आंतरराष्ट्रीय कचरावेचक दिवस १ मार्च रोजी असतो. या दिनानिमित्ताने कचरा वेचक महिलांच्या समस्या लोकांना कळाव्यात म्हणून स्त्री मुक्ती संघटनेने नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी विभागात कचरावेचक महिलांची रॅली काढली होती.
“कचरा आमच्या हक्काचा नाही, कोणाच्या बापाचा”, “आमच्या पोरांना शिक्षण द्या, म्हातारपणी पेन्शन द्या”, अशा विविध घोषणा देत महिलांनी एमआयडीसी परिसर दणाणून सोडला होता. या महिलांना एमआयडीसी विभागात फिरून कचरा वेचताना विकाऊ कचरा मिळत नाही, महिला दहा तास उन्हातान्हात फिरतात, त्यामुळे कंपन्यांच्या दाराशी कंपनीवाल्यांनी आमच्या संस्थेशी करार करून या महिलांना एकहाती कचरा द्यावा, कंपनीने दिलेल्या ठराविक वारी व ठराविक वेळी ठरवून दिलेली व महापालिकेचे ओळखपत्र असलेली महिला येईल, कंपनीतला कचरा उचलून तिथला परिसर स्वच्छ ठेवेल अशी या कचरा वेचक महिलांची मागणी असून गेली अनेक वर्ष कंपन्यांना भेटून, प्रत्यक्ष बोलणे करूनही यात यश येत नाही अशी खंत स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांनी व्यक्त केली, कंपनीतील वेगळा केलेला सुका कचरा प्रत्यक्ष दाराशी मिळाल्यास महिलांची वणवण थांबेल, यातील अनेक महिला वयस्कर आहेत, माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी या कामात मदत करावी अशी अपेक्षा वृषाली मगदूम यांनी व्यक्त केली.

माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी रॅलीत नुसताच सहभाग न घेता या महिलांना साडी वाटप केले.यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, या कचरा वेचक महिला माझ्या बहिणी असून त्यांच्या समस्या निवारण करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. त्यांचे जीवन अतिशय हलाखीचे असून दिवसभर फिरून कचरा वेचून त्या गुजराण करतात.या महिलांची मुले शिकावीत, त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मी पूर्वीपासून सर्वतोपरी मदत करत आलो आहे, यापुढेही करेन. कंपनीमधील कचरा महिलांना मिळावा यासाठी संस्थेकडून पत्र मिळावे व त्या पत्राचा मी सरकारी अधिकारी, मंत्री यांच्यापर्यंत पाठपुरावा करेन. कचरावेचक महिलांना त्यांचे उपजीविकेचे साधन मिळवून देण्यासाठी मदत करीन, तसेच या महिलांना कचरा वेगळा करण्यासाठी पन्नास महिला काम करू शकतील अशी शेडही उपलब्ध करून देईन असे आश्वासन त्यांनी दिले.

याप्रसंगी रुक्मिणी पाॅल, वेणू वाघ, शकुंतला सकट यांनी कचरा वेचकांच्या समस्या मांडल्या, सेक्युरिटी ,कंपनी स्वच्छ करणारे, घंटागाडीवाले हे सर्वच लोक शेलका कचरा घेतात व महिलांना अतिशय टाकाऊ कचरा मिळतो. कंपनीतील लोक कंपनीच्या बाहेरही उभे करून घेत नाहीत अशी गाऱ्हाणी या महिलांनी मांडली. सीमा किसवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
उन्हातान्हात कचऱ्यासाठी रॅली काढणाऱ्या या महिलांच्या आर्त घोषणा ऐकताना आजच्या समाजातील विषमता आणि शोषण यामुळे किती भीषण अवस्थेत त्या जगताहेत हे हृदय द्रवणारे चित्र आहे.
हे किती काळ आपल्या देशात चालत राहणार असे वाटत राहते…