‘तुमची गीते वाचताना मला ती काव्यकल्पनांमुळे जशी आकर्षून घेतात, तसे त्यातले गाणेही मला सतत जाणवत राहते…’
— स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर ! ….
१५ एप्रिल १९३२ रोजी सुरेश भट यांचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे रामनवमी! सुरेश भट लहान असतानाच एक दुर्दैवी घटना घडली. त्यांना पोलिओने गाठले. त्यात त्यांचा एक पाय कायमचा अधू झाला. त्यामुळे त्यांना मैदानात जाऊन खेळायला जमत नसे. परंतु इच्छाशक्ती असेल तर एक मार्ग बंद झाला तरीही अन्य मार्ग खुणावतात. त्यांचेही तसेच झाले.
आईमुळे भट साहेबांना संगीताची आवड निर्माण झाली. आई हार्मोनियम वाजवत असल्यामुळे सुरेशने घरात बसल्या बसल्या वेगळे काही छंद जोपासावेत म्हणून बाजाची पेटी आणून दिली. वडील श्रीधर ह्यांनाही संगीताची आवड असल्यामुळे घरी एक ग्रामोफोन होता. सुरेशला लागलेला संगीताचा छंद पाहून डॉक्टर नेहमीच नवनवीन ध्वनिमुद्रिका घेऊन येत.
सुरेशची संगीताची आवड पाहून त्याचा शाळेच्या बँडपथकात प्रवेश झाला. पथकात ते बासरी वाजवू लागले. ते पाहून श्रीधरपंतांनी चिरंजीवाला सखोल संगीत शिक्षण मिळावे म्हणून प्रल्हादबुवांची सांगीतिक शिकवणी लावली.
बारा वर्षे वय असताना सुरेश भट यांनी कविता लिहायला सुरुवात केली. दोन-अडीच वर्षात अनेक कविता लिहून झाल्या परंतु का कोण जाणे वैतागून त्यांनी पन्नास-साठ कविता लिहिलेली वही एका विहिरीत टाकून दिली. मॅट्रिक झाल्यानंतर नवीन दृष्टी प्राप्त झाल्याप्रमाणे त्यांनी पुन्हा काव्य लेखनाला सुरुवात केली. विदर्भ महाविद्यालयातील मराठी विषयाचे शिक्षक आणि प्रतिभासंपन्न कवी भ.श्री. पंडीत यांचे मार्गदर्शन सुरेश भट यांना मिळाले. त्याच काळात भट कुसुमाग्रज, केशवसुत आणि तांबे यांच्या लेखनाने प्रभावित झाले.
काव्य लिहिता लिहिता सुरेश भट उर्दू गझलांकडे आकर्षित झाले. ते गझलांचा विविध मार्गांनी अभ्यास करु लागले, उर्दू भाषकांशी उर्दूतून संभाषण करु लागले. रात्री उशिरापर्यंत जागून मुशायारे ऐकू लागले. त्यांनी १९५४ या वर्षी पहिली मराठी गझल लिहिली… ‘का मैफलीत गाऊ ?’ हीच ती गझल ज्यामुळे एक गझलकार जन्माला आला… सुरेश भट! सोबतच त्यांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली. महाविद्यालयात शिकत असताना केलेल्या रचना ते मित्रांना ऐकवून दाखवत तेही कुठे तर रस्त्यावर असलेल्या चहाच्या टपरीवर !
भट साहेबांनी अनेक कविता, गझल, शेर लिहिले. त्यांची एक रचना महाराष्ट्रदिन, स्वातंत्र्यदिन आणि मराठी राजभाषा दिनी सर्वत्र ऐकू येते. ते गीत म्हणजे….
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी !

सुरेश भट नव्याने लिहिणारांना ते उपदेश करत…
“फुकाचे काय शब्दांना मिळे
दिव्यत्व सत्याचे ?
घराची राखरांगोळी कपाळी
लावतो आम्ही”
अतिशय समर्पक शब्दात शब्दांशी इमान राखणाऱ्या लेखकां विषयीच्या ह्या भावना हृदयाला स्पर्श करतात. अशीच एक रचना आईला समर्पित केलेली आहे. ती अशी….
गीत तुझे मी आई, गाइन
शब्दोशब्दी अमृत ओतुन
भावफुलांना पायी उधळुन
मम प्रतिभेचे झिजवुनि चंदन
आयुष्याचा कापुर जाळुन
तुझे सारखे करीन पूजन
शब्दांची किती छान योजना आहे, प्रतिभेचा यापेक्षा उत्तुंग आविष्कार दुसरा कोणता असू शकेल ? प्रतिमांचा चपखल उपयोग मनाला भावतो. मातृभूमीला वंदन करणारी, तिचे गोडवे गाणारी रचना अशीच वाचनीय आणि गेय आहे. ही रचना आपण सारेच अधूनमधून नक्कीच गात असतो…
‘गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे । आणीन आरतीला
हे चंद्र, सूर्य, तारे !’…
ही कविता, हे शब्द ओठावर न आलेला माणूस शोधून सापडणार नाही….
एक फार मोठा योगायोग त्यांच्या जीवनात घडून आला. सुरेश भट यांनी लिहिलेल्या कवितांची वही एका व्यक्तिला सापडली. त्यातील कविता वाचून एक अनमोल खजिना सापडला असल्याच्या भावनेतून त्या व्यक्तिने सुरेश भट यांचा शोध घेतला. दोघांची भेट झाली आणि भटांच्या त्या काव्यांना सुंदर अशा चाली लावणारी ती व्यक्ती होती…. पंडित हृदयनाथ मंगेशकर! नंतर भटांच्या कविता, गझला पंडित हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्यासारख्या दिग्गजांनी गायल्या आहेत. हरवलेले योग्य व्यक्तिच्या हाती सापडले की त्याचे सोने होते, ते असे.
सुरेश भट यांनी लिहिलेल्या गझला, कविता या सर्वांची नोंद इथे घेणे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यांची एक हळुवारपणा जोपासणारी रचना ही रसिकांच्या ओठावर घोळत असते… ते म्हणतात…
चल ऊठ रे मुकुंदा, झाली पहाट
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली…
सुरेश भट यांनी गझल हा काव्य प्रकार स्वतःसाठी कधी मर्यादित ठेवला नाही तर अधिकाधिक कवींनी ह्या गझल सारख्या रचना कराव्यात अशी त्यांची तळमळ होती. गझला लिहिणारांना ते सातत्याने मार्गदर्शन करीत. गझल लिहायची कशी, ते तंत्र कोणते, व्याकरणाच्या दृष्टीने प्रत्येकाची गझल शुद्ध असावी, सक्षम असावी या तळमळीने त्यांनी ‘गझलेची बाराखडी’ हे पुस्तक लिहून प्रकाशित केले आणि अनेक लिहित्या हातांना बळ देण्यासाठी ती पुस्तिका स्वखर्चाने पाठवून दिली.
सुरेश भट यांचे लग्न १९६४ यावर्षी पुष्पा मेंहदळे यांच्याशी झाले. त्या शिक्षिका होत्या. विशाखा, हर्षवर्धन आणि चित्तरंजन ही त्यांची संतती परंतु दुर्दैवाने हर्षवर्धन या मुलाचा एका अपघातात मृत्यू झाला आणि भट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला… भटांच्या लेखनातून एक अजरामर गीत जन्मले…
‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुनही वाटते मला की
अजुनही चांदरात आहे…’
‘कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते.’ असा सल्ला देऊन सुरेश भट पुढे म्हणतात,
‘हे बघा, आता मी जे सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. नाव व्हावं म्हणून कधीही लिहू नये. लिहिल्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहावं…’ सुधीर भट यांचे हे वाक्य म्हणजे एक संदेशच आहे. यातील ‘राहवत नाही’ ह्या शब्दांमध्ये फार मोठा गहन अर्थ सामावला आहे. कोणताही विषय सुचला, एखादी घटना लक्षात आली की लगेच लिहायला बसू नये. अगोदर त्यावर चिंतन, मनन करावे हे करत असताना एक वेळ अशी येते की, एक प्रकारची अस्वस्थता येते, भटांच्या शब्दात ‘राहवत नाही’ आणि मग लेखन सुरू करावे एक मस्त कलाकृती जन्मते…
अशा हरहुन्नरी आणि साहित्य, लेखनाला सर्वस्व मानणारे, मातृभाषेचे पांग फेडण्याची आस मनी बाळगून असलेलले सुरेश भट यांचा १४ मार्च २००३ कर्करोगाने मृत्यू झाला. गझल सम्राट सुरेश भट यांना विनम्र अभिवादन.

— लेखन : नागेश शेवाळकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800