Wednesday, September 11, 2024
Homeसाहित्यकविता : १) माझे पप्पा.   ...

कविता : १) माझे पप्पा.               २) गोकुळ अष्टमी निमित्त काही कविता.

माझे वडील श्री अविनाश श्रीनिवास झोपे यांचा जन्मदिवस आज, दि.२६ ऑगस्ट रोजी आहे. अधिव्याख्याता (विद्युत), शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव इथून ते निवृत्त झाले आहेत. सध्या हास्यपरिवार जळगाव (आंबेडकर उद्यान) येथील उत्साही कार्यकर्ता व सभासद आहेत. माझ्या वडिलांबद्दल काही शब्द सांगू इच्छिते. ते माझ्या जीवनातील एक दीपस्तंभ आहेत, सामर्थ्य, शहाणपण आणि अखंड प्रेमाचा स्रोत आहेत. त्यांच्या निःस्वार्थ पाठिंब्यामुळे आणि शांत धैर्यामुळे मी आज जी व्यक्ती आहे, ती होऊ शकले. माझ्या जीवनावर त्यांनी केलेल्या प्रभावाचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी ही कविता एक छोटा प्रयत्न आहे. तसेच ते फक्त माझे वडील नाहीत, तर शिक्षक देखील आहेत. त्यांच्या शिकवणीतून मला केवळ शाळेतील पुस्तकेच शिकायला मिळाली नाहीत, तर जीवनाचे धडे देखील मिळाले. त्यांनी मला ज्ञान, शिस्त, आणि माणुसकीचे महत्व शिकवले. त्यांच्या शिकवणीमुळे माझ्या जीवनाचा मार्ग स्पष्ट झाला आहे. ही कविता त्यांच्या असामान्य योगदानाला समर्पित आहे.

माझे वडील, प्रा अविनाश झोपे

माझे वडील _माझे पप्पा

कोणी म्हणतात “बाबा”
कोणी म्हणतात “डॅडा”…
माझ्या मराठमोळ्या घरातले
मॉडर्न माझे “पप्पा”

कष्ट करणारे,
आमच्या सुखासाठी
घाम गाळणारे
चूक समजावणारे,
थोडेसे खवळणारे 
तरीही मायेने जवळ घेणारे
असे माझे “पप्पा”

बंडी-लुंगी आवडणारे, वाचन वेडे असणारे,
कर्म योग मानणारे, स्वछताप्रिय असणारे
तरीही फाडफाड इंग्लिश बोलणारे,
असे हे मॉडर्न माझे “पप्पा”

आयुष्यात काटे अनेक वेचले
प्रसंगी सरणावर ठेविले सगेसोयऱ्यानी
कधीही रडताना न बघितलेले
कधीही न ढासळनारा 
लग्नात लेकींना निरोप देताना मात्र,
धाय मोकलून रडला,
असे हे माझे वडील उर्फ “पप्पा”

माझ्या खांद्यावर ठेवुनी तुमचे कर,
संकटाना लढा देण्यास मिळते मज बळ
वटवृक्षपरी तुम्ही कर्ता,
विद्यार्थ्यांचे तुम्ही धर्ता
तुमची सावली ज्याच्यावरी,
तो निर्भयी होतो तारी,
असे आहेत देवरूपी माझे “पप्पा”

शब्द अपुरी पडती,
तुमची थोरवी बोलाया
जन साक्षी आहेत
तुमची महती गायला
आभाळ हि नतमस्तक होई
ज्यांच्या कर्तृत्वापुढे,
असे थोर हे आहेत  माझे “पप्पा”

प्रिय पप्पा, तुम्ही आहात म्हणून
माझ्या अस्तित्वाला उपकारांची झालर आहे,
माझ्या यशाची चमक जेव्हा
मला तुमच्या डोळ्यात दिसते,
तेव्हा मी भरुन पावते,  
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा …

— रचना : प्रा.नेहा झोपे चौधरी.
यांत्रिकी विभाग (इलेक्ट्रिक वेहिकल्स -EV )
महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि ADT विद्यापीठ, पुणे

गोकुळ अष्टमी निमित्त काही कविता

१. गोकुळाष्टमी

थरा वर थर उंच उंच हे थर
गगनाला भिडले गोविंदाचे कर

गोलावर गोल, गोविंदांचे रिंगण
मनोरा आकाशी, सजले अंगण

भरभक्कम असे मनोऱ्याचा पाया
हातांची साथ, प्रयत्न नाही वाया

दहीहंडी फोडायचा एकच ध्यास
कान्ह्याचा वास, परिश्रमाची कास

जिद्द, जोश, उत्साहाचा त्रिवेणी संगम
मनोऱ्याचे दृष्य असे विहंगम

निडर, निर्भय मन असे गोविंदाचे
यशाशिखरी, वातावरण जल्लोषाचे

गोविंदा करितो, कान्हाचे स्मरण
खात्री त्यास करेल *तो* रक्षण

एकतेचा दिसे अनोखा अविष्कार
कृष्णनिती असे जीवनाचे सार

— रचना : डॉ दक्षा पंडित. मुंबई

२. बाळकृष्ण

प्रत्यक्ष ते परब्रह्म नंदाघरी
कृष्णालिला ती न्यारी
सहज  पुतना शोषीली
मुखी पाहूनी ब्रम्हांड
यशोदामाता हर्षली

दही दुध लोणी खातो चोरूनी
शिंक्यावरला मटका फोडूनी
गोपीकांचे ह्रदय नेतो चोरूनी
हरीचक्रपाणी हा राधेला भूलवी

दाढी वेणीची गाठ बांधूनी
कधी जाई मुंगुस सोडुनी
गर्दभ बांधून, देई धेनू सोडुनी
गवळणींची पाहतो फजिती

गोपगड्यांसवे करितो खोड्या
गवळणीं पाहूनी झाल्या वेड्या
यशोदेसी क‌रिती कागाळ्या
तुझा, कृष्ण, बाई आहे भूलव्या
       
गोकुळी अवतरली स्वर्गनगरी
चिंता पळाल्या साऱ्या बाहेरी
अवघे आसूर धाडिले यमाघरी
कालिया मर्दूनी यमुना ढोही
कसांची ती झोप उडविली
बाळकृष्ण नंदाघरी !!!

— रचना : आशा दळवी. सातारा

३. जन्माष्टमी

सोहळा श्रीकृष्ण जन्माचा
गौरव श्रावण अष्टमीचा

विष्णूच्या पूर्ण अवताराचा,
दुष्ट प्रवृतीच्या संहराचा

देवकी वसुदेवाच्या प्राक्तनाचा
नंद यशोदेच्या भाग्याचा

गोपिकांच्या रास लीलांचा,
बासरीच्या सुरेल बोलांचा

राधेच्या श्रेष्ठ गाढ प्रेमाचा,
मीरेच्या निस्सीम अजोड भक्तीचा

अलौकिक तत्वाच्या कौतुकाचा
मोरपंखी लोभस थाटाचा

सोहळा  जन्माष्टमीचा
लाडक्या गोड कान्ह्याचा

— रचना : मीरा जोशी. नवी मुंबई

४. कृष्णाष्टमी

धावपळ रात्रीस काळ्या मेघांची
पसरला काळाकभिन्न अंधार
लाविली कोणीतरी विजांची झालर
कोसळणार पाऊस मुसळधार….

चिंताहारी ऐकले
नवबालकाचे रुदन
तेजोमय बंदीगृहाचे दालन
घेत अपत्याचे लोभस मुखदर्शन
टोपलीत झोपविला मोहन ….

बंदीशाला सुखासीन निद्राधीन
खुलले दरवाज्यांचे अडसर
डोईवर बाळ, द्रुतगती पिता दैवाधीन
नेहमीची निम्नगा नव्हती निळसर ….

निमग्न पावले नाहीत अडली
उग्ररुपा नदीस विश्वरुप-भेटीची आस
उंबळून स्पर्शली पदअंगुष्ठी
क्षणभर दुभंगून दिली वाट खास ….

नकळता बाळांची अदलाबदल
गोपराजगृही घडली नवलाई
राणी अनभिज्ञ आली धावत दाई
नंदलालासाठी मग पाळणा गाई ….

— रचना : विजया केळकर. नागपूर

५. मुरलीमनोहर

“जगताचा कैवारी मुरलीमनोहर”
गोकुळीचा कान्हा आहे भारी
तो सा-या जगताचा गिरीधारी
सा-या भक्तांचा आहे कैवारी
असा आहे मुरलीमनोहर मुरारी !! १!!

प्रेम करुनी गोकुळवासियांवरी
गोकुळ वासियांना वेड लाविले
सा-या गोपिकांचे चित्त हरिले
राधिकेचे तर चित्त भानच हरले !!२!!

कानाने वृंदावनी वेणू वाजवूनी
गोप गोपी सृष्टीलाच मोहविले
कृष्ण म्हणजे आनंद, नि अमृत
कृष्ण असे आयुष्यभरीचा अमृतठेवा !!३!!

कृष्ण हाच माता, कृष्ण हाच पिता
कृष्ण हाच कैवारी तोच आहे सद्गुरु 
तोच आहे सकलांचा भवसागर तारु
त्याचिया नामस्मरणे अंती मोक्षप्राप्ती करु !!४!!

— रचना : मधुकर ए. निलेगावकर. पुणे

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

11 COMMENTS

  1. नेहा तू तुझ्या पप्पांच्या वाढदिवसानिमित्त कविता खूप छान लिहिली आहे त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद

  2. “माझे वडिल माझे पप्पा ”
    नेहा कविता फार सुंदर केली आहे.👌👍

  3. माझे वडील_माझे पप्पा

    ही कविता वाढदिवसा निमित्त नेहा तू छान लिहिली आहे पप्पा बद्दल ची भावना खूप छान व सरळ भाषेत व्यक्त केली आहे त्याबद्दल तुझे खूप अभिनंदन ।

  4. *माझे वडील_माझे पप्पा*
    नेहा वडिलांना खूपच छान वाढदिवसाची भेट कविता लिहून दिली आहे.त्याचे शब्दांकन सुद्धा फारच छान आहे👏👏

  5. खूपच छान कविता लिहिली आहे तुझ्या मध्ये भरपूर छान कला आहे त्याचा तू पूर्ण पणे वापर करून समाजात काही ना काही करत असते

  6. *माझे वडील_माझे पप्पा*
    फारच छान कविता लिहिली आहे व त्याचे शब्दांकन सुद्धा फारच छान आहे . पप्पांच्या वाढदिवसाची अप्रतिम भेट दिल्याबद्दल तुझे अभिनंदन आणि असेच सुरेख लिहत राहावे

  7. कृष्णावरील प्रेम भक्तीभाव ओसंडून वहावा अशा कविता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments