१. नैवेद्य…
ते जेमतेम नऊ दहा वर्षाचे पोर रणरणत्या उन्हात जीवाच्या आकांताने पळत होते. फाटक्या सदऱ्याच्या ओच्यात काहीतरी गच्च धरलेले होते. “चोर चोर, पकडा पकडा” असे ओरडत काही लोक त्याच्या मागे धावत होते.
धावता धावता तो धप्पकन खाली पडला आणि त्याच्या ओच्यातील केळीच्या पानात गुंडाळलेला नैवेद्य खाली सांडला.
त्याची चूक एवढीच होती पोटासाठी मागून थकल्यावर भुकेने व्याकूळ होऊन देवासमोरचा मुंग्या लागलेला नैवेद्य त्याने उचलला होता.
२. घोषणा…
सर्व कार्यकर्ते दिवसभर ‘जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त’ घोषणा देऊन थकले आणि रात्री रेस्टॉरंट आणि बिअर बार मध्ये शिरताच जोरात ओरडले – “ए पोऱ्या डोळे फुटलेत काय ? चल टेबल साफ कर.” गडबडीत त्या छोट्या पोराच्या हातून ग्लास पडून फुटला. मालकाने खाडकन त्याच्या मुस्कटात लगावली. घोषणा देणारे पेगवर पेग आत रिचवत होते तर पोराचे अश्रू डोळ्याबाहेर पाझरत होते.
३. कोरा गंध…
परिस्थितीमुळे नवीन पुस्तकं घेणे त्याला कधी जमलेच नाही. जुन्या पुस्तकांवर समाधान मानणारा तो आज शाळेत नव्या पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार म्हणून खूप आनंदी होता.
पुस्तकं हातात पडताक्षणी पुस्तकांचा कोरा गंध नाकात शिरला. हा गंधही एवढा आनंदायी असू शकतो.हे त्याला आज पहिल्यांदाच जाणवले.
४. भीती…
बायको आणि दोन लेकरांना घेऊन स्मशानभूमीच्या झोपडीवजा घरात राहून तिथले सारे काम तो बघायचा. त्याची लेकरं
जळणाऱ्या चितेच्या उजेडात खेळायची, उबेला बसून अभ्यासही करायची एकदा एका पत्रकाराने त्याला विचारले “इथे तुम्ही राहता तेव्हा भीती नाही का वाटत तुम्हाला ?” एन “साहेब, मेलेल्या माणसांची काय भीती ?.”
५. जीणं…
त्याने पाठीवर सपासप चाबकाचे फटकारे ओढून घेतले की कुणी त्याला पैसे देत तर कुणी त्याच्या झोळीत मुठभर धान्य घालीत. एकदा त्याच्या शाळेत जाणाऱ्या मुलाने त्याला विचारले – “बापू, असे पाठीवर फटके मारून घेऊन आपणच लोकांसमोर का हात पसरायचे ?” “पोरा, हे आसलं जीणं तुझ्या वाट्याला यायला नगं म्हणून. शिकून लय मोठा हो.”
— लेखन : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सर्व अलक सुरेख आणि मन भाविक आहेत.👌👌👌
अलक उत्तम
सर्व अलक रचना एकापेक्षा एक सुंदर आहेत! सामाजिक विषमतेचे दाहक दर्शन घडवणाऱ्या आहेत. हार्दिक अभिनंदन अरुणाताई 🙏💐
सर्वच अलक सुंदर.