Wednesday, April 23, 2025
Homeबातम्यामराठीस नोबेल पुरस्कार मिळावा - देवेंद्र भुजबळ.

मराठीस नोबेल पुरस्कार मिळावा – देवेंद्र भुजबळ.

बरोब्बर ६ वर्षांपूर्वी नवी मुंबईत झालेल्या साळी समाजाच्या साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केलेले विचार, कार्यक्रम वृत्तांत फेस बुक च्या सौजन्याने पुढे देत आहे. आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.
— संपादक

जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी मिळणारा नोबेल पुरस्कार मराठी साहित्यिकास मिळण्याची आपली आकांक्षा असली पाहिजे, अशी अपेक्षा माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केली. नवी मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय स्वकुळ साळी मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक, संपादक श्री संजय आवटी होते.

साळी समाजातील साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा, अशा या संमेलनात व्यक्त करण्यात आलेल्या भावनेचा धागा पकडून श्री भुजबळ पुढे म्हणाले, आपली स्वप्नं संकुचित न ठेवता ती वैश्विक असली पाहिजे. म्हणून आजपर्यंत मराठी साहित्यिकास न मिळालेला साहित्यातील जागतिक स्तरावर सर्वोच्च समजला जाणारा नोबेल पुरस्कार मिळण्याची आपली आकांक्षा असली पाहिजे. केवळ साहित्यच नव्हे तर कुठलीही कलाकृती ही वैश्विक असली पाहिजे असं जरी मानलं जात असलं तरी, कुठल्याही थोर कलाकृतीचा उगम हा आपल्या मातीतून, मुळातून होत असतो, हे विसरून चालणार नाही.

म्हणूनच एकीकडे शंभर वर्षांची परंपरा लाभलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरत असताना प्रदेशनिहाय, समाजनिहाय, वेगवेगळ्या विचारसरणीनुसार आयोजित होणारी साहित्य संमेलनं महत्वाची ठरतात. समाजातील विविध घटकांना व्यक्त होण्याचं संमेलन हे माध्यम असून समाजात, साहित्यात निर्माण होत असलेले नवनवे हुंकार दाबून दबणार नाहीत, तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. महाराष्ट्रात चाळीस ते पन्नास साहित्य संमेलनं होत असावीत, असा अंदाज व्यक्त करून श्री भुजबळ यांनी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या समाज घटकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच आपली परंपरा, वैशिष्टय जपण्याचं महत्व अधोरेखित केलं.

अध्यक्षपदावरून बोलताना श्री आवटी यांनी उपस्थितांना कधी हसवत तर कधी अंतर्मुख करत परखडपणे आपली मतं व्यक्त केली.

महाराष्ट्र स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष डॉ. अशोक दांडेकर यांनी स्वागत तर श्री विजय वैद्य यांनी आभार प्रदर्शन केलं.

यावेळी व्यासपीठावर सर्वश्री अविनाश साळी,आदिनाथ हरवंदे, चंद्रशेखर बारगजे, सदाशिव चिंचकर, संजय सरोदे, अश्विनी मते, संगिता अरगुणे आदी उपस्थित होते.

संमेलन यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

दोन दिवस चाललेल्या या संमेलनात ग्रंथदिंडी, निमंत्रितांचं कवी संमेलन, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक मुशाफिरी असे विविध उपक्रम झाले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. भुजबळ सर,मराठी भाषेला आता अभिजात दर्जा प्राप्त झालेला असल्याने, तुम्ही पाच-सहा वर्षांपूर्वी संमेलनात केलेली “मराठी भाषेला नोबेल पुरस्कार मिळालाच पाहिजे” ही मागणी आता अधिकच रास्त ठरते, वास्तव वाटते. “अब दिल्ली दूर नहीं!”, तसेच आता नोबेल पुरस्कार दूर राहू नये! काळजी वाटते ती एवढीच की सोशल मिडियावर बोकाळलेले मराठी साहित्य आपला दर्जा सुधारवण्याऐवजी काही वेळा अर्थशून्य, गुणशून्य होत चालले आहे. अनेक लेखक सवंग लोकप्रियतेसाठी लिहिताना दिसतात, त्यांच्या अतिउत्साहाला लगाम घालून, उत्तम दर्जाचे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचेल अशी खबरदारी तुमच्यासारख्या समाजमाध्यमांनी घ्यायला हवी, तरच आमच्यासारख्या रसिक वाचकांना दर्जेदार साहित्य वाचायला उपलब्ध होईल आणि त्या साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार मिळवण्याची क्षमता असेल. तुमचे हार्दिक अभिनंदन. 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता