गुलबक्षी
‘गुलबक्षी’ ………. तिन्हीसांज अन संथ सुरू होणारी रात्र या दरम्याने फुलणारी नाजुक, गोंडस विलोभनीय फुलं म्हणजेच गुलबक्षी ! सायंसमयी ऊमलेलेलं सोनं म्हणजे गुलबक्षी. कोकणात तर या फुलांचे फुलाफुलातच विणलेले गजरे महिला केशसंभारावर अत्यंत दिमाखाने मिरवतात ती गुलबक्षी नाजुकतेचा एक सुंदर नमुना …………
मुळातच कवयित्री सौ. मनीषा ताम्हणे यांच्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे शिर्षकच ‘गुलबक्षी’ आहे. सायंसमयीच्या निवांत वेळी फुलणारं, बहरणारं अन नजरेत भरणारं आहे याची चुणुक छान बांधणी असलेल्या मुखपृष्ठावरील कळ्या अन उमलून आलेलं गुलबक्षीचं फूल यानी वेधून घेतलं. सदोदित वर्षाचे बाराही महिने फुले देणारे ते ‘गुलबक्षी’, कुणीतरी किती छान लिहिले आहे ……..
‘आयुष्या रे तुझी किती करावी मनधरणी
निसटून जाशी हातून तरीही असा क्षणोक्षणी
कधी गावे गाणे होऊन मखमली पक्षी
कधी रिझवावे तुला होऊन नभ गुलबक्षी’
सायंसमयी फुलणारी अनेक फुले आहेत, काही गंधानी मोहित करणारी तर काही रंगानी, रंगाची नजाकत तर गुलबक्षीसारखी दुसऱ्या फुलांत क्वचितच. गुलबक्षी हे शिर्षक आवडण्याजोगेच आहे.
पाककलेमध्ये निपुणता प्राप्त करणाऱ्या मनीषाताई जशा रूचकर, बक्षिसपात्र पदार्थ करण्यात माहिर आहेत किंबहुना त्याहून जास्त तितक्याच नजाकतीने काव्यरचना करण्यात ही माहिर आहेत, ‘गुलबक्षी’ वाचताना हे जाणवते म्हणून कौतुक. काव्यलेखनाची नेमस्त कला त्या जोपासून आहेत, विविध काव्य प्रकारात म्हणजेच शेलकाव्य, हायकू, गझल, गवळण, अभंग, आरती, लावणी, तांका, बालकविता, भावगीत, निसर्ग कविता इतक्या साऱ्या काव्य प्रकारांना त्यांनी सहजपणे हाताळले आहे, हे त्यांचे कौशल्यच. फक्त सायंसमयी फुलणाऱ्या गुलबक्षीसारखी नाही तर फुलून फुलारून अनेक दिवस ताजातवाना रहाणाऱ्या ‘डबल डिलाईट’ गुलाबासारख्या त्यांच्या कविता आहेत.
सर्वसाधारणपणे कविता संग्रहाच्या शिर्षकाची कविता त्यात अंतर्भुत असते ही आपली कल्पना. परंतु त्यांच्या पन्नास कवितां मध्ये मला गुलबक्षी सापडली ती,
‘जाहली तिन्हीसांज’ या कवितेत……….
‘गुलबक्षीच्या फुलांचे रंग
मनावर उमटवती तरंग
दरवळे मोगऱ्याचा सुवास
होई माहेरचा भास’
प्रत्येक स्त्रीला माहेरचा भास होणारी गुलबक्षी अशी आहे. तर जन्माला आल्यापासूनच…
‘चौकटीत जगायची सवय लागली
पुढे पुढे जाता जाता,
ही चौकटच सारं आयुष्य बनली’
किती प्रांजळपणे त्यांनी हे वास्तव मांडले आहे, म्हणून नवल वाटते. चौकटीतलं आयुष्य बरेच जण जगत असतात पण उघडपणे हे सत्य सांगणे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तसेच ‘स्वैर वागणे टाळून मर्यादेच्या चौकटीत रहावे’ हा गुरुमंत्रही देतात यातून त्यांचे जागृत समाजभान दिसून येते.
आत्तापर्यंत त्यांच्या कविता वेगवेगळ्या पाच प्रातिनिधीक काव्य संग्रहातून रसिक वाचकांच्या भेटीला आल्या आहेत परंतु, “गुलबक्षी” हा मनीषाताईंचा पहिलाच स्वतंत्र काव्यसंग्रह आहे, या त्यांच्या पहिल्या पावलाचे अभिनंदन जरूर करायलाच हवे. आपल्या मनांत ओसंडून वाहणारे प्रगल्भ साहित्य, वाचक प्रेमीजनांपर्यंत पोहचविणे हे महत्वाचे असतेच.
मनीषाताई शास्त्रीय संगीताचा पाठ गिरवत आहेत. त्यांच्या चार परिक्षा झाल्या असून आणखी काही परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर ‘संगीत विषारद’ होणार आहेत. सूर, ताल शब्द यांचा आरोही – अवरोही ताळमेळ त्या ओळखून, जोखून आहेत हे त्यांच्या काही कवितांमधून उद्धृत होताना दिसते. शब्दांना सुरांची साथ लाभली की एखादे वा अनेक गीतं निर्माण होतात, त्यांच्या कवितांची अशीच लयबद्ध गाणी भविष्यात आपल्याला ऐकायला मिळोत ही मनोकामना. पाककला, गायन कला, लेखन कला असं चतुरस्र व्यक्तिमत्व म्हणजे मनीषा ताई.
‘नको वाटतो विरह कशासाठी त्या यातना
धुंद करणारे क्षण सोसवेना तो दुरावा’
किती चपखल नाजुक प्रेमभावना व्यक्त केल्या आहेत बरं. संसार या त्यांच्या अभंगात….
‘प्रेमळ भांडण । भावना दोघांच्या
स्वप्नाळू डोळ्यांच्या । जाणिवांच्या ।।
असावा एकोपा । आदर करावा
संशय नसावा । संसारात ॥
किती महत्वाचं विषद केलंय हे !
‘सदाफुली सारखे बहरायचे, हेच जीवनतत्व असावे’ त्यांच्या चिरंतन विचारातून हे प्रकट होते, हे ही महत्वाचे.
रखरखत्या उन्हात ताम्हणांची फिकट निळी फुले नजरेला एक वेगळाच आनंद देतात तव्दतच सौ. मनीषा ताम्हणे यांचा ‘शॉपिजन’ने प्रकाशित केलेला ‘गुलबक्षी’ काव्यसंग्रह वाचताना मनाला आनंद होतो. सन्माननीय गझलकार सुरेश भट त्यांच्या एका गझलेत म्हणतात……..
‘येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो
अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही’
या उक्तीप्रमाणे मनीषाताईंची काव्य क्षेत्रातील पाऊले यशोमंदिराकडे पोचावीत, नवनवे काव्यसंग्रह त्यांच्या लेखणीतून झरत रहावेत, स्वतःच्या पाऊलखुणा उमटवत इतरांसाठी तो मार्गदर्शक ठसा कायम ठेवावा, ही स्वामीचरणी प्रार्थना.
— परीक्षण : सुनील चिटणीस. पनवेल
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
गुलबक्षी कविता संग्रह
बक्षीस देऊन जाईल
मनिषा ताईंना
असे हे सुंदर परिक्षण सुनील चिटणीस सरांनी केले आहे.
गोविंद पाटील जळगाव.
मनीषा ताम्हणे यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहाचं “गुलबक्षी”चं सुनील चिटणीस यांनी केलेल रसग्रहण अतिशय उत्कट आहे. रसाळ आहे. कवितासंग्रह वाचण्याची उत्कंठा वाढवणारं आहे. काव्य लेखन हा साहित्य प्रकार एकूण
कठीणच! पण मनीषा हा काव्यप्रकार अत्यंत कौशल्याने हाताळते. मनीषा तुझी पाककला, अलीकडेच कळलेली गायनकला आणि काव्य कला या सर्वांसाठी तुझे अभिनंदन आणि अभिमान सुद्धा!