श्री प्रकाश बाळ जोशी यांच्या “मैत्रिणीची गोष्ट” या पुस्तकाचा हिंदी अनुवाद “सहेली की कहानी” हा नुकताच मुंबई मराठी पत्रकार संघात उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल श्री राम नाईक यांच्या आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाला आणि त्या निमित्ताने प्रकाश बाळ जोशी यांचा जीवन प्रवास माझ्या डोळ्यांपुढे तरळू लागला.

मुंबईतील १९९२ च्या दंगली झाल्या, त्यावेळी मी अलिबाग येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करत होतो. तत्पूर्वी मी मुंबई दूरदर्शन केंद्रात कार्यरत असल्याने, माझा दूरदर्शन मधील अनुभव लक्षात घेऊन मला मंत्रालयात बोलवून घेण्यात आले आणि माझ्याकडे मा. मुख्यमंत्री यांचे टिव्ही कव्हरेज करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्या दंगली शमल्या. सत्तांतर झाले आणि मी पुन्हा अलिबागला परतलो. पण १९९३ च्या जून महिन्यात माझी मंत्रालयातील वृत्त शाखेत वरिष्ठ सहायक संचालक म्हणून रितसर बदली करण्यात आली.
वृत्त शाखेत बदली झाल्याने मंत्रालय कव्हर करणाऱ्या विविध वार्ताहरांशी माझा नियमितपणे दैनंदिन संबंध येऊ लागला. त्या वेळी दोन तीन वाहिन्या सोडल्या तर अन्य वाहिन्या नव्हत्याच आणि सोशल मिडीयाचा मागमूस देखील नव्हता. त्यामुळे अनेक पत्रकारांशी व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आणि ते आजतागायत टिकून आहेत.
आज इंग्रजी पत्रकारीतेत असंख्य मराठी नावे दिसतात हि आनंदाची, अभिमानाची बाब आहे. पण तीस पस्तीस वर्षापूर्वी इंग्रजी पत्रकारीतेत हाताच्या बोटावर मोजण्या इतपत मराठी नावे होती. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे प्रकाश बाळ जोशी यांचे होय. त्यावेळी ते टाईम्स ऑफ इंडिया या प्रख्यात इंग्रजी वृत्तपत्राचे राजकीय प्रतिनिधी होते. इतक्या मोठ्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी असूनही त्यांच्या वागण्याबोलण्यात नेहमी शालीनता असे. मुख्यमंत्री, मंत्री यांच्या पत्रकार परिषदेतही ते कधी मोठ्या आवाजात प्रश्न विचारत नसत. अतिशय संयमित असे त्यांचे व्यक्तीमत्व होते आणि अजूनही ते तसेच आहे !
पत्रकारितेत असताना श्री जोशी बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्ट या पत्रकारांच्या संघटनेचे नेतृत्व करीत असत. तसेच ते मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष ही होते. महाराष्ट्र शासनाने आता जरी पत्रकारांसाठी सन्मान योजना लागू केली असली तरी या योजनेचा प्रारंभापासून श्री जोशी यांनी केलेला पाठपुरावा विसरता येणार नाही. टाईम्स ऑफ इंडिया त २५ वर्षे आणि पत्रकारितेतील एकूण ४० वर्षांची गौरवशाली सेवा बजावून ते निवृत झाले.
नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी येथे मराठी माध्यमात शिक्षण घेतलेल्या, पुढे पुणे येथील एस पी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्युट मधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या नंतर पुण्यातीलच केसरी, सकाळ या मराठी वृत्त पत्रातून पत्रकारिता सुरू करून त्यांनी मुंबई गाठली.
मुंबईत आल्यानंतर श्री जोशी यांनी फ्री प्रेस जर्नल, इंडीयन एक्स्प्रेस, डेली आणि शेवटची टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात केलेली पत्रकारिता अचंबित करणारी आहे.

एखादी व्यक्ती एखाद्या नोकरी किंवा व्यवसायातून निवृत्त झाली की तिचे करिअर संपल्यातच जमा होते. पण पत्रकारीतेतून निवृत झाल्यावर जोशीनीत्यांच्या आवडीच्या चित्रकलेला पूर्ण वेळ वाहून घेतले. हळूहळू त्यांचे चित्रकार म्हणून केवळ राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव होऊ लागले. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भारताबरोबरच अमेरीका, इटली, फ्रांस, जर्मनी, स्वित्झर्लंड, सिंगापूर, भूतान इत्यादी देशांमध्ये यशस्वी झाले. इतकेच काय, ब्रिटीश पार्लमेंट च्या कमिटी रुममध्ये चित्रकलेतील योगदानाबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. त्यामुळे पत्रकारितेतील निवृत्तीनंतर आता ते चित्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.

पत्रकार, चित्रकार म्हणून नावलौकिक मिळविलेल्या प्रकाश बाळ जोशी यांनी साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. गेल्या चार दशकात त्यांनी लिहिलेल्या विविध कथा “प्रकाश बाळ जोशी कथा” या पुस्तकात संकलित करण्यात आल्या आहेत. या कामी त्यांचे मित्र, जेष्ठ लेखक श्री अर्जुन डांगळे यांनी पुढाकार घेऊन महत्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट कथा पुस्तकासाठी देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण हा पुरस्कार या पुस्तकाला प्राप्त झाला आहे.
विशेष म्हणजे या पुस्तकाचा गुजराती, हिंदी, इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला असून मल्याळम आणि फ्रेंच भाषेतील अनुवादाचे काम सुरू आहे.

सत्यकथा, साधना, श्रीशब्द या नियकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या जोशी यांच्या कथा “मैत्रिणीची गोष्ट” या पुस्तकात समाविष्ठ करण्यात आल्या आहेत. तर “गेटवे” या पुस्तकात मुंबईतील जगण्याची आव्हाने आणि विरोधाभास दाखवण्यात आला आहे. “पोल बुक २०००” या इंग्रजी पुस्तकात महाराष्ट्राच्या स्थापनेपासून झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा संशोधन पर अभ्यास केलेला आहे.
अशा प्रकारे प्रकाश बाळ जोशी यांनी वयाच्या आकडेवारीत न पडता पत्रकारिता, चित्रकला आणि साहित्य क्षेत्रात उमटवलेला आणि उमटवीत असलेला ठसा निश्चितच गौरवशाली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : देवेद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
श्री. जोशी साहेबांनी आवडीने छंदाचे सोनं केले.
सर, तुम्ही ते खूप छान मांडले आहे.
छंदातून अर्थप्राप्ती न करता आनंद प्राप्त करता येतो हेच जोशी सरांनी कृतीतून दाखवले आहे.
संपादक भुजबळ साहेबांनी सुंदर लेख(आठवण) लिहीला आहे.
गोविंद पाटील जळगाव.
सलाम सर
पत्रकारितेतलं ग्रेट व्यक्तिमत्व🙏
🙏 Sir, really this is Very nice, Super, & Amazing. . Not only me, but we all ” Igatpurikar ” friends proud of you.
Congratulations Dear Mr. प्रकाश जोशी. 💐👍🤝
God bless you.
अशिच उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहो. आणि आपल्या इगतपुरी शहराची शान वृद्धिंगत होत राहो.
रिटायर न होता सतत काम करणं ही जपानी माणसाची खासियत. पण प्रकाश बाळ या भारतीयाने सेवानिवृत्तीनंतर आपले पॅशन ओळखून चित्रकला आणि साहित्यात भरीव कामगिरी केली याचे सुरेख चित्रण भुजबळ सरांनी केलंय.