Friday, December 6, 2024
Homeलेखपालकत्व : एक कला - २१

पालकत्व : एक कला – २१

“उजळू दे दिवाळी…”

आपल्या कोवळ्या मुठीमध्ये आईने दिलेले दहा रुपये घट्ट दाबून लड्डू लहान भावासाठी बिस्कीट आणायला जात होता. मी दिसताच धावत माझ्याकडे आला. माझ्या हाताचं बोट धरून माझ्या सोबत चालू लागला आणि एकाएकी त्याने मला विचारलं, “दीदी, दिवाली हमारी बस्ती मे क्यू नाही आती ? “लड्डू चा हा प्रश्न मला निरुत्तर करून गेला.
चमचमणारे आकाशदिवे चांदण्याशी बोलत होते. बारीक रंगबिरंगी लाईटच्या माळा दारा दारात डोलत होत्या. उंबरठ्यावर लक्ष्मीची नवीन पावले कोरली होती. फराळाचा सुगंध स्वंपकघराचा ताबा घेत होता. दिवाळीचा सण घरा घरात शिरला होता.
मात्र, काही अंधारलेल्या कोपऱ्यात दिवाळी फक्त लाल दिव्याच्या भकास चकाकित हरवून जाते. अशी ही लाल दिव्याची वस्ती जिथे कायमच झगमगणारे लाईट असतात पण त्यात उध्वस्त आयुष्याचा अंधार सामावला असतो. या वस्तीतील लहान मुलांना दिवाळी म्हणजे सुरेख पणत्यांची आरास असते हे कुठं ठावूक असतं ? त्यांना त्यांच्या वस्तीत चकाकणारे जे लाल दिवे असतात एवढाच प्रकाश माहिती असतो.

आठ नऊ वर्षांचा लड्डू दिवाळी वर रागावला होता. कारण त्यांच्या वस्तीत दिवाळी कधीच येत नाही असं तो म्हणाला.लड्डू ला शाळेसाठी, तुम्ही दिवाळी कशी साजरी केली ? यावर आठ ओळी लिहायच्या होत्या. पण त्याला काय लिहावं कळेना. बाईंनी दिलेला हा गृहपाठ कसा करायचा हे कोडं त्या चिमुकल्या जीवाला सोडवे ना. लड्डू मला म्हणाला,”दीदी सच्ची की दिवाली मे क्या होता है ? इधर तो जुआ खेलते है और रोज से ज्यादा दारू पिते है. “त्याचे टपोरे गोल गोल डोळे फिरून माझ्यावर थांबले आणि जरा थांबून तो परत म्हणाला, “ऐसी होती है क्या दिवाली ? टीचर तो बोली है जो जो किया दिवाली पे वो लिखना. मै क्या लिखु दीदी ?”
निरुत्तर होण्या पलीकडे जणू काहीच उपाय नव्हता माझ्याकडे !

आज इथल्या मुलाकडून पणत्या आणि आकाश दिवे करून घेण्यासाठीसाठी मी काही थोडं सामान घेऊन आले होते. यामुळे त्यांना थोडी मजा वाटेल आणि दिवाळीत काय काय करतात हे देखिल कळेल. मुलांना एकत्र करून मी बुद्ध विहार या हॉलमध्ये गेले जो वस्तीच्या बाजूलाच होता.
तेवढ्यात पोलिसांची गाडी आली. या वस्तीत हा त्यांच्या दिनचर्येचा भाग आहे. लाल दिव्याच्या वस्तीत व्यवसाय करणाऱ्या काही मातांना पोलीस गाडीत ढकलू लागले. लड्डू च्या आईला पण ते गाडीकडे जाण्यासाठी ढकलू लागले. लड्डू च्या आईने त्याच्या आठ नऊ महिन्यांचा लहान भावाला लड्डू जवळ दिले आणि काही पैसे त्याच्या हातावर ठेवले. त्याच क्षणी पोलिसांनी लड्डूच्या आईला गाडीत कोंबले. त्या झटक्याने लड्डूच्या हातातले पैसे खाली पडले आणि लहान भावाला सांभाळत लड्डू खाली वाकला. पैसे उचलताना पोलिसांच्या गाडीत कोंबलेल्या बायका मध्ये तो आपल्या आईला शोधत असतानाच गाडी पुढे निघून गेली. लड्डू ने मातीतले पैसे उचलले आणि हाफ पँटच्या खिश्यात टाकले. आई कधी परत येणार हे त्याला माहिती नव्हतं.

एकूणच सगळं अनिश्चित. या निष्पाप जिवांच्या वाट्याला आलेला वणवा त्यांचं बालपण होरपळत होता. समोरच्या गल्लीतून एक वयोवृद्ध महिला येत होती. तिला बघताच लड्डू लहान भावाला खाली सोडून तिच्याकडे पळत गेला तिला चिटकत तो म्हणाला, “नानी, पुलिस मां को ले गये.
मां ने ये पैसे दिये है, चौकीमे भेजने को. “असं म्हणत लड्डूने खिष्यातल्या मातीने भरलेल्या काही नोटा त्या नानीच्या हातावर ठेवल्या.त्या नोटा मोजत तिने तोंडातील पान शेजारी थुंकले आणि लड्डू वर ओरडत म्हणाली, “तेरा कौंसा वाला बाप बैठा है चौकी मे ? जो इतने नोट मे छोड देगा तेरी माँ को ?.” असं म्हणत तिने लड्डू ला बाजूला केलं आणि लड्डूच्या आईच्या खोलीचे दार बंद करून कडी लावली. लड्डू ला इशारा करून खोली बाहेर बसायला सांगून. लड्डू ने दिलेल्या नोटांची पुंगळी मुठीत दाबून ती निघून गेली.

नात्यांचे फार वेगळे अर्थ आहेत या वस्तीत. नानी म्हणजे जिने त्यांच्या आईचा संपूर्ण ताबा घेतला आहे अशी व्यक्ती आहे, लाड करणारी कोणी प्रेमळ आजी नाही !
नानी म्हणजे, या वयोवृद्ध महिला आपल्या खोल्या या मुलींना व्यवसायासाठी भाड्याने देतात आणि त्यांच्या रोज कमाईचा निम्मा हिस्सा स्वतः ठेऊन घेतात. तसेच वेळोवेळी अनेक गरजासाठी, पोलीस चौकीत पैसे भरण्यासाठी, त्यांना मोठ्या व्याज दरात कर्ज देतात आणि कर्ज वसूल करण्यासाठी म्हणून त्यांचे पूर्ण पैसे पण जबरदस्तीने ठेऊन घेतात. या मुली त्यांच्या पूर्ण देखरेखीत असतात. त्यांच्या पैश्याचा संपूर्ण हिशोब या नानी कडे असतो. काही काही नानी चांगल्या पण असतात. त्या मुलींना व्यवस्थित सांभाळतात. पण त्या या मुलींवर आपली सत्ता समजतात.म्हणून त्यांच्या खोलीत राहणाऱ्या मुलींची मुलं त्यांना नानी म्हणतात.
नानी खोलीचे दार बंद करून आणि पैसे घेऊन निघून गेली. लड्डू त्याच्या लहान भावाला घेऊन खोलीच्या बंद दारासमोर बसला आणि लाहन्याच्या हातात असलेला बिस्कीट चा पुडा फोडून बिस्कीट खाऊ लागला.

किती ही असुरक्षितता ! या मुलांची आई कधी परत येणार ? कधी पर्यंत ही मुलं अशी बंद खोली समोर या भयानक वातावरणात सुरक्षित राहणार ? असे अनेक प्रश्न मला हैराण करत होते. मी लड्डू ला हॉल मध्ये घेऊन येण्यासाठी तिथे गेले. मी लड्डू आणि त्याच्या भावाला घेऊन हॉलकडे येताना, तेवढ्या तीन महिला खोली जवळ आल्या आणि खोलीचे दार उघडून भिंतीच्या कोपऱ्यात ठेवलेली महादेवाची डोळे मिटलेली मूर्ती आणि चांदी चा लहानसा दिवा घेऊन बाहेर पडल्या. त्यांच्या हातात महादेवाची मूर्ती आणि दिवा बघून लड्डू माझा हात झटकून लहान भावाला खाली सोडून त्या महिला कडे धावत गेला आणि रडत त्यांची विनवणी करू लागला.”हमारे भगवान क्यू ले जा रहे हो. ये दिया मत ले जाओ.”असं म्हणत तो त्यांचा पदर ओढू लागला.आपला पदर आणि लड्डू दोघांना झटकत त्यातली एक महिला म्हणाली, “तेरी माँ ने दिये के पैसे नहीं चुकाये और पहले का कर्जा भी बाकी हैं. भगवान जी चुका देंगे सारा कर्जा”. असं म्हणत त्या सगळ्या मिश्कीलपणे हसून तिथून निघून गेल्या आणि लड्डू मात्र टाहो फोडून रडत होता. मी त्याला समजवायला जवळ घेतलं, तर तो म्हणाला, “दीदी भगवान और दिया दोनो ले गये ये अब दिवाली कैसे करेंगे ?” मी लड्डू ची समजूत काढत होते. मी त्याला नवीन पणती देणार असं सांगून त्याला हॉलमध्ये घेऊन गेले.

मला परमेश्वराची वजाबाकी कळेनाशी झाली. आशेची किरण आणखी किती रुसणार या वस्तीतील या निरागस मुलावर याचं गणित कसं सुटेल ? असे विचार मन खिन्न करत होते. लड्डू हुंदके देतच होता.मी त्याला म्हणाले, “तू खूब पढाई करना और बडा आदमी बनना फिर नये भगवान जी और नया दिया लेकर आना.” असं म्हणत मी त्याच्या हातात एक पणती रंगवायला दिली. या काळोखातून बाहेर पडण्यासाठी मुलांच्या डोळ्यात अशी स्वप्न पेरणं खूप गरजेचं होतं. लड्डू ने डोळे पुसल आणि लहान भावाच्या तोंडात बिस्कीट चा तुकडा टाकून. पणती रंगवायला बसला.

जी मुलं शाळेत जात नाहीत त्यांच्यासाठी पणत्या, रंग, ब्रश इत्यादी वस्तू नवीन होत्या. रंगांत रंगलेले हात त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद फुलवत होते.काहींनी फक्त गम्मत केली. पणत्या सुबक सुंदर झाल्या नव्हत्या पण त्यावर मुलांनी आखलेल्या उभ्या आडव्या रंगीत पट्टयांनी काही क्षणा साठी का होईना त्यांना वस्तीतील काळा ठसा विसरायला लावला होता. आकाश दिव्यासाठी आणलेला लाल गुलाबी कागद मुलांच्या दारू, सिगारेट, आफिम हाताळणाऱ्या रखरखीत झालेल्या हातावर हलकेच आपला रंग सोडत होता.त्या रंगवलेल्या पणत्या आणि आकाशदिवे दिवाळीत त्यांच्या लाल दिव्याच्या वस्तीत त्यांच्या खोलीचे दार उजळतील किंवा नाही माहिती नाही पण आज त्यांच्या निरागस चेहऱ्यावर आनंदाची चमक जरूर आली होती.

लड्डू मला म्हणाला, “दीदी अब मैं लिख दु क्या कॉपी मे, दिवाली पे मैने दिये को रंग लगाया और कंदील भी बनाया”. मी हसून होकारार्थी मान हलवली.
लड्डू अर्धवट रंगवलेल्या पणत्या आणि चांदणीचा आकार न घेऊ शकलेल्या आकाश दिव्यात खरी दिवाळी शोधत होता.
काळोखात आपली दिशा शोधणारे लुकलुकणारे हे निरागस दिवे स्वप्रकाशाने उजळावे असे मनोमन वाटले.
“उजळू दे दिवाळी
काळोखाच्या दारी
तेजोमय ही दिवाळी पणती
फराळ थाळी, सुख रंगाची रांगोळी
आणि चंद्र कोरीचा एक तुकडा
चला भेट देऊ त्या काळ्या रात्रीस
रिकामी नसावी एक ही झोळी
उजळू दे दिवाळी
काळोखाच्या दारी”
क्रमशः

डॉ राणी खेडीकर

— लेखन : डॉ. राणी खेडीकर.
अध्यक्ष, बाल कल्याण समिती, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !