देवा ! कसे आले दिस
झाला माणूस दानव
जिवा लागे हुरहूर
मनी कालवाकालव
बुकं खूप शिकलेला
हाती पैसा झाला मोप
नाही चाड ती कशाची
जणू खुरटलं रोप
खेड्यातून माही लेक
जाई रोजंच साळेला
पोर हाय लई भोळी
घोर लागतो जिवाला
नाही वाट ती सरळ
काट्याकुट्यातून जाई
जाते तशी तुडवत
साळा गाठण्याची घाई
नदी वाटंत आडवी
ओलांडुनी जाई पोर
पूर येई पावसाने
जिवा लागतोया घोर
झाला विकास शहरी
गाव बुडे अंधारात
बाप जगाचा पोशिंदा
बुडालेला संकटात
आले आले कलीयुग
लवकर जगबुडी
जाशी कैसा पैलतीरी
जड पापाची गाठोडी
— रचना : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800