‘मल्लखांब विश्वगुरू’ म्हणून परिचित असलेल्या श्री. उदय देशपांडे, यांना जानेवारी २०२४ मध्ये ‘मल्लखांब’ खेळातील कार्यासाठी भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आणि त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांना अपरिमित आनंद झाला. त्यांचे कार्यच तसे आहे. चला तर आज महाराष्ट्राच्या भूमीत, साधन केवळ एक मल्लखांब, ज्याच्या सहाय्याने जगाचे केवळ लक्षच वेधून घेतले असे नव्हे तर महाराष्ट्रातील एका पारंपरिक खेळाला विश्वभर खेळाडू मिळवून दिले आणि त्यांच्या चापल्याने हा खेळ जगभरातील जनमानसात रुजवला आणि रुजवत आहेत त्या श्री उदय देशपांडे यांच्या जीवन कार्याची प्रेरणादायी कहाणी समजून घेऊ या.
श्री उदय देशपांडे यांचा जन्म २० जुलै १९५३ रोजी मुंबईत झाला. त्यांनी १९७३ मध्ये मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्रात बी.एससी पदवी मिळविली. त्यांना मैदानी खेळांची पहिल्यापासून आवड होती. मात्र मल्लखांब विशेष प्रिय असल्याने १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला मल्लखांब प्रशिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
मल्लखांब ! ‘मल्ल’ (बलवान किंवा योद्धा) आणि ‘खांब’ (स्तंभ). कुस्तीगीर कुस्तीचा सराव करण्यासाठी वापरत असलेल्या लाकडी खांबाला मल्लखांब म्हणतात.
त्याचे खेळाडू लाकडी खांब, काठी किंवा दोरीचा वापर उभ्या स्थिर किंवा लटकत्या स्थितीत हवाई योग किंवा जिम्नॅस्टिक आसने करण्यासाठी करतात.
मल्लखांबाचा इतिहास : –
१२ व्या शतकात सोमेश्वर चालुक्य यांनी ११३५ मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्हास’ या पुस्तकात मल्लखांबाचा इतिहास दिला आहे. या पुस्तकात त्याच्या जनकाचाही शोध लागला. गरज ही शोधाची जननी आहे, या उक्तीप्रमाणे, साधारण ७ शतकांनी म्हणजे १९ व्या शतकाच्या सुरुवातीला मल्लखांबाचे पुनरुज्जीवन झाले हे खरंच रंजक आहे.
त्याचे असे झाले, की एकदा निजामाचे दोन प्रसिद्ध पैलवान, गुलाम आणि अली, कुस्तीसाठी पुण्यात आले. त्यांनी पेशव्यांच्या दरबारी कुस्तीसाठी आव्हान देत म्हटले की, त्यांच्या राज्यातील कोणत्याही प्रसिद्ध पैलवानाने त्यांच्याशी कुस्ती करावी. परंतु राज्यातील कोणताही पैलवान त्यांच्याशी कुस्ती करायला तयार नव्हता. मग बाळंभटदादांनी हे आव्हान स्वीकारले आणि एक महिन्याचा वेळ मागितला. त्यांना तो मिळाला.
या एका महिन्याच्या काळात, बाळंभट दादा एका जंगलात कुस्तीची तयारी करीत होते. त्यावेळी त्यांना काही माकडे झाडावर कोलांट्या उड्या मारतांना दिसली. त्यांच्या हालचालींमध्ये, बाळंभटांना कुस्तीच्या काही चाली दिसल्या आणि त्यांनी लाकडी खांबावर त्याच प्रकारच्या चाली करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण महिनाभर त्यांनी त्या चाली उत्तम प्रकारे पारंगत केल्या आणि ते कुस्तीसाठी सज्ज झाले.

पहिला कुस्ती सामना अली नावाच्या पैलवानाशी झाला आणि अवघ्या पाच मिनिटांत बाळंभटांनी तो सामना जिंकला. हे पाहून दुसरा पैलवान गुलाम तेथून पळून गेला. पेशव्यांनी या चमत्काराबद्दल विचारले तेव्हा बाळंभटांनी त्यांना संपूर्ण घटना सविस्तर सांगितली आणि तेव्हापासून मल्लखांब या खेळाचे संशोधक व आद्यगुरू म्हणून बाळंभट देवधर (इ.स. १७८०-१८५२) ओळखले जातात. पुढे पेशव्यांच्या सांगण्यानुसार ते ही विद्या इतरांना शिकवू लागले.

मल्लखांब : प्रकार
प्रचलित मल्लखांब हा २ ते २ १/२ मी. उंचीचा, शिसवी अथवा सागवानी लाकडाचा, वरच्या दिशेने निमुळता होत जाणारा खांब असतो. अंग, मान व बोंड असे त्याचे तीन भाग असतात. मल्लखांब गुळगुळीत रहावा, घट्ट पकडता यावा व घसरू नये म्हणून अशुद्ध एरंडेल तेलाचा तसेच राळेचा वापर करतात.

मल्लखांबाचे एकंदर बावीस प्रकार आहेत. प्रचलित साध्या (किंवा स्थिर) मल्लखांबाशिवाय अन्य प्रमुख उपयुक्त प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : –
१) वेताचा मल्लखांब
२) टांगता मल्लखांब
३) निराधार मल्लखांब
१) वेताचा मल्लखांब : –
शरीराची लवचिकता व संतुलन राखण्याच्या दृष्टीने वेताचा मल्लखांब फार उपयुक्त असतो. सुमारे ३ ते ४ मी. लांबीचा लवचिक वेत लोखंडी हुकाला टांगला जातो. यावर प्रामुख्याने आसने व फरारे या गटांतील प्रकार करणे शक्य असते. वेताऐवजी जाड दोर वापरूनही मल्लखांब−कसरती केल्या जातात.
२) टांगता मल्लखांब : –
१ १/२ ते २ मी. उंचीचा लहान आकाराचा हा मल्लखांब छतापासून दोरीने टांगला जातो. यावर कसाचे व शरीर सामर्थ्याचे प्रकार केले जातात. हा मल्लखांब टांगलेला असल्याने तो स्वतःभोवती तसेच वर्तुळाकृती फेऱ्यातही फिरत असल्याने खेळाडूला विशेष कौशल्य आत्मसात करावे लागते.
३) निराधार मल्लखांब : –
केवळ १ ते १ १/२ मी. उंचीचा हा मल्लखांब बुंध्यात तिरपा छाट घेतलेला असतो. तो जमिनीत न पुरता पाटावर, अथवा बाटल्यांवर ठेवलेल्या स्टुलावर (बाटलीचा मल्लखांब) ठेवला जातो. यावर आसने आणि फरारे केले जातात. मल्लखांबास कोणताही आधार नसल्याने कौशल्य पणास लावावे लागते. प्रामुख्याने प्रात्यक्षिकांसाठी मल्लखांबावर मनोरे सादर केले जातात. या प्रकारात एकाच वेळी १० ते २० खेळाडू मल्लखांबावर तसेच जमिनीवरही आपापल्या जागा पटकावतात आणि कमळ, देऊळ, मत्स्याकृती, गरूड, उडत्या आकृत्या इ. प्रकारचे मनोरे सादर करतात.

एकाग्रता, चपळता, तोल सांभाळण्याचे कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या या मल्लखांब विद्येचे युद्धशास्त्रात खूप महत्त्व आहे. राणी लक्ष्मीबाई यांनीही या विद्येत प्रावीण्य मिळविले होते.
मल्लखांबाचे हेच महत्व जाणून श्री उदय देशपांडे यांनी मल्लखांब प्रसारासाठी आयुष्य वाहून घेतले. आशिया, अमेरिका आणि युरोप या तीन खंडांमधील ५२ देशातील सुमारे ५००० मल्लखांबप्रेमींना त्यांनी आता पर्यंत मल्लखांब प्रशिक्षण दिले आहे. मल्लखांबाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी भारत आणि भारताबाहेर ५००० हून अधिक मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली आहेत.

श्री उदय देशपांडे यांनी केवळ सुदृढ मुले आणि मुली यांनाच मल्लखांब शिकवला नाही असे नाही, तर अनाथ, दृष्टिहीन, दिव्यांग अशा खास विद्यार्थी -विद्यार्थिनींनाही मल्लखांब प्रशिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याचा दर्जा उंचावण्यास मदत केली आहे.

उदयजीनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये, भारतातील सर्व राज्यांमध्ये मल्लखांब पोहोचवलाच, शिवाय भारत सरकार, भारतीय ऑलम्पिक संघटना, रेल्वे मंत्रालय यांची मल्लखांबाला मान्यताही मिळवून दिली आहे. मध्य प्रदेश राज्याने तर २०१३ मध्ये मल्लखांब हा त्यांचा राज्यखेळ म्हणून घोषित केला आहे.
अस्सल मराठमोळा, पारंपरिक खेळ आणि व्यायाम प्रकार असलेल्या मल्लखांब खेळात आज हजारो मुले-मुली सातत्याने प्राविण्य मिळवित आहेत. मल्लखांबावर व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते. शारीरिक लवचिकता, चपळता, कौशल्य आणि धैर्य वाढते आणि इतर खेळांसाठी आवश्यक असलेली शारीरिक क्षमता निर्माण होते. तसेच अभ्यासासाठी आवश्यक असलेली मानसिक एकाग्रता देखील वाढते याचा अनुभव मी ही माझा मुलगा जेव्हा शालेय वयात मल्लखांब कसरती करण्यासाठी जात होता तेव्हा घेतला आहे.
उदयजींच्या मेहनतीमुळे आज जगभर मल्लखांब स्पर्धा पुढील तीन प्रकारांमध्ये आयोजित करण्यात येतात : –
१) स्थिर मल्लखांब
२) झुलणारा मल्लखांब
३) दोरी मल्लखांब.
या व्यापक आणि सुंदर व्यायाम प्रकारात, खेळाडू मल्लखांबाच्या प्रकारावर विविध प्रकारची आसने, पकड, विविध आकार सादर करतात.
मुंबईच्या क्रीडा क्षेत्रात गेली ९९ वर्षे अहर्निशपणे कार्यरत असलेल्या सुप्रसिद्ध श्री समर्थ व्यायाम मंदिराचे उदयजी गेली ४२ वर्षे मुख्य प्रशिक्षक आणि मानद प्रमुख कार्यवाह म्हणून तर २०१६ पासून विश्व मलखांब महासंघाचे संस्थापक संचालक व मानद् महासचिव म्हणून ते कार्यरत आहेत. २०१९ व २०२३ साली त्यांनी मुंबई व आसाम येथे विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत १५ देश सहभागी झाले होते. इतर अनेक देशात राष्ट्रीय मल्लखांब संघटना स्थापन करण्यामध्येही त्यांचा मोठा वाटा आहे. मल्लखांबाची आंतरराष्ट्रीय नियम पुस्तिका तयार करून आंतरराष्ट्रीय पंचवर्गही त्यांनी घेतले आहेत.

मल्लखांबावर विविध भाषांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, तीन शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक आणि एक अर्जुन पुरस्कार विजेती खेळाडू घडले आहेत.

मल्लखांब क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानासाठी उदयजीना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार, याबरोबरच ५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने २०२४ मध्ये पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करून त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.

संपूर्ण पन्नास वर्षाहून अधिक काळ त्यांनी केलेली अविरत मल्लखांब सेवा ही पूर्णपणे मानसेवी आहे. त्यांनी त्यासाठी कोणतेही मानधन अथवा शुल्क घेतलेले नाही. केंद्र शासनाच्या ‘कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईज’ खात्यात ३८ वर्षे काम करून ते वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर २०१३ मध्ये ‘डेप्युटी कमिशनर’ म्हणून निवृत्त झाले. आज वयाच्या सत्तरीतही ते रोज सकाळी समर्थ व्यायाम मंदिर, दादर येथे विनामूल्य मल्लखांब प्रशिक्षण देतात.
श्री.उदय देशपांडे यांनी आपल्या निस्वार्थ योगदानातून ‘समर्थ भारत, सशक्त भारत’ आणि त्यातूनच ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना यशस्वीपणे अमलात आणायला सुरुवात केली आहे. यासाठी त्यांना पहिल्यापासून पत्नी सुखदा आणि ओंकार आणि अदिती या दोन्ही मुलांची साथ लाभली आहे. इतकेच नव्हे तर मुलांनी त्यात प्रावीण्य मिळविले आहे. त्यांची मुलगी अदिती अमेरिकेत एरियल सिल्क शिकवण्यात सहभागी होती.
कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार अशा मल्लखांब खेळाच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या उदयजींना कोणतीही कसरत न करता मनःपूर्वक दंडवत.

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
नीला बर्वे सिंगापूर यांनी पद्मश्री उदय देशपांडे यांचा मल्लखांबावरील त्यांचे प्राविण्य आणि त्यांची त्यातील तपश्चर्या आणि त्यांचे योगदान याविषयी खूप माहितीपूर्ण लेख मला वाचण्यास पाठवला त्याबद्दल त्यांना धन्यवाद खरोखरच उदय देशपांडे यांचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण कस्टम डिपार्टमेंटमधील असिस्टंट डायरेक्टर ची नोकरी सांभाळून त्यांनी मल्लखांबा एवढं स्वतःचे मल्लखांबाचे तीन प्रकार त्यांनी तयार केले आणि त्याचा प्रसार खूपच भारतभरच नव्हे तर जगातही त्यांनी केला आश्चर्य म्हणजे निवृत्त झाल्यावर ते मुंबईत विनामूल्य मल्लखांबाचे वर्ग चालवीत आहेत अर्थात याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा राजा छत्रपती पुरस्कार दादाजी कोंडदेव पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार हे त्यांना देण्यात आले याचबरोबर नीला बर्वे यांनी मल्लखांबाच्या इतिहासाविषयी सुद्धा खूपच माहिती यात दिली आहे पेशवेकालीन मल्लखांबाचे असलेले तीन वेगळे प्रकार आणि त्यात प्राविण्य मिळालेले बाळंबट यांनी परदेशी कुस्तीगारांचा त्याचा वापर करून केलेला पराभव यावेळी माहितीपूर्ण लिखाण केले आहे खरोखरच मला मल्लखांब या शब्दापलीकडे काहीच माहिती नव्हती ती बरीच माहिती ह्यांच्या लेखातून मला मिळाली आणि असा लेख मला वाचायला पाठवल्याबद्दल त्यांना धन्यवाद