Sunday, June 22, 2025
Homeसाहित्यकाही कविता

काही कविता

प्रख्यात नाट्यकर्मी श्री रवी वाडकर यांच्या काही कविता आपल्या पोर्टल वर सादर करीत आहे. त्यांना आज पर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
श्री रवी वाडकर हे पेशाने उद्यान रचनाकार आहेत.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
— संपादक

१. पहिला पाऊस.

सकाळचं चालणे आणि सुचलेल्या ओळी……

पाऊस तुझा न माझा,
रिमझिमत्या पावसाचा…

रिमझिमत्या पावसाचा ओलेता पदर
धुके हे धुसरसे, हात हाती धर ॥ध्रु०॥

वाट भिजलेली, मृदगंध मातीचा
हिरव्या फांदीला, झुला झुले प्रितिचा
सडा पाकळ्याचा, वाट पाहते नजर ॥१॥

वर्दळ माणसांची निसटते तुझे दिसणे
थेंबाथेंबाचे हे फुलु‌नी आले चांद‌णे
जीव वेडावतो उगा, ना तुजला खबर ॥२॥

अंगणात साचले पाणियाचे तळे
आठवाच्या रानी गीत तुझे ओले
आसावल्या भेटी, थरथरते अधर ॥३॥

सवय ही नात्याचं पहिल पाऊल आहे, असते.
आठवण येणं, “ती” चा विचार येणं, राहणं, ती असल्याचा भास होणं, आपल्या सोबत आहे असे वाटणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, प्रेमच असते. व्यक्त होणं, न होणं पण का हुरळून जात मन. ठाऊक नाही. पण माझ्या प्रत्येक निर्मितीत तू डोकावत असतेस..

२. आठवण

आठवण येते ना
पण हळूच बाजूला करतेस ना.
मनात असतं, पण सांगायच नसतं
हे बरं नाही, काही एक खरं नाही.
मुद्दामच टाळायच
पण मन मानत नाही.
काळजाला रूचत नाही
उगाचच कशाला खिडकी
अर्धवट बंद करायची, सांग ना.
मग सांजवेळी त्यातून
आठवण आत येणारच.
बाजूला हळूच बसणार,
जगलेल्या क्षणांच्या सोबतीन
याद करून देणारच.
मी काय म्हणतो
आठवण जपावी आपल्याच ओंजळीत
आठवण आली की,
आठवणीने उघडावी ओंजळ
आणि काळजात रुजवून घ्यावी.

३.
 
चित्र
चांदण
चितारल,

ओठ
ओठात
ओसंडल

उरी
उगाचच
उसासल

रात्र
रातभर
रडवतेय

पंख
पापणी
फडफडतेय

गुंता
गुंतुनी
गुंतलेला..

४. ‘ती’च बोलणं…

उठल्यापासून सुरु होतो प्रवास दिवसाचा
प्रश्न मनात अनेक ‘ती’ चे
काय करत असेल ? कशी असेल ?
फोन करत नाही की मेसेजही
मग कसं कळावं मनातलं. 
समोर असली तरी न बोलता
अबोल शब्दाचे अर्थ कसे उमजावे ?
मी काय करावं ? काय बोलावं ?
कसं वागावं ? काहीच सुचत नाही
नेमकं काय हवं असत तुला
ते तर कळत नाही.
जाऊ दे म्हणतो.
तुझ्या विचारांना बाजूला सारतो
काही तरी लिहावं
चितारावं म्हणून कागद उचलतो
तर पुन्हा तू समोर तशीच अबोल..
आता फक्त तुझे डोळे
बोलत असतात माझ्याशी..

रवी वाडकर

— रचना : रवी वाडकर. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. हेमंत मुश्रीफ व रवी वाडकर दोघाच्याही कविता सुरेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on जिचे तिचे आकाश…: १३
सौ. सुनीता फडणीस on योग : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश…: १३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे
ज्ञानेश्वर वि जाचक on करवंदे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १२
अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?