“फ्रान्झ काफ्का”
फ्रान्झ काफ्का हे विसाव्या शतकातील प्रमुख जर्मन भाषिक लेखक, कादंबरीकार व लघुकथाकार होते. जर्मन भाषिक प्रदेशात जन्म झालेला नसताना देखील त्यांचे सर्व साहित्य जर्मन भाषेतच आहे. आश्चर्य म्हणजे त्यांच्या अनेक प्रसिद्ध साहित्यकृती त्यांच्या मृत्युपश्चात प्रकाशित झाल्या आहेत.
फ्रान्झ काफ्का यांचा जन्म ३ जुलै १८८३ मध्ये तत्कालीन ऑस्ट्रिया-हंगेरी प्रदेशातील प्राग शहरात ज्युली आणि हेरमान ह्या ज्यु धर्मीय मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे मोठे दोन भाऊ लहानपणीच मृत्यू पावल्यामुळे ते सर्वात मोठे आणि जबाबदार ह्या भूमिकेतून त्यांचे आयुष्य जगले. त्यांना तीन लहान बहिणी होत्या. अध्यात्माकडे झुकाव, अत्यंत हुशार, चलाख बुद्धी, शांत उदासीन स्वभाव तसेच नाजूक शरीरयष्टी हे सर्वच त्यांना त्यांच्या आईकडून आले होते, तरी देखील त्यांचे आईबरोबरचे नाते फार घनिष्ठ नव्हते. त्यांचे वडील कट्टर ज्यु धर्मीय व कर्मकांडात आणि सामाजिक बंधनात अडकलेले होते.
फ्रान्झ काफ्का जर्मन आणि चेक दोन्ही भाषा आणि संस्कृतींमध्ये वाढले परंतु शालेय शिक्षण चालू असताना ते वडिलांच्या धाकाने आज्ञाधारी होते खरे पण शांत, दुःखी, उदासीन आणि अपराधी भावना घेऊन जगले. मोठे झाल्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला समाजवादी आणि नास्तिक म्हणून जाहीर केले. त्यांच्या लेखनावर ह्याचा प्रभाव दिसून येतो.
फ्रान्झ काफ्का यांची ओळख १९०२ मध्ये जर्मन ज्यु लेखक, तत्वज्ञानी मॅक्स ब्रॉड ह्यांच्याशी झाली. त्यांनी यथावकाश काफ्का च्या लेखनावर संस्कार करून ते सर्वांना समजेल असे सुलभ, सोपे केले. प्राग विद्यापीठात त्यांना १९०६ मध्ये विधी विषयात PhD पदवी मिळाली व त्यांनी इन्शुरन्स कंपनी मध्ये नोकरी सुरू केली. कामाच्या तणावामुळे त्यांना रात्री जागून लेखन करावे लागे पण त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला.

काफ्का यांना प्राग मध्ये नोकरी करत असतानाच क्षय रोग झाल्याचे कळले व त्यांचे आयुष्य विस्कळीत झाले. त्यांना लेखन, नातेसंबंध आणि नोकरी काहीच धड सांभाळता येईना. १९२३ मध्ये ते बर्लिन मध्ये केवळ लिखाण करण्यासाठी गेले जिथे त्यांना डोरा नावाची एक ज्यु मुलगी भेटली व ते एकत्र राहू लागले. त्यांची तब्येत पूर्णपणे खालावल्यामुळे ते शेवटीची भेट म्हणून प्रागला आले आणि व्हिएन्ना जवळील एका इस्पितळात ३ जून १९२४ रोजी त्यांचा चाळीसाव्या वर्षी मृत्यु झाला.
काफ्का यांनी ४० वर्षांच्या काळात जे काही लिखाण केले ते मात्र अत्यंत उत्कृष्ट, प्रभावशाली आणि विचारांना चालना देणारे आहे. आत्ताच्या काळातील युवक युवतींना भावणारे असे त्यांचे लेखन आहे .त्यामुळेच अजूनही त्यांच्या कथा, कादंबऱ्या वाचल्या जातात व अभ्यासल्या जातात. त्यांच्या उदासीन स्वभावामुळे तसेच आत सतत चाललेल्या झगड्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूपच कमी होता. ह्या मानसिक अस्थिरतेचा परिणाम म्हणजे त्यांनी स्वतःच त्यांचे ९०% लेखन जाळून टाकले. जे काही १० % होते त्यातले देखील काही हरवले व अगदी अल्प प्रमाणात उपलब्ध असलेले प्रकाशित झाले आहे.
त्यांच्या साहित्यातील अत्यंत गाजलेल्या साहित्यकृती खालीलप्रमाणे…

१) दास उअरटाइल (The Judgement) – :
१९१२ मध्ये लिहिलेली ही लघुकथा एक माणूस आणि त्याचे वडील यांच्या नातेसंबंधांवर आधारित आहे. फेलिस बाऊर नावाच्या मुलीला भेटल्यानंतर त्यांनी ही संपूर्ण कथा एका रात्रीत एका बैठकीत लिहून पूर्ण केली. मानसिक स्तरावरील चलबिचल, अतिविचार करण्याचा परिणाम आणि गोंधळलेल्या मनामुळे बिघडलेले नातेसंबंध असे सगळे ह्यात लेखकाने दाखवले आहे. ह्या बद्दल अजून माहिती करून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
२) दि फेरवानडलुंग -:
(The Metamorphosis) – ही काफ्का च्या सर्वसाहित्यातील सर्वात जास्त प्रसिद्ध तसेच सर्वात मोठी (अंदाजे ७० पाने) परंतु तरीही लघु कादंबरी आहे. वेगळ्या धाटणीच्या ह्या कथेतील नायक असतो एक सामान्य विक्रेता ग्रेगोर सामसा. अचानक एके दिवशी झोपेतून उठल्यावर त्याचे रूपांतर एका अवाढव्य कीटकात (काही ठिकाणी झुरळ असा उल्लेख आहे) झालेले दाखवले आहे. एकाएकी झालेल्या ह्या बदलाचा परिणाम काय होतो आणि त्याला जगण्यासाठी कसे झगडावे लागते ते सर्व ह्यात लेखकाने मांडले आहे. मनोविकार, सामाजिक बंधने, रोजच्या रोज जगण्यासाठीचा लढा असे अनेक पैलू ह्यात हाताळले आहेत. ह्या उत्कंठावर्धक कथेबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
३) देर फेरशॉलेनं (The Missing Man /The Man who disappeared) –
१९११ ते १९१४ ह्या दरम्यान लिहिलेली ही काफ्काची पहिली कादंबरी. जी काफ्का च्या मृत्युपश्चात प्रकाशित केली आहे व ती अपूर्ण आहे. अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या त्याच्या अनेक नातेवाईकांवर लिहिलेली ही कादंबरी आहे. जी इंग्रजी मध्ये अनेक लोकांनी विविध नावांनी प्रकाशित केली आहे.
४) ब्रिफे आन फेलिस (Letters to Felice) – :
ब्रॉड च्या नात्यातील फेलिस नावाच्या मुलीशी काफ्काची ओळख आणि मैत्री होते. ते १९१२ ते १९१७ अशी पाच वर्षे एकमेकांच्या पत्राद्वारे संपर्कात असतात. ती पत्रे नंतर प्रकाशित झाली आहेत.
ह्या काही लोकप्रिय साहित्याशिवाय बाकी असंख्य लघुकथा, कादंबऱ्या काफ्का ह्यांनी लिहिल्या आहेत. त्यातील काही नावे म्हणजे द कॅसल, इन द पिनल कॉलनी, अ कंट्री डॉक्टर, अ लिटिल वुमन, लेटर टू हीज फादर, द ग्रेट वॉल ऑफ चायना, प्रोमेथस, द मेरिड कपल इत्यादी इत्यादी…
साहित्य हेच जीवन असलेल्या ह्या दुर्दैवी लेखकाचे जीवन ४० वर्षातच पंचतत्वात विलीन झाले. त्यांचे लेखन अचाट करणारे, मन गोंधळून टाकणारे आणि विचारांना चालना देणारे आहे. स्वतःच्या कोषात राहणे, सामाजिक जीवनात गप्पा मारणारे परंतु स्वतःच्या भावविश्वात मनोविकार असल्याप्रमाणे अडकणे हे लेखकाच्या स्वभावाचे पैलू त्याच्या लेखनात क्षणोक्षणी दिसतात. त्यांनी मांडलेल्या तत्वज्ञानाला साहित्य जगतात काफ्कास्क असे म्हटले जाते. ९०% साहित्यकृती स्वतःच जाळून टाकणाऱ्या हया चमत्कारिक व्यक्तीची तपशीलवार जीवनकथा खालील लिंकवर क्लिक करून जाणून घ्या.

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800