‘अंतरीचा डोह’ या डॉ. सतीश यादव लिखित वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन दिनांक 13 मे 2024 रोजी झाले आणि या लेखांचे माझे वाचन सुरू झाले.
काही लेखांचे वाचन झाल्यावर असे लक्षात आले की पुस्तकाला दिलेले शीर्षक “अंतरीचा डोह” हे किती अनुरूप आहे. या पुस्तकातील लेखांची विभागणी चार विभागांमध्ये केली आहे. चारही विभागांना दिलेली शीर्षके अगदी समर्पक आहेत.
पहिल्या विभाग आहे ‘कोसळणाऱ्या मानवतेला सावरणारे हात’. या विभागामध्ये राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, स्वामी रामानंद तीर्थ यांची सर्वसामान्यांना माहिती नसलेली बाजू सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सामाजिक रूढी, परंपरा, प्रथा, धर्म, जाती बौद्धिक गुलामगिरी अशा विविध सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या विभागातील एक उल्लेखनीय लेख म्हणजे ‘जरा याद करो कुर्बानी’. यामध्ये कारगिल युद्धात शहीद झालेले शहीद बालाजी माले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून तरुणांमध्ये देशासाठी लढण्याची प्रेरणा जागृत केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आधुनिक काळापर्यंत सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न या विभागामध्ये केला गेला आहे.
या पुस्तकातील दुसरा विभाग म्हणजे ‘साहित्यायन. ‘यामध्ये प्रेमचंद, डॉक्टर रांगेय राघव, कैफी आझमी, साहित्य आणि समाज, मूलतत्त्ववादी प्रवृत्तींची मीमांसा, मराठी विज्ञान साहित्यातील मैलाचा दगड – धुमयान इ.चा समावेश आहे. मानव मुक्तीचे उद्गातेअसलेल्या प्रेमचंद यांच्या कथांचे केंद्रबिंदू कुटुंब हे होते. डॉक्टर काशिनाथ राजे लिखित डॉक्टर रांगेय राघव यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या अल्पायु मध्ये केलेल्या अप्रतिम कलाकृतींची माहिती या लेखातून मिळते. स्त्रियांच्या अद्भुत सामर्थ्याची ओळख जगाला झाली पाहिजे यासाठी धडपडणारे कवी कैफी आझमी यांचाही परिचय या लेखामधून होतो. डॉ. सूर्यनारायण रणसुभे सरांचा अल्पसा परिचय होताच परंतु या लेखामधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतर पैलू ही माहित झाले. डॉक्टर पंडित विद्यासागर लिखित धुमयान या कादंबरीचा परिचय वाचून ती पूर्ण कादंबरी वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. साहित्याच्या मेजवानीने तृप्त करणारा असा हा दुसरा विभाग आहे.
‘चिंतन गर्भातील मोती’ या शीर्षकांतर्गत असलेला तिसरा विभाग; यामध्ये शेतकरी तसेच दलितांच्या सामाजिक समस्यांवर चिंतन आणि त्यावर अपेक्षित उपाय याविषयी विवेचन केलेले आहे. स्मरण शहिदांचे या अंतर्गत भगतसिंग,सुखदेव, राजगुरू यांनी जसा देशाला मुक्त करण्यासाठी लढा दिला तसेच युवकांनी नवीन तत्त्वज्ञानाच्या उभारणीसाठी आत्ममुक्तीचा लढा देण्याची गरज आहे हे समजले. धर्मसंस्थेचा ऐतिहासिक निर्णय यातून धर्मसंस्थेची कार्यपद्धती, लातूर जिल्ह्यातील अनुवादकांची माहिती, उच्च शिक्षणातील अपेक्षित बदल इ. विषयांचे चिंतन खरोखरच विचाराभिमुख करणारे आहे.
‘अंधाराचे भाष्यकार प्रकाशाचे सोबती’ या अंतर्गत ज्यांच्या कार्याची ओळख झाली असे डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, डॉ. विठ्ठल मोरे, डॉ. अंबादास देशमुख आणि ॲड. रजनी गिरवलकर हे खरोखरच समाजासाठी एक प्रकाश स्तंभ आहेत. सामाजिक परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याची प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या प्रतिभासंपन्न ध्येयवेढ्या व्यक्तींची ओळख झाली.ॲड. रजनी गिरवालकर यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण पूर्ण करून स्त्रियांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली.
खरोखरच ‘अंतरीचा डोह’ हा लेखसंग्रह वैचारिक प्रगल्भतेचे एक उत्तम उदाहरण आहे. आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो. आपल्या पुस्तकांची लवकरच शताब्दी होवो. या शुभेच्छांसह मी लेखनाला विराम देते.
— परीक्षण : ज्योती भातीकरे-वांगे (एम. ए. इंग्लिश बी.एड.) लातूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800