आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर प्रसिद्ध करण्यासाठी नवी सदरे, नव्या लेख माला, नवे विषय सुचवा, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जर्मन भाषेच्या प्राध्यापक, जर्मन साहित्य, संस्कृती, समाज याच्या अभ्यासक प्रा आशी नाईक यांनी “जर्मन विश्व” हा सुंदर विषय सुचविला आहे. ही लेखमाला, आज बुधवार पासून दर बुधवारी प्रसिद्ध करीत आहोत.
या पूर्वी प्रा आशी नाईक यांच्या काही कविता, काही लेखन आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध झाले आहेच. त्यांच्या या लेखमालेसाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
युरोप खंडाच्या मध्यभागी वसलेला, ९ शेजारील राष्ट्रांनी वेढलेला जर्मनी हा एक सधन देश आहे. जर्मनीच्या उत्तरेला डेनमार्क समवेत समुद्र आहे. तर बाकी सर्व दिशांना नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, पोलंड, स्विझरलँड, ऑस्ट्रिया इत्यादी युरोप मधील बाकी महत्त्वाचे देश आहेत.
जर्मनीचा मध्य आणि दक्षिण भाग जंगलांनी व्यापलेला आहे. घनदाट अरण्य असलेला दक्षिण जर्मनीचा भूभाग ब्लॅकफॉरेस्ट नावाने ओळखला जातो. डोंगराळ प्रदेशातून उगम पावलेल्या माईन, डोनुबे आणि ह्याईन ह्या येथील प्रमुख नद्या आहेत.
जर्मनीचे युरो हे चलन असून जर्मनी हा युरोप मधील सर्वात मोठी अर्थ व्यवस्था असलेला तर जगात चवथ्या क्रमांकाची अर्थ व्यवस्था असलेला देश आहे.
बर्लिन ही जर्मनीची सांस्कृतिक तर फ्रँकफुर्ट ही आर्थिक राजधानी आहे.
जर्मनीची प्रमुख आणि एकच भाषा जर्मन असली तरी स्थलांतरित लोकांची संख्या भरपूर असल्याने ते त्यांची भाषा तसेच त्यांची संस्कृती घेऊन आले आहेत. ह्या देशवासीयांचा मुख्य धर्म ख्रिश्चन असल्याने तिथे नाताळ, इस्टर इत्यादी सारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. ब्रेड आणि बटाटा हे तिथले नेहमीचे आणि रोजचे खाद्य तर बियर हे त्यांचे आवडते पेय आहे.
जर्मनीचा इतिहास तिथल्या लोकांसारखच अतिशय रोचक आहे. जर्मन लोक संपूर्ण जगात स्वच्छता प्रिय आणि शिस्त प्रिय म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांचे देश प्रेम, त्यांचे मोटार गाड्या बनवण्याचे कौशल्य आणि त्यांची भूतदया ह्यासाठी ते जाणले जातात. बहुतांश लोकांच्या घरी कुत्रे असते आणि गमतीनेच असेही म्हटले जाते की “जर्मनी मध्ये मुलं कमी आणि कुत्री जास्त” जन्माला येतात ! अर्थात तेवढ्याच प्रेमाने या कुत्र्यांचा सांभाळ केला जातो. त्यांच्या पालन पोषणाबद्दल अनेक नियम देखील काटेकोरपणे पाळले जातात.
मात्र कोणताही देश हा तिथे राहणाऱ्या लोकांमुळे ओळखला जातो, प्रसिद्ध होतो आणि नावलौकिक मिळवतो. जगभरात ज्यांचे नाव आहे, ज्यांना त्यांच्या क्षेत्रात मान आहे आणि जे जनमानसात लोकप्रिय आहेत अशा अनेक व्यक्ती जर्मनी देशाच्या आहेत. त्यातली काही अतीप्रसिद्ध नावे म्हणजे अल्बर्ट आईनस्टाईन, मॅक्स म्युलर, बोरिस बेकर, स्टेफी ग्राफ, जोहान वॉल्फगांग ग्योथे, मोझार्ट किंवा बाख इत्यादी इत्यादी. याच्या जोडीलाच अती बदनाम झालेले नाव म्हणजे हिटलर चे होय.
जसे भाषा शिकताना संस्कृती शिकतो, देशाचा अभ्यास करताना व्यक्तींचा अभ्यास केला जातो तसेच व्यक्ती आणि त्यांचे कार्य समजून घेतले की देशाची ओळख होते, संस्कृती समजते आणि इतिहास देखील लक्षात येतो. म्हणूनच आपण जर्मन विश्व ह्या लेखमालेत जर्मनी मधील साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलावंत, संगीतकार, खेळाडू, तत्त्वज्ञानी, राजकारणी अशा अनेक क्षेत्रातील व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत.
तुम्हाला कोणत्या विशिष्ट जर्मन व्यक्ती बद्दल जाणून घ्यायचे असल्यास तसे आम्हाला नक्की कळवा.
— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
I think this is also intro of Germany.
I want to know history of Germany and I read about Hitler but I want to know about him. About positive & negative things about him
So today u have given historical information about Germany. Very nice