न्यूयॉर्कस्थित सांगलीची कन्या नयना निगळ्ये हिचा ‘अशब्द’ हा पहिला कवितासंग्रह आणि यातील निवडक कवितांचा ‘ओल्या राती’ हा संगीत अल्बम दोन्हीचे प्रकाशन पुण्यात मे २०२४ मध्ये प्रसिध्द सितार वादक उस्ताद उस्मान खान आणि ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे यांच्या हस्ते झाले.
पुण्यातील के. एच. संचेती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात यानिमित्ताने या संग्रहातील संगीतबध्द कवितांची मैफलही रंगली. ‘अशब्द’ हा काव्यसंग्रह आता विविध देशांमध्ये उपलब्ध आहे. हे पुस्तक संपूर्ण जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचले आहे, ज्यामध्ये अमेरिका, जर्मनी, दुबई आणि भारतातील विविध राज्यांचा समावेश आहे. या कवितासंग्रहाने अल्पावधीतच शहरी आणि ग्रामीण वाचकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे आणि महिला, पुरुष, शिक्षक, शासकीय अधिकारी, अभियंते, डॉक्टर, लेखक, गायक, वादक, कलाकार आणि साहित्यतज्ञांना तितकेच प्रभावित केले आहे.
‘अशब्द’ हे न्यूयॉर्कच्या अनेक ग्रंथालयांमध्ये सूचीबद्ध असलेले पहिले मराठी पुस्तक आहे. हे पुस्तक अमेरिकेतील हेम्पस्टेड ग्रंथालयाच्या विदेशी भाषा पुस्तक संकलन विभागात ‘मराठी’ भाषेची अधिकृत भारतीय भाषा म्हणून ओळख निर्माण करणारे उल्लेखनीय पहिले पुस्तक आहे. हा अमेरिकेतील मराठी भाषिकांसाठी फार महत्त्वाचा टप्पा आहे आणि ‘मराठी पाऊल पडते पुढे !’ या मराठी अस्मितेचे प्रतीक आहे.
कवयित्री नयना निगळ्ये आपल्या मनोगतात लिहितात, ‘अशब्द’ हा माझ्या अंतरंगाचा आरसा आहे जो मी आपल्यासमोर अनावृत्त करत आहे. हे माझ्या अंतर्हृदयाचे प्रतिबिंब आहे जे मी आपल्याला उलगडून दाखवत आहे. माझे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले तर तरुणाई प्रदूषणरहित पर्यावरणास हितकारक उर्जानिर्मिती प्रकल्पांच्या विकसन आणि व्यवस्थापनात व्यतीत झाली. शिक्षण, नोकरी, यश हे माणसाचा सामाजिक स्तर उंचावू शकतात पण माणसाला माणूस बनवतीलच असं अजिबात नाही. चूल आणि मूल यांनीच मला माणूस म्हणून जगायला शिकवलं, आयुष्यात भरभरून समाधानाचे न संपणारे क्षण दिले. अनेक भाषांचा आणि अनेक संस्कृतींचा संगम माझ्या जीवनाला आकार देतो. सौरऊर्जा, विद्युतघट, सागरी पवनचक्की यांसारख्या प्रकल्पांतून माझ्या कार्याची झलक मिळते परंतु माझ्या अंतरंगाची, माझ्या मनाची गोडी निःसंशय कवितेतच सापडते. माझी मायबोली मराठी या कवितेच्या माध्यमातून माझ्या अंतर्मनाचा निखळ आवाज बनून निनादली आहे.
‘अशब्द’ची केंद्रीय संकल्पना म्हणजे अंतर्गत आत्मसंघर्षाची पराकाष्ठा. हा संघर्ष वैयक्तिक पातळीवरून सुरू होतो आणि शरीरात, मनात, अनुभवात, जीवनात, निसर्गात, विश्वात, समाजात अनेकविध पैलूंमध्ये विविध रूपांमध्ये साकारतो. जणू एकात्मतेच्या दोन बाजू आणि म्हणूनच कदाचित अव्यक्त “अशब्द.” विसंगतीतील सुसंगती की सुसंगतीतील विसंगती, अपूर्णतेतील पूर्णता की पूर्णत्वातील अपूर्णता, कधी उत्तर बनून येणारे प्रश्न तर कधी प्रश्नांनाही भेडसावणारे प्रश्न. शब्दांचे व्यक्तिसापेक्ष अर्थ आणि भाव शेवटी सर्वच ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर सापेक्ष आणि तितकेच विचारप्रवर्तक. म्हणूनच या माझ्या अनुभवांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खटाटोप.

या संग्रहातल्या काही कविता स्वतःमधेच चार पाच अगदी स्वतंत्र भाव, परस्पर विरोधी स्वतंत्र अर्थ घेऊन अवतरल्या आणि एकाच कवितेच्या नानाविध रूपांनी मलाही चकित केले. ‘वादळी,’ ‘राधा बनता धारा,’ ‘स्त्री शक्ती आणि वास्तव’ या अशाच गटातल्या काही सख्या. काही पंचवीस तीस वर्षापूर्वी अर्धवट खरडून ठेवलेल्या ओळी गेल्या दोन तीन वर्षात पूर्ण झाल्या.
म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग आणि शुभेच्छा तिथे तर अवकाशमार्ग. शेवटी सुर जुळत गेले आणि या कविता गीतरूपाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस झाला. पण वाचताना कवितेशी होणारी अंतरंगाची निर्व्याज ओळख गाण्याच्या साजश्रृंगारात होत नाही हे मनोमन जाणवलं. मग संगीत अल्बम प्रकाशनाला महिनाभर उरला असताना कवितासंग्रह प्रकाशनाचाही दुग्धशर्करा योग जुळून आला. तर ‘अशब्द’ रूपाने मी आपल्या समोर माझे अंतरंग, माझा आत्माच ठेवते आहे, हे शब्द, ह्या भावना, माझ्या जीवनाच्या प्रवासाचे साक्षीदार आहेत.

‘अशब्द’च्या पानांमधून तुम्हीही या शब्दविश्वात प्रवेश करा जिथे प्रत्येक कविता एक नवीन जग, एक नवीन अनुभव, एक नवीन भावना उलगडते. आपल्या संवेदनशील वाचनासाठी आणि माझ्या भावविश्वातील सहप्रवासासाठी मी आपली आभारी आहे.
अनुभवा ‘ओल्या राती’ चे मनमोहक सूर माझ्या कवितांवर आधारित “ओल्या राती” ह्या संगीत अल्बमातील सुरेख गाणी आणि कार्यक्रमाच्या व्हिडिओंना तुम्ही अनुभवू शकता.”
वाचकांच्या प्रतिक्रिया
१. सौ. स्वाती वर्तक, खार(प), मुंबई ५२ :

“मध्यंतरी माझ्या वाचनात एक कविता आली. खूपच आवडली. वाटले या कवियत्रीच्या आणखी कविता मिळाल्यात तर नक्की आवडेल वाचायला. कळले तिचा “अशब्द” नावाचा कविता संग्रह प्रकाशित झालाय. लगेच मागवून झपाटल्यासारखे वाचून काढले. ते झपाटलेपण माझ्या वाचन वेडामुळे नव्हते, ते गुंग होणे होते तिच्या कवितांमुळे. तिच्या प्रत्येक कवितेत वेगळी धुंदी आहे. त्या आशय गर्भित, डूब असलेल्या, तरल, भावनाशील आयुष्याशी निगडीत जीवनाचे सत्यासत्य पडळातना वाटल्या.” तिला कुठलाही विषय भावतो. तिच्या मनाची अंतर्वेदना अतिशय मार्मिक पणे आर्ततेने उलगडत जाते. एक प्रखर सत्य ती सहजपणे दावते. ती एका कवितेत सांगते :
‘जेव्हा माणसं जवळ येतात
तेव्हा ती हमखास दूर जातात
खूप खूप दूर ..
कधीच न भेटण्यासाठी
जवळीकीचा बंध तुटतो..
पुनः कधीच न सांधण्यासाठी’
‘आता इथे’ ही कविता तर मनाला भिडते. ढोंगीपणावर असा काही शाब्दिक आसूड ओढते की वाचक स्तब्ध होतो :
‘एवढ्या गर्दीत इथल्या शोधू कसे मी तुला
कोवळे ऊन तू की अंधार मानू सावळे ?
युद्ध आणि बुद्ध वेड्या कधीच नव्हते वेगळे
झेंडा कुणाचाही असो फक्त मेले मावळे’
“अशा तिच्या कविता पूर्ण मनापासूनच वाचाव्यात… यात जी खोली आहे ती अपूर्व ! सध्याच्या राजकारणाशीही आपण हिची सांगड घालू शकतो :
‘हा असो वा तो नेता
मरतो फक्त कार्यकर्ता’
“असा ‘कोरडा’ लगावण्यास कवियत्रीचे शब्द सामर्थ्यवान आहेत. अशा अनेकअर्थी कविता ठाव घेतात.
“त्याच बरोबर… अगदी धुंद करणाऱ्या तरल प्रेमळ कविता ही हळव्या हळव्या करून जातात.
‘पुनः श्वास माझा नवा ध्यास होतो
नवा ध्यास पुनः नवा श्वास होतो’
‘निळाईत न्हालेली राधा गर्द केशरी जरी श्रीहरी’
‘पहिली प्रेम कहाणी-मनामनात लपलेली’
‘भिजलेल्या ओल्या राती
लाटा येती आणि जाती
जगतात जागतात
ओल्या राती रिती नाती’
“किती अलवार. शब्दांशी ती सहज खेळते असे जाणवते.. त्यातील अनुप्रास, त्याची गेयता तिच्या शब्दांवर जणू सौंदर्याचा मोहोर खुलतो. ‘शिवशक्ती’… या कवितेत तिने वापरलेला … ‘स्वप्न वर्खी अंखात’ ही ओळ मला मोहीत करते. त्या कवितेत असलेला तिचा आध्यात्मिक बरोबरच सामान्य जीवनाशी जुळलेला शंकर पार्वतीच्या जीवनातील अर्थ अतिशय सार्थपणे ती अधोरेखित करते. त्यातील शेवटची ओळ… ‘नयनाने नयनाने’ … किती खुबीने वापरले आहे असे जाणवत राहते.
“कविता वृत्तात असो पंचाक्षरी असो वा गझल असो ती आपल्याला सानंदे त्या त्या प्रांतात हिंडवून आणते. अगदी चार ओळींची ‘निवडुंग’ कविता देखील किती अर्थगर्भित. पंचाक्षरी… ‘स्पर्श’ …देखील आपल्या मनाला स्पर्श करून जाते. ..चिरंतनाची ओढ का असते? कोणत्या क्षणासाठी ही सर्व फुले फुलतात? हे प्रत्येक मानवी मनाला पडलेले प्रश्न ती लीलया …. ‘चिरंतन क्षण’ या कवितेत मांडते. ‘ऋतुमती’ सारखा विषय घेऊन ती जेव्हा लिहिते तेव्हा आपलेही काळीज भळभळ ओघळते की काय वाटते.
“अशीच ‘चेहरे’ कविता पुस्तक वाचता वाचता अटळपणे जाणवते.. ती एक स्त्री तर आहेच पण स्त्रीत्वावर अदम्य विश्वास असलेली, स्वतःच्या सामर्थ्याचा अस्तित्वाचा अभिमान असलेली, अन्यायाला वाचा फोडणारी, आईच्या ममतेची, त्या मायेतील सामर्थ्याची पण तरीही गरज असल्यास आपल्या बाळासाठी ‘क्षमेचे’ रूप घेणारी वात्सल्याची मूर्ती होणारी. हा द्वंद्व उत्तम रित्या साकारणारी ही कवियत्री आहे …
“साऱ्याच कवितांबद्दल लिहीत नाही वाचकांची उत्सुकता कवियत्रीची भरारी बघण्यासाठी कायम राहावी ही इच्छा असल्याने आवरते आणि एवढेच सांगते हा एक अफलातून कविता संग्रह आहे तो रसिक वाचकांनी अवश्य
वाचावा.”
२. डॉ. रवि महामुनी, प्रिन्सिपल सायंटिस्ट, टाटा रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर पुणे :
“नयना, तुझा ‘अशब्द’ हा काव्यसंग्रह वाचला. खरोखर सर्व कवितांनी निःशब्द करून टाकले. कविता संग्रहातील सर्व कवितांमध्ये विषयांची विविधता दिसून येते. प्रत्येक कविता एक नवीन अनुभव आणि भावना प्रकट करते. भाषेचा प्रयोग अत्यंत कल्पकतेने केला आहेस ज्यामुळे कवितांचे वाचन आकर्षक आणि प्रभावी झाले आहे. विशेषतः ‘जवळीक,’ ‘नवा श्वास,’ ‘हास्य ओले’ मनाला विशेष भावल्या कारण त्या ओळींमध्ये एक खास प्रकारची भावना आणि गहनता होती. एकंदरीतच हा संग्रह साहित्यिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वाचकांसाठी प्रेरणादायक आहे.”
३. अंजली वसंत गडकर, न्यूयॉर्क :
“नेमक्या शब्दात रेखाटलेल्या ‘अशब्द’ हा कवितांचा संग्रह मनाला खूपच भावला. काही वेळा भावनांच्या राज्यांत हरवून जाताना कवयित्रीची शब्दांची ताकद दिसते. कधी वाटते एकच कविता वाचून त्यातच रमावे की दुसरी वर हळूच हात फिरवावा आणि त्यातही रमून जावे. कवयित्री परदेशात राहूनही भाषेवरचे इतके प्रभुत्व पाहून विस्मयचकित व्हायला होते. खूप खूप शुभेच्छा नयना. सदैव चांगल्या गोष्टींची अपेक्षा ठेवणारी मैत्रीण.”
४. उदय बिराजदार, उद्योजक, पुणे :

कवयित्रीने या कवितासंग्रहात वेगवेगळ्या विषयांवर कविता लिहिल्या आहेत.निसर्ग, जीवन, संघर्ष, स्त्रीशक्ती, जीवनातील विरोधाभास, स्वप्ने… अनेक मानवी भावना प्रभावीपणे मांडल्या आहेत. या कविता वाचकताना वाचकालाही या वेगवेगळ्या भावना अनुभवायला मिळतात.
५. राजेश्वरी किशोर, लेखिका, ‘निकोबारची नवलाई’ आणि ‘आरोही – विशेष फूल फुलताना’ :

“नयना – एक इंजिनिअर, एक पर्यावरण प्रेमी आणि माणूसपण जपणारी. तिचा ‘अशब्द’ हा कवितासंग्रह विविध जाणीवांवर आधारित आहे. कधी निसर्ग, कधी मनातलं, कधी जीवनातलं तर कधी अवकाशातलं. कधी अथांग सागरातलं तर कधी मनाचं कुंपण असलेलं. कधी अवीट प्रेम तर कधी विखुरलेले मोती. कधी लोपता अंधार तर कधी भविष्यातला अंकुर. अशा अनेक जाणीवा शब्दसुरात मांडलेला हा काव्यसंग्रह. कधी तरल प्रेम तर कधी उद्वेगपूर्ण आवेश अशा विविध छटा आपल्याला या कवितांत दिसून येतात. त्याचबरोबर निसर्गप्रेम, समाजभान, आयुष्याचं सार सामाजिक जाणीव करून देतात. प्रत्येक कविता पुन्हा पुन्हा वाचावी तेव्हा प्रत्येकवेळी त्यातला गर्भित अर्थ आपल्याला अधिकच खोलवर समजत जातो. मोजून मापून लिहिलेल्या शब्दांत अथांग सागराचं गुपित सापडत जातं. अतिशय गेय असा हा सुंदर काव्यसंग्रह.
“मला तिची एक कविता फार आवडली –
दोन बाजू
स्वप्नातला प्रत्येक पळ
जर सत्यात अवतरला असता
पापणीचा काठ माझ्या
कधी ओलावलाच नसता…
सत्यामधला कटू क्षण
जर नेहमीच स्मरला असता
बेभान धुंदीत ओठ माझा
मंदपणे हसलाच नसता..
६. अतुल दिवे, संगीतकार व गायक :

“मी एक रसिक आणि संगीतकार आहे. शब्दांचा मूल्य जपत या सुंदर शब्दांना चाल देण्यासाठी मला अत्यंत आनंद झाला. एक उत्तम मीटर असलेलं काव्य व प्रत्येक शब्दांमध्ये प्रत्येक ओळीमध्ये एक गर्भित अर्थ असलेले काव्य असं मला जाणवलं. त्यांचे शब्द व शब्दांचे भाव हे खरोखर संगीताला व गाण्याला साजेसे आहेत असे मला वाटते. नयनाच्या लिखाणामध्ये एक विचार मला आढळला. कधी सामाजिक तर कधी क्षितिजाच्या पल्याड पाहणारी एक कवियत्री, कधी स्त्रियांच्या भावना चपखल मांडणारी तर कधी परकाया प्रवेश करून पुरुषांच्या मनाचा सुद्धा वेध घेणारे शब्द. प्रत्येक शब्दाचे अर्थ व मूल्य वेगळेच. काही शब्द इतके सुंदर की जणू काही शब्दांमध्येच चाल सुचलेली… प्रसंगी त्यामध्ये त्याला बांधायचं आणि गायचं इतकच शिल्लक होतं तर काही काव्य हे मात्र वाचल्यानंतर हे असंच असायला हवं असं वाटणार… मनाने अत्यंत मिश्किल परंतु अत्यंत शिस्तबद्ध… शब्दांच्या पक्या आणि स्वतःच्या विचारांचा एक मोठा विचार स्तंभ म्हणजे नयना निगळ्ये व त्यांची प्रतिभा आहे. त्यांच्या गाण्यांना व कवितांना चाली लावताना व गाताना एक आत्मिक आनंद झाला.”
७. पंडित शैलेश भागवत, सनई वादक :

“कवियत्री बालपणापासूनच कवि मनाच्या आहेत असे त्यांच्या प्रत्येक काव्यातून प्रतिबिंबित होते. त्यांचे प्रत्येक काव्य रोजच्या रोज सर्वसामान्यांच्या अनुभवातून तसेच प्रत्येकाच्या मनातील घालमेल, उत्साह, आनंद, प्रेम, विरह, चिडचिड असे सर्व भाव आणि अनुभव अत्यंत वास्तववादी वाटतात. अमेरिकेसारख्या प्रगत देशातील व्यस्त आणि गतिमान दिनचर्येत सुद्धा त्यांनी त्यांची ही स्फूर्ती जिवंत ठेवून भावनांना छान वाट करून दिली आहे.”
“ओल्या राती” चे मनमोहक सूर अनुभवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा….
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
— टीम एन एस टी. ☎️ +919869484800
Thank you Alka Tai and Devendra ji 🙏🙏
सुगंध उत्तम आहे
Thank you 🙏