Friday, December 6, 2024
Homeलेखमर्मबंधातली ठेव ही……..!

मर्मबंधातली ठेव ही……..!

नातं… नातं काय असतं…? मनामनांना बांधून ठेवणारे अदृश्य बंध…! हृदयाच्या तळातून उमलणारे कोवळे अंकुर…! नाती जपायची असतात… ज्या तळातून ती जन्मलीत ….. त्या तळाचा ओलावा नित्य कायम ठेवून…. भावनांचं सिंचन करून… प्रसंगी जखमा करून जाणारे प्रसंग झेलून….. तर काही नाती तर जखमांना सतत हिरवं ठेऊनही जपावी लागतात…. त्या नात्याने काळजाला दिलेल्या सुगंधी जखमांचा हिरवंपण जपूनच ती जपल्या जाऊ शकतात…..

जखमांना विसरून नाती जपताच येऊ शकत नाहीत…. या नात्यांमध्ये जखमा एवढ्या प्रभावी असतात की नात्यांच्या उच्चाराअगोदर जखमांचं मूकपणच मनाला स्पर्शून जातं… नजरेसमोर धुकं ठेवून जातं….त्या धुक्याला वाट करून देताच धुकं तर विरून जातं…. पण दवबिंदू मात्र पानापानावर ओघळलेले असतात..,..

या जखमा भरून निघणं म्हणजे त्या नात्याचा मृत्यूच नाही काय…? नाती काय काहीतरी देण्याच्या…… काही मिळवण्याच्याच उद्देशानेच जोडली जातात….? ती निस्वार्थ असूच शकत नाहीत…….?

जी नाती कसल्या तरी स्वार्थाने जोडली जातात….. तिथे हृदयाला जखमा करून जाणारे क्षण असतात…… जी नाती हृदय विसरून जोडली जातात…. तिथे हृदयाने जपलेल्या ओलाव्याची अपेक्षा तरी कशी करावी……?

ती मुळात नाती नसतातच…… असतो तो केवळ कोरडा व्यवहार…… या व्यवहारात मनाचं गुज खरंतर मनापर्यंत पोहोचतच नाही….. केवळ कानापर्यंत पोहोचून मध्यावरच विरून जातं…. अशी नाती अल्पायुषी असतात…….. काळाच्या कसोटीवर तग धरू शकत नाहीत…….

नाती अजरामर हवीत……. मनातून जन्मलेली असावीत…. तरच ती नाती अनमोल ठरतात……आणि तरच त्या नात्याचं मोल जपण्यासाठी प्राणाची आहुती ही हसत हसत दिली जाते…!

अजरामर व्हायला नात्यांना खूप मोठा तळ हवा….. त्याची खोली एवढी असावी की पृथ्वीवरील कोणताही सागर ठरावा अपात्र……
त्याच्या खोलीशी स्पर्धा करण्यास…. ते नातं हृदयाच्या अलवार तारांना स्पर्शून जाणार झंकारून जाणारं जीवन संगीत ठरावं….. अगदी सौम्य… अगदी सुखद…. ते इतकं मृदू असावं…..जणू विधात्याने आपल्या हळुवार हातांनी आळवलं त्याला …….. ती एक अशी भाषा ठरावी की प्रेमळ हृदयांनाच ती कळावी…..ते मुग्ध असावं…..पण त्या मुग्धतेतूनही खूप काही सांगून जावं……. स्वतःला पटवून द्यावं …!

अशी काही जपण्याजोगी नाती आपणाकडे असणं आयुष्याचा ठेवा असतो तो ……. आपली जीवनाच्या प्रत्येक स्थित्यंतरात सोबत करण्याला…….! हृदयाच्या अलवार कोपऱ्यात जपून ठेवण्याजोगी ठेव…….. हो..! मर्मबंधातली ठेव असते ती….! हृदयातल्या स्पंदनाचे मर्म जाणणारी….. आणि ते जाणवून देणारी मर्मबंधातली ठेव असते ती…… ! अशी नाती खूप दुर्मिळ असतात……. सर्वांनाच गवसत नाहीत ती……..! आपल्या जवळचं खूप काही हिरावून नेणारी नातीच पावलोपावली दिसतात……. अशी नाती कधीकधी आपल्यालाच ठोकरून जातात…….. तर कधी आपणच ठोकरतो काही नाती……! भावनेचा लवलेशही नसलेली…….!असल्या नात्याने ठोकरलेली मने क्षणकालच पायातलं बळ विसरून गळून पडतात ..
…… पण दुसऱ्याच क्षणी तेवढ्याच …… कदाचित दुप्पट जोमाने आपले पाय जमिनीत रोवून उभी राहतात…… कारण ठोकर खाऊन का होईना पण त्या नात्यातला फोलपणा कळतो…… अशी नाती सहज विस्मरणात जातात….. त्या नात्यांच्या स्मृतीही कडवट भासू लागतात….. अशा नात्यांची स्थिती कालांतराने गळून पडणाऱ्या मुखवट्यांसारखी असते …….!

मुखवट्यांच्या दुनियेत ‘मर्मबंधातली ठेव’ ठरलेली नाती खूपच दुर्मिळ असतात……. काही जणांच्या हृदयांनी अशा नात्यांचे अस्तित्व टिपून ठेवलेलं असतं…… बहुदा काहींचीच हृदय या सुखद नात्यांनी व्यापलेली असतात……. ही नाती आयुष्यभर जतन करून ठेवण्या इतकी अनमोल असतात….. जिथे मनाचे हळवे बंध असतात………तिथे जखमा तर असणारच…. पण ह्या जखमाही ‘सुगंधी’ असतात……!यांचा दरवळ सदैव मनात दरवळत असतो……. तो इतका सौम्य असतो जणू देव्हाऱ्यात लावलेल्या धुपाचा गंध…… अवघ्या घरात मंदपणे दरवळत राहावा…….

जखमांनाही सुगंध बहाल करून जाणारी ही नाती मनामनाच्या किमयेतून साकारतात……. वास्तविक पाहता ही नाती म्हणजे स्वतःच एक मोठी किमया असतात……. ही मनाची अस्सल ठेव जतन करावी प्रत्येकानं……. कारण ही नाती म्हणजे मनाला पडलेले एक सुख स्वप्न…….! जे स्वप्न पडायलाही मोठं भाग्य लागतं…….!

सागराच्या तळापेक्षाही खूप खोल रुजलेली…. स्वतःच एक जीवन संगीत साकारणारी….,… अत्यंत मुग्ध….. तरीही खूप खूप बोलकी…… खूप अलवार…. कधी जखमा करून जाणारी……. पण तरीही हृदयातल आपलं अस्तित्व चिरकाल टिकवून ठेवणारी……..

अशी नाती जपावीत जीवनाच्या प्रत्येक वळणावर……. आपलं अस्तित्व साकारताना सावरावं…… या नात्यांचंही अस्तित्व….. कारण अशी नाती कधीच मरत नाहीत……ती अमर्त्य असतात…. अशी नाती असतात एक गुंजारव….., जीवनाच्या सामान्य परिसीमांच्याही पलीकडेही ज्यांचा नाद ऐकू येतो……ही नाती साकारतात……एक आकाश….. वेदनेच्या काळ्या मेघालाही सौख्याची रूपेरी कडा देऊन जाणारं……….!

— लेखन : प्रीती प्रवीण रोडे. अकोला
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 969484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. ,मनाला भेदून जाणारे काव्य खूप सुंदर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !