Friday, November 8, 2024
Homeलेखझुंजार-मनस्वी पत्रकार : नितीन चव्हाण

झुंजार-मनस्वी पत्रकार : नितीन चव्हाण

साधारण १९८० च्या दरम्यान माझी त्यावेळी गोरेगावकर असलेले, गोव्याचे मुख्यमंत्री असलेले दयानंद बांदोडकर याचे खाजगी सचिव असलेले मा. ग.शं.सामंत यांच्याशी ओळख झाली, ओळखीतून मित्र झालो. त्या मैत्रीच्या ओळखीने त्यांनी मला मराठी वृत्तपत्र लेखक संघ, शिंदेवाडी दादर पुर्व, मुंबई येथे कधी कसे नेले हे मलाही काही आठवत नाही. मला लेखनाची आवड होती, पत्र लिहित होतो वगैरे वगैरे.. नंतर मध्ये बराच कालावधी नंतर ग.शं. सामंत यांनी मला संघाच्या कार्यकारिणीत घेतले. पुढे १९९६ घ्या दरम्यान मला प्रमुख कार्यवाह म्हणून एकमताने निवडून दिले. एकूण संघाच्या कामकाज व कार्याची कल्पना आली. मार्गदर्शनासाठी ग.शं‌. सामंत, गणेश केळकर व विश्वनाथ पंडित हे होतेच.

त्याच सुमारास एक तरुण युवक संघात नियमितपणे येत असे. माझ्या कारकिर्दीत त्याच्यावर कोषाध्यक्षपदाची जबाबदारी होती. अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, अन्य पदाधिकारी व अर्थात कोषाध्यक्ष असलेला तो तरुण. त्यावेळी या युवकाने तरूण भारत दैनिकातून उमेदवारीस सुरूवात केली.

दै.सामना, दै. सकाळ, तरूण भारत या दैनिकाच्या विविध प्रकारच्या स्तरावरील पत्रकारिताचा अनुभव घेत घेत या तरुणाने दै.महाराष्ट्र टाईम्स मध्ये पत्रकारितेला नव्या जोमाने उत्साहाने सुरुवात केली. टाईम्स मध्ये त्यांनी आपल्या अंगभूत गुण, कर्तृत्व, निष्ठा, निस्पृहता, सचोटी, जिज्ञासू वृत्ती या जोरावर आपला अनोखा ठसा उमटवला. पुढे त्याला मुंबई महानगर पालिकेत म.टा. प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. तेथे सुध्दा या युवकाने आपल्या लेखणीतून उपेक्षित अशा जनसामान्यांच्या प्रश्नावर, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या यांवर परखडपणे लेख लिहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खस्ता खाल्ल्या. हिंदी, मराठी, इंग्रजी बरोबरच कोकणी आणि मालवणी भाषेवर विशेष प्रेम होते.

दिवाळी अंकातून त्यांनी लिहिलेले लेख म्हणजे सृजन वाचकांना मेजवानी होती. कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, मोकळी मैदाने, दलितांवरील लेखादीबद्दल अनेक संस्थांनी तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे सरमळकर स्मृती पुरस्काराचे ते मानकरी होते. ते अनेक पुरस्काराचे मानकरी होते. त्यांच्या धारदार लेखाची दखल जशी खाजगी संस्था, निमशासकीय, सरकार (केंद्र आणि राज्य) यांना सुध्दा घ्यावी लागली. शासन दरबारात त्यांचा दबदबा होता.

मनस्वी स्वभावाचा ह्या युवकाची आणि माझी नाळ छान जुळली होती. त्यांच्या दादर पूर्व, कोल डोंगरी अंधेरी पूर्व, चारकोप येथील त्याच्या घरी माझी वहिवाट होती. नंतर ते विक्रोळी येथे राहावयास गेले होते. घरगुती संबंध होतेच. दूरध्वनीवर तो जरी नसला तरी बाबा, त्याची पत्नी यांच्याशी मन मोकळ्या गप्पा व्हायच्या…

नंतर नंतर माझ्या नोकरी, घरगुती कारणं तसेच त्यांचे वृत्तपत्रीय कामाकाजामुळे संपर्कात सातत्य राहिले नसले तरी दूरध्वनी वरून गप्पागोष्टी होत असे आणि ध्यानीमनी नसताना अचानक कळले की या युवकाची प्रकृती बरी नाही म्हणून. वाटलं होईल बरा.. त्याला भेटायला जाणे काही जमले नाही ही खंत आहे.

मध्यंतरी मी बाहेर गावी गेलो असताना संघाध्यक्ष रविंद्र मालुसरे यांचा निरोप आला, “हा आपला जीवाभावाचा जानी दोस्त आपल्या पासून दूर दूर पत्रकारिता करण्यासाठी खास यमराज स्वतःसह अज्ञात स्थळी घेऊन गेले.. कधीही परत न येण्याच्या बोलीवर..”

अवघ्या वयाच्या ५२ व्या वर्षी या माझ्या जिवलग मित्राच्या मैत्रीला मी कायमचा मुकलोय. असा हा माझा हा दोस्त म्हणजे नितीन चव्हाण होय. नुकताच मी बाहेर गावाहून आलोय. सौ.वहिनी, त्यांचे चिरंजीव, आईबाबा यांना भेटण्यासाठी माझा धीर होत नव्हता तरी पण मोठ्या दु:खी अंत:करणाने काल रविवार दि.०६ ऑक्टोबर, २०२४ रोजी मी, सौ व रविंद्र मालुसरे, (अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई) त्यांच्या विक्रोळी निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली.

अवघ्या ऐन उमेदीच्या काळात यमराज माझ्या दोस्ताला घेऊन गेला. काळाने नितीन च्या परिवारावर घातलेला हा क्रूर घाव एवढा जबरदस्त आहे की, त्याच्यावर घातलेला हा घाव नितीनची सुविद्य पत्नी, चि ऋषीकेश (दै.पुढारीचे वार्ताहर) लेक विशेष करून नितीनची माऊली, ती, बाबा त्याची धाकटी लेक कसे सहन करणार ? त्यांचे बाबा तर आता आपला नितीन कधी घरी येणार हे सारखं सारखं तळ मजल्यावर जाऊन पाहात होते. (त्यांचे घर तिसऱ्या मजल्यावर आहे) त्याच्या परिवाराचे सांत्वन कसे करावे हेच आम्हाला (मी व श्री व सौ रविंद्र मालुसरे) यांना कळत नव्हते. मन सुन्न झाले होते. शेवटी दु:खी अंतःकरणाने आम्ही त्याच्या परिवाराचा मोठ्या कष्टाने निरोप घेतला.
नितीन यांच्या समस्त परिवाराच्या या असिम दु:खात आम्ही सहभागी आहोत.
ओम् शांती ! शांती !! शांती !!! ओम्..

नंदकुमार रोपळेकर

— लेखन : नंदकुमार रोपळेकर. मुंबई .
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on मतदान करा हो मतदान…..
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण भाग : २२
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” – १२
माधुरी ताम्हणे on अनुकरणीय “आडे”बाजी !
माधुरी ताम्हणे on
माधुरी ताम्हणे on
विजया केळकर on
Manisha Shekhar Tamhane on
Shrikant Pattalwar on