ईजिप्तची राजधानी कैरो येथे भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन काल मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
भारताचे ईजिप्त मधील राजदूत श्री अजित गुप्ते ह्यांचे राजकीय निवासस्थान असलेले विस्तीर्ण इंडिया हाऊस सकाळ पासूनच माणसांनी फुलून गेले होते. बंगल्याच्या सुरुवातीलाच असलेल्या वर्तुळाकार हिरवळीवर, जिथे रोज तिरंगा फडकत असतो तिथे आज नवीन तिरंगा फडकू लागला. फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. वर्तुळाच्या एका बाजूने १९४७ पासून आज पर्यंतचे भारत – ईजिप्त मैत्री संबंधावर प्रकाश टाकणारे मोठ्या आकारातील सुमारे पन्नास फोटो लावलेले होते. महत्वाचे म्हणजे २०२३ हे वर्ष खूप महत्वाचे आहे कारण या कालखंडात तीन VVIP visits झाल्या. २७ वर्षानंतर प्रथमच भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी इजिप्तला जून २०२३ मध्ये भेट दिली. ही ऐतिहासीक घटना. दुसरी ऐतिहासीक घटना म्हणजे ईजिप्त चे राष्ट्राध्यक्ष SiSI आपल्या प्रजासत्ताक दिवसाचे प्रमुख पाहुणे होते. सप्टेंबर २३ मध्ये त्यांनी G २० चे प्रमुख पाहुणे दुसऱ्यांदा भारताला भेट दिली. वरील भेटीमुळे दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी मोठी मदत झाली.
प्रवेश करताच हे फोटो येणाऱ्याचे लक्ष वेधून घेत होते व लोक उत्सुकतेने फोटो बघत होते. बरोबर नऊ वाजता राजदूत गुप्ते यांनी तिरंगा फडकवला. पुष्प वृष्टी झाली. राष्ट्रगीत झाले व उपस्थित लोक बाजूच्या विस्तीर्ण हिरवळीवर गेले.
ऊन खूप म्हणून मोठाले मंडप उभारण्यात आले होते. तिरंगी फुगे व तिरंगी झालरीनी मंडप सजवले होते. पुष्पगुच्छ सुद्धा तीन रंगी सुंदर दिसत होते.
राजदूत गुप्तेनी परंपरेनुसार प्रथम हिंदीतून, नंतर इंग्रजीतून मा.राष्ट्रपतींचे भाषण वाचले.
त्यानंतर करमणुकीचा कार्यक्रम झाला. राष्ट्रभक्तीपर गाण्यांवर नृत्ये आणि गाणी म्हटली. विशेष उल्लेख करावासा वाटतो हे सर्व कलाकार ईजिप्शियन होते. इकडचे लोक बरेचसे भारतीय लोकांसारखे दिसतात.
“ऐ मेरे वतन के लोगो” हे गाणे सुद्धा ईजिप्शियन मुलीने सादर केले. “ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, हम सब हिंदी है !” अतिशय गोड आवाज. कौतुकाची बाब अशी की या कलाकारांना हिंदी अजिबात येत नाही. You Tube वर ऐकून शिकतात. परफेक्ट उच्चार करतात. “हम सब हिंदी है” गाणे ऐकताना गंमत वाटत होती.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्ती पर नृत्य, गाणी, स्वातंत्र्यदिन विषयावर ऑनलाईन जनरल नॉलेज स्पर्धा घेतल्या होत्या. त्याचे पारितोषिक वितरण झाले. कार्यक्रम संपला.
त्यानंतर छोले, भटुरे, हराभरा कटलेट, समोसे, गुलाबजाम, केक आणि चहा असा अल्पोपहार होता. कॉस्मोपॉलिटन सुमारे तीनशे लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
मी उपस्थित होते हे माझे भाग्य. जय हिंद.
— लेखिका : सुलभा गुप्ते. कैरो, ईजिप्त.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
कैरोत भारतीय स्वातंत्र्याचा मानबिंदू असलेल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे सुरेख वर्णन सुलभा गुप्ते मॅडम यांच्या लेखातून होते.
सुलभा ताई, भाग्यवान आहात! भारताबाहेर भारताचा स्वातंत्र्य दिन कशाप्रकारे साजरा करण्यात येतो, हे पाहण्याची संधी मिळाली, म्हणून तुमचे अभिनंदन आणि तुम्ही खूप छान वृत्तांत लिहून तेथील कार्यक्रमाचे वर्णन आमच्यापर्यंत पोहचवले म्हणून मनःपूर्वक धन्यवाद 🙏💐