८ भगिनींचे शीळवादन : सावरकरांना अभिवादन
नमस्कार मंडळी.
दरवेळी आपण या सदरात एका भगिनी विषयीची, तिचे कार्य कर्तृत्व याची ओळख करून घेत असतो. पण आजच्या सदरात मात्र एक सोडून अनेक भगिनींची आगळीवेगळी ओळख करून घेणार आहोत, ती त्यांचे शीळवादन ऐकून आणि हे शीळवादन म्हणजे केवळ मनोरंजन नाहीय तर नुकत्याच; २८ मे रोजी होऊन गेलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सादर केलेले “जयोस्तुते“ हे त्यांची स्फूर्तीगीत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन. या सर्व भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन.
— संपादक
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे “जयोस्तुते” हे स्फूर्तीगीत शीळवादन करून सादर केलेल्या आम्ही सातजणी; वय वर्षे (४५ ते ८२ मधल्या) अजून पर्यंत एकमेकींना भेटल्या देखील नाहीत. पण दोन महिन्यापूर्वी एका ग्रूप वर आम्ही एकत्र आलो त्याचे कारण म्हणजे शीळेवर गाणी सादर करण्याची आमची आवड म्हणून.

उषाताई फाल्गुने ह्यांची ही संकल्पना, शिल्पा वझे ने उचलून धरली आणि रूचा सोहोनी या आमच्या तरूण मैत्रिणीने संकलनाची सर्व जबाबदारी स्विकारली आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सादर केलेले “जयोस्तुते“ हे गाणे, आम्ही आमच्या परीने शीळेवर गाऊन सावरकरांना अभिवादन म्हणून, त्याचा व्हिडिओ करून सादर करीत आहोत.
असे कराओकेवर शीळ वाजवून, त्याचा व्हिडिओ करून पाठवायचा आणि त्यातला निवडक भाग घेऊन, परत व्हिडिओ बनवायचा, हेही आम्ही प्रथमच करत आहोत.
शिल्पा वझेनी “गुंज लहरी“ हे नांव सुचवले. त्याबद्दल ती सांगते….
जेव्हा मी आमच्या या गटासाठी, म्हणजेच उत्साही महिला शीळवादकांसाठी, एका योग्य नावाचा विचार करत होते, तेव्हा माझ्या मनात काही विचार होते :
मला असं प्रतिनिधित्व करणारं नाव हवं होतं जे स्त्रीच्या शीळवादनातून प्रेम, आवड, सौंदर्य, अभिजातता या भावनात्मक अभिव्यक्तीला सामावून घेईलच, आणि त्याच बरोबर तिच्या सामर्थ्याशी सुसंगत असेल — जसं की पारंपारीक चौकटीत अडकून न पडता, वयाच्या मर्यादेपलिकडे, काळाबरोबर नवीन गोष्टी शिकत, सर्वांना सामावून घेत, वेगवेगळ्या कलाकृती समर्थपणे सर्वांपर्यत पोहोचवत राहील.
या अनुषंगाने मला सुचलेले नाव, म्हणजे “गूंज लहरी”. जिथे तिच्या प्रतिध्वनीला, तिच्या आत्म्याच्या सुरेल लहरींसह सौंदर्याची आणि सुजाण सामर्थ्याची साथ मिळते …”
ज्या काळात मुलीनी, स्त्रीने शीळ वाजवणे निषिध्द समजलं जाई, त्या काळात आमच्या ग्रूप मधल्या काही जणींच्या घरातली सर्व, गंमत म्हणून शीळेवर गाणी म्हणायचे. पण ते घरापुरतेच मर्यादित होते. बायकांनी कला म्हणून शीळ वाजवणे स्विकारले गेले नव्हते. त्यांनीही ते स्विकारले नव्हते आणि समाजाने सुध्दा नव्हते. त्यावेळी कधीतरी शाळा, कॅालेजातून ही एखाद वेळी म्हटले गेले शीळगीत. त्याचे तेव्हढ्यापुर्ते कौतुकही झाले. परंतु शीळ हे पुरूषांचेच क्षेत्र वर्षानुवर्षे समजले गेले आहे.
ह्या ग्रूपमुळे खूप जणींनी, अनेक वर्षांनी, अशी मोकळेपणानी, वेगळ्या प्लॅटफॅार्मवर शीळ वाजवण्याचा प्रयत्न केला आहे. यांना त्यांचे आकाश मिळाल्याचा आनंद, त्यांच्या बोलण्यातून वेळोवेळी मला जाणवत होता .म्हणूनच “जिचं तिचं आकाश” या सदरात मला हा व्हिडिओ टाकावासा वाटला. भाग घेतलेल्या महिला कलाकार, वेगवेगळ्या वयाच्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या महिला रहातातही वेगळ्या टाईम झोन मध्ये .. त्यांची नांवे आणि राहण्याची ठिकाणे पुढील प्रमाणे आहेत.
१) शिल्पा वझे. रिचमंड, टेक्सास, अमेरिका
२) स्वाती प्रभू. एडमंड, ओक्लाहोमा, अमेरिका
३) चित्रा मेहेंदळे. सिएटल, वॉशिंग्टन, अमेरिका
४) अनघा सावनूर. पुणे, महाराष्ट्र, भारत.
५) उषा फाल्गुने, सँडिएगो, कॅलिफोर्निया, अमेरिका
६) मीनल परांजपे. पुणे, महाराष्ट्र, भारत
७) निवेदिता जोहरी. मुंबई, महाराष्ट्र, भारत
८) रुचा सोहोनी. डब्लिन, आयर्लंड

म्हणूनच ह्या सर्व जणींचा हा व्हिडिओ हे एक धाडसाचे, कौतुकाचे काम आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील 👇 लिंकवर क्लिक करून हा व्हिडिओ नक्की पहा.
https://youtu.be/Tz0ekaqR3as?si=Kbt56-OfscJ2CV_7
आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जरूर कळवा. अभिप्राय लिहा, म्हणजे आपला अभिप्राय सर्वांपर्यंत पोहोचेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ आपल्याला पहायला मिळतील.
धन्यवाद.
— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800