नवदूर्गातील देवीचं तिसरं रुप आहे चंद्रघंटा माता.
नवरात्रीच्या तिसर्या दिवशी दुर्गेची ‘चंद्रघंटा’ देवीच्या रूपात पूजा केली जाते.
तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तीला ‘चंद्रघंटा देवी’ असे म्हटले जाते.
चंद्रघंटा देवीचे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहाहात आहेत. या दहा हातामध्ये कमळ, खड्ग, धनुष्यबाण गदा, त्रिशुळ आदी आयूधं आहेत. तिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केलं असून, ती वाघावर बसलेली आहे. तिला गोड खीर आणि मिठाई नेवैद्य म्हणून दाखवतात.

एकेकाळी राक्षसांनी पृथ्वीचा आणि स्वर्गाचा ताबा घेतला महिषासुर नावाच्या राक्षसाने देवांनाही सोडले नाही आणि देवराज इंद्राचे सिंहासन काबीज करण्यासाठी युध्द करू लागला.
पृथ्वी आणि स्वर्गाला राक्षसांपासून मुक्त करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश देवता आले. भगवान शिवाने ‘चंद्रघंटा‘ रूपी दुर्गादेवीला त्रिशूल दिले, भगवान विष्णूने चक्र दिले, इंद्राने आपली घंटा दिली आणि सूर्याने आपले वैभव दिले. त्यानंतर देवी चंद्रघंटाने युध्द करून महिषासुराचा वध केला. त्यांच्या कंठातून एक दैवी ऊर्जा बाहेर पडली, ती देवी चंद्रघंटाच्या रूपात अवतरली.

चंद्रघंटा देवी ‘मणिपूर’ चक्राची देवी आहे. या दिवशी साधकाचे मन ‘मणिपूर’ चक्रात प्रविष्ट होते. या चक्राचा बीज मंत्र ‘रं’ आहे हे दहा पाकळ्या असलेले कमळाचे फुल असते. मणिपूर चक्र हे नाभीच्या मागे स्थित आहे. ‘मणि’ म्हणजे रत्न आणि ‘पूर’ म्हणजे शहर. शरीरातील मध्य भाग, अन्नाचे पचन करण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती तयार करते. मणिपूर चक्र अग्नीतत्वाशी संबंधित आहे.
चंद्रघंटा देवीची मुद्रा नेहमी भक्ताच्या मनातले भीतीचे सावट किंवा दडपण दूर करण्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य देते.चंद्रघंटा देवीच्या उपासनेने अलौकिक वस्तुचे दर्शन होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो, घंटा, शंख सारखे दिव्य आवाज ऐकायला येतो.
चंद्राघंटा माताच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. भक्तांच्या संकटाचे निवारण ही देवी लगेच करते. तिचा उपासक पराक्रमी आणि निर्भय होतो. या देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता बरोबर सौम्यतेचाही विकास होऊन संपूर्ण शरीरात अनेक गुणांची वाढ होते.आवाजात मधुरता येते. तिची उपासना केल्यामुळे सर्व संसारीक संकटातुन मुक्ती मिळते.
चंद्रघंटा देवीची भारतात अनेक मंदिर आहेत उत्तर प्रदेश मध्ये प्रयागराज येथे चंद्रघंटा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
क्रमशः

— लेखन : पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800