स्पर्धा परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी
“आम्ही अधिकारी झालो”
आपण पहातो की शक्यतो,एका पुस्तकावर एकच परीक्षण प्रसिद्ध होत असते.पण विशेष म्हणजे “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकावर स्वयंस्फूर्तीने एक नव्हे तर चक्क सहा परीक्षणे लिहिल्या गेली आहेत. वस्तुतः ही परीक्षणे इतर वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली आहेत. पण तरीही या समीक्षकांची अशी अपेक्षा आहे की, ही परीक्षणे आपल्या पोर्टल वर देखील प्रसिद्ध व्हावीत. म्हणून आज पासून सलग सहा दिवस, रोज एक या प्रमाणे सहा परीक्षणे प्रसिद्ध करीत आहे.
आज, पहिले परीक्षण वाचू या…. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख, पत्रकारितेचे ज्येष्ठ अभ्यासक, अनेक इंग्रजी पुस्तकांचे लेखक, प्रा डॉ किरण ठाकूर यांनी लिहिलेले परीक्षण.
ठाकूर सर आणि अन्य सर्व समीक्षकांचे मनःपूर्वक आभार.
– संपादक
अत्यंत बिकट परिस्थितीत जन्मलेल्या, स्व:कर्तुत्वावर विश्वास असलेल्या, नशिबाला बोल लावत बसण्यापेक्षा यश आपल्याकडे खेचून आणणाऱ्या ३५ स्त्री-पुरुष अधिकाऱ्यांच्या यश कथा या “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकात गुंफलेल्या आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाच्या यूपीएससी किंवा एम पी एस सी परीक्षा बाबतीत एक दोन प्रयत्नात यशस्वी होणे कठीण असते असा लक्षावधी युवक युवतींचा अनुभव असतो. परंतु या यश कथांच्या नायक नायिकांनी मात्र जिद्द न सोडता यश कसे मिळवायचे याची दिशा दाखवून दिली आहे.
पुस्तकाचे लेखक आणि संपादक देवेंद्र भुजबळ यांनी स्वतःची देखील यशकथा (क्रमांक २१ : दहावी नापास ते माहिती संचालक) गुंफली आहे. प्रत्येक कथा दोन-तीन पानातच तुम्हाला भारून टाकते.
या पस्तीस पैकी प्रत्येक यश कथेचं शीर्षक तुमचे लक्ष वेधून घेते. नमुन्यादाखल ही शीर्षके पाहा :-
दारू विकणारीचा मुलगा झाला आय ए एस
भिकारी झाला अधिकारी
मजुराची मुलगी झाली आय ए एस
कॅन्टीनबॉय ते जॉईंट सेक्रेटरी
पोरकी पोर झाली अधिकारी
डेअरीबॉय ते विक्रीकर सहआयुक्त
ग्रामकन्या ते आयपीएस
लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी
तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर
जेल सुधरविणारा अधिकारी
मुलींना आय ए एस करणारी आई
सून आधी झाली फौजदार मग झाली तहसीलदार
यातील काही निवडक कथांचा सारांश वाचला तर लेखकाने किती परिश्रमपूर्वक यश कथा नायकांची निवड केली हे कळेल. लेखक देवेंद्र भुजबळ महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी आणि जनसंपर्क विभागाचे अत्यंत यशस्वी अधिकारी होते. त्यांच्या कामाचा मूलभूत प्राथमिक भाग बातमी आणि लेख यासाठी लेखन करणे हा होता. त्यामुळे या पुस्तकातील प्रत्येक कथा रंजक आणि आपल्या वाचकांना उपयुक्त झाली आहे यात नवल ते काय !
त्यांच्या पुढील काही यश कथांचा सारांश वाचला की या त्यांच्या मूळ संकल्पनेचा आणि त्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा गाभा लक्षात येईल.
कर्नाटकाच्या रायचूर जिल्ह्यात जवलगेरा या अत्यंत मागासलेल्या दुर्गम गावात एका अगदी छोट्या शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले जी श्रीकांत यांची करिअरची सुरुवात रेल्वे मध्ये तिकीट कलेक्टर म्हणून झाली. या नोकरीमुळे त्यांनी देश पाहिला. भले बुरे अनुभव घेतले. दूर शिक्षण पद्धतीत बी कॉम शिकून पदवी मिळविली. मित्राकडून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची माहिती मिळाल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा पाठपुरावा करीत आपले ध्येय गाठले. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात पहिली नेमणूक झाल्यानंतर कष्टाने आणि कल्पकतेने लोकांची कामे करून दाखविली.
नव्या मुंबईत कोपरखैरणे परिसरात बांधकामाच्या ठिकाणी कष्ट उपसत पोट भरणाऱ्या, बंजारा समाजातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या स्वाती मोहन राठोड या कन्येने आय ए एस ची परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली. याचे श्रेय तिच्या आई वडिलांचे. नंतर सोलापूरला मोल मजुरी करून आणि हातगाडीवर भाजी विकून या दोघांनी आपल्या चार मुलांना शिकवले. स्वाती त्यापैकी एक.
नंदुरबार जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या सामोदे गावात काम करणाऱ्या आदिवासी महिलेच्या मुलाची ही कहाणी अविश्वसनीय अद्भुत सुरस आणि चमत्कार वाटेल अशी आहे. मजुरीवर भागत नाही म्हणून आपल्या झोपडीतच दारू विकणाऱ्या महिलेचा हा मुलगा. गुत्त्याची गिऱ्हाईक त्याला जवळच्या दुकानातून चखणा आणण्यासाठी पैसे देत. थोडी त्यालाही बक्षीशी देत. त्यातून त्यांनी आपल्या शाळेची पुस्तकं, वह्या यांचा खर्च भागवला. पण शिक्षणाची त्यांची ओढ कायम राहिली. शाळा कॉलेज करीत मुंबईच्या सेठ जी एस मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. पण तेवढ्याने त्यांचेचे समाधान झाले नाही म्हणून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसले. पहिल्याच प्रयत्नात ते 2013 मध्ये उत्तीर्ण झाले. आपल्याच मूळ नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत झाले. कोरोना च्या काळात त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केले. त्यांच्या नवनव्या संकल्पनेची शासनात आणि समाजात प्रशंसा झाली. लिहिलेल्या “मी एक स्वप्न पाहिले” हे पुस्तक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरले आहे.
‘मी पोलीस अधिकारी झाले’ या शीर्षकाखाली पुस्तक लिहिलेल्या सुनिता कुलकर्णी नाशिककर यांची यश कथा थोड्या वेगळ्या कारणासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महिलांना उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात भरती होण्याची संधी दिली, त्याला आता तेवीस वर्षे होऊन गेली. पहिल्या बॅचमध्ये निवडलं गेलेल्या २६ महिलांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावच्या त्या कन्या. त्यांच्या ट्रेनिंगच्या बॅचमध्ये ५०० पुरुष ट्रेनी होते. त्यात समावेश होता सुनिता नाशिककर यांचा. त्यानंतर पदोन्नती होत होत त्या शेवटी कोल्हापूरला पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्यांचे अनुभव चित्तथरारक आहेत. त्यावर आधारित त्यांचे पुस्तक तरुण मुला-मुलींना प्रशासनात प्रवेश मिळण्यासाठी प्रेरणादायक आहे.
स्वतःचा काहीही दोष नसताना अपघातामुळे अंधत्व आलेल्या सुजाता बाळासाहेब कोंडीकिरे यांनी मुंबई च्या वरळीच्या नॅशनल स्कूल ऑफ ब्लाइंड मध्ये प्रशिक्षण घेऊन ब्रेल लिपी शिकून एम एस सी आय टी चा अभ्यासक्रम तर पूर्ण केलाच, पण महाराष्ट्र लोकसेवा सिलेक्शन आणि बँकेच्या परीक्षा त्या उत्तीर्ण होत गेल्या वर्ष 2015 मध्ये होत गेल्या संपूर्ण भारतात निवड झालेल्या सात अंध व्यक्तींमध्ये ही एकमेव महिला निवडली गेली. पुस्तके वह्या वाचता येत नव्हत्या. सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास त्यांनी केवळ रेडिओ आणि टेलिव्हिजन चॅनल्स ऐकून, त्यांच्या शिक्षकांनी फोनवर केलेले मार्गदर्शन याचा उपयोग करून त्यांनी परीक्षेत प्राविण्य मिळवले. अंधत्वावर तर मात त्यांनी केलीच पण नैराश्य पूर्णपणे झटकून टाकले. डोळस विद्यार्थ्यांना देखील जमणार नाही असे यश त्यांनी मिळवून दाखविले.
मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षिकेची कन्या तेजस्वी सातपुते. इंडियन पोलीस सर्व्हिस, आयपीएस मध्ये प्रविष्ट होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या. कोरोनाच्या काळात सातारा पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी मोठी कामगिरी करून दाखवली. थोड्याच दिवसात कर्तबगारी दाखवीत त्या मुंबई पोलीस मध्ये उपायुक्त पदावर त्या आता (2024) मध्ये कार्यरत आहेत.
या यश कथा युवक युवतींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी जशा रंजक आणि प्रेरणादायी आहेत तशीच या पुस्तकाच्या निर्मितीची कथा देखील आगळी वेगळी आहे. लेखक संपादक देवेंद्र भुजबळ आणि प्रकाशिका सौ. अलका देवेंद्र भुजबळ यांनी निर्मिलेले हे पुस्तक इतर प्रकाशनांपेक्षा वेगळ्या पद्धतीने निर्मिले आहे. आपापल्या आधीच्या मूळ कार्यक्षेत्रापेक्षा सेवानिवृत्तीनंतर हाती घेतलेले समाज प्रबोधनाचे काम करताना त्यांनी न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टल च्या प्रकाशनाची जबाबदारी हाती घेतली. पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून त्याकडे न बघता मराठीमध्ये लिहू शकणाऱ्या बंधू भगिनींना त्यांनी लिहिते केले. जगभरातील ओळखीच्या किंवा अनोळखी असलेल्या असंख्य लेखक लेखिकांना प्रेरित केले. गेल्या तीन चार वर्षातच रंजक माहितीप्रद कथा, कविता, लेख, फोटो आणि व्हिडिओ अशी साधने वापरली. त्यातून आठ पुस्तके आपल्या या प्रकाशनच्या प्लॅटफॉर्मवर प्रकाशित केली. त्या नंतरचे हे नववे पुस्तक १४६ पानात गुंफलेले आहे. सर्व यश कथा नायक नायिकांचे फोटो आकर्षकरित्या मुखपृष्ठाच्या चौकटीत त्यांनी नेटकेपणाने बसवले. त्यातून बाहेर आले ते “आम्ही अधिकारी झालो” या शीर्षकाचे पुस्तक. केवळ एका महिन्यात या पुस्तकाची पहिली आवृत्ती हातोहात संपली. दुसरी आवृत्ती काढण्याची मागणी सतत येत असताना महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या हस्ते औपचारिक लोकार्पण समारंभ झाला. त्या पाठोपाठ संपादक प्रकाशक आणि त्यांचे स्नेही यांच्या समवेत जपानच्या प्रवासात असताना पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे नियोजन झाले देखील.
…
निर्मिती श्रेय, लेखक संपादक : देवेंद्र भुजबळ.
प्रकाशक : सौ अलका देवेंद्र भुजबळ. प्रकाशन क्रमांक नऊ
न्यूज टुडे पोर्टल चे प्रकाशन…
— पुस्तक परिचय लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
ई-मेल drkiranthakur@gmail.com