Monday, September 9, 2024
HomeUncategorizedगुरू महिमा

गुरू महिमा

शिक्षक म्हणजे गुरू. आजच्या शिक्षक दिनानिमित्ताने तसेच तिथीनुसार आज, ५ सप्टेंबर रोजी शांतीसागर महाराज यांचा समाधी दिन आहे, या निमित्ताने हा विशेष लेख.सर्व गुरू जणांना विनम्र अभिवादन.
– संपादक

गुरु गोविंद दोऊ खडे
काके लागू पाय,
बलिहारी गुरु आपणो गोविंद दियो बताय।

पहिले गुरु अध्यात्मिक, दुसरे आई-वडील, तिसरे शिक्षक आणि चौथे ज्यांनी ज्यांनी आपल्याला घडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले असे सर्व पुण्यात्मे.

गुरु महिमा अगाध आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा तो गुरु. अंधाराकडून उजेडाकडे नेणारा तो गुरु. सन्मार्गावर नेऊन पोहोचविणारा तो गुरु.
गुरु महिमा अनंत आहे, दिशादर्शक गुरु, मार्गदर्शक गुरु, माऊली गुरु, गुरु घडविणारा गुरु, पाषाणाचा देव बनविणारा गुरु, आयुष्य रुपी वादळात किनाऱ्याला घेऊन जाणारा तो गुरु. अशाच एका गुरूंचा, आचार्यांचा समाधीदिन सप्टेंबर महिन्यातला

चारित्र्य चक्रवर्ती प्रथम आचार्य श्री शांतिसागर महाराज यांचा जन्म दक्षिणेतील बेळगाव जिल्ह्यातील भोज जवळील यलगोल येथे 1872 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमगोंडा व आईचे नाव सत्यवती होते तसेच त्यांचे स्वतःचे मूळनाव सात गोंडा असे होते. सुरुवातीपासूनच ते वित्तराग प्रवृत्तीचे होते व थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या धार्मिक कथा त्यांना आवडायच्या. कधीही अधर्म न करणारे मितभाषी, मृदभाषी, संयमी असे ते व्यक्तिमत्व होते.

वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले आणि सहा महिन्यातच त्यांची पत्नी मृत पावली. त्यानंतर त्यांनी कधीही विवाह केला नाही. आई-वडिलांनी आग्रह केला तरी त्यांनी सांगितले की, मी विवाह करणार नाही व आई-वडिलांना वचन देखील दिले की आई वडीलांचे जीवनमान असेपर्यंत ते दीक्षा घेणार नाहीत.

त्यांच्या वडिलांचे कपड्याचे दुकान होते. कपडा स्वतः कट करून घ्यायला ते लोकांना लावत व जेवढे पैसे द्यावे वाटतील तेवढे गल्ल्यात टाका असे सांगत असत.

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर उत्तूर गावात त्यांची भेट गुरु देवेंद्रकीर्तीजी महाराज यांच्याशी झाली. त्यांनी गुरूंना निरग्रंथ दीक्षा मागितली पण गुरूंनी त्यांना सांगितले की मुनीव्रत तेवढे साधे नाही. सुरुवातीला त्यांनी त्यांना क्षुल्लक दीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी निरग्रंथ दीक्षा घेतली तसेच पुढील टप्प्यात नेमिनाथजींच्या दर्शनाला ते गिरनारला गेले तेव्हा त्यांनी एलकपथची दीक्षा घेण्याचे ठरविले.

त्यांच्या तपस्वी जीवनात ते शास्त्रचिंतन, आत्म स्वाध्याय, तपोजीवन, तत्व उपदेश यातच रममाण राहिले.

प्राणीमात्रां विषयी सुद्धा त्यांच्या मनात खूप दया आणि सहानुभूती होती. बेडकाला खात असणाऱ्या एका सापाला त्यांनी पळविले.
गुहेत जेव्हा ते ध्यानाला बसत असत त्यावेळेस अनेक वेळा त्यांच्या अंगावर नाग देखील चढले तरीही तपश्चर्येतून त्यांचे मन अजिबात विचलित झाले नाही. ते जेव्हा मुक्तागिरी येथे वास्तव्यासाठी होते तेथे सिंह देखील त्यांच्यासमोर येऊन बसत.
मी जर त्यांना त्रास दिला नाही तर ते मला कशासाठी त्रास देतील असे त्यांचे नेहमी वक्तव्य असायचे.
जेव्हा आपल्या संघाबरोबर ते शिखरजीला जात होते तेव्हा रस्त्यात चार पाच बैल त्यांच्यासमोर आले ते आता हल्ला करतील अशी परिस्थिती असताना ते बैल शांतीसागर महाराजांना बघून नतमस्तक झाले.

त्याकाळी जैन मुनींच्या विहारा बाबत खूप विरोध होत होता. काही दुष्ट लोकांनी या जैन दिगंबर आचार्य व मुनी संघावर जेव्हा हल्ला केला तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडले.
शांतीसागर महाराजांनी त्यांना सोडण्यास सांगितले, पोलिसांनी त्याला नकार दिला तेव्हा त्यांनी ते स्वतः अन्नत्याग करतील असे सांगितले इतकी सर्वांप्रती त्यांना दया होती.

एकदा ध्यानधारणा करत असताना त्यांच्या अंगावरती मुंग्या चढल्या तेव्हा तेथील पुजाऱ्याला ते म्हणाले, माणसाच्या कर्मामुळे त्याला त्रास असतो कोणीही त्याला स्वतःहून त्रास देत नसतो. म्हणून मुंग्या चावल्या हे माझे कर्म आहे. इतरांनी त्रास देणे हे माणसाचे स्वतःचे संचित असते किंवा कर्म असते.

जे प्राणी त्यांच्या आभामंडळात येत होते ते निरूपद्रवी होत असत जरी ते हिंस्त्रश्वापदं असले तरी देखील.

शास्त्र चर्चाकार अडप्पा यांना बोलता येत नव्हते तेव्हा गुरुदेवजींनी त्यांना नमोकार मंत्र म्हणायला लावून बोलते केले.

एकदा एका ब्रिटिशियन अधिकाऱ्याने त्यांना दिगंबर अवस्थेत असल्यामुळे अडविले तेव्हा ते तिथेच ध्यानस्थ बसले. ब्रिटिशियन मोठे अधिकारी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा जैन मुनींवरती कोणताही दबाव न टाकण्याचा आणि त्यांच्या विहारावरती कुठलीही मर्यादा न आणण्याचा कायदा ब्रिटिश सरकारने केला.

आचार्य शांतीसागर महाराजांना चारित्र्य चक्रवर्ती असे का म्हटले जाते कारण, त्यांनी चारित्र्याचे सहा खंड ज्याच्यामध्ये गुप्ती, समिती, धर्म, बारा भावना, परिषज्य, आणि चारित्र्यावर विजय प्राप्त केला होता.

जैन धर्माला जेव्हा स्वतंत्र धर्म म्हणून घोषित केले तेव्हा त्यांनी अन्नग्रहण केले. जिनवाणी जेव्हा जीर्ण झाली तेव्हा ताम्रपत्रावरती लिहिण्याचे कार्य त्यांनी करवून घेतले.

एकदा त्यांच्या अंगावरती एक डाग आला, तो चर्मरोग पुढे वाढत राहिला त्यापुढे ते कुंथलगिरी येथे आले व त्यांनी सल्लेखना घेण्याचे मनात ठरविले. वीरसागर महाराजांना त्यांनी गुरु दीक्षा देण्याचे ठरविले. आचार्य पदाचा भार त्यांनी वीरसागर महाराजांना दिला. त्यांनी देखील उत्तर काळामध्ये समाधी ग्रहण करावी व आपला आचार्य पदभार पुढील आचार्यास द्यावा व सुयोग्य शिष्यास उत्तराधिकारी ठरवावे हेही सूचित केले म्हणजे ही परंपरा टिकून राहील हे ही पहावे असे सांगितले. आचार्य पद परिग्रहाचा त्याग त्यांनी केला.
शेवटी शेवटी जल त्याग देखील त्यांनी केला व 36 दिवसांची सल्लेखना घेतल्यानंतर त्यांनी संदेश देखील दिला की, आत्मचिंतन केल्याशिवाय सम्यक प्राप्ती होत नाही.

त्याग व तपश्चर्या मूर्ती शांतीसागर महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात 9938 उपवास केले.
अशा या थोर तपश्चर्या मूर्तीचा समाधी दिन आहे 18 सप्टेंबर 1955.
त्यांचा शेवटचा संदेश हा होता संयम पाळा, संयम पाळा, संयम पाळा….
समाधी सम्राट प्रथम आचार्य श्री शांतीसागर महाराज नमोस्तु नमोस्तु नमोस्तु.

— लेखन : संगीता कासार (जैन). मुख्याध्यापिका, लातूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments