मी मोठी होत असतांना,
देवा….तुलाही मोठे होतांना,
पाहिलंय मी,
देव्हाऱ्यातल्या तुझ्या
छोट्या रूपातून,
सोन्याचांदीच्या मखरांत,
तुला आलेलं,
……पाहिलयं मी !
लहानपणी …
दोन हात जोडले की,
तू पावायचास म्हणे ….
खडीसाखरेचा नेवैद्य सुध्दा,
तुला चालायचा म्हणे…
आता …मोठे झाल्यावर..
पैशाच्या राशी नाही ओतल्या,
तर बघतही नाहीस म्हणे,
दागिन्यांनी मढवले नाही तर,
नाराज असतोस म्हणे….
मोठे झाल्यावर..
इतका कसा बदललास तू ?
भक्तांच्या हाकेला
धाऊन येणारा,
इतका कसा सुस्तावलास तू ?
मी लहान असतांना..
पुराणकथांतून भेटलास तू…
पाप आणि अन्यायाविरूध्द
सतत लढलास तू..
आता मोठे झाल्यावर…
पापी माणसांच्या सहवासात दिसतोस तू,
न्यायाचे दरवाजे बंद करून,
मंदीरात झोपतोस तू….
मी लहान असतांना…देवा
“तू आम्हाला घडवलसं,
चांगली बुध्दी मागितली की देतोस,”
असचं ऐकत आले….
पण आता मोठं झाल्यावर …देवा
माणसंच तुला घडवताहेत,
तुझे नांव वापरून,
कसेही वागत आहेत..
हे पहिलंय मी !
म्हणूनच देवा ..
लहानपणी कधीही
न शिवलेली..
शंका आहे मनांत..
मोठेपणी आता वाटतंय..
तू खरंच आहेस की नाहीस ?
खरा असलास …
तर या जगाला वाचव..
नाहीतर …
तुझ्या अस्तित्वाला धोका आहे स्व:ताला वाचव !
मोठे व्हायच्या नादात,
मनाच्या गाभाऱ्यातले,
तुझे स्थान विसरू नको
पापी आणि अन्यायी लोकांची साथ देऊ नको !
— रचना : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
👌👌👌👌 छान कविता
चित्राताई,
तुमच्या मनाच्या गाभारात बाप्पा सुरक्षित आहे. त्यामुळे काळजी नको.
खूप छान कविता.
Chitra, kavita khup khup khup chan zali ahe.