Wednesday, April 23, 2025
Homeसाहित्यजर्मन विश्व : १४

जर्मन विश्व : १४

“वेर्नर हेरझोग”

जर्मन सिनेक्षेत्रातील वेर्नर हेरझोग हे अत्यंत मोठे नाव, ते सिनेमा दिग्दर्शक, अभिनेते, ऑपेरा दिग्दर्शक तसेच लेखक देखील आहेत.

दक्षिण जर्मनीमधील म्युनिक शहरात ५ सप्टेंबर १९४२ रोजी वेर्नर हेरझोग यांचा जन्म झाला.दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झालेल्या दैन्यावस्थेमुळे त्यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बालपण काढावे लागले.
ते सांगतात की, त्यांच्या लहानपणी घरी खेळणी आणि उपकरणे तर नव्हतीच पण पाण्याची देखील वानवा होती. ते रहात असलेल्या गावातील प्रत्येक घरातील पुरुष गायब म्हणजे युद्धकार्यात होता. प्रत्येक घरी केवळ स्त्रीया आणि मुले होती. सिनेमा मधील “सि” देखील त्यांना माहीत नव्हता. घरची गरिबी, पित्यावीण वाढलेले पोर, केथॉलीक ख्रिश्चन धर्मात बळजबरी झालेले रुपांतर, महायुद्धाचे सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागणारे परिणाम अशा दुर्दैवी लहानपणात ते अनेक जीवनविषयक धडे शिकले, जे त्यांच्या कामात अभिव्यक्त होतात.

वेर्नर हेरझोग यांनी वयाच्या १७ व्या वर्षी पहिल्यांदा फोन वापरला. यथावकाश परिस्थिती बदलली. १९ व्या वर्षी त्यांनी त्यांच्या पहिल्या सिनेमावर काम सुरू केले. हेराकलेस (Herakles) हा त्यांचा पहिला लघुचित्रपट १९६२ रोजी निर्माण झाला. त्यानंतरच त्यांचे मनात पक्के झाले की आयुष्यात त्यांना चित्रपटच बनवायचे आहेत. त्यांनी आकिरे, द व्रथ ऑफ गॉड (Aguirre, the Wrath of God) ह्या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की, ‘चित्रपट बनवण्याच्या तयारीसाठी मी म्युनिक फिल्म स्कूल मधून ३५ मि.मी. चा कॅमेरा चोरला पण मला ती चोरी वाटत नाही, ती माझी गरज होती. माझा त्यावर एक स्वाभाविक हक्क आहे असे मला वाटले.’ इतक्या मोकळेपणे हे जगजाहीर करणे किंवा करता येणं, सोपे नाही हो. कौतुक वाटले मला त्यांच्या खरेपणाचे.

चित्रपट दिग्दर्शक म्हणून सिनेक्षेत्रात पदार्पण करण्याआधी त्यांनी पैसे जमवण्यासाठी रात्रपाळी केली. तसेच त्यांच्या मैत्रिणीबरोबर इंग्लंडला जाऊन इंग्रजी शिकले. १९६२ पासून सुरू झालेली “नव जर्मन चित्रपट” चळवळ १९८२ पर्यंत चालू राहिली. वेर्नर हेरझोग तसेच तत्कालीन बाकी दिग्दर्शक जसे की रायनर वेर्नर फासबिन्डर, विम वेंडर्स व फॉल्कर श्लोनडॉर्फ ह्यांनी एकत्र जर्मन सिने जगताला कलाटणी दिली. कमी वेळाचे, कमी खर्चात बनवलेले, जागतिक पातळीवरील घडामोडी विचाराधीन घेऊन बनवलेले हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

दिग्दर्शक म्हणून वेर्नर हेरझोग हे अत्यंत चोखंदळ, वेगळा विचार करणारे आणि नवनवीन प्रयोग करणारे आहेत. त्यांच्या चित्रपटांमधील खास गोष्ट म्हणजे त्यांचा नायक कमालीचा महत्त्वाकांक्षी व अशक्यप्राय वाटणाऱ्या स्वप्नांचा मागोवा घेणारा असतो, यांच्या कथनकातील पात्रे असाधारण बुद्धी कौशल्य असलेली पण तितकीच अस्पष्टता असलेली असतात. त्यांच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची शैली पारंपरिक पद्धतीची नसून, प्रयोगशील असते. अभिनय नाटकी वाटू नये म्हणून ते पात्रांसाठी चित्रपटातील परिस्थिती सारखीच वास्तविक परिस्थिती निर्माण करून त्याचा अनुभव देतात व ते चित्रित केले जाते. ह्या अभिनव पद्धतीमुळे चित्रपटांत प्रत्येक पात्र ते पात्र जगत असतो आणि म्हणून अभिनय स्वाभाविक होतो.

वेर्नर हेरझोग ह्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे आकिरे, द व्रथ ऑफ गॉड, १९७२ (Aguirre, the Wrath of God) – हा एक ऐतिहासिक सिनेमा असून क्लाऊस किंस्की ह्यावर चित्रित झाला आहे. हा स्पनिश शिपाई असतो v त्याच्या सहकाऱ्यांबरोबर तो अमेझॉन नदीच्या पात्राजवळ एका सोने असलेल्या गावचा शोध घेतो.

द एनिग्मा ऑफ कास्पर हाउसर, १९७४ (The Enigma of Kaspar Hauser) – Every man for himself and God Against All अशा नावाने जर्मन चित्रपट बनवलेला गेला. ह्यातील नायक कास्पर हाउसर वयाची पहिली १७ वर्षे एका लहानशा तुरुंगात एकटा राहतो आणि मग एका दुखापतीने मरण पावतो अशी भयानक पण रोमांचक पटकथा असलेला हा सिनेमा आहे.

हार्ट ऑफ ग्लास, १९७६ (Heart of Glass) – जर्मनीमधील बवेरिया भागातील एका प्रोफेटच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.

स्टोसेक १९७७ (Stroszek) – ब्रुनो नावाचा प्रसिद्ध अभिनेता ह्यात आहे. ह्या सिनेमाची खासियत म्हणजे ह्यातील अभिनेते अननुभवी आहेत .हा विनोदी पण त्याच वेळी भावूक करणारा सिनेमा आहे. नोस्फेरतू द वंपायर १९७९ (Nosferatu the Vampyre) – हा एक थरारक सिनेमा ड्रॅक्युला नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.

फ्रित्झकार्लदो १९८२ ( Fritzcarraldo) – साहसी शौर्यकथा असलेला हा सिनेमा क्लाउस किंस्कीवर चित्रित झाला आहे. ह्यातील नायक एक मोठे जहाज एका अवघड, दुर्गम भागातून दुसऱ्या प्रदेशात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करताना दाखवला आहे.

कोब्रा वर्दे १९८७ ( Cobra Verde) – क्लाउस किंस्की बरोबरचा हा अखेरचा चित्रपट असून ह्यात सोन्याच्या वखाणीत काम करणाऱ्या कामगाराची दुर्दैवी जीवनकथा दाखवली आहे.

ह्याशिवाय काही महत्वाचे चित्रपट आणि डॉक्युमेंट्री खालीलप्रमाणे लेसन्स of डार्कनेस १९९२ (Lessons of Darkness), लिटिल डिटर नीड्स टू फ्लाय १९९७ (Little Dieter needs to fly), माय बेस्ट फाइंड १९९९ (My best Fiend), इनविन्सिबल २००१ (Invincible), ग्रीझली मॅन २००५ ( Grizzly Man), एन्काऊंटर्स ॲट द एंड ऑफ द वर्ल्ड २००७ (Encounters at the end of the world), केव्ह ऑफ फोर्गॉटेन ड्रीम्स २०१० (Cave of forgotten Dreams).

त्यांच्या १० लोकप्रिय चित्रपटांची यादी आणि थोडक्यात माहिती खालील लिंकवर क्लिक करून जाणून घेऊया.

त्यांनी जवळजवळ १२ पुस्तके देखील लिहून प्रकाशित केली आहेत. त्यांची वाचनीय पुस्तके म्हणजे द ट्विलाईट वर्ल्ड, ऑफ वॉकिंग इन आइस, द फ्युचर ऑफ ट्रूथ इत्यादी. तसेच त्यांनी अनेक ऑपेरा सुद्धा दिग्दर्शित केले आहेत.

त्यांचे सिनेमे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. हाताळलेला विषय, दिलेला संदेश, दाखवलेली परिस्थिती ह्यामुळे टीका टिप्पणी झालीच परंतु वेर्नर हेरझोग ह्यामुळे डगमगले नाहीत. सध्याच्या काळात आपल्याकडे पुरेसे नवीन विषय नाहीत, त्यामुळे सृजन खुंटले आहे अशी काहीशी त्यांची धारणा असल्याने त्यांनी त्यांचे काम श्रद्धेने नेटाने चालू ठेवले. तसे केले नाही तर सृजनाच्या अभावी आपल्या पिढीला अकाली मृत्यूस सामोरे जावे लागेल असे ते म्हणत. यथावकाश त्यांना यश, प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचे कौतुक झाले हे आपण जाणतोच.

प्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक म्हणतात, वेर्नर हेरझोग हे आत्ताच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाचे दिग्दर्शक आहेत ज्यांनी चित्रपट क्षेत्राला खरी कलाटणी दिली. वेर्नर हेरझोग ह्यांचे २००९ साली १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये देखील नाव आले होते. त्यांच्याबद्दल बोलताना अमेरिकन समीक्षक म्हणतात, “त्यांनी बनवलेला एकही सिनेमा कोणतीही तडजोड करून बनवलेला नाही, लज्जास्पद किंवा नावं ठेवायला जागा असलेला नाही. सर्वच चित्रपट अत्यंत उत्कृष्ट आहेत, त्यांचे खरं म्हणजे अपयश देखील उत्कृष्ठ आहे.”

असे हे वेर्नर हेरझोग आत्ताच्या घडीला त्यांच्या सध्याच्या अमेरिकन पत्नी बरोबर, एलेनाबरोबर लॉस एंजेलिस, अमेरिका येथे वास्तव्याला आहेत.त्यांनी एकूण ३ वेळा विवाह केले. त्यांना ३ मुले आहेत. त्यांना मातृभाषा जर्मन सोडून इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, ग्रीक, इटालियन भाषा येतात. त्याच बरोबर त्यांना लॅटिन देखील वाचता येते. वाचन हा त्यांचा छंद आहे आणि ते फावल्या वेळात लेखनही करतात. त्यांचा कार्याचे कौतुक म्हणून त्यांना कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये ग्रँड प्रिक्स, व्हेनिस फिल्म फेस्टिवल मध्ये गोल्डन लायन इत्यादी पारितोषिके मिळाली आहेत.

त्यांच्या बद्दल अजून माहिती करून घेण्यासाठी खालील मुलाखत नक्की ऐका.
https://youtu.be/PuZi5iJbPTg?si=sWs_oJQxD0TGH_xk

प्रा आशी नाईक.

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता