डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख, जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी सर यांचा अमृतमहोत्सव आज, १९ मे रोजी आहे. त्यानिमित्त शब्दवेध बुक हाऊस या प्रकाशन संस्थेने त्यांच्या नावाने ‘जनसंपर्कतज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी लोकपत्रकारिता पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांना प्रदान केला आहे. त्यानिमित्त शब्दवेधचे प्रकाशक श्री वैजनाथ वाघमारे यांच्या भावना आम्ही प्रकाशित करत आहोत.
श्री वैजनाथ वाघमारे यांचे ‘न्यूज स्टोरी टुडे’ परिवारात हार्दिक स्वागत आहे.
— संपादक
मी २००३ साली छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएममध्ये कामाला सुरुवात केली. त्यावेळी प्रा. पुरी सर तिथे यायचे. कंधारला बातमीदारी करताना सरांचे नाव ऐकून होतो. सर कॉलेजमध्ये यायचे. ते कोणताच बडेजाव न करता माझ्याशी बोलायचे. त्यामुळे ते आपलेच आहेत असं वाटायचं. तिथं सरांशी संपर्क आला. त्यांना काही फाईल, पेपर देणे असे काम मी करायचा. त्यावेळी त्यांच्याबद्दल पत्रकारिता क्षेत्रातील बरीच मंडळी पुरी सरांचे नाव निघालं की, भारावून जात. त्यांच्या तोंडून ऐकायला मिळणारे शब्द ‘सेवाभावी’ जीवन जगणं काय असतं, हे पुरी सरांच्या कृतीतून कळत असे.
मी एमजीएम सोडले आणि ‘दैनिक लोकपत्र’ मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झालो. तिथली नोकरी सोडली अन् डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमधील प्रा. सुरेश पुरी सरांची कॅबीन गाठली. सरांना सांगितलं, ‘मला नवीन ठिकाणी नोकरी मिळवून द्या. ‘सरांनी क्षणाचाही विलंब न करता एक चिठ्ठी लिहिली आणि सांगितले, ‘दैनिक पुण्यनगरीत’ जा, तिथं महादेव कुंभार आहे त्याला माझं नाव सांग. पुरी सरांनी पाठवले आहे. एवढा निरोप दे.’
बाबा पेट्रोल पंपाजवळ पुण्यनगरीचे ऑफिस होतं. तिथं आलो. कुंभार साहेबांना भेटलो. त्यांनी मला व्यवस्थापकांशी भेट घालून नोकरी दिली. मी दुसर्या दिवसापासून दैनिक पुण्यनगरीत काम करू लागलो. कुंभार साहेबांनी इतकी मोकळीक दिली की, मी माझ्या मर्जीनुसार लेख छापू लागलो. महाराष्ट्रातून त्या लेखांबद्दल चांगल्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. सृष्टीच्या चक्रातील विकसित मेंदूत कधी काय करेल, याचा नेम नाही. कुठलाही उपद्रव न देताही त्याचं वाढणारं कर्तृत्व सहन होत नाही. म्हणून त्याविरुद्ध षडयंत्र रचणे हे काही नवीन नाही. माझ्या स्वभावाची अडचण अशी की, कुणाच्या पुढे पुढे करता येत नाही आणि कुटाळकी तो काही आपला मार्ग नाही. मी तिथे कामाच्या गुणवत्तेमुळे उपद्रवी ठरू लागलो. तिथंही माझ्या बाबतीत राजकारण सुरू केलं. मग अचानक एकेदिवशी माझ्या बदलीचे फर्मान निघाले. ती गोष्ट माझ्या मनाला पटली नाही. मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता नोकरीचा राजीनामा दिला माझ्यावर घरच्या जबाबदारी असतानाही. मी मस्त फकिराची जिंदगी जगत होतो.
डिसेंबर २००८ चा तो पहिला आठवडा होता. परत पुरी सरांची कॅबीन गाठली. दुपारची वेळ होती. त्यावेळी विद्यापीठातील डिपार्टमेंटला पोहोचलो. सर कॅबीनमध्ये बसलेले होते. त्यांच्याजवळ माझी अडचण सांगितली. सरांनी विचारले,
‘नोकरी कुठे करायची?’
मी म्हणालो, ‘मला नोकरी करायची नाही. प्रकाशन चालवायचे आहे.’
‘मनाची पक्की तयारी झाली का ?’ सर म्हणाले.
मी, ‘हो.’ म्हणालो.
सरांनी मला विचारले,
‘तुला माझ्याकडून काय अपेक्षित आहे ?’
मी म्हणालो, ‘मला कॉम्प्युटर घेऊन द्या. सोबत डीटीपीचे कामे करील आणि प्रकाशन व्यवसायही चालवील.’
या दिवसाचं मला आजही नवल वाटतं. मी काही सरांचा विद्यार्थी नाही. कायम आऊट ऑफ कव्हरेज राहणारा मी अन् ते जनसंपर्कतज्ज्ञ. अशी आमच्या दोघांच्या जीवनपद्धतीची दोन टोकं. तरीही मी कुठलाच विचार न करता हक्काने रुपये मागितले. त्यांनी कधी गाव विचारलं नव्हतं. आईवडिल काय करतात, भाऊ किती, बहिणी किती अशीही कधी चर्चा झाली नव्हती. यापूर्वी आमच्या भेटी तर किती झाल्या असतील जास्तीत जास्त चार ते पाच.
सर म्हणाले, ‘तू उद्या शहरात जाऊन कॉम्प्युटरचे कोटेशन घेऊन ये.’
मी दुसर्या दिवशी दोन तीन दुकानांतून कोटेशन घेऊन आलो. सरांना दाखवले. सर म्हणाले, ‘तू आता गावी जा. एक तारखेला पगार होतो. पगार झाला की, मी तुला फोन करतो.’
मी गावाकडे आलो. कधीच घरी एक दिवसापेक्षा जास्त दिवस न राहणारा मी चक्क आठ दिवस झाले तरी औरंगाबादला जायचे नाव घेत नव्हतो. माय चौकशी करू लागली. मी थातुरमातूर उत्तर देऊन वेळ काढली.
२००९ साल उजाडलं आणि बरोबर २ तारखेला सरांचा फोन आला,
‘वैजनाथ तू औरंगाबादला ये.’
मी लागलीच औरंगाबादला आलो. मीरा बुक्स अँड पब्लिकेशनचे जीवन कुलकर्णी माझे चांगले मित्र. त्यांनी सांगितले, ‘काहला गुरूजी दुसरीकडं जाता. इथं आपल्या ऑफीसमध्ये जागा आहे. कॉम्प्युटर इथंच ठेवून काम करत जा.’ कुलकर्णी यांनीच शिंदे यांच्याकडून कॉम्प्युटर घेऊन दिले. सरांना बोलावले. तो दिवस होता ०३ जानेवारी २००९. दुपारी सर आले. त्यावेळी जीवन कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक बब्रुवान रुद्रकंठवार ऊर्फ धनंजय चिंचोलीकर उपस्थित होते. सरांनी कॉम्प्युटर चालू केला. हातात दोन हजार रुपये ठेवले. म्हणाले, ‘हे मेससाठी’ आणि इथेच माझ्या प्रकाशनाचा जन्म झाला.
रुद्रकंठवार म्हणाले, ‘वैजू, म्हातार्याचा तुझ्यात लई जीव हाय’ आणि आम्ही सर्व हसलो. एक महिनाभर मी कुलकर्णी यांच्या ऑफिसात थांबलो. फुले-आंबेडकरी चळवळीतील सहभाग आणि काही दिवस दैनिकातील कामामुळे काही माणसं जोडली होती. त्यामुळे कामाची गती वाढली.
दरम्यानच्या काळात आमच्या मामानं एक आफत आणली होती कर्नाटकची. त्याचे नाव गुरूनाथ शंकर पांचाळ. तो बर्याच दिवसापासून संपर्कात होता. एकदा मला कावीळ झाली होती. त्याने मलाच औषध तयार करायला लावले आणि पिवळे पडलेले अंग एका दिवसात पूर्वपदावर आले. तो मनातल्या बर्याच गोष्टी सांगायचा. त्यामुळे त्याचा आम्ही आदर करत होतो. कंधार परिसरातील लोक त्याला साधू, संत सुदामबाबा म्हणायचे. तो औरंगाबादला येत. त्याने घर बांधायला काढले. त्यावेळी मी त्याला सुरुवातीला पंचवीस हजार रुपये दिले. त्याची अपेक्षा इतकी वाढत गेली की, २००९ ते २०१३ या काळात त्याने तब्बल दोन लाख रुपये नेले. तो माईंड सेटर होता. पांचाळच्या चक्रात मी पूर्ण फसलो होतो. यात तब्बल सहा वर्षे निघून गेले. या सहा वर्षात मी एकदाही पुरी सरांना भेटलो नाही. माझ्या अडीअडचणी सांगितल्या नाहीत. सरांनीही कुणाजवळ कधी वैजनाथला मी इतके रुपये दिले, तो मला भेटला नाही असे कधी काही सांगितले नाही. मी कुठे आहे, याचा साधा शोधही घेतला नाही. आता तर माझी हिंमतच होत नव्हती सरांच्या समोर जाण्याची. पुन्हा त्या दडपणात आणखी अंतर वाढतच होते. आतून खूप अस्वस्थ झालो होतो. ‘सरांना काय वाटेल ?’ हे प्रचंड मानसिक दडपण वाढलं होतं. भीत भितच मी एका दिवशी सरांना फोनही न करता घरी गेलो. सरांच्या समोर सर्व हकिकत ठेवली. सरांनी कोणत्याही प्रकारची नाराजी न व्यक्त करता कामाची विचारपूस केली. मी काही रुपये त्यांना देत होतो. त्यांनी ते नाकारले.
आतून बाहेरून सहा वर्षांपासून अंगात सुरू असलेलं भेदरणं हळूहळू तासाभरात दूर झालं. आपली चूक असतानाही मायेचा पदर कुठेही ढळला नाही, याची जाणीव मला झाली. त्यामुळे मला नवचेतना मिळाली.
प्रकाशनाचे काम बर्यापैकी सुरू झाले. माझ्या दुबळ्या जिभेमुळे मला काही नुकसान सहन करावे लागले. कारण मी कुणासोबत व्यावहारिक संबंध न ठेवता भावनिक होत गेलो. त्यामुळे प्रचंड मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासातून जावे लागले. (मी आणि पुरी सर विद्यापीठातून एकदा लुनावर येत होतो. त्यांनी माझा स्वभाव लक्षात घेतला होताच. सिलेखाना चौकात एक खड्डा अचानक आला. त्याला चुकवत सर म्हणाले, ‘समाजात खूप खड्डे आहेत. कुणाच्या भपक्यात जाऊ नको. अडचणीत येशील.’) आणि तेच माझ्यासोबत घडले.
आज सोळा वर्षे कशी निघून गेलीत हे कळलेच नाही. जवळपास सहाशेच्या वर पुस्तके मी छापली. त्यामुळे किमान जगण्यापुरते रुपये व्यवसायातून सहज मिळत आहेत. घर झालं. मुलं शिकत आहेत. जगण्यासाठी गरजेपुरता पैसा आता उपलब्ध होत आहे.
आदरणीय, पुरी सरांचा आणि माझा संबंध आला नसता तर आज मी कुठे असतो ? याचा काहीच अंदाज घेता येत नाही. सरांचा ‘आसरा’ मला मिळाला म्हणून मी आज सुखानं दोन घास खात आहे. तीस वर्षांपूर्वी पाच रुपयाला महाग असणारा मी आज लाख रुपयाची गोष्ट सहज करतोय, ही पुण्याई पुरी सरांचीच. माझं आयुष्य म्हणजे एक गोधडीच. असंख्य लोकांनी मला आधार दिला. त्यातूनच मी इथपर्यंत येऊ शकलो. पुरी सरांनी मायेचा उबारा देत पालकाचा भरभक्कम आधार दिला. त्यामुळे कुणाच्या तरी आयुष्याला ठिगळं लावतोय, याचं समाधान आहेच; पण याचं सर्व श्रेय ‘जनसंपर्कतज्ज्ञ प्रा. सुरेशजी पुरी’ सर यांनाच जाते.

मायेची सावली देणारं प्रचंड विस्तारलेल्या झाडाखाली मी गेलो. आयुष्याचा होणारा उन्हाळा वाचला. नाही तर मी कदाचित सृष्टीच्या चक्रात कुठं विलीन झालो असतो, याचा नेम नव्हता. जगताना कधी दुखलं खुपलं तर मायीसोबत नकळतपणे सरांची आठवण होते. आतून वाटते की, ‘माय आहे, सर सोबत आहेत. आणखी आपणाला काय पाहिजे ?’ अधूनमधून सरांचा फोन असतो, ‘वैजनाथ, कुठं आहेस रे ?’ या आवाजातून मिळणारी उर्जा ती कोणत्याही शब्दात सांगता येणारी नाही. आणि भक्कमपणे पायी फिरायला, काम करायला उभा राहत असतो.
माझ्या गावात जुने माणसं म्हणत, ‘यशाला हजार बापं असतात; अपयशाला कोणी नसतं.’ पण यशात नाहीतर अपयशात पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा ‘बाप’ मला पुरी सरांच्या रूपाने मिळाला. त्यामुळे पुन्हा नव्याने मला सारं काही उभं करता आलं.
सरांचे हे अमृतमहोत्सवी वर्षे आहे. त्यांना दीर्घाष्यू मिळो. हे नियतीला मागणं आहेच. लोककवी वामनदादा कर्डक यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांप्रती आपल्या एका कवितेत जी भावना व्यक्त केली. तीच माझ्याही मनाची अवस्था आहे.
“चोचीतला चारा
देत होता सारा
आईचा उबारा
देत होता सारा
माझ्यावर मायेचा उबारा
घेऊन पंख पांघराया
माझा बाप आयुष्याच्या सोबतीला
शेवटच्या क्षणापर्यंत रहावा”
ही नियतीकडून अपेक्षा !

— लेखन : वैजनाथ वाघमारे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800