास स्वच्छ संदेश दिला आहे ते म्हणतात……..
की घेतले व्रत हे नच अंधतेने।
लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने।
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे ।
बुद्ध्याची वाण करी हे धरीले सतीचे ।।
कोणत्याही व्यक्तिगत लाभाशिवाय, प्रसिद्धी परांङमुख होऊन, समाज समर्पित भावनेने राष्ट्रमातेची सेवा करणे हे सतीच्या व्रतापेक्षाही अधिक खडतर, विश्व कल्याणकारी व लोकोपयोगी महा व्रत आहे यात मला तरी शंका नाही. म्हणूनच आजच्या मंगलदिनी आपल्या प्राण प्रिय राष्ट्र मातेचे गुणगौरव गान करणे हे आपणा प्रमाणेच माझाहि आनंदाचा व गौरवाचा विषय आहे.
तात्याराव सावरकरांप्रमाणेच लाखो अनाम राष्ट्रभक्तांनी राष्ट्रमातेच्या पूजनास्तव स्विकारिलेले “आत्म बलिदानाचे” हे व्रत जाणून बुजून बुद्ध्याच स्वीकारले होते हे आज आपण दुर्दैवाने विसरलो आहोत. या स्वातंत्र्याच्या ध्यासापोटी हजारो वंश, कुळे व कुटुंब नामशेष झाले, ज्यांचा इतिहासात नामोल्लेख सुद्धा नाही. आज त्या अनाम क्रांतिकारकांना/हुतात्म्यांना व राष्ट्रभक्तांना स्मरणे अतिशय आवश्यक आहे. या स्वातंत्र्याच्या ध्यासाचे महन्मंगल गान गाताना अलौकिक व एकनिष्ठ सावरकर भक्त श्री गोपाळराव गोडसे म्हणतात……..
स्वातंत्र्याचा ध्यास कुणा दे, कठोर कारावास ।
अंदमानचा वास कोणाच्या गळ्यात येई फास ।
कुणास विरोहोच्छास कुणी हो जननिंदेचा घास ।
शाईने का लिहिला जाई राष्ट्राचा इतिहास ?।।
या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह, असहकार आंदोलन व यथाशक्य प्रयत्न करणाऱ्या हर एक राष्ट्र भक्ताच्या प्रयत्नास मानवंदना देताना या स्वातंत्र्याच्या प्राप्तीचा खरा मान हा क्रांतिकारकांचा व राष्ट्रीय यज्ञात आत्महुती देणाऱ्या वीरांचा आहे हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. स्वातंत्र्यास्तव प्रत्येकाने दिलेल्या योगदानाचे महत्त्व आहेच, पण केवळ सामान्य मार्गाने व नि:शस्त्र प्रतिकारने स्वातंत्र्य मिळाले असते, तर क्रांतिकारक उगाच फासावर का गेले असते ? हेही आपण ध्यानात घेणे गरजेचे आहे. म्हणून आपण अतिशय कष्टाने मिळवलेले हे स्वातंत्र्य आता “आचंद्र सूर्य” आपल्या देशात नांदण्यासाठी आपण सर्वांनीच व विशेषत: तरुणाईने कटिबद्ध होणे गरजेचे आहे.
इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या ठरावावर बोलताना इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान यांनी जे स्पष्टीकरण दिले होते त्यात ते म्हणतात …….
Britain is transporting power due to the fact that…..
1) The Indian mercenary army is no longer loyal to britain, and
2) Britain cannot afford to have large British army to hold down India.
दिनांक 29 मार्च 1857 रोजी शहिद मंगल पांडे यांच्या महन्मंगल उठावातून सुरू झालेला भारतीय स्वातंत्र्याचा हा “राष्ट्रीय क्रांती यज्ञ” लाखो क्रांतिकारक व राष्ट्रभक्तांच्या अथक व अतुलनीय प्रयत्नातून दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी, खंडित का होईना, पण भारताच्या स्वातंत्र्यात परिवर्तित झाला याचे शल्य मानावे कि आनंद ? याचाही विचार करणे आज गरजेचे आहे. असो, आज या महन्मंगल प्रसंगी अन्य चर्चा न करता राष्ट्र कार्यार्थ तन, मन, धनाने योगदान देणाऱ्या सर्व आंदोलक, राष्ट्रभक्त, क्रांतिकारक, लेखक, विचारवंत व योद्धांच्या चरणी शतशः नतमस्तक होऊ या व त्यांचे आपल्यावर ऋण आहे याचे सतत स्मरण ठेवूया.
या सर्व ज्ञात अज्ञात राष्ट्रभक्त व क्रांतिकारकांना मानवंदना देताना मला असे म्हणावेसे वाटते की……..
भारत माते पुत्र शहाणे अमित तुला लाभले।
कुशीत तुझ्या परी जन्मली काही वेडी मुले।
काही वेडी मुले जयांची हरखून गेली मने।
क्रांती पूजा केली ज्यांनी रुधीराच्या तर्पणे।।
परतंत्र शुंखलेचा तोडावयास पाश ।
पेटून यज्ञकुंड, उठले, सहस्त्रदास ।
एकेक जीविताची समिधा जिवंत झाली ।
स्वातंत्र्य मंदिराची पूजा सजीव झाली ।।
सर्वस्व त्यागुनिया मग एक एक उठले ।
नरवीर अग्रणी ते मृत्युंजयीच ठरले ।
त्या सुप्त शक्तींना हा माझा लवून मुजरा ।
येतो सुवास अजूनही त्यांचाच मृत्तिकेला ।।
माझ्या काव्य प्रवासाचे आपण सारे सन्माननीय, सजग व संवेदनशील साक्षीदार आहात. मला सुचलेली प्रत्येक कविता मी आजपर्यंत अवलोकनार्थ आपणास पाठवीत आलेलो आहे. आपण दिलेल्या सूचना, प्रेरणा, आशीर्वाद व शुभेच्छा यांच्या बळावर माझा हा काव्य प्रवास यथामती सुरू आहेच. आज आरती या काव्यप्रकारातील एक कविता आपणास पाठवीत आहे. परमपूजनीय स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी रचलेल्या मूळ —
“आरती भारत माता की जगत के भाग्य विधाता की” या आरतीचा मला सुचलेला मुक्त भावानुवाद आहे. अवघ्या मराठी मनांचा श्रद्धा भाव मी या आरतीतून प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे. अंतरीच्या आर्तर्तेतून प्रकटते ती “आरती” अशी माझी याबद्दलची आत्मीय धरणा आहे.
हा भाव अधिक सघन,सम्रुध्द व प्रासादिक व्हावा म्हणून मी गेली चार वर्ष अनेक मान्यवर व विद्वानांकडे ही आरती पाठवून ती अधिक निर्दोष करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंदीमधील सुप्रसिद्ध “आरती कुंजबिहारीकी” या आरतीच्या चालीत व या आरतीच्या अनुबंधातच ही आरती रचलेली आहे. राष्ट्र मातेच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना राष्ट्रमाते बद्दल वाटणाऱ्या हृदयस्थ भावना आपणास या शब्दातून प्रकट करावयास आवडतील म्हणून आपणास ही आरती पाठवीत आहे.
श्री भारत मातेच्या आरतीचे हे प्राकृत देशीकार लेणे आज मी “महाराष्ट्र शारदेच्या चरणी” समर्पित करीत आहे. आपणास हवा तेव्हा व हवा तिथे आपण या आरतीचा राष्ट्रकार्यार्थ व आत्मतृप्ती साठी विनियोग करावा ही आपणास प्रार्थना…..!
पुनश्च एकदा आपणास भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा……!
…….. अधिक काय लिहिणे ?
आमचे आगत्य असो द्यावे…!
कळावे, धन्यवाद….!
— लेखन : योगेशवर उपासनी. अमळनेर, जि. जळगाव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800