कोल्हापूर मराठी प्रतिष्ठान ग्रुप तर्फे नरसोबाची वाडी, पवित्र दत्तस्थान येथे नुकतीच सिताफळ, लिंब, कलमी आंबा, हापूस आंबा, गुलाब अशी नाना तऱ्हेची झाडे लावण्यात आली. या वृक्षारोपणात डाॅ.सागर गुडमेवार, सौ.रोहिणी पराडकर, ऋचा महाबळ, अनघा महाबळ शैलजा परमणे, अनिता भोई व त्यांच्या मुलीने सहभाग घेतला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर गुडमेवर यांनी निसर्ग आपल्यात कसा शारीरिक, मानसिक बदल करून आपल्या आरोग्यात कसा चांगला बदल घडवतो हे सांगितले. तुम्ही झाडांशी बोला, निसर्गातील शुद्ध हवा, वाऱ्याचा आवाज, पक्षांचा किलबिलाट ऐकून मन कसे प्रफुल्लित होते व निसर्गाकडून,झाडांकडून कशी सकारात्मक ऊर्जा मिळते त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
या नंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊन मिरज सोनी गावामध्ये भवानी मंदिर येथे प्रस्थान केले.
कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सौ. रोहिणी पराडकर यांनी तिथे जमलेल्या महिलांना आज कालच्या महिला सुरक्षित आहेत का? त्यांच्यावर होणारे अत्याचार या विषयावर काही प्रश्न विचारून त्यांना बोलते केले. यावेळी जमलेल्या गावातील महिलांनी खूप छान प्रतिसाद देऊन आपले विचार मांडले.
स्थानिक शिक्षक, अध्यक्ष व सरपंच ताई शारदा यादव याही हजर होत्या. सुलोचनाताई व सरपंच शारदाताई यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन व पाहुण्यांचे आदरातिथ्य सौ. सुलोचना पाटील ताईंनी केले होते.
तसेच होम मिनिस्टरच्या खेळात भाग घेऊन विजेत्या ठरलेल्या सौ.अश्विनी उल्हास पाटील यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. तर ऋचा महाबळ यांच्या “मनदर्पण” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी सहभागी महिलांना प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
गोव्यातही कार्यक्रम
या पूर्वी गोव्यातील अंजूना, बार्डेज येथील महिला आश्रमात महिलांशी हितगुज, अभिवाचन व विविध कला गुणदर्शन दाखवणारे कार्यक्रम गेल्या महिन्यात करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सौ.रोहिणी पराडकर साईबाबा मंदिर महिला आश्रम आणि बालिकाश्रम येथे सर्वांचे स्वागत करून तीन उपक्रम घेतले. साईबाबा मंदिर येथे कवी कट्टा व भोजनाची व्यवस्था सौ. कविता शेट्ये व त्यांचे पती चंद्रशेखर शेट्ये यांनी केली. देवळाचा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ पराडकर यांनी सर्वांच्या वतीने देवस्थान कमिटीचे मनःपूर्वक आभार मानले.
कवी कट्टा यामध्ये सौ.रोहिणी पराडकर, सुनिता फडणीस, वर्षा शिंत्रे, नागरत्ना कुरतरकर, मंजिरी वाटवे, ऋचा महाबळ, शैलजा परमाणे, दिपक पवार, कविता शेटये त्याने सुंदर कविता सादर केल्या.
डॉ. आरती दिनकर यांनी सूत्रसंचालन केले. नंतर सर्व कवींना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
बालिकाश्रम मध्ये गेल्यावर सर्व मुलींनी त्यांची ओळख करून दिली व सुरेल आवाजात गणपती स्तोत्र म्हटले. नंतर सर्वांना सौ. प्रांजली चौधरी ताईंनी सर्व मुलींना रांगोळी काढायला शिकवले. रांगोळी काढतांना सर्व मुली खुपचं उत्साही आणि आनंदी झाल्या होत्या. त्यांचा आनंद त्यांच्या निरागस चेहेऱ्यावर अगदी ओसंडून वाहत होता. रांगोळी काढण्यात सर्व मुली इतक्या गुंग झाल्या होत्या की वेळ कसा चुटकी सारखा निघून गेला कळलेच नाही. नंतर सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन झाले.
महिला आश्रम मध्ये महिलांशी हितगुज व अभिवाचन आणि विविध कला गुण दर्शन दाखवणारे कार्यक्रम केले. एकपात्री प्रयोग दीपक सरांनी करून कोमेजलेल्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. नंतर रेखा पोकळे ताईंनी संस्थेची माहिती देणारी पुस्तक आयोजक सौ.रोहिणी ताईंना भेट दिली. अश्या अप्रतिम कार्यक्रमाचा शेवट स्वादिष्ट चहा पोहे खाऊन झाला.
हिरवाईने नटलेल्या, अतिशय स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणातून कुणाचेच पाय निघत नव्हते.
या खास दिवसावर कवी श्री दीपक पवार यांनी सुंदर काव्य रचना केली.
गोमंतकाची माती असे आगळी,
रेखाताईची तयारी निराळी
रोहिणीताईंचे नियोजन खूप भारी,
कविताईंच्या भोजनाची चव लई न्यारी
डाॅ.आरती सांभाळती निवेदनाचा भार
सौ. प्रांजली नी दिला मंचाला आवाजाचा आधार
वर्षांच्या अन् नागरत्नांच्या बरसल्या शब्दधारा,
रेखाजीं व सर्वांच्या संगतीला पाऊस अन् वारा
ॠचाजींच्या शब्दात जादूई स्वर
सुनिताजी व मंजिरीजींचा अमृतमय सूर
शैलजाजींच्या स्वरात व नृत्यात सुंदर ताल – लय,
या पामराचे आनंदाने भरून आले हृदय.
रचना : कवी दिपक पवार. रुकडी, कोल्हापूर.
खरोखरच कोल्हापूर मराठी प्रतिष्ठान ग्रुपने हे जे काही पर्यावरण आणि त्याच्या जोडीला सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले ते अतिशय कौतुकास्पद आहेत. आपण, आपला ग्रुप जर असे काही उपक्रम राबवित असेल तर ते सचित्र आमच्याकडे पाठविल्यास आपल्या पोर्टल वर नक्कीच प्रसिद्ध करता येतील.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800