मराठी पाठ्य पुस्तकातील “वन्स मोअर” या इंग्रजी शब्दाला आक्षेप घेण्यात गैर काहीच नाही. पण अनेक इंग्रजी शब्द हा आपल्या भाषेचा, जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत हे आपण विसरतो.
स्वा. सावरकर किंवा पु भा भावे यांच्या सारख्या विद्वानांनी मराठी शब्दाचा आग्रह धरला त्या काळात स्वा. सावरकरांनी तर अनेक मराठी प्रतिशब्द सुचवले इंग्रजी शब्दांना. पण आजही स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस, टेबल, पेन, प्लॅटफॉर्म, यांना प्रतिशब्द का वापरले जात नाहीत ?
आजकाल मराठी वृत्त वाहिन्यांवर तर सर्रास इंग्रजी शब्द वापरले जातात. ब्रेकिंग न्यूज, हेड लाइन्स, मॉर्निंग न्यूज, टी टाईम अशी अनेक उदाहरणे देता येतील. बातम्या दाखवताना खाली ज्या सरकत्या ओळी दाखवतात त्यातले मराठी तर हास्यास्पद असते. त्यात शुध्द लेखनाच्या, व्याकरणाच्या अनेक चुका असतात. ते तेथील विद्वान संपादकाच्या कसे लक्षात येत नाही ? सुजाण मराठी भाषा प्रेमी त्यावर आक्षेप का घेत नाहीत ? मराठीचे आकडे लिहिणे सहज शक्य असूनही सर्व संख्या इंग्रजीतच असतात.
अनेक मराठी चित्रपटाची, नाटकाची, कथांची नावे इंग्रजी असतात. ते आपण सहज खपवून घेतो. साहित्यात देखील अनेक इंग्रजी शब्द सहज वापरले जातात. तंत्रज्ञानाने नवी उपकरणे रोजच्या व्यवहारात आलीत. सोशल मीडिया ची भाषा तर विचारायलाच नको. तिथे शब्दाऐवजी चित्रे, इमोजी ही नवी सांकेतिक भाषा सहज वापरली जाते.
संगणक प्रणाली वापरताना जे इंग्रजी शब्द उपयोगात येतात (उदा. डिलीट, कट, पेस्ट, कॉपी, मेल, मेसेज) ते आपल्या व्यवहारी लेखी बोलीचा भाग झाले आहेत.यू ट्यूब वर जावेद अख्तर यांची हिंदी, उर्दू भाषे संबंधी एक मुलाखत पाहिली. त्यात ते हिंदीचा एक परिच्छेद वाचून दाखवतात. वरवर बघता हिंदीतल्या या परिच्छेदात चक्क दहा बारा देशी परदेशी भाषेचे शब्द असल्याचे जावेद सोदाहरण समजावून सांगतात !
इतर भाषेतील शब्द आयात केल्याने भाषेचे नुकसान न होता ती समृद्ध होत जाते. एक मात्र खरे, लिहिताना, बोलताना भाषेचे विदृपीकरण होणार नाही याची दक्षता घेणे तितकेच गरजेचे असते. प्रमाण भाषा, बोली भाषा, साहित्यिक भाषा, प्रबंधाची भाषा व्यावसायिक (कोर्टाची भाषा) यातील फरक लक्षात घेणे गरजेचे आहे.
सरकारी परिपत्रकाची भाषा देखील वेगळी असते. कविता, गजल यात तर व्याकरणाच्या नियमांना, प्रमाण भाषेच्या आकृती बंधाला झुगारले असते. ते कृतीनुसार क्षम्य देखील मानले जाते !
आजकाल शाळेतल्या मुलांची भाषा, नंतर कॉलेजच्या तरुणाची भाषा, पुढे कार्यालयातील, कॉर्पोरेट जगातील, आय टी सेक्टर मधील वेगळीच भाषा हे सारे आपण गृहीत धरायला हवे. अगदी शिव्या देताना सुध्धा रागाच्या भरात माणसे जे बोलतात, जे घाणेरडे शब्द वापरतात, ते बोलणाऱ्याला शब्दशः अपेक्षित नसते. तो वाईट सवयीचा भाग असतो.
भाषेतून प्रभावीपणे व्यक्त होणे हे जास्त महत्वाचे.याचा अर्थ भाषेचा चुकीचा वापर केव्हाही अक्षम्यच. अर्थात शुध्द भाषा म्हणजे नेमके काय याची नव्याने व्याख्या करणे देखील आता गरजेचे आहे.
आपल्या देशात तर काही कोसावर भाषा बदलत जाते. ग्रामीण, नागरी, शहरी अशी भाषेची रुपांतरे काळाच्या ओघात होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे काही अप्रिय गोष्टी देखील स्वीकाराव्या लागतात. ते करताना भाषेचे मूळ पावित्र्य, सौंदर्य राखले जावे ही अपेक्षा देखील गैर म्हणता येणार नाही ! आपली अभिव्यक्ती अधिकाधिक प्रभावी, अर्थपूर्ण व्हावी असे वाटत असेल तर एकापेक्षा जास्त भाषा बोलता लिहिता येणे ही भविष्याची गरज आहे.या अभ्यासाने भाषेत योग्य काय अयोग्य काय हे आपले आपल्याला समजत जाते.
— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे.
माजी कुलगुरू, हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800