नात्यांचे शिवधनुष्य
परवा मित्राचा फोन आला. माझ्याच वयाचा.. चांगला पाऊण एक तास बोलत होता. या वयाचे एक दुखणे असते. एकटेपण वाढीला लागलेले.cशिवाय वाढत्या वयाच्या, शारीरिक दुखण्यातून उद्भवलेल्या नैसर्गिक तक्रारी.. खरे दुःख असते ते जवळची नाती तुटत चालल्याचे.. आपलीच रक्ताची माणसे दुरावत चालल्याचे. हा दुरावा अनेक कारणांनी आलेला. मुलं मोठी झालीत. नोकरीच्या निमित्ताने परगावी, परदेशी स्थिरावली. मुली लग्न होऊन सासरी गेल्यात. म्हणजे प्रत्येकाने आपले वेगळे घरटे बांधले. संसार वेगळे झाले. नकळत नैसर्गिक पद्धतीने. मुद्दाम कुणी काही केले, वैमनस्य निर्माण झाले असेही नाही. सगळ्यांनी मिळून सगळे आहे तसे स्वीकारले.
भेटी गाठीची फ्रिकवेंसी वाढली हळूहळू. प्रत्येकाचे आपापले वेगळे विश्व. वेगळ्या गरजा.. वेगळ्या भावनिक भुका ! वैचारिक पातळीत देखील दरी निर्माण होत गेली पिढी बदलली तशी. आपले विषय वेगळे. त्यांचे विषय, इंटरेस्ट वेगळे.. तिसऱ्या म्हणजे नातवंडांच्या पिढीचे तर आजूनच वेगळे. त्यामुळे तंत्रज्ञानाने व्हिडिओ कॉल ची सोय असली तरी किती अन् काय बोलणार, कितपत संवाद कंटाळवाणा न होता चालू ठेवणार हा प्रश्न दोन्ही पक्षी येतोच.
अशी फार कमी कुटुंब असतील जिथे सारे काही शत प्रतिषत आलबेल चालले आहे.म्हणजे बोलण्यात पूर्वी इतकाच ओलावा आहे. एकमेका विषयी काळजी आहे. तशी गरजच पडली तर आपल्या अडी अडचणी बाजूला सारून, गरज असल्यास मदतीला धावून जाण्याची उर्मी आहे. हे असे असेल तर अपवादात्मकच. एरवी दिसतो तो नाटकी व्यावहारिक कोरडेपणा.
अगदी रक्ताच्या नात्याचा जरी विचार केला तरी मुलगा-आई-वडील, मुलगी- जावई- आई – वडील, भाऊ बहिणी…अशा नात्यात देखील पूर्वीची ओल, माया, जिव्हाळा दिसत नाही. मग काका मामा चुलते ही नाती तर दूरच राहिली.
नाती कशी टिकतात, दृढ होतात ? त्यासाठी सर्वात गरजेचा असतो तो परस्परांवरचा विश्वास.. आधीची नाती घट्ट टिकून होती कारण कुठे कसल्या शंका नव्हत्या. इफ्स अँड बटस् चे अडथळे नव्हते. आता नात्यात दोन गोष्टी आड येतात.. पाहिली गोष्ट मानसिक.. ती म्हणजे इगो.. आपला प्रत्येकाचा अहं!हा लहान मोठा प्रत्येकाचा स्वभाव गुण. म्हणजे अगदी पाच सहा वर्षाचे नातवंडं देखील या इगो पोटी रुसू रागवू शकते ! वय जितके कमी तितका इगो जास्त! वयाने मोठी माणसं थोडा तरी समजूतदारपणा दाखवतील.. पण तरुण पिढी किंवा तिसरी पिढी आपल्या मताशी ठाम. (इथे एक गोष्ट कबूल केलेली बरी.. हाच आरोप मधली पिढी किंवा तिसरी पिढी ज्येष्ठ पिढी बद्दल देखील करू शकते !).
ही जी अविश्वासाची भावना आहे, ती माणसांना जवळ येऊ देत नाही. नवरा बायकोच्या बाबतीत तर हे जास्त महत्वाचे कारण ठरते. पैशाचा आर्थिक व्यवहार असो, एकमेकाच्या मित्र मैत्रिणी संबंधाचा विषय असो किंवा परस्परांच्या सासर माहेर नाते संबंधाचा विषय असो.. या बाबतीत पारदर्शी व्यवहार नसतील तर शंकेला वाव असतो. त्यामुळे पती पत्नी च्या नात्यात तू तू मैं मैं सुरू होते. संबंधात दरी निर्माण होते. नाते टिकवायचे असेल तर दोन्ही पक्षी एक सूत्र पाळणे ही प्राथमिक गरज असते. ती म्हणजे समोरच्या व्यक्तीला आहे तशी गुण दोषासह स्वीकारणे ! ती आपला मूळ स्वभाव बदलणार नाही हे गृहित धरून चालणे. आपल्या साठी समोरच्या व्यक्तीने बदलले पाहिजे हा आग्रहच मुळात चुकीचा असतो. कारण आपण तरी बदलायला कुठे तयार असतो ? त्यापेक्षा समोरची व्यक्ती आहे तशी स्वीकारणे अन् पुढची वाटचाल करणे केव्हाही उत्तम ! बदलायचेच असेल तर स्वतःला बदलावे. म्हणजे च्यारिटी बिगिंस एट होम या न्यायाने आपण बदललो तर पुढची व्यक्ती आपोआप बदलेल या आशेला जागा असते. अर्थात हा नियम दोघानाही त्याच प्रमाणात लागू होतो. म्हणजे दोघांनीही आपल्यात बदल करावे. म्हणजे नाते पूर्व पदावर येण्यास, आपसातील ताण तणाव कमी होण्यास मदत होते.
एकमेकांचा आदर करणे, त्यांची आस्थेने विचारपूस करणे, काळजी व्यक्त करणे अशा छोट्या छोट्या गोष्टी देखील नात्याची वीण घट्ट होण्यास कारणीभूत ठरतात. इथे मला माझ्या आजीचे एक वाक्य आठवते. ती म्हणायची, ”गोड बोलायला पैसा नाही मोजावा लागत !” किती खरे आहे हे.. आधीची ज्येष्ठ पिढी अशा छोट्या छोट्या वाक्यातून मोठा धडा शिकवून जायची. आता कुणाला उपदेशाच्या चार गोष्टी सांगतो म्हंटले तर कंटाळा येतो. तीच ती रेकॉर्ड लावू नका हे ऐकावे लागते !
चूक झाली तर कुणी कबूल करायचे, कुणी पाहिले पाऊल पुढे टाकायचे यावर देखील गाडे अडू शकते. इथे कमी पणा न घेता कुणी एकाने पुढाकार घ्यायला हरकत नसते. किंवा लाईटली बोलायचे तर असे प्रसंग वारंवार येत असल्याने, हवे तर आळीपाळीने दोघांनीही पुढाकार घ्यावा. समस्या सुटण्यास निश्चित मदत होईल. जिला उपायच नाही अशी कोणतीही समस्या नसते. मुख्य म्हणजे आधी समस्या आहे हे उभय पक्षी मान्य करणे सर्वात जास्त गरजेचे असते. एरवी आजूबाजूला कुणाला कळू नये, म्हणून नातेवाईकाच्या भीतीने आपण काही समस्या नाही हे भासवत नाटक करतो. ते जास्त गंभीर असते. धोक्याचे असते.
आपल्या अन् तिसऱ्या पिढीतल्या दुराव्याचे राग रंग अधिकच वेगळे असतात. वयात पाच सह दशकांचा फरक. त्यांची वाढ वेगळ्या वातावरणात झालेली. त्यांचे आचार विचार, अभ्यासक्रम, सारेच वेगळे. त्यामुळे तसेही आपण त्यांच्या पर्यंत पोहोचणे, किंवा त्यांनी आपल्याला समजून घेणे तसेही कठीणच. तेव्हा ते खाली उतरणार नाहीत हे गृहित धरून चाललेले बरे. आपल्याला लहान व्हावे लागेल. त्यांच्या भाव विश्वात शिरावे लागेल. त्यांचे ऐकून घ्यावे लागेल. त्यांच्याशी वाद न घालता, त्यांना समजावण्याचा आग्रह न धरता, त्यांना समजून घ्यावे लागेल. त्यांच्या बर्थ डे पार्ट्या वेगळ्या, त्यांचे मित्र मैत्रिणी शी वागणे वेगळे. त्यात आमच्या वेळी असे नव्हते, हे तुम्हाला शोभून दिसत नाही, असले वागणे बरे दिसत नाही.. वगैरे डोस न पाजलेले बरे. आता त्यांचे हित अहित त्यांना अन् त्यांच्या पालकांना ठरवू द्या. त्यात तुम्ही मध्यस्थी करू नका. न मागितलेले उपदेशाचे डोस पाजू नका.. ही पिढी तुमचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांची जबाबदारी त्यांना कळते. त्यांना काहीच समजत नाही ही तुमची समजूत चुकीची आहे ! मुख्य म्हणजे ठोकर बसल्या शिवाय शहाणपण येत नाही हे दोन्ही पिढ्यांनी मान्य केलेले बरे. हातपाय खरचटल्या शिवाय, जखमा झाल्याशिवाय सायकल किंवा तत्सम वाहन चालवता येत नाही हे सर्वानाच चांगले ठाऊक आहे. त्यांना धडपडू द्या, चुकू द्या, अपयश येऊ द्या. उलट तुम्हीच त्यांचे ऐका. त्यांचे नवे जग समजून घ्या. आपले म्हणणे, आपले विचार त्यांच्यावर थोपू नका. त्यामुळे त्यांना तुमचा कंटाळा येईल. एकमेकांचा आदर करणे हे तत्त्व फक्त सम वयस्क व्यक्ती साठीच नाही. ते मोठ्यांना देखील लागू होते जेव्हा त्यांचा संबंध लहानाशी येतो ! पूर्वी आपण म्हणायचो लहानानी मोठ्यांचा आदर केला पाहिजे. पण या बदलत्या काळात मोठ्यांनी देखील लहानाच्या बोलण्याचा आदर केला पाहिजे. त्याच्या मतांना धुडकावून चालणार नाही आता !
एकूण काय आजच्या काळात प्रत्येक नात्याचे शिव धनुष्य पेलणे हे फार मोठे आव्हान होऊन बसलेय प्रत्येकांसाठीच. ही तारेवरची कसरत काळाच्या ओघात दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. अन् ह्या समस्येची प्रश्न पत्रिका ज्याची त्यालाच सोडवावी लागणार आहे. त्यासाठी गाईड उपलब्ध नाही !
— लेखन : विजय पांढरीपांडे. हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
नात्यांचे शिवधनुष्य लेख विचारप्रवर्तक. प्रत्येकाने आपापली प्रश्नपत्रिका स्वतःच समजून सोडवावी हा विचार भावला.