कर्तव्य आणि जबाबदारी
घेतली सर्व खबरदारी
आणि जगायचे राहून गेले…..
आज करू उद्या पाहू
दिवसांमागून दिवस सरले
आणि जगायचे राहून गेले….
सामाजिक बंधन, अटी तटी
नाही पार केल्या कधी चौकटी
आणि जगायचे राहून गेले….
नाते जपले सर्व सोसले
मनाचे कधी न ऐकले
आणि जगायचे राहून गेले…..
मोह माया प्रेमळ छाया
जगाच्या विचारात वेळ गेला वाया
आणि जगायचे राहून गेले….
अपेक्षांचे ओझे सदैव वाहिले
तडजोड करून नेहमीच पाहिले
आणि जगायचे राहून गेले….
स्वतःचे अस्तित्व कधी न जपले
जीवनभर सर्वांसाठी खपले
आणि जगायचे राहून गेले….
लोकांना ओळखण्यात चुकले
अनेक संधींना मुकले
आणि जगायचे राहून गेले….
न दिसला मनुष्याचा लबाडीपणा
सहन केला सर्वांचा खोटेपणा
आणि जगायचे राहून गेले……
लाख मर्यादा, सतत धाक
स्वप्नाची ती झाली राख
आणि जगायचे राहून गेले….
आणि जगायचे राहून गेले….

— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
वस्तुस्थितीचे विदारक दर्शन…!
खूप छान रचना आहे ताई, मनाला भावणारी 👌👌👌
खूपच सुंदर कविता … बऱ्याच लोकांना आपलीशी वाटेल अशी आहे ही कविता.