भारतीय संस्कृती, इतिहास, श्रद्धा स्थाने याला मोठी परंपरा आहे. हिंदू धर्म हा या भूमीतील सनातन, पारंपरिक धर्म राहिला आहे, अजून हि आहे आणि पुढेही राहणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या प्रयाग येथे सुरू असलेल्या कुंभ मेळ्याच्या निमित्ताने एकूणच कुंभमेळा, त्याच्या विषयी होणाऱ्या टीका टिपण्यांचा स्वानुभवावर आधारीत समाचार घेणारा निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांचा लेख पुढे देत आहे.
– संपादक
भारतात प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी दर १२ वर्षांनी होणारे कुंभ मेळे हे पौराणिक काळापासून चालत आलेले आहेत. ते इतके पौराणिक आहेत की, ते नेमके कधी सुरू झाले, हे आजतागायत कुणी सांगू शकलेले नाही. पण देव आणि दानव यांच्या मध्ये झालेल्या युध्दात अमृत कुंभ सांडून त्यातील अमृत या ४ ठिकाणी असलेल्या नद्यात पडल्याने, या नद्यांमध्ये स्नान केल्यास आपल्या कडून कळत, नकळत झालेली पापे धुतल्या जाऊन आपण शुध्द होतो, या धारणेमुळे हजारो वर्षांपासून ठरलेल्या पर्वणीच्या दिवशी आणि त्या दिवशी शक्य नसल्यास कुंभ पर्व काळात तरी या ठिकाणी जाऊन भाविक स्नान करीत असतात. यावेळी येणाऱ्या विविध साधूंचे विशेष महत्व असते.
आजच्या तथाकथित व्यवस्थापन जगात आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, या कुंभ मेळ्यांचे कुणीही निमंत्रक, आयोजक,
व्यवस्थापक रहात आलेले नाही. कुठलेही आमंत्रण, निमंत्रण, जाण्यायेण्याच्या प्रवास खर्च, (भारतात मुस्लिमाना त्यांच्या पवित्र मक्केला जाण्यासाठी भारत सरकार अनुदान देते, इकडे लक्ष वेधावेसे वाटते ! त्याचे काय कारण आहे, कुणास ठाउक..) भारतीय पंचांगानुसार येत असलेल्या पर्वण्याना अशिक्षित समजले जाणारे भाविक ही कसे उपस्थित राहतात, हे एक आश्चर्यच आहे.
या कुंभ मेळ्याना केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या ही इतकी असते की, आज पर्यंत ती कधी मोजताही आलेली नाही.

करोडो लोक इतक्या श्रध्देने, शिस्तीने, स्वतःहून येत राहतात, हे कुंभ मेळे आनंदात, शांततेत होत असतात, हे एक जागतिक आश्चर्य आहे. याचा खरे तर प्रत्येक हिंदू व्यक्तीस सार्थ अभिमान वाटला पाहिजे. पण दुर्दैवाने अभिमान तर राहिला दूरच पण अन्य धर्मियांपेक्षा काही हिंदूच या अभिमानास्पद कुंभ मेळ्याची चेष्टा करताना दिसत आलेले आहेत आणि अजूनही दिसत आहेत.काही चॅनल्स, यू ट्यूब वर तर कोण साध्वी किती सुंदर आहे, त्यांची जणू सौंदर्य प्रतियोगिता असल्याप्रमाणे क्रमांक देण्यात येत आहेत, अतिशय चविष्टपणे त्यांना खोदून खोदून, प्रश्न विचारून मुलाखती घेतल्या जात आहेत, तर कुणी आयआयटीयन बाबा, उद्योजक बाबा, परदेशी बाबा म्हणून रंगवून दाखविल्या जात आहेत. हे सर्व पाहून असे वाटते की, कुंभ मेळा ही काय मनोरंजनाची, चेष्टेची बाब आहे की काय ? बरं यात काही प्रसार माध्यमे, काही खाजगी व्यक्तींबरोबर सरकारी नोकरीत उच्च पदांवर राहिलेले, ज्यांच्या वर हे कुंभ मेळे व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी असलेले अधिकारी पाहून तर यांना ना हिंदू धर्म, भारतीय संस्कृती कळाली ना आपले लोकशाही देशातील सरकारी अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व कळाले, असे मी स्वानुभवाच्या आधारे ठामपणे सांगू शकतो. कारण आधी भारत सरकारच्या दूरदर्शन मध्ये आणि नंतर महाराष्ट्र शासनाच्या माहिती खात्यात नोकरी करताना मी हे दुष्चित्र प्रत्यक्ष पाहिले आहे, अनुभवले आहे. अर्थात याला काही सन्मान्य अपवाद देखील आहेत, त्याची सुध्दा दखल इथे घेतली पाहिजे. अन्य राज्यातील कुंभ मेळ्यांशी माझा कधीं थेट संबंध आलेला नसल्याने मी नाशिक – त्रिंबकेश्वर येथे झालेल्या कुंभ मेळ्याविषयीचेच माझे अनुभव कथन, निरीक्षण, भावना मर्यादित आहेत, हे आधीच स्पष्ट करतो.
पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतले पाहिजे की जिल्हास्तरीय सर्वात महत्वाचे, सर्वाधिक अधिकार असलेले, सर्व खाते, विभाग, सर्व यंत्रणा यांच्याशी संपर्क, सहकार्य, समव्यय साधण्याची प्रमुख जबाबदारी असलेले पद धारक म्हणून जिल्हाधिकारी यांच्या कडे पाहिल्या जाते.आणि ते खरेही आहे. हे अधिकारी आपली जबाबदारी कशी पार पाडतात, यावर त्या त्या कुंभ मेळ्याचे यश, अपयश अवलंबून असते.

इथे एक बाब ही लक्षात घेतली पाहिजे की प्रयाग, हरिद्वार, उज्जैन या तीन ठिकाणी वैष्णव आणि शैव एकत्रच स्नान करीत असतात. पण नाशिक येथे पेशवे काळात प्रथम स्नान कुणी करावे ? या वरून शैव आणि वैष्णव या दोन्ही आखाड्यात वाद झाल्याने, पुन्हा असे वाद होऊ नये म्हणून, पेशव्यांनी वैष्णव आखाडे हे नाशिक येथे तर शैव आखाडे हे त्रिंबकेश्वर येथे स्नान करतील, अशी व्यवस्था घालून दिली. तीच व्यवस्था आजतागायत कायम असल्याने नाशिक व त्रिंबकेश्वर अशा दोन ठिकाणी कुंभ मेळा भरत असतो.
१९९२ साली नाशिक – त्रिंबकेश्वर येथे कुंभमेळा भरलेला असताना तत्कालीन जिल्हाधिकारी श्री उमेशचंद्र सरंगी यांनी ज्या पद्धतीने, आत्मीयतेने कुंभमेळा हाताळला, त्याची आजही जुन्या व्यक्ती आठवणी काढतात. भयंकर कोपिष्ट समजल्या गेलेल्या साधूंनी देखील सरंगी साहेबांच्या प्रशासनाची तारीफ केली होती.

पण त्या पुढील म्हणजे २००४ सालचा कुंभ मेळा तसे यश मिळवू शकला नाही. हा कुंभ मेळा लक्षात राहिला तो साधुंवर रस्त्यात उधळलेली नाणी उचलण्याच्या नादात झालेल्या भाविकांच्या चेंगराचेंगरीत काही भाविकांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्युंमुळे. त्यावेळी तिथे हजर असलेल्या एकमेव दूरदर्शन कॅमेरामन ने केलेले चित्रीकरण,.पुढे या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या आयोगापुढे सादर करण्यात आले. नाशिक चे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री महेश झगडे यांनी नुकतीच त्यांच्या फेस बुक वर त्रोटक पोस्ट टाकली की, “त्यांना त्यावेळी शाही स्नानात भाग घेण्याची जराही इच्छा झाली नाही.” असे लिहिण्यामागे त्यांचा काय हेतू असावा, हे त्यांचे त्यांनाच माहीत पण जणू जे काही चालले होते, ते काही बरोबर नव्हते म्हणून आपण त्या सर्व बाबींपासून दूर राहिलो होतो, असे म्हणण्याचा त्यांचा रोख दिसतो.
या कुंभ मेळ्याच्या वेळी मी मंत्रालयात उपसंचालक (वृत्त) या पदावर काम करत होतो. नाशिक विभागीय माहिती कार्यालयास कुंभ मेळ्याच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबींचा समन्वय साधणे, वेगवेगळ्या राज्यातून तसेच विदेशातूनही येणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना पासेस देणे, अशा स्वरूपाची कामे करावी लागत. फक्त मंत्रालयात बसून काम करण्यापेक्षा एक तरी पर्वणी स्वतः अनुभवावी म्हणून मी त्रिंबकेश्वर येथील, जिथे नागा साधू स्नान करतात, तिथे आमच्या प्रसिद्धी पथकाबरोबर जाण्याची विनंती वरिष्ठांना केली. त्यावेळी आमचे महासंचालक, श्री भूषण गगराणी होते, जे सध्या मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त आहेत, त्यांनी मोठ्या मनाने परवानगी दिली. आम्ही नाशिक विभागीय माहिती कार्यालयात पोहोचलो, तर तिथे पाहिले की, आमचे नाशिक विभागीय माहिती उपसंचालक श्री उदयगिरी महंत हे ऐनवेळी आलेल्या काही परदेशी माध्यम प्रतिनिधींना पासेस नाकारत होते, कारण काय तर त्यांच्या कडे महाराष्ट्र शासनाची किंवा अन्य कोणत्याही राज्य सरकारची अधिस्विकृती पत्रिका नाही म्हणून. पण विशेष म्हणजे, त्या परदेशी माध्यम प्रतिनिधींकडे भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी मंत्रालयाने, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेली अधिकृत पत्रे होती. ती पाहून मी त्यांना पासेस दिले पाहिजे, असे महंत यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आडमुठेपणा साठी कुप्रसिद्ध असलेले महंत स्वतःचा हेका काही सोडेनात. शेवटी मी गगराणी साहेबांशी फोन वर बोलून वस्तुस्थिती अवगत केल्यावर त्यांनी महंत यांना “समजावले” आणि मग त्या परदेशी माध्यम प्रतिनिधींना पासेस मिळाले. खरं म्हणजे, परदेशी माध्यम प्रतिनिधी स्वतःहून आलेले आहेत, त्यांच्या कडे भारत सरकारची रितसर प्राधिकार पत्रे आहेत, त्यांना पासेस दिल्यामुळे परदेशात आपल्या कुंभमेळ्याची चांगली प्रसिद्धी होईल या सर्व बाबी विचारात न घेता, आपल्या हेकेखोर स्वभावामुळे, आपण आपल्या देशाची परदेशी माध्यम प्रतिनिधींसमोर प्रतिमा मलिन करतोय, याचे भानही त्यांना राहिले नाही म्हणून अधिकाऱ्यांनी नियमांचा स्वतःला वाटतो तो अर्थ न घेता तारतम्य बाळगून काम करणे आवश्यक असते.
त्याच्या पुढच्या, म्हणजे २०१६ साली झालेल्या कुंभ मेळ्याच्या आधी जवळपास मी ३ वर्षे नाशिक विभागाचा माहिती उपसंचालक असल्याने त्या ३ वर्षात, कुंभ मेळा आयोजनाविषयी सातत्याने झालेल्या सर्व शासकीय बैठका, भेटी, पाहणी दौरे यांना मला उपस्थित राहावे लागले होते. अजूनही लक्षात राहिलेल्या काही बाबी म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री विलास पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकांना नाशिक चे पोलीस आयुक्त, महानगर पालिका आयुक्त हे जिल्हाधिकारी यांना सेवाजेष्ठ असल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकांना स्वतः उपस्थित राहणे म्हणजे कमीपणाचे ठरेल, असे समजून या बैठकांना स्वतः उपस्थित न राहता त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवित असत. साहजिकच त्यांच्या त्यांच्या विभागांविषयी निर्णय घ्यायची वेळ आली की, ते कनिष्ठ अधिकारी हतबल होऊन, “साहेबांना सांगतो” एव्हढे सांगण्याशिवाय काही करू शकत नसत. त्यामुळे कित्येक वेळा या बैठका काही ठोस निर्णय न घेताच संपत असत. “अधिकारीच माझे ऐकत नाहीत, तर मी काय करू ?” असे प्रसार माध्यमातील त्या जिल्हाधिकाऱ्यांचे विधान त्यावेळी चांगलेच गाजले होते. यात परत त्यांची मुळातच अशी भूमिका होती की, कुंभ मेळा ही पूर्णपणे धार्मिक बाब असल्याने शासनाचा, या सर्व आयोजनाशी संबंधच काय ? ही त्यांची भावना, भूमिका खुद्द त्यांच्या महसूल खात्याच्याच नव्हे तर इतर सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये झिरपत गेली असावी. त्यामुळे कुंभ मेळा एकदिड वर्षावर येऊन ठेपलेला असताना, शासनाने शेकडो करोडो रुपयांची तरतूद उपलब्ध करून दिल्या नंतर ही प्रत्यक्ष कामांमध्ये काहीच प्रगती होत नव्हती. ही बाब शेवटी मंत्रालय पातळीवर लक्षात आल्याने काही तत्काळ उपाययोजना सरकार ने केल्या, त्यातील काही प्रमुख म्हणजे, जिल्हाधिकारी,.महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त या तिघांच्या तातडीने बदल्या केल्या.

उज्जैन येथील कुंभ मेळा आयोजनाचा अनुभव असलेले अधिकारी श्री दिपेंद्रसिंह कुशवाहा यांची नाशिक जिल्हाधिकारी म्हणून तर नाशिक विभागीय आयुक्त म्हणून श्री एकनाथ डवले यांची नेमणूक करण्यात आली. तसेच श्री श्रीकांत सिंग आणि मनीषा म्हैसकर पाटणकर या दोघा सचिवांची देखरेख समिती स्थापन करण्यात आली. या नेमणुका झाल्या नंतर मात्र ज्या झपाट्याने सर्व कामांना प्रत्यक्षात जी गती प्राप्त होत गेली, त्यामुळे हा कुंभमेळा कसा काय पार पडेल ? या विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांमध्येच निर्माण झालेला संभ्रम दूर होत गेला आणि सरतेशेवटी २०१६ चा कुंभमेळा व्यवस्थित पार पडला.
आता,आतापासून २०२८ साली नाशिक – त्रिंबकेश्वर येथे भरणाऱ्या कुंभमेळ्या विषयीच्या बैठका, निधीची तरतूद आदी बाबी सुरू झाल्या आहेत. तो कुंभ मेळा देखील यशस्वी झाल्याचे मला एक भाविक म्हणून बघता येईल, अशी आशा आहे.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००
एवढ्या मोठ्या प्रमाणात जर एखाद्या ठिकाणी जर एव्हडे भावीक एकत्र येणार असतील तर त्यांची सुरक्षा आणि सुव्यवस्था आणि स्थानिक राहिवाश्यांची गैरसोय न होता त्यांचे रोजचा नित्यक्रम सुरळीत चालू राहण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न अपेक्षित असतो. अश्यावेळी तरी शासनाने ठरवून दिलेल्या प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्यांनी कुठलिही कृती वयक्तिक विचारांनी चालवणे हे गैरच आहे. त्यासाठी अश्या गैरवर्तुणीकीसाठी अशा अधिकाऱ्यांना बदली अधिक पदावनती ची शिक्षा देणे याबाबतीत निर्णय राज्य शासनाने घ्यावा असे सुचवावेसे वाटते. नपेक्षा अशी जबाबदारी प्रशंसनीय पद्धतीने संभालेल्या माजी अधिकाऱ्यांचा आयोग बनवून त्यांना विशेष अधिकार देणेच योग्य ठरेल. माजी अधिकाऱ्यांचे त्यांचे त्यावेळच्या व्यवस्थेतील नंतर लक्षात आलेल्या त्रुटिंचीही दुरुस्ती होऊन अधिक चांगल्या व्यवस्थेची अपेक्षा ठेवता येईल.
भुजबळ साहेबांचा हा लेख 2028च्या कुंभमेळ्याच्या पूर्वनियोजनच्या विषयी त्यांची श्रद्धा आणि कळकळ अधोरेखीत करते.
मान्य आहे की अशा अती प्रचंड मेळाव्यात अनेक लोक आपापल्या मतलबाने आलेले असतात. पण म्हणून जे श्रद्धा आणि परंपरा जतन करण्यासाठी इतके कष्ट, वेळ, आणि पैसा खर्च करून तिथे जातात. त्यांच्याकडे हीन भावनेने पाहणे किती योग्य आहे. यावर आपण व्यक्त केलेले विचार आवडले.
कुंभ मेळाव्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नांना आलेले यश व समाज माध्यमाकडून चांगली अपेक्षा व्यक्त केली आहे.
साहेब
धन्यवाद
खूप माहितीपूर्ण लेख आहे.
शिवाय सध्या घडत असलेल्या घटनांबद्दल व्यक्त केलेली नाराजी योग्य आहे. धन्यवाद!