परिचारिका म्हटले की, आपल्या डोळ्यापुढे लगेच एखादे रुग्णालय आणि रुग्णाजवळ त्याला प्रेमाने औषध, इंजेक्शन देणारी, सलाईन लावणारी पांढऱ्या शुभ्र गणवेशातील एका प्रेमळ स्त्रीची मूर्ती उभी राहते.अशी ही परिचारिकेची प्रतिमा निर्माण करायला कारणीभूत ठरली ती फ्लॉरेन्स नाईटिंगेल. १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना सेवा सुश्रुषा करणारी फ्लॉरेन्स नाईटिंगेल जगात खूपच लोकप्रिय ठरली. म्हणूनच १२ मे हा तिचा जन्म दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या निमित्ताने रुग्णांची अतिशय मनोभावे सेवा केलेल्या, आपल्या अंगभूत कला गुणांमुळे सामाजिक आणि साहित्यिक उपक्रम राबविण्यात मग्न असलेल्या सौ मीना घोडविंदे यांची प्रेरणादायी जीवन कहाणी जाणून घेऊ या.
अशा या फ्लॉरेन्स नाईटिंगेल ला आदर्श मानून आपली परिचारिकेची सेवा आदर्शपणे बजावलेल्या, अनेक पुरस्कार आणि मान सन्मान मिळविलेल्या ज्येष्ठ परिचारिका म्हणजे ठाणे येथील सौ मीना घोडविंदे या होत.
खरं म्हणजे सौ मीना घोडविंदे यांच्या जडणघडणीत त्यांचे वडील रामचंद्र वनगे यांचे मोठेच योगदान आहे. आईला देवाज्ञा झाल्यानंतर वडिलांनी त्यांना जाणीवपूर्वक सुशिक्षित, सुसंस्कारी, सेवाभावी घडवले. १९५० च्या दशकात मीनाताईंच्या वडिलांचे ठाण्यामध्ये सुप्रसिद्ध कापड दुकान, अन टेलरिंग जेन्टस क्लोथ शॉप होते. सर्व ऑफिसचे, शाळांचे, बँकांचे, शिपाई व पोस्टमन यांचे गणवेश शिवण्याचे ते एकमेव दुकान होते. मीनाताईना त्यांना दुकानात मदत करावी लागत असे.
मीनाताई अवघ्या दहा वर्षांच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले. वडिलांनीच त्यांना स्वयंपाक शिकवला. घरातील नाश्ता, जेवण बनविणे, अन्य सर्व कामेही त्यांनाच करावी लागत. त्याकाळी घरात मदतनीस ठेवायची प्रथा नव्हती, की कोणतेही पदार्थ बाहेरून कुठूनही मिळत नसत. महत्वाचे म्हणजे वडिलांनी ५० वर्षापूर्वीच्या वातावरणात मुलींना शिकण्यासाठी विरोध न करता उलट पूर्णपणे पाठबळ दिले. त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या बहिणीचे शिक्षण उत्तम जे तऱ्हेने झाले.
आई मधील सर्व कलागुण मीनाताईंना उपजत लाभले. कोणत्याही कलेचे त्यांना शास्त्रशुद्ध शिक्षण घेता आले नाही.अर्थात आई गेल्याच्या धक्का मीनाताई यांच्यासाठी इतका जबरदस्त होता आणि अजूनही आहे की, तो प्रसंग त्यांच्या मन:पटलावर करतोय कायमचा कोरला गेला आहे. आपल्या आई विषयी अत्यंत भाऊक होऊन बोलताना मीनाताईनी इतक्या प्रवाही भाषेत सांगितले की, सर्व प्रसंग जिवंत होऊन माझ्या डोळ्यापुढे उभा राहिला. त्या म्हणल्या, “मला आठवते त्याप्रमाणे आई गोरी होती. ६ फूट उंच, शेलाटी मध्यम बांधा, १ वेणी कमरेखाली काष्ट्ट्यावर रुळायची, नऊवारी साडी नेसायची, सतत कामात व्यग्र असायची. आल्यागेल्या पाहुण्यांसाठी कायम तत्पर राहायची. आम्हा ५ भावंडांचे यथासांग सर्व आवरून ती दुपारच्या मोकळ्या वेळेत पाहुण्यांना भेट देण्यासाठी म्हणून, लग्न कार्यात देण्यासाठी म्हणून नेहमी वीणकाम,भरतकाम, नक्षीकाम, लोकरीचे मफलर _स्वेटर बनविणे, तबकावर ठेवायच्या रुमाल बटनांचे ससे बनवणे अशा काही ना काही गोष्टीत सतत व्यस्त असे. तिच्या या स्वभावामुळे ती नातेवाईकांना खूप आवडायची.
माझेमामा ठाण्यातच कोर्ट नाक्यावरील स्टेट बँकेत कामाला येत असत.आई आणि मामाचे एकमेकांवर इतके प्रेम होते की,मामा दुपारी जेवणाचा डबा आई सोबतच जेवत असे. जेवण झाले की मामा आईला पेटीवर भजने गाऊन दाखवित असे.गाण्याची आवड म्हणून वडिलांनी तिच्यासाठी पेटी आणली होती. आई शुद्ध शाकाहारी होती. सर्व स्वयंपाक छान बनवायची. तिची आवड म्हणजे ती काम करीत करीत रेडिओवर लता, आशा, सुमन यांची ऐकत राहायची.त्यामुळे साहजिकच ती गाणी आमच्याही कानावर पडून आम्हालाही संगीताची गोडी लागली. असेच एके दिवशी नेहमीप्रमाणे सर्व सुरू असताना तिला पोटात दुखून, पेप्टिक अल्सर बर्स्ट झाला. तिची प्रकृती गंभीर होत गेली . केस आवाक्याबाहेर गेलेली असल्याने कोणीही डॉक्टर उपचार करण्यास तयार नव्हते. शेवटी माझ्या वडिलांकडे कपडे शिवायला येणाऱ्या तलाव पाळीवरील डॉक्टर पंडित हॉस्स्पिटल मध्ये तिला दाखल करण्यात आले. पण उपचारांची शर्थ करूनही ती वाचू शकली नाही. दुसऱ्याच दिवशी तिने आमचा निरोप घेतला. ती गेल्याचे कळताच ठाण्यातले जे लोक वडिलांकडे कपडे शिवायला येत असत ते सर्व, नातेवाईक यांनी घरात एकच गर्दी केली. तो दुर्दैवी दिवस होता, १० मे १९६६. आपल्या आईला कधीही विसरू न शकलेल्या मीनाताई, आईविषयी त्यांच्या कवितेतून लिहितात,
“जन्मदात्री”काय
अंतर्यामी कायमच वसते
प्रत्यक्षात आता न दिसते
कसे तुज विसरून जावे
या जन्मी ते मला न ठावे
असती अजूनी आम्हासवे
सुखावलो सान्निध्ये तुजसवे
एकच आशा रुते ग मनी
भासे मजसि यावेस परतूनी
गल्लीतील गं घर गे अपुले
दिल्ली पर्यंत नांव जाहले
प्रसिद्धी, किर्ती, यशही लाभले
तुझ्याविना सर्व व्यर्थ भासले…
आज संसारात सर्व बाजुनी सुखी समाधानी असूनही आईचा वियोग त्यांना सतत जाणवत राहतो.
मीनाताईंच्या आईला सर्व कलांची फार आवड होती. त्यामुळे आईने मीनाताईंच्या शालेय जीवनापासूनच त्यांच्यात कलागुण रुजतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. ती मुलींकडून आवडीने नृत्य बसवून घेत असे. त्यानुसार नटवणे, सजवणे, प्रकरणात घुंगरू असलेले पैंजण आणणे, सोबत चेहऱ्यावर लावण्यास बिंदी, चकमक पावडर, कलाबतू कापून ती मुलींना छान सजवत असे. त्यावेळचे सीमा देव यांचे नृत्य प्रसिद्ध होते,
“चाळ माझ्या पायात,
पाय माझे तालात,”
या गाण्यावर अन, “कशी झोकात चालली कोळ्याची पोर” या गाण्यावर त्या व त्यांची बहीण ऐटीत नृत्य करत असत.
पुढे मीनाताईनी माध्यमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन बक्षीस मिळवले. त्यांच्याच भागात नाटककार शशी जोशी रहात असत. त्यांनी लिहिलेली नाटकें ते रंगभूमी वर सादर करत असत. शशी जोशी मीनाताईंच्या वडिलांचे मित्र होते.त्यामुळे जेव्हा त्यांच्याकडे नाटकाच्या तालमी व्हायच्या तेव्हा स्त्री कलाकार आली नाहीतर ते तेव्हढी संहिता वाचण्यासाठी मीनाताईना घेऊन जात असत अन वाचून झाली की परत घरी आणून सोडत. यामुळे नाट्यातले बोलण्यातले संदर्भ अन वाक्यातले चढ उतार मीनाताईना व्यवस्थित समजायला लागले.एकदा हौस म्हणून शशी जोशी यांच्या नाटकात वडिलांनी त्यांना कामही करू दिले. पण पुढे मात्र आईला देवाज्ञा झाल्यामुळे वडिलांनी त्यांना कोणाही सोबत नाटकात काम करण्यास जाऊ दिले नाही.
मीनाताई अकरावी बोर्डाची परीक्षा पास झाल्या आणि त्यांनी स्वतःतील सेवाभाव ओळखून ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील नर्सिंग कॉलेजला प्रवेश घेतला. तेथेही त्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत. त्यावेळचे शिकावू डॉ सुनिल कातकडे यांनी शिकावू परिचारिकांकडून त्यावेळचे प्रसिद्ध गीत, “हिल पोरी हिला” यावर नृत्य बसवून घेतले होते. पुढे तिथूनच त्यांची वर्कर्स टीचर्स ट्रेनिंग साठी निवड झाली. त्या कुर्ला बोर्ड येथे प्रशिक्षणास जात असत. तेथे निरनिराळ्या संस्थातून ४० जणी प्रशिक्षणासाठी येत असत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना अभ्यास सहल म्हणून दक्षिण भारतात जाण्याची संधी मिळाली. त्यामुळे कन्याकुमारी ते रामेश्वरपर्यंत, लोकांचे जीवनमान पहायला मिळाले. तिकडे कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे कामाचे तास, साप्ताहिक सुट्टी, त्यांचे व कुटुंबियांचे आरोग्य आदी बाबींचा अभ्यास करता आला.
या सहलीवरून शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यात त्यांनी “गुंतता हृदय हे” या नाटकात शशिकला जी भूमिका करायच्या, ती कल्याणीची भूमिका खूप प्रभावीपणे केली. यासाठी आईच्या मैत्रिणीची नऊवारी साडी आणून ती नेसण्याचे त्या त्यान्च्याकडूनच शिकल्या. तेव्हा खोटे दागिने घालण्याची प्रथा नव्हती. त्यामुळे आईच्या मैत्रिणीचेच खरे मंगळसूत्र, मोत्याच्या कुड्या, नाकातील मोत्याची नथ, हिरव्या बांगडया, पाटल्या सर्व पर्स मध्यें नेऊन, नाटकाच्या हॉल मध्यें तय्यार होऊन नाट्य छटा, अगदी जशी च्या तशीच सादर केली. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून केईएम हॉस्पिटल च्या मेट्रन रानडे मॅडम उपस्थित होत्या. त्यांना ही नाट्य छटा फारच आवडली. त्यांनी प्रशंसा करीत, “यू आर दि बेस्ट कल्याणी” म्हणत कौतुकाने जवळ घेतले. पुढेही मीनाताईना नाट्यक्षेत्रात खूप संधी चालून आल्या. पण एक तर आई नव्हती म्हणून आणि दुसरी बाब म्हणजे सरकारी नोकरीत प्रवेश केल्यामुळे त्यांना नाईलाजाने नाट्य क्षेत्रापासून दूर रहावे लागले, याची त्यांना अजूनही खंत वाटते.
मीनाताईंचा नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. विशेष म्हणजे चार वर्षांच्या या प्रशिक्षणात त्या चारही वर्षे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. पुढे, बरीच वर्षे त्यांच्या उत्तरपत्रिका शिकाऊ परिचारिकांना वाचण्यासाठी ठेवल्या जात असत. शिवाय या चार वर्षांच्या प्रशिक्षणात त्या अभ्यासाबरोबरच सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत राहिल्या. प्रत्येक स्पर्धेत त्यांचे बक्षीस ठरलेलेच असायचे. रांगोळी स्पर्धा, नृत्य, नाट्य, गायन, हस्ताक्षर ई. स्पर्धेत त्या अग्रणी असत.
नर्सिंग चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स म्हणून हॉस्पिटल प्रशासनानेच कायम स्वरुपी आदेश देऊन त्यांना रुजू करून घेतले. सर्वात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या प्रसूती कक्षामध्यें सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती मातेला धीर देत, तणावमुक्त करत आश्वस्थ करीत असत. अत्यंत संवेदनशिलतेने, अगदी शेवटच्या क्षणाला प्रसूती प्रक्रिया पूर्ण होताना, नवजात शिशुला कौशल्याने हाताळणे आणि इतर सर्व कामे त्या प्रशिक्षणात डॉ कणबूर सर, यांनी जसे शिकवले होते त्याच शास्त्रोक्त पद्धतीने करत असत. नवशिशूला स्वच्छ करत त्या मातेच्या जवळ ठेवत, अन स्तनपानाचे तंत्र मातेला शिकवत असत. त्यांच्या या सर्व कौशल्यपूर्ण कामाचे निरीक्षण केवळ शिकावू परिचारिकाच नव्हे तर शिकावू डॉक्टर्ससुद्धा करीत असत. कमालीची सहनशीलता, सहजता, नीटनीटकेपणा, स्वच्छता या मीनाताईंच्या गुणांचे सर्व कौतुक करीत असत.
प्रसूती कक्षातच त्यांना सातत्याने १० वर्षे सेवा करता आली. या दरम्यान त्यांनी जवळपास १० हजार गरीब महिलांच्या कौशल्याने प्रसूत्या केल्या. पण त्याकाळी सरकार दरबारी रेकॉर्ड मागायची स्थिती नव्हती.
नियन्त्याने मातृत्वाचे वरदान फक्त स्त्री ला च प्रदान करून तिच्यात आजन्म पुरेल अशी शक्ती बहाल केली आहे. अन त्या उपजत शक्तीमुळे कोणतीही स्त्री, असेल त्या परिस्थितीत आईपण आनंदाने स्वीकारते कारण “आईपण” हीच कोणत्याही स्त्रीच्या जीवनाची परिपूर्ती असते. समाजात सर्वच स्तरावर तिच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघितले जाते. अगदी गर्भधारणे पासून तिच्या शरीरात हार्मोनल बदल घडतात ,तसे तिच्या मानसिक अवस्थेतही बदल होऊन ती अपत्यास जन्म देण्यास समर्थ होते. ही प्रक्रिया विवाहित स्त्री साठी नैसर्गिकच असून त्या वेळच्या वेदनाही ती बाळ कुशीत घेताना सुखकर मानते.
विवाहानंतर मीनाताईंच्या ३ पाळ्यांच्या नोकरीमुळे सासऱ्यांनीच त्यांना ठाणे येथे राहण्याची परवानगी दिली अन त्या ठाणे येथेच राहिल्या. त्यांचे पती कला शिक्षक असल्याने ज्या शाळेत नोकरी करण्यास मिळत असे तिथेच ते चित्रकला व उपजत असलेली संगीत कला शिकवीत असत. त्याच बरोबर ते मुलांना खाजगीरित्याही शिकवत असत. शिवाय मराठी भक्तीसंगीत व सुगम संगीताचे कार्यक्रम स्वतंत्ररित्या सादर करत असत.
मीनाताईंच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ३ वर्षांनी दुसरा मुलगा झाला. इतर स्त्रियांच्या बाळंतपणासाठी, त्यांच्या बाळांसाठी सदैव तत्पर असलेल्या मीना ताईंनी स्वतःच्या बाळाकडे पूर्णपणे लक्ष दिले. म्हणूनच त्यांनी त्यांची प्रसूती रजा संपल्यावर शिल्लक होती ती पगारी रजा, तीही संपल्यावर बिन पगारी रजाही घेतली. पण आपल्या मुलांना स्वतःच्या नजरेखाली वाढवले. मुलांना जेव्हा स्वतः ची अंघोळ स्वतः करणे, कपडे घालणे, प्रातर्विधी करणे ही कामे जमू लागली, तेव्हाच त्या मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरीस जाऊ लागल्या. ड्युटीवर जाताना मुले पाळणाघरात ठेवायची व घरी येताना घेऊन यायची हा त्यांचा नित्यक्रमच झाला. त्यात त्यांची ठाणे जिल्ह्यातली शिबिरातील कामाची वेळ असली किंवा त्यांच्या पतीस रात्रीच्या गाण्याच्या कार्यक्रमास जायची वेळ आली तर मुले पाळणाघरातच झोपी जायची. त्यामुळे त्यांची खूपच तारेवरची कसरत व्हायची. तेव्हा घरी फोनची सोयही नव्हती. त्यामुळे हे पतिपत्नी एका वहीत एकमेकांसाठी निरोप लिहून ठेवत असत. त्यात परत त्यांच्याकडे गॅसही नव्हता. त्यामुळे सर्व स्वयंपाक त्यांना स्टोव्ह वरच करावा लागत असे. कामाव्यतिरिक्तचा सर्व वेळ हे दोघेही मुलांसाठीच देत असत. सुदैवाने त्यावेळी हे कुटुंब रंगायतन जवळच दगडी शाळेच्या बाजूच्या सरकारी निवास स्थानात राहात असे. मुलांना बागेत नेणे, झोपाळ्यात बसवून, तलाव पाळीला फिरवून आणत. अशा प्रकारे त्यांनी मुलांच्या शारीरिक, मानसिक वाढीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. तसेच मुलांना जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले होते तरी मराठी सुविचार सांगून त्यांचा अर्थ समजावून सांगून मुलांच्या मनाची त्यांनी चांगली मशागत केली. त्या मुलाना अथर्वशीर्षच्या संंस्कार वर्गाला पाठवत असत .
मुले थोडी मोठी झाल्यावर, ७ ते १४ या वयात त्यांच्यात होणारे हार्मोनल बदल लक्षात घेऊन मीनाताईंनी दोन्ही मुलांना घेऊन लोणावळा येथील मनशक्ती केंद्रातील ३ दिवसांचे निवासी शिबिर दोनदा केले जेणेकरून मुले कायमची सत्याच्या मार्गांवर राहतील. ३ पाळ्यातील परिचारिकेची नोकरी सांभाळत मुलांना घडविणे ही फार तारेवरची कसरत होती. पण मीनाताईं सातत्याने मुलांचे संस्कारवर्ग, खेळ, अभ्यास यात त्यांच्या सोबत स्वतःही सतत गुंतून राहायच्या. त्यामुळे मुले सरळमार्गी राहून कायम प्रथम क्रमांक मिळवित राहिली. पुढे दोघांचेही शिक्षण पूर्ण झाल्यावर ते त्यांच्या गुणवत्तेवर नोकरीस लागले.तो पर्यंत मीनाताईंनी स्वतःच्या सर्व हौशीमौजीना तिलांजलीच वाहिली होती. अगदी जवळच्या नातेवाईकांकडे काही सोहळे असतील तरच त्या मुलांना घेऊन जात, जेणेकरून त्यांना नात्यांची ओळख होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होईल. घरात कुणी तिसरी व्यक्ती मदतीला नसताना त्यांनी पतीच्या साथीने हे सर्व जाणीवपूर्वक केले.

आजच्या अती महत्वाकांक्षी आईवडिलांनी लक्षात घ्यावी अशी गोष्ट म्हणजे, मीनाताईंनी स्वतःची कुठलीही मते मुलांवर न लादता त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला नेहमी वाव दिला. त्यामुळे दोन्ही मुलांना, त्यांच्या मनाप्रमाणे स्वतःचे जीवन घडविता आले. या सर्व कष्टांचे फळ म्हणजे मुले तर चांगली घडलीच पण मीनाताईना डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या “आई महोत्सवात” ‘आदर्श आई’ चा पुरस्कार प्रथम क्रमांकाने मिळाला अन जणू त्यांच्या जीवनाचे अन आईपणाचे सार्थकच झाले. आज त्या दोन गोंडस नातवंडाच्या आजी आहेत. त्यांच्या घरात गोकुळ नांदत आहे. या आनंदासोबत त्या व त्यांचे पती स्वतःचे छंद आवडीने जोपासत आहेत.
एकत्र कुटुंब पद्धतीची महती विशद करताना, मीनाताई लिहितात…
तीन पिढ्या नांदती
प्रेमभावे नाते जपती
जीवनी आनंद शोधती
तेथे देवी प्रेमे वसती…1
एकमेकांची घेतात
काळजी मनापासून
नाते घट्टच करतात
जीवापाड जपून… 2
संस्काराचे बीज रुजते
शिदोरी सर्वांना मिळते
स्नेह बंधनाने उमजते
जगण्याचे मोल कळते.. 3
आत्मीयतेने घरासाठी
मनस्वी बंध प्रेमे जपावे
घरचं हो प्रत्येकासाठी
मंदिरासारखे भासावे… 4
सहभागी सुखदुःखात
होऊन ऋणात राहावे
आनंदाचे रोजच घरात
कारंजे नित्य वाहावे… 5
मीनाताईंच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन आरोग्य खात्याने त्यांचे नाव प्रथम क्रमांकाने राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठविले होते. या बरोबरच त्यांच्या सेवाभावी सेवेबद्दल त्यांचा शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक संस्था, ई. मधून अनेकदा गौरव करण्यात आला आहे. पूर्ण सेवाभावी वृत्तीने ४१ वर्षे सेवा बजावून त्या नियत वयोमानाप्रमाणे ५८ व्या वर्षी निवृत्त झाल्या.
नोकरीतून सन्मानाने निवृत्त झाल्यावर आरामदायी जीवन न जगता मीनाताईंनी स्वतःला सामाजिक आणि साहित्यिक सेवेत मनस्वीपणे झोकून दिले आहे. अनेक गरजूंना त्या मदत करीत असतात.मदत करण्याची सहज प्रवृत्ती अन मनमिळावू स्वभाव यामुळे त्या खूप लोकप्रिय आहेत. स्वतःतील कलागुणांना विकसित करत जीवन जगण्याची किमया साधत त्या आनंदयात्री ठरल्या आहेत.

समाजात जनजागृती करण्यासाठी संपादक श्री मधुसूदन सुगदरे यांच्या मार्गदर्शनाने मीनाताई लेख लिहू लागल्या. विशेषतः, महिलांचे स्वातंत्र्य, हक्क, कर्तव्य, याची जाणीव करून देत, विद्यार्थ्यांवर संस्कार मूल्ये व शिक्षणाचे महत्व रुजविणे यासाठी त्या सातत्याने लेखन करीत असतात. जाणीवपूर्वक लेखन करत त्यांनी स्वतःचा वाचकवर्ग निर्माण केला आहे.
या बरोबरच विविध काव्य स्पर्धेत, निबंध स्पर्धेत त्या सहभागी होतात आणि पुरस्कारही मिळवितात. त्यांना अजेय शतकोटी संस्थेत, काव्य स्पर्धेत विशेष कवयित्रीचा किताब प्राप्त झाला आहे.

मीनाताईंच्या हाताखाली ४८ वर्षांपूर्वी प्रशिक्षणार्थी परिचारिका म्हणून राहिलेल्या आणि नंतर त्यांच्या जीवलग मैत्रीण बनलेल्या सौ चारुशीला गायकवाड मीनाताईंविषयी बोलताना म्हणतात, “मीनाताईंचे कौशल्यपूर्ण काम बघत बघत आम्ही परिचारिकेचे काम आत्मसात करीत गेलो. नर्सिंगच्या सेवेसोबतच आपल्यातील कला गुणांना वाव देणे, विविध सामाजिक साहित्यिक उपक्रमात सहभाग घेणे, हे त्यांचे व्यक्तिमत्त्वातील विशेष गुण पहात आम्हीही नकळत घडत गेलो.”
अशा या अतिशय निष्ठेने परिचारिकेची सेवा बजाविलेल्या, निवृत्ती पश्चात सामाजिक, साहित्यिक सेवेत मनस्वीपणे काम करीत असलेल्या मराठी नाईटेंगल सौ मीनाताई वनगे घोडविंदे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मीनाताई घोडविंदे ह्या आदर्श परिचारिका आणि जीवनगौरव पुरस्कार प्राप्त समाजसेविका, बहुआयामी लेखिका आणि कलावंत मनाच्या मनस्वी महिलेचा परिचय वाचून मनापासून आनंद झाला. मी मीनाताईंना काही साहित्यिक समूहांच्या माध्यमातून परिचित असले, तरीही आपल्या परिचित व्यक्तिमत्त्वाचा विस्तृत परिचय वाचून मनात अभिमान दाटून आला आणि आदर वाढला.
देवेंद्र भुजबळ सर रत्नपारखी आहेत ह्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आणि त्यांच्या साहित्यिक गुणांचेही दर्शन ह्या लेखाच्या अनुषंगाने घडले. म्हणूनच सन्माननीय परिचारिका सौ. मीनाताई घोडविंदे आणि आदरणीय लेखक श्री. देवेंद्र भुजबळ सर ह्या दोघांचेही हार्दिक अभिनंदन 🙏💐
एक कर्तव्यदक्ष, प्रतिभाशाली व्यक्तीमत्व. सेवा, साहित्य, कला या तिन्ही प्रांतात मुक्त मुशाफिरी करून, स्वतःचे उत्तम असे स्थान निर्माण करणाऱ्या रणरागिणी.. एक आदरणीय व्यक्ती, मीनाताई म्हणजे सर्वच स्त्री पुरुषांना आदर्श असं अढळस्थान आहेत.
डॉ. क्षितिज कुलकर्णी.
एक आदर्श परिचारिका म्हणून नक्कीच त्यांचे नाव घ्यायला हवे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीला प्रणाम.