नवदुर्गा देवीमधलं ‘ब्रह्मचारिणी’ हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. ब्रह्मपद प्राप्त करून देणारी ब्रह्मचारिणी माता. येथे ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्या दिवशी या मातेची पूजा केली जाते.
ब्रह्मचारिणी माता देवी द्विभूजा आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू आहे. तिने शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. तिचा आवडता रंग पांढरा आहे. हा रंग आपल्याला संयम आणि अहिंसा शिकवतो.
ब्रह्मचारिणी देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. तिने पूर्व जन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती. या तपस्येमुळे या देवीला ‘तपश्चारिणी’ किंवा ‘ब्रह्मचारिणी’ असे म्हणतात.
कुंडलिनी शक्ती योगाभ्यासानूसार सुप्तावस्थेत मूलाधार चक्रात राहत असते. देवीची दिव्य साधना केल्याने आणि तिच्या उपासनेने, तिच्या कृपेने ही कुंडलिनी शक्ती जागृत होते तेव्हा ती कुंडलिनी मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध व आज्ञा या षट्चक्राचा भेद करून ती शक्ती पुढे ब्रह्मग्रंथी, विष्णुग्रंथी व रुद्रग्रंथीचे भेदन करत ती सुषुम्नामार्गाने उर्ध्वगतीने झेपावते.

ब्रह्मचारिणी देवी या दिवशी साधकाचे मन ‘ *स्वाधिष्ठान’* चक्रात स्थिर करते या स्वाधिष्ठान चक्राचा बीज मंत्र ‘ *वं* ‘ आहे. हे जल तत्त्वाशी निगडित आहे. मानवी शरीरात ओटीपोटी जी अड्रिनल ग्रंथी असते त्या जागी तिचे स्थान आहे. मानवी शरीरात ती अन्नमय कोषात वास करते.

पंचमहाभूते ही समिष्टीत म्हणजे विश्वात व्यापुन आहे तसेच पंचमहाभूतेचे अस्तित्व व्यष्टीत म्हणजे प्रत्येक जीवातही आहे. मन शांत ठेऊन ‘वं’चा सतत उच्चार केल्याने या चक्रात मन स्थिर करणार्याला तिची कृपा होते आणि तिचा आशीर्वाद प्राप्त होते.
ब्रह्मचारिणी मातेची उपासना केल्याने भक्तांना तप, सदाचार त्याग, वैराग्य आणि संयम अशा गुणांची प्राप्ती होते. भक्तांना मुक्तीसाठी ही शक्ती प्राप्त करून देते. ही देवी मोक्षदायिनी आहे. ही देवी वेदस्वरूप आहे तशीच तत्वस्वरूपही आहे.
भारतात ब्रह्मचारिणी देवीची अनेक मंदिरे आहेत. सर्वात प्रसिद्ध मंदिर वाराणसी येथे काशी तीर्थ क्षेत्रात बालाजी घाटाजवळ स्तिथ आहे. तसेच लखनौत शास्त्री नगर मध्ये मोठे उंच मंदिर आहे. तिथे नवरात्रीत दुसर्या दिवशी फुलांची खास सजावट केली जाते आणि मध्य प्रदेश मध्ये ‘बगोईमाता’ ब्रह्मचारिणीच्या रूपात ओळखली जाते. इथे देवीची प्रतिमा भव्य दिव्य आहे या देवीच्या कृपेने भक्ताला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे.

— लेखन : पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
दुसरं रुप मातेचे,, अगदी अ, वर्ण निय, आहे.,. सफेद रंग
, शांत स्वभाव, संयमी, कृपा संपादन करणारी…. असे हे
रूपं….शत कोटी कोटी प्रणाम,
जय दुर्गे माते…..
जय नवदुर्गा माता,….. यातील दोन्हीही रुप, अप्रतिम आहे, या विषेश, महत्वाचे अशी, माहिती मिळाली, धन्यवाद…, अशी च नवं दुर्गा माता दि आम्हाला माहीती
देत असा….. खूप खूप धन्यवाद….
दुर्गा मातेच्या पहिल्या आणि दुसर्या रुपाची खूपच सुरेख माहिती.
श्री दुर्गामातांची पहिलं रुप व दुसरे रुप…यांची माहिती खुपच छान सविस्तर वर्णन केलेस..पूर्णिमा.. वाचुन खुप छान वाटले…इतर कुठे अशी पूर्ण माहिती वाचण्यास क्वचित मिळते…खुप खुप धन्यवाद.