नर्मदा पूजन
आज पहाटे 4 वाजता उठलो. सगळे आवरून 6 वाजता साबुदाणा खिचडी, चहा घेऊन ओंकारेश्वर च्या आणि ममलेश्वर च्या दर्शनाला गेलो. तिथे यशोधन चे गुरुजी आमची वाट पहात होतेच. गर्दी ही होतीच. पण तरीही दर्शन छान झाले. अभिषेक ही छान झाला.
मग आम्ही नर्मदा घाटावर गेलो. पूर्वी नदीत पाणी कायम वहात असायचे पण आता नर्मदा नदीवर असणारी धरणे त्यामुळे नदीत पाणी सोडले जाते तेव्हाच घाटावर भरपूर पाणी असते. पाणी सोडण्यापूर्वी सायरन होतो. तसा सायरन आज सकाळी पहाटे पासून ऐकू येत होता.
आता नर्मदेवर खुप सारी धरणे झाल्यामुळे नर्मदा स्वइच्छेने वाहतच नाही. आता ती अभियंत्यांच्या मर्जीने वाहते.
ओंकारेश्वर येथे जे धरण आहे त्यात वीज निर्मिती केल्यानंतर उर्वरित पाणी धरणातून पात्रात सोडले जाते. ते पाणी वाहून गेले की नर्मदा पात्रात पाणी कमी होते व मग घाटाच्या पायऱ्यांवर बसून स्नान करणे कठीण होते.
पण आमच्या परिक्रमेत मय्येची अपार कृपा झाली. संकल्प पूजा करण्या आधी देवदर्शन करणे बाकी होते.
त्यासाठी हॉटेल वरून छोटया गाडीने निघालो. आपण प्रथम ओंकारेश्वर शिवलिंग दर्शनासाठी नर्मदेवरील झुला पुलावरून पायी मजल दर मजल करत गेलो.
आज शनिवार..
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या ओंकारेश्वर व ममलेश्वर या दोन्ही शिवलिंगांचे नर्मदा जल अर्पण करून सकाळी सकाळी छान दर्शन घडले.
आद्यगुरू शंकराचार्य यांच्या गुफेत जाऊन दर्शन घेतले.
परिक्रमा उचलण्यापूर्वी मनासारखी दर्शने झाल्याने सर्वांना समाधान वाटले. आणि मग आम्ही छोट्या गाड्यांमध्ये बसून दक्षिण तटावर नागर घाटावर आलो. सर्वांनी सहजी यथेच्छ स्नान केले.
पहिल्या दिवशी मनसोक्त स्नान झालं त्यामूळे सर्वांनाच समाधान वाटलं..
अशाने उत्साह वाढतो….
तोपर्यंत टूर मधील मुलांनी संकल्प पूजेची जय्यत तयारी केली होती…
टेबल, खुर्च्या, तांब्याची चकचकीत पूजा भांडी, सभोवती फुलांची रांगोळी, प्रत्येकाच्या हाताला अत्तर, स्त्रियांना नथी गजरे, सर्वांच्या गळ्यात शुभ्र पंचे, त्यावर पुष्पहार ..
टेबल खुर्च्यांवर आरामात बसून पूजा सूरू झाली…..
जगदानंदी नर्मदेचे पात्र….
उत्तर तटावरचं सहज दिसणारं ओंकारेश्वराचं राऊळ…
गुरुजींचे समजावून सांगणे…
सकाळी नऊची प्रसन्न वेळ….
जणू काही सगळे शुभ योग सहज सहज जुळून आले आहेत…..
संकल्प पूजा उत्तरोत्तर रंगत गेली…
आरती अष्टक झाले..प्रसादआणला….
सर्वांना दिला…..
अंगावरील पूजेच्या शोभायमान पेहरावात भरपुर फोटो काढले…
अपेक्षेपेक्षा अधिक सुंदर पूजा झाल्या कारणाने सगळेच आकंठ समाधानात बुडालेले……त्यानंतर हॉटेल मध्ये आलो…..भोजन प्रसाद घेतला…..
अशा प्रकारे श्री नर्मदा परिक्रमेची संकल्प पूजा यथासांग पार पडली……
परिक्रमा उचलली… सोबत एका बाटलीत नर्मदा नदीचे पाणी भरून ते पूजा करून सोबत घेतले. आता रोज संध्याकाळी त्याची आरती केली जाणार आहे.
आता आपण सर्व जण परिक्रमावासी झालो आहोत……
आता थेट श्री नर्मदेशी अनुसंधान करावयाचे आहे…….
भोजनोत्तर
बस सूरू झाली…….
नर्मदे हर…..
क्रमशः
— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800