Thursday, January 16, 2025
Homeलेखपालकत्व : एक कला - २८

पालकत्व : एक कला – २८

बालकांचं भाव विश्व”

“भातुकली च्या खेळामधली
झाकणाने कापलेली
चाफ्याच्या पानाची गोल पोळी
किती मस्त होती
खोट खोट होतं सगळं
पण वीण किती घट्ट होती

दाण्याचीच भाजी,
दाण्याचाच भात
तरी चव वेगळी होती
या नात्याची
सगळेच मैत्र जीवाचे
वयाची नव्हती भानगड काही

इवल्याश्या गुळासाठी
आजी पण हट्ट करायची
गंमतच्या भिंती गंमतच दार
घरा मध्ये तरी मुलं रमायची

चूल नव्हती खरी पण
आमटी तरी शिजायची
भातुकलीचा खेळ संपल्यावर
आई बाबा, भाऊ बहीण सगळे
इवले इवले हात घट्ट धरून
एकसाथ पळायचे”
     
बालपण किती निरागस असतं. खोट्या खोट्या गोष्टी पण खऱ्या खऱ्या जगता येतात आणि त्यातून आनंद ही मिळवता येतो. बालकांच्या भाव विश्वात नाजूक तरल रंग विखुरलेले असतात. त्या रंगाचा प्रत्येक ठिपका त्या बालकाला एक नवं स्वप्न देणारा असतो. हे भाव विश्व बाल्या व्यस्थेला वेगवेगळे आयाम देत जातं आणि बालपण फुलवत जातं. अश्या नाजूक अवस्थेत बालपण जपणं त्यांना त्यांच्या विश्वात रममाण होण्यासाठी तसं स्वच्छ सुरक्षित वातावरण तयार करणं ही आपल्या सगळ्याची जवाबदारी आहे. बालकांचं भाव विश्व समजून घेताना बालकांना व्यक्त होऊ देणं महत्त्वाचं आहे. आपलं बोलणं कोणीतरी लक्ष देऊन ऐकत आहे याची पावती बालकास मिळाली तरच ते बालक आपल्याशी मनमोकळे गप्पा करतं.

त्याच्या त्या गप्पांना आपल्या दृष्टीने तसा अर्थ नसतो. कधी कधी बालकांच्या गप्पांना कोणताही संदर्भ लागत नाही. पण त्यातून त्यांची भाषा, बोलण्याची पद्धत, व्यक्त होण्याची गरज या गोष्टीची स्पष्टता बालकांना अवगत होऊ लागते. बालक बोलत असताना आपण आपल्या कामात असतो, उगाच मध्ये मध्ये आपण त्याला ओ देतो. पण आपलं संपूर्ण लक्ष त्याच्या कडे आहे. आणि तो जे काही बोलतोय ते आपण लक्ष देऊन ऐकतोय हे जोवर घडत नाही तोवर बालक आपल्याशी मनमोकळे पणाने बोलत नाही. आणि मोठ्यांना कायम असच वाटत असतं की, त्यांना बालकावर संस्कार करायचे आहेत त्यांना खूप काही द्यायचं आहे, शिकवायचं आहे आणि म्हणून मोठे लोक सतत बालकाला काहीतरी सांगत असतात. पण त्याच वेळी ते हे विसरतात की, देण्याची प्रक्रिया एकून घेण्याच्या प्रक्रियेशी निगडित आहे.

पालक शिक्षक आणि आपण सगळेच बालकांना एकून घेण्यासाठी आपली तयारी करत नाही. बाजारात गेल्यानंतर आपण बालकाला प्रत्येक भाजी, फळ याची नावे सांगायला सुरुवात करतो.पण तिथे पोहोचल्यावर बालकाला काय वाटतंय, त्याच्या मनात, डोक्यात काय शब्द येत आहेत, त्याला ते शब्द उच्चारण्याची संधी मिळाली तर कदाचित त्याच्या कडून नवीन काहीतरी  घडू शकेल. त्यासाठी त्याला आपल्या कडे असलेली माहिती देण्याचा मोह थोडा आवरून धरला तर बालकांचं भाव विश्व किती सुंदर आणि अनोखं असतं याची जाणीव आणि प्रचिती आपल्याला निश्चितच होऊ शकेल.

पुढील लेखात या विषयावर आपण आणखी सखोल चर्चा करू या.
क्रमशः

डॉ राणी खेडीकर

— लेखन : डॉ राणी खेडीकर.
अध्यक्ष, बाल कल्याण समिती, पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय