शिक्षण क्षेत्रातील एक झळाळतं व्यक्तिमत्त्व, विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या भवितव्याचा ध्यास घेत संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वाहून घेतलेले, माननीय आमदार ज. मो. अभ्यंकर सर यांचा १६ एप्रिल रोजी वाढदिवस! या निमित्ताने त्यांच्या सुसंस्कारित, प्रामाणिक आणि ध्येयवेड्या वाटचालीला मन:पूर्वक सलाम! तसेच न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
ज.मो. अभ्यंकर सर स्वतः हाडाचे शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक होते. स्पर्धा परीक्षेतून पुढे शिक्षणाधिकारी, उपसंचालक, शिक्षण विभागात अवर सचिव आणि दहावी – बारावीच्या बोर्डाचे अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी शिक्षण प्रशासनात एक नवा आदर्श निर्माण केला. मायनॉरिटी आणि एससी-एसटी कमिशनच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी तेवढ्याच समर्थपणे त्यांनी निभावली.
अभ्यंकर सरांनी तब्बल पन्नास वर्षाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात निरंतर कार्य केले आहे आणि अजूनही करीत आहेत. सन २००८ साली सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा शिक्षणप्रेमाचा ध्यास कमी झाला नाही. सन २०१० पासून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभर कार्यकारिणीचा विस्तार केला. अनेक रस्त्यावरच्या लढाया लढल्या. विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान मिळावे यासाठी शेकडो किलोमीटरची पायी दिंडी केली. हा निरंतर, खडतर प्रवास त्यांचा एकट्याचा नव्हता तर त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षणवेड्या कार्यकर्त्यांचा होता.
सर स्वभावने मृदू व मिश्किल आहेत. बेशिस्तपणा मात्र त्यांना अजिबात खपत नाही. नम्रता, प्रामाणिकपणा व सचोटीने वागणे ही त्यांची खरी ओळख. सरकारी सेवेत असतानाही सुट्ट्यांमध्ये, सणांच्या दिवशी स्वतः कार्यालय उघडून महत्त्वाच्या फायलींचा निपटारा ते करत. शिक्षणाधिकारी असताना त्यांनी शाळांमध्ये सहशालेय उपक्रम सुरुवात केले. शाळाबाह्य मुली शाळेत परत याव्यात यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. दहावी- बारावीच्या परीक्षेमध्ये राबवलेली बारकोड योजना मैलाचा दगड ठरलेली आहे. शिक्षक – शिक्षकेतरांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी कॅम्पचे आयोजन त्यांनी सुरू केले व कॅम्प मध्येच मान्यता देण्याची सुरुवात केली. असे अनेक हरहुन्नरी उपक्रम त्यांनी आपल्या कार्यकाळात राबवले. प्रशासनातील अधिकाऱ्याला त्याच्या उत्कृष्ट कामासाठी दोन वेतनवाढी मिळणे ही दुर्लभ गोष्ट ही त्यांना प्राप्त झालेली आहे.
मुंबई विभागातून सर विधान परिषदेवर शिक्षक आमदार म्हणून निवडून येणे ही त्यांच्या कामाची शिक्षकांनी दिलेली पावतीच होती. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील अठरा वर्षांची निकालाची परंपरा मोडून त्यांनी मिळवलेला विजय हा शिक्षकांच्या मनातील खंबीर विश्वासाचा परिपाक होता. शिक्षण क्षेत्रातील कायदे, नियमावली, परिपत्रके यांचा गाढा असा अभ्यास आहे. शालेय शिक्षण कायद्यातील अनेक तरतुदी, परिपत्रके तारखेसहित त्यांना मुखोद्गत आहेत.
निरपेक्ष वृत्तीने व सचोटीने शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामामुळे सरांची प्रशासनावर पकड आहे. त्यामुळे अधिकारी नियमातील कामाला नाही म्हणू शकत नाही. वावगं काम ते कधीच कोणाला सांगत नाहीत, स्वतः करितही नाहीत.
तासन तास बसून शिक्षकांचे प्रश्न ऐकणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, योग्य त्या ठिकाणी तात्काळ फोन करून प्रश्न सोडवण्यास मदत करणं ही त्यांची खासियत आहे. त्यांच्याजवळ आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून, प्रामाणिकपणे मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यासाठी ते शंभर टक्के प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या जवळ न्याय मागण्यासाठी आलेली कोणतीही व्यक्ती ही त्यांच्या प्रेमातच पडते.
सुट्टीच्या दिवशी, सणाच्या दिवशीही सर शिक्षकांच्या समस्या ऐकण्यासाठी ऑफिसमध्ये हजर असतात. हे सोपं काम नाही. निवडून आल्यानंतर त्यांनी एकही दिवस रजा घेतलेली नाही. पायाचा आजार प्रचंड बळावलेला असतानाही ते ऑफिसमध्ये उपचार घेता घेता सुनावणी करत होते. हे त्यांच्या समर्पणाचे उदाहरण आहे. शाळांना भेटी देणे, शिक्षकांच्या समस्या ऐकून घेणे हे ते नियमित करत असतात. त्यामुळे शिक्षणातील तयार होणारे नवीन प्रश्न त्यांना तात्काळ कळतात.

सराना कार्यकर्त्यांची उत्तम जाण आहे. यांच्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याची क्षमता आहे. गंभीर वातावरणही हलकं फुलकं ठेवण्याची ताकद त्यांच्यात आहे. कोणत्याही कार्यक्रमाचं, निवडणुकीचे ते अत्यंत सूक्ष्म संयोजन करतात. जबाबदाऱ्या वाटून देतात. सूक्ष्म निरीक्षण शक्ती ही त्यांचं वैशिष्ट्य आहे. चुकलेल्या व्यक्तीला सुधारण्याची संधी द्यायला हवी अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे यशस्वीता त्यांनी नेहमीच अनुभवलेली आहे. त्यामुळे त्यांचा सहवास हा नेहमीच कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा असतो.
अनेक संस्थाचालक, मुख्याध्यापक यांच्याशी सरांचे सलोख्याचे संबंध असूनही चुकीच्या ठिकाणी आरसा दाखवण्याची ताकद व नैतिकता त्यांच्यात आहे. सतत कार्यरत राहणे हा त्यांचा स्थायीभाव आहे.
राज्यातील शिक्षणाला पहिल्यांदा इतका तज्ञ, कार्यप्रवण व शिक्षणात रुची असणारा व शिक्षणातलं कळणारा आमदार मिळालेला आहे. याचा फायदा राज्यातील शिक्षणाला नक्कीच होणार आहे.
शिवसेना या पक्षाशी त्यांची निष्ठा कायम राहिली असून, पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, आदित्यजी ठाकरे, शिवसेना नेते सुभाषजी देसाई व खासदार विनायकजी राऊत यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेक पक्षीय जबाबदाऱ्याही ते अत्यंत जबाबदारीने पार पाडत आहेत. लोकसभा, विधानसभेला संपूर्ण शिक्षक सेनेला त्यांनी कार्यरत केले होते. अनेक शैक्षणिक संस्थांचे सल्लागार म्हणून त्यांचा सल्ला आजही मार्गदर्शक ठरतो. अशा पन्नास वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये अविरत काम करणाऱ्या शिक्षण महर्षीचा सहवास माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना लाभला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनात अनेक ताकदीचे नवीन कार्यकर्ते तयार होत आहेत. संघटनेप्रति, आपल्या पक्षाप्रति, आपल्या कार्यकर्त्यांप्रति इतकी संवेदनशीलता क्वचित पाहायला मिळते, ती अभ्यंकर सरांमध्ये ओतप्रत भरलेली आहे. त्यांच्या कार्याचा अमृत महोत्सव सुरु असतानाच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना मन:पूर्वक अभिवादन करतो.
माननीय आमदार ज. मो. अभ्यंकर सर, आपल्यासारखी व्यक्तिमत्त्वे शिक्षण क्षेत्राला दिशा देतात. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड प्रेरणादायी कार्यासाठी अनंत शुभेच्छा !

— लेखन : जालिंदर सरोदे. कार्याध्यक्ष, शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अभ्यंकर सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.