Thursday, December 5, 2024
Homeबातम्याग्रंथालयांनी बदलणे आवश्यक - मनोज गोगटे

ग्रंथालयांनी बदलणे आवश्यक – मनोज गोगटे

राज्यात बारा हजार ग्रंथालये आहेत. पण त्यांना मिळणारे सरकारी अनुदान जर बंद झाले तर त्यांपैकी दहा हजार ग्रंथालये बंद पडतील. त्यामुळे ग्रंथालयांना लोकाश्रय मिळावा असे वाटत असेल तर त्यांनी काळानुरूप बदलणे आवश्यक आहे. त्यामुळे विविध स्तरांतील लोक वेगवेगळ्या कारणांनी ग्रंथालयांकडे पुन्हा येतील, असे परखड विचार श्रीवर्धन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री मनोज गोगटे यांनी व्यक्त केले. ते चिपळूण येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या
ग्रंथालय मित्र मंडळ मेळाव्यात बोलत होते.

बदलत्या काळ परिस्थितीत पुस्तकांचा संग्रह आणि त्यांची देवघेव करण्याचे ठिकाण एवढेच कार्य करून ग्रंथालयांना पुरेसे ठरणार  नाही. त्यांना सांस्कृतिक केंद्राचे नवे, विस्तारित रूप घ्यावे लागेल. तेथे केवळ वाङ्ममय नव्हे तर विविध विद्याशाखांचा पाठपुरावा करावा लागेल. वेगवेगळी माध्यमे वापरावी लागतील. ज्ञान संकलन व ज्ञान प्रसारण हे त्यांचे मुख्य कार्य राहील असा सूर या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. 

लेखक व विविध विषयांचे तज्ज्ञ डॉ तानाजीराव चोरगे यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले. दातार, बेहेरे, जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य माधव बापट यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, की महाविद्यालयीन ग्रंथालये विविध पुस्तकांनी भरगच्च अशी भरलेली असतात. तथापी, विद्यार्थी त्यांचा लाभ उठवत नाहीत असाच आमचा अनुभव आहे.

‘ग्रंथालय मित्र मंडळा’चे प्रवर्तक सुधीर बडे आणि ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संचालक गिरीश घाटे यांनी चर्चासत्राचे प्रास्ताविक करताना सांगितले की, सध्या वाचन कमी झाले आहे. ते पुढील काळात आणखी घटणार आहे. केवळ छांदिष्ट लोक वाचत राहतील. त्यामुळे ग्रंथालयांचा लोकाश्रय कमी होणार हे स्वाभाविक आहे. म्हणूनच या टप्प्यावर ग्रंथालयांनी त्यांची भूमिका जाणावी आणि कार्यविस्तार करावा. ज्ञानाची; तसेच, मनोविनोदनाची नवनवीन साधने उपलब्ध होत जाणार आहेत. त्यांचा फायदा घेऊन ज्ञानप्रसार हे व्यापक उद्दिष्ट ग्रंथालयांनी त्यांच्यापुढे ठेवावे.

‘ग्रंथालय मित्र मंडळा’च्या गावोगावी मेळावे घेण्याच्या मोहिमेचे अध्यक्ष डॉ. रविन थत्ते यांनी मोहिमेतील या पहिल्या कार्यक्रमास संदेशपर लिहून दिलेले भाषण मनीषा दामले यांनी वाचून दाखवले. ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’चे कार्याध्यक्ष चितळे यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले.
चर्चेस प्रत्यक्ष आरंभ करताना देवरुखचे गजानन केशव जोशी यांनी ग्रंथालये नवनवीन वाचकांना आकृष्ट करण्यासाठी उपक्रम योजू शकतात हे विविध उदाहरणांनी दाखवून दिले. दुर्गम भागातील गावी ग्रंथालय निष्ठेने चालवणारे नारकर यांनीही मुख्यत: स्पर्धांच्या माध्यमातून बालवाचकांना खेचून कसे घेता येते ते सांगितले. ग्रंथालयाने सलून, देवळे, बाजार येथे  ‘वाचनकट्टे’ चालवले असल्याची अभिनव माहिती त्यांनी दिली.स्वातंत्र्यपूर्व काळात वाचनप्रसाराच्या ओढीने ग्रंथालये सुरू झाली. त्यामुळे पुस्तके, मासिके यांच्याबद्दल समाजात आकर्षण निर्माण झाले. त्यातून माणूस सुजाण, सुसंस्कृत व ज्ञानी होत गेला. नंतरच्या काळात नवनवीन माध्यमे आल्यावर लोकांचा तो विश्वास घरंगळत चालला असून गावोगावची जुनी ग्रंथालये या ऐतिहासिक वास्तू म्हणून शिल्लक राहिल्या आहेत. पण चिपळूणच्या  ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’ यासारखी जी ग्रंथालये नवनवीन उपक्रम करतात तेथे लोक वारंवार येत असतात असे आढळून येते.

बडे यांनी गावोगावी ‘ग्रंथालय मित्र मंडळे’ कशी बनवता येतील याबाबत माहिती दिली. गावातील इच्छुक लोकांनी एकत्र येऊन मंडळ बनवावे. ते रजिस्टर करावे. अशा गावोगावच्या नोंदणीकृत ग्रंथालयांना नेटवर्कने जोडता येऊ शकेल. तो महाराष्ट्रव्यापी कार्यक्रम होईल.

चर्चेत डॉ. रत्नाकर सीताराम थत्ते यांनी ते व्यक्तिश: करत असलेल्या ग्रंथ प्रसार प्रयत्नांची माहिती दिली. ते ‘ग्रंथालय मित्र मंडळा’साठी आदर्श म्हणून उपयोगी वाटले.

ग्रंथाली वाचक चळवळीचे अर्धव्यू श्री दिनकर गांगल यांनीही या वेळी समयोचीत मार्गदर्शन केले.

प्राची जोशी, विनिता नातू, राजकुमार सावंत, अरुण इंगवले, गोराडे, राष्ट्रपाल सावंत, सुहास बारटक्के, कैसर देसाई, विवेक कदम इत्यादींनी चर्चेत सहभाग घेतला.

शेवटी लोकमान्य टिळक स्मारक मंदिराचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रकाश देशपांडे यांनी चर्चासत्र उपयुक्त ठरले असल्याचा अभिप्राय व्यक्त करून दिवसभराच्या कार्यक्रमाचा समारोप केला.

या मेळाव्यास विविध ग्रंथालयांचे पदाधिकारी, ग्रंथपाल आणि लेखक, प्राध्यापक उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. ग्रंथालयांची उपयोगिता आणि निरुपयोगीता
    अनेक अभ्यासू, वाचनप्रेमींना इच्छा असूनही परवडत नाही म्हणून आवडीच्या लेखकांची, विषयांची जाडजूड पुस्तके विकत घेणे शक्य नसते. अशा अनेकांना वाचनालये उपयोगी असतात. धनिकांच्या उदार देणग्यांच्या मदतीने नव्या ग्रंथांची भर पडते. ग्रंथालयाच्या वास्तूची दुरुस्ती केली जाते.
    अनेक आपल्या उत्तर जीवनात ग्रंथालयांचे उरताई आहोत असे अभिमानाने सांगतात. मीही त्यातला एक आहे.
    बदलत्या काळानुसार तळहातात सर्व जगाचे ज्ञान हात जोडून उभे राहताना ज्ञान साधना कमी, टिवल्याबावल्या करत वेळ घालवायला सोय झाल्याचे दिसून येते. वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी छापून येणारी बातमी शिळी होऊन गेलेली असते. संपादकीय पान देखील अजेंडा घेऊन चालवायची वेळ आली आहे.
    यामुळे ग्रंथालयांची दैना विचित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !