“हुंदके सामाजिक वेदनेचे”
महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणूनच नाही तर भटक्या विमुक्तांच्या सामाजिक चळवळीतील एक लेखक, कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री राजाराम गो. जाधव सरांचा “हुंदके सामाजिक वेदनेचे” हा ग्रंथ वाचण्यात आला. या ग्रंथावर समीक्षा करावी ही जाधव सरांची इच्छा होतीच. नाही तरी राजाराम जाधव सरांचे मी नोकरीत असल्यापासून एक वेगळे प्रेम माझ्यावर होते. माझ्या नोकरीच्या कार्यकाळात ज्या काही अडचणी आल्या त्यामध्ये एक उपसचिव म्हणून ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. राजकीय हस्तक्षेपामुळे अनेकदा माझ्यावर संकट कोसळले पण राजाराम जाधव सरांनी त्या राजकीय अस्तित्वाची परवा न करता ते थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सामंजस्यपणाने माझी सत्य परिस्थिती त्यांच्या समोर कणखरपणे मांडली हा इतिहास मोठा आहे.
गोर बंजारा समाज म्हणजे भटका विमुक्त! वाचनाची कुठलीही परंपरा नसताना लाख खिंड सारख्या लहानशा खेड्यामध्ये राजाराम जाधव सर पदवीधर झाले. बहुदा त्या परिसरातील ते पहिले पदवीधर होते. आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये पुसदच्या एस टी कॅन्टीनमध्ये कपबश्या धुवून त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आणि महाराष्ट्र शासनाच्या जॉईंट सेक्रेटरी (सहसचिव) पर्यंत मजल मारली.
“हुंदके सामाजिक वेदनेचे” ह्या ग्रंथात राजाराम जाधव यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात भेटलेली माणसे, समाजातील वंचित, कौटुंबिक कारणामुळे वैफल्यग्रस्त झालेली माणसे वाचली आणि ती त्यांनी या ग्रंथामध्ये शब्दबद्ध केलेली आहेत.
खरंतर शिकून नोकरी करणारी माणसं आज अवतीभवती बरीच भेटतात. पण नोकरी करत असताना गोरगरीब लोकांच्या व्यथा आणि वेदना समजून घेऊन त्यांना मदत करणारा अधिकारी शोधूनही सापडत नाही. लेखक राजाराम जाधव सरांचे साहित्यातील योगदान मोठे आहे. सन २००४ साली त्यांचा पहिला कविता संग्रह “वादळ वारा ” प्रकाशित झाला. त्यानंतर २००५ साली “वाळवंटातील संधी प्रकाश”, २०२१ मध्ये “अंधार यात्रेचे स्वप्न ” आणि “अजिंक्यवीर” अशीही दोन पुस्तके प्रकाशित झाली आणि गोर साहित्यामध्ये या दोन्ही पुस्तकांनी खळबळ उडून दिलेली आहे.
“अजिंक्यवीर” हा ग्रंथ म्हणजे लेखकाच्या शासकीय सेवा काळातील आलेले अनुभव आणि आठवणीचा लेखाजोखा आहे. मंत्रालयात एका जबाबदारीच्या पदावर असताना त्यांनी कर्तव्यदक्ष आणि कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून काम करताना प्रसंगी कोणत्याही मंत्र्याची मुरवत न करता केलेल्या कार्याची उजळणीच म्हणावी लागेल! शासन सेवेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना हा ग्रंथ निश्चितच प्रेरणा देतो.
त्यानंतर २०२३ साली शैक्षणिक आणि सामाजिक विषयावरील वैचारिक बदलावरील “चंद्रकला” कादंबरीचे प्रकाशन झाले. एकूण ६ ग्रंथ लेखक राजाराम जाधव सरांच्या नावावरती असून त्यांचे आजही अविरत लेखन सुरू आहे. नेपाळच्या साहित्य संमेलनामध्ये त्यांना समाजभूषण लेखक व साहित्य पुरस्कार मिळालेला आहे.
२०२१ मध्ये त्यांचा आलेला “अंधार यात्रेचे स्वप्न” या ग्रंथाने गोर बंजारा साहित्यात वाचकांना भुरळ घातली. कुठल्याही साहित्यिकाच्या साहित्य लेखनाची प्रेरणा ही आईच असते. परंतु लेखक राजाराम जाधव सरांच्या लेखनाची परंपरा त्यांचे वडील गोबराबापु जाधव यांच्याकडून मिळाल्याचे दिसते. कारण गोबराबापू जाधव हे धार्मिक वृत्तीचे, पूजा पाठ करणारे. हा वारसा लेखक राजाराम जाधव सरांकडे आला परंतु महानायक वसंतराव नाईक साहेबांच्या विचाराने ते प्रेरित होऊन ते परिवर्तनवादी विचाराकडे वळले आणि भटक्या विमुक्तांच्या व्यथा-वेदना त्यांनी आपल्या लिखाणाच्या द्वारे शब्दबद्ध केलेल्या आहेत.
दैनिक विदर्भ मतदार असो की, दैनिक देशोन्नती, दैनिक लोकमत असो की, दैनिक सकाळ आणि साप्ताहिक बंजारा पुकार या वृत्तपत्रामधून त्यांचे भरपूर लेखन झालेले आहेत. आणि त्या लेखनामधील काही लेखांचा संग्रह करून त्यांनी “हुंदके सामाजिक वेदनेचे” हा सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे. हे पुस्तक डिसेंबर २०२३ मध्ये प्रकाशित झालेले असून सदर पुस्तक सौ. अलका देवेंद्र भुजबळ, प्रकशिका न्यूज स्टोरी टुडे मुंबई यांनी प्रकाशित केला आहे. पुस्तकाचे सुंदर मुखपृष्ठ पवन रामचंद्र जाधव यांनी तयार केलेले आहे.
या पुस्तकामध्ये एकूण बारा प्रकरणे असून त्यामध्ये मी परिस्थिती चोरली, माझे रक्तापलीकडले नाते, लढाई अस्तित्वाची, समाज उद्धाराची पंचशील तत्वे, समाज स्वास्थ्याबरोबरच आपली मानसिकता बदलण्याची गरज, विमुक्त-भटक्यांच्या न्यायालयीन लढाईतील एक वास्तववादी लेखाजोखा, आपल्या महासंघाच्या वाटचालीबद्दल वाचा विचार करा आणि सामील व्हा!, सामाजिक एकता व जनजागृतीसाठी युवक महोत्सव कार्यक्रमाची आवश्यकता! बारा बलुतेदारीतून वगळलेले विमुक्त भटके आणि बंजारा समाज!, सफर जिंदगी का!, विमुक्त दिनाच्या निमित्ताने: एक सामाजिक विचार- कटूसत्य, हुंदके सामाजिक वेदनेचे असे एकापेक्षा एक दर्जेदार प्रकरण या पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे.
वैचारिक लेखन आवडणाऱ्या वाचकांना निश्चितच आवडणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकातून लेखकांनी समाजातील अनेक व्यक्तीचे संदर्भ घेऊन त्यांच्या व्यथा-वेदना वाचकाच्या समोर मांडण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. यामध्ये लेखकाचे आई-वडील,भावंड, शाळेतील शिक्षक, महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी आणि काही भेटलेली महत्त्वाची मंडळी, वर्गमित्र सवंगडी या सर्वांसोबत जुळलेल्या कौटुंबिक मैत्री संबंधातून जे काही लेखकाला शिकायला मिळाले ते रक्ताच्या नात्यापलीकडचे नातेसंबंध असल्याचे लेखकांनी यामध्ये आवर्जून उल्लेख केलेला आहे. आणि या सर्वांची जीवन स्टोरी शब्दबद्ध करून मराठी साहित्यात लेखकाने एका चांगल्या ग्रंथाची भर टाकलेली आहे. हा ग्रंथ वाचताना पानोपानी माणुसकीचा ओलावा तर दिसतोच परंतु शाहू- फुले- आंबेडकरांच्या आणि महानायक वसंतराव नाईकसाहेबांच्या परिवर्तनवादी विचाराचा विचार करण्याचे भान देतो.
या ग्रंथातील लेख हे केवळ मनोरंजन म्हणून नाही तर ते वास्तव्यवादी आपल्या खास शैलीतून शब्दबद्ध केलेला अनमोल ठेवा आहे. विविध संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यालयामध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गांना हा ग्रंथ निश्चितच आपले कार्यालयीन काम नियमबद्ध करण्यासाठी प्रेरणा दिल्याशिवाय राहत नाही.
“हुंदके सामाजिक वेदनेचे” या पुस्तकाचा आत्मा जर असेल तर ते विमुक्त भटक्यांच्या न्यायालयीन लढाईतील एक वास्तववादी लेखाजोखा हे प्रकरण आहे. खरच लेखकाने मागासवर्गीय प्रवर्गातील पदोन्नतीला मिळालेल्या स्थगितीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी अनेक अधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जो लढा दिलेला आहे. त्याला तोड नाही. त्या लढ्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागेल. मा. सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानात्मक लढ्याची ही संघर्ष कहानी पाहूया !
महाराष्ट्र शासनाच्या २००१ च्या कायद्यानुसार मागासवर्गीयांना सर्व स्तरावरील वर्ग एक मध्ये पदोन्नती देण्याचा निर्णय घेऊन त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने ५ मे २००४ रोजी निर्गमित केले होते आणि २००६ पर्यंत मागासवर्गीय संवर्गातील सर्व स्तरातील पदोन्नत्या सुरळीतपणे चालू होत्या. मागासवर्गीय लोकांना वर्ग एक मध्ये पदोन्नती देण्याच्या शासन निर्णयामुळे प्रस्थापित समाजाच्या अधिकाऱ्यांना प्रचंड धक्का बसला. आणि त्यांना मनोमन वाटू लागले की, मागासवर्गीय अधिकाऱ्याच्या हाताखाली आपल्याला काम करावे लागेल ही अपमानजनक बाब त्यांच्या मनात घर करू लागली. त्यामुळे शासनाने पदोन्नतीसाठी निर्गमित केलेला आदेश आणि शासनाचा मूळ कायदा २००१ ला मा. उच्च न्यायालयामध्ये याचिका क्रमांक ८४५२/२००६ च्या माध्यमातून श्री. विजय घोगरे ( अभियंता) यांनी महाराष्ट्र शासनाला आव्हान दिले आणि मा. उच्च न्यायालयाने ५ मे २००४ रोजी निर्गमित केलेल्या आदेशाला ९ मार्च २००७ रोजी पुढील निर्णय होईपर्यंत स्थगिती दिली.मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २८ मार्च २०१८ रोजी महासंघाच्या बाजूने महत्त्वपूर्ण आणि न्यायपूर्ण निर्णय देऊन पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला. ह्या सर्व न्यायालयीन लढयाचे श्रेय महासंघाचे अधिकारी लेखक मा. राजाराम गो. जाधव सर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती हे विसरून चालता येणार नाही.
हुंदके सामाजिक वेदनेचे हा ग्रंथ तमाम इतिहास संशोधक विविध संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि आरक्षण चळवळीत काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना उपयुक्त ठरणारा आणि प्रेरणा देणारा आहे.
शेवटी लेखक राजाराम गो. जाधव सरांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो !
— परीक्षण : याडीकार पंजाबराव चव्हाण
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना अन्य सामाजिक साहचर्यात समाविष्ट करणे मोठी समस्या आहे. जो समाज घर, शेती करून एकाजागी राहायला लागतो. त्या समाजातील समस्या आहेत. पण फिरते जीवन काढत पालातून राहून कधी जंगलात तर कधी वाळवंटात, नैसर्गिक आपत्तीच्या झळा झेलत. आपल्या कडील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची चाऱ्याची सोय करून देणे, शारीरिक कसरती, लांब वरच्या मालवाहतूकीतून कष्टमय जीवन यापन करणारे मुख्य समाज धारेत येताना प्रस्थापितांचा मोठा अडसर आहे. जाधव सरांचा जीवन संघर्ष यामुळे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यांच्या जीवनकार्याचा परिचय अतिशय हृद्य आहे.