बाल काव्यसंग्रह लिहिणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. कारण मुलांना भावतील, त्यांना सहज म्हणता येतील, गुणगुणता येतील अशा सोप्या शब्दात तसेच मुलांच्या भाव विश्वाला आणि कल्पनेला लक्षात घेऊन कविता साकाराव्या लागतात.
आपले तीन काव्यसंग्रह “मानसमेघ, अमन, आयाम” व एक चारोळी संग्रह “उमेद” च्या प्रकाशनानंतर कवयित्री मलेका शेख-सय्यद यांनी “अक्षर अक्षर शिकूया” हा बाल काव्यसंग्रह लिहिला आहे. काव्यसंग्रह इतका सुंदर आहे कि पाहताच वाचण्याचा मोह आवरत नाही. मनातील एक लहान बालक पुन्हा जागा झाला व मी माझ्या लहानपणात रमून गेलो असे वाटले. कारण संपूर्ण काव्यसंग्रहात ए.आय. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक कवितेला साजेल असे चित्र साकारले आहे.
काव्यसंग्रहाचे मुखपृष्ट ज्योती घनश्याम यांनी ए .आय. तंत्रज्ञानाचा वापर करून रेखाटले आहे. मुखपृष्टावर शाळेतील वर्गाचे चित्र रेखाटले आहे जे काव्यसंग्रहाला छान शोभून दिसते.
कवयित्री मलेका शेख-सय्यद यांनी आपला हा काव्यसंग्रह भावंडांना व मुलांना समर्पित केला आहे. या काव्यसंग्रहास लाडोबा प्रकाशनाचे प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रस्तावना दिली आहे तर पाठराखण साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्राप्त कवी एकनाथ आव्हाड यांनी केली आहे.
कवयित्री मेलका शेख-सय्यद या शिक्षिका असल्यामुळे त्यांचे भोवताल मुलांच्या भावभावनांनी व्यापले आहे. त्यामुळे मुलांच्या कल्पनांचा विचार करणे आणि काव्यात उतरवणे मलेकाजी यांना शक्य झाले आहे.मलेकाजी आपल्या मनोगतात म्हणतात, “बालमन हे भन्नाट कल्पनांनी भरलेलं असतं. मुलांच्या मनात सतत नवीन काहीतरी करण्याची इच्छा असते. एकच एक गोष्ट करून ते कंटाळतात. त्यांना नवीन काहीतरी हवं असतं. मुलांना काहीतरी नवीन वाचनासाठी द्यावं जे त्यांना आवडेल.” हा हेतू पूर्ण करण्यासाठी मलेकाजींनी या बालकाव्यसंग्रहाची निर्मिती केली आहे.
या काव्यसंग्रहात मुलांमध्ये संस्कार बीज मलेकाजी सहज पेरतात. कोणताही व कसलाही प्रबोधनाचा आव न आणता त्यांनी मुलांना अनेक चांगल्या सवयी या काव्यसंग्रहात सांगितल्या आहेत.
या काव्यसंग्रहात पर्यावरणाविषयी जागृती केली आहे, डोंगरांचं, झाडांचं महत्व सांगितलं आहे, त्याचबरोबर खेळाचे महत्त्व पटवून दिले आहे.
काव्यसंग्रहातील पहिलीच कविता “अक्षर अक्षर शिकूया” त्यामधील पुढील ओळी मुलांवर संस्कार करताच सोबत वाचनाची आवड निर्माण करताना.
सावित्रीमाई व जिजाऊ यांची आठवण ही करून देताना कवयित्री पुढील ओळी लिहितात….
“पुस्तक आपले आहे सोबती
शिकता शिकता सर्व बोलती
सावित्री, जिजाऊ आदर्श नारी
पुस्तके वाचूया भारी भारी”
त्याचबरोबर झाडे लावू ही कविता झाडांचा, डोंगरांचा, नदीचा, स्वच्छतेचा महत्व सांगते व निसर्गा प्रती कृतज्ञतेची भावना ही निर्माण करते. मैत्री ही कविता पडणाऱ्या पावसाच्या पाण्यात कागदाची होडी बनवून लहान मुलं जे खेळ खेळातात त्या खेळाची आठवण करून देताना मलेकाजी पुढील ओळी लिहितात….
“तू धर छत्री
मी बनवतो होडी
मग जाऊ पाण्यात
मजा येईल थोडी”
लहान मुलांना बाबापेक्षा आईची सोबत जास्त असते. मुलं शाळेतून घरी आले कि त्यांना पडणारे सर्व प्रश्न ते आईला विचारत असतात आणि आई सर्व प्रश्नांची उत्तरे न थकता देत असते.आईचा मुलांचा संवाद काव्यमय पद्धतीत मलेकाजी आपल्या या काव्यसंग्रहात मांडतात.मुले जे काही शाळेत शिकतात त्याचा अवलंब ते घरी आले कि करतात तसंच काही “कचरा” या कवितेत अगदी सुंदर रित्या मलेकाजी यांनी रेखाटलं आहे.
“आई आई नको टाकू कचरा इकडे तिकडे शाळेत सांगतात बाई लक्ष द्या स्वच्छते कडे”
शिकूया मुलांनो, ढगोबा, चांदोमामाची नगरीं, मुंगीताई, देवबाप्पा या कवितेतून मुलांना शिक्षणासोबत आनंदही मिळावा असा अतोनात प्रयत्न मलेकाजी आपल्या कवितेतून करताना दिसतात. मलेकाजी तिरंगा या देशभक्तीपर गीताद्वारे मुलांना तिरंग्याचे महत्व व तिरंगाच्या रंगाचे, अशोकचक्राचे महत्व सांगतात त्याचं बरोबर मुलांच्या मनात देशभक्ती अंकुरीत करण्याचा प्रयत्न करताना खालील ओळी लिहितात….
“प्रिय आमचा झेंडा तिरंगा फडकत राहो नभात
मायभूचे प्रेम राहिलं सदैव आमच्या हृदयात”
मुलांचा शाळेच्या डब्याबद्दल आई सोबत होणारा नाजूकसा गोड असा सवांद,मुलांना आवडणारी मनीमाऊ, मासा, पतंग, फास्ट फूड, मोर, पोपट, आगगाडी, फुलपाखरू, परी अशा सुंदर सुंदर कवितांचा या काव्यसंग्रहात मलेकाजी यांनी समावेश केला आहेच सोबत मायभूमीच्या संस्कृतीतून लोप पावत जाणाऱ्या “पोळा” या ग्रामीण संस्कृतीचा वसा मुलांना समजावून सांगताना खालील ओळी मलेकाजी रचतात
” वाजत गाजत मिरवणूक ओवाळते माला
वर्षभर काम काम आज आराम ह्याला
गोड गोड पुरणपोळी खाऊ घालू त्याला
चिऊ माऊ चला गं चला लागू कामाला”
मलेकाजी यांनी भातुकली, हसू खेळू, मोबाईल या कवितेत आजच्या पिढीच्या मुलांना मैदानी खेळ महत्वाचे आहेत ते खेळले पाहिजे, मोबाईलचा वापर जास्त करू नये हे आपल्या काव्यातून समजावतात.
शहर, शिकारी, प्राण्यांची सभा, घड्याळ दादा या कवितेतून काव्यरूपी कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पालक, रोज रोज व फास्ट फूड या कवितेत भाजी, फळे हे आरोग्यासाठी किती महत्वाचे हे सांगताना मलेकाजी खालील ओळी लिहितात….
“गाजर काकडी टोमॅटो
फळे खा रोज थोडे
त्यातून सुटेल शरीराचे
बाई म्हणतात कोडे”
शेवटची कविता खोटं ही लहान मुलांच्या भावना व्यक्त करणारी आहे व ती प्रौढ व्यक्तींना विचार करायला लावणारी आहे. आपण मुलांना जे काही सांगतो, समजावतो खरंच आपण तसे वागतो का? आपल्या वागण्यावरून व सवयीवरून मुलांना काय प्रश्न पडतात त्यांच्या मनात काय चालू असते, ते काय विचार करतात, देवबाप्पाला गाऱ्हाणे मुलं कसं मांडतात मलेकाजी यांनी अतिशय सुंदर रित्या याचा उल्लेख केला आहे.
“देवबाप्पा देवबाप्पा
खरं सांगू तुला
माणसं बोलतात खोटी
राग येतो मला”
या बाल काव्यसंग्रहात विविध काव्यप्रकरातील एकूण ४५ कविता व त्याला अनुसरून उत्तम चित्र त्यामुळे या काव्यसंग्रहाचा दर्जा खूपच उंचावला आहे . हा काव्यसंग्रह मुलांना व मोठ्या वाचकांना आवडेल यात काही शंकाच नाही.कवयित्री मलेका शेख-सय्यद यांच्या हातून अशीच वेगळी लेखन क्रांती घडो अशी इच्छा व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

— परीक्षण : खाजाभाई बागवान.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
कवयित्री मलेका शेख सैय्यद यांच्या बाल संग्रहास शुभेच्छा व जेष्ठ बालसाहित्यिक एकनाथजी आव्हाड सरांची पाठराखण उत्तम, वाचनीय आहे.
गोविंद पाटील सर जळगाव.