Thursday, December 26, 2024
Homeलेखमाझी जडणघडण : भाग २३

माझी जडणघडण : भाग २३

“कुमुद आत्या”

ज्या ज्या व्यक्ती माझ्या बालपणी माझ्या अत्यंत आवडत्या होत्या आणि कळत नकळत ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्या मनावर प्रभाव होता त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे कुमुदआत्या. “कुमुद शंकरराव पोरे”. पप्पांची म्हणजेच माझ्या वडिलांची मावस बहीण. पप्पांना सख्खी भावंड नव्हतीच. ते एकुलते एक होते पण गुलाब मावशी, आप्पा आणि त्यांची मुलं यांच्याशी त्यांची अत्यंत प्रेमाची आणि सख्यापेक्षाही जास्त जिव्हाळ्याची नाती होती.

कुमुदआत्या ही त्यांची अतिशय लाडकी बहीण. या बहीण भावांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम. त्यांचं घर स्टेशन रोडला होतं. घरासमोर एक उसाचं गुर्‍हाळ होतं आणि तिथे पप्पा सकाळी ठाणे स्टेशनवर ऑफिसला जाण्यासाठी, दहा पाचची लोकल गाडी पकडण्यापूर्वी आपली सायकल ठेवत. संध्याकाळी परतताना ती घेऊन जात पण तत्पूर्वी त्यांचा गुलाब मावशीकडे एक हाॅल्ट असायचाच. रोजच. गुलाब मावशीचा परिवार आणि कुमुदआत्याचा परिवार एकाच घरात वर खाली राहत असे. पप्पा आल्याची चाहूल लागताच कुमुदत्या वरूनच, जिन्यात डोकावून विचारायची,

”जना आला का ग ? त्याला म्हणाव “थांब जरासा” त्याच्यासाठी कोथिंबीरच्या वड्या राखून ठेवल्यात.आणते बरं का ! येतेच खाली.“ पप्पा येताना भायखळा मार्केट मधून खूप सार्‍या भाज्या घेऊन यायचे. त्यातल्या काही भाज्या, फळे गुलाबमावशीला देत, कधी कुमुदात्यालाही देत. म्हणत,” हे बघ! कशी हिरवीगार पानेदार कोथिंबीर आणली आहे ! मस्त वड्या कर.” कुमुदआत्या पण लडिवाळपणे मान वळवायची आणि अगदी सहजपणे पप्पांच्या मागणीला दुजोरा द्यायची.

तसं पाहिलं तर एक अत्यंत साधा संवाद पण त्या संवादात झिरपायचं ते बहीण भावाचं प्रेम. प्रेमातला हक्क आणि तितकाच विश्वास.

घरी आल्यावर पप्पांकडून आम्हाला या कोथिंबीर वड्यांचं अगदी चविष्ट कौतुक ऐकायला मिळायचं. मी तेव्हा खट्याळपणे पप्पांना विचारायचे, ”एकटेच खाऊन येता ? आमच्यासाठी नाही का दिल्या आत्याने वड्या ?”

पण कुमुदआत्या आमच्या घरी यायची तेव्हा कधीही रिकाम्या हाताने यायचीच नाही. कधी रव्याचा लाडू, कधी कोबीच्या वड्या, सोड्याची खिचडी, कोलंबीचं कालवण असं काहीबाही घेऊनच यायची. ती आली की आमच्या घरात एक चैतन्य असायचं. तिचं बोलणं गोड, दिसणं गोड, तिच्या गोरापान रंग, उंच कपाळ, काळेभोर केस, कपाळावरचे ठसठशीत कुंकू आणि चेहऱ्यावरून ओसंडणारा मायेचा दाट प्रवाह, कौतुकभरला झरा.. ती आली की तिने जाऊच नये असंच वाटायचं आम्हाला. आमचं घर हे तिचं माहेर होतं आणि या माहेरघरची ती लाडकी लेक होती.

कुमुदआत्या

माझ्या आईचं आणि तिचं एकमेकींवर अतिशय प्रेम होतं. नणंद भावजयीच्या पारंपरिक नात्याच्या कुठल्याही कायदेशीर मानापमानाच्या भोचक कल्पना आणि अटींपलीकडे गेलेलं हे अतिशय सुंदर भावस्पर्शी नातं होतं. सख्या बहिणी म्हणा, जिवाभावाच्या मैत्रिणी म्हणा पण या नात्यात प्रचंड माधुर्य आणि आपुलकी होती. खूप वेळा मी त्यांना सुखदुःखाच्या गोष्टी करताना पाहिलं आहे. एकमेकींच्या पापण्यांवर हळुवार हात फिरवताना पाहिलं आहे. खरं म्हणजे त्या वयात भावनांचे प्रभाव समजत नव्हते. त्यात डोकावताही येत नव्हतं पण कृतीतल्या या क्षणांची कुठेतरी साठवण व्हायची.

आज जेव्हा मी कुमुदआत्यांसारख्या स्त्रियांचा विचार करते तेव्हा मनात येतं “एका काळाची आठवण देणाऱ्या, त्याच प्रवाहात जगणाऱ्या या साध्या स्त्रिया होत्या. लेकुरवाळ्या, नवरा मुलं— बाळं, घर या पलिकडे त्यांना जग नव्हतं. स्वतःच्या अनेकविध गुणांकडे दुर्लक्ष करूनही त्या संसारासाठी आजुबाजूची अनेकविध नाती मनापासून जपत, नात्यांचा मान राखत, तुटू न देता सतत धडपडत जगत राहिल्या. विना तक्रार, चेहऱ्यावरचे समाधान ढळू न देता. पदरात निखारे घेऊन चटके सोसत आनंदाने जगल्या. त्यांना अबला का म्हणायचे ? स्वतःसाठी कधीही न जगणाऱ्या या स्त्रियांना केवळ अट्टाहासाने प्रवाहाच्या विरोधात जायला लावून “अगं ! कधीतरी स्वतःसाठी जग. स्वतःची ओळख, अस्तित्व याचं महत्त्व नाहीच का तुला ?” असं का म्हणायचं ? पाण्यात साखर मिसळावी तस त्यांचं जीवन होतं आणि त्यातच त्यांचा आनंद असावा.

मी आजच्या काळातल्या प्रगत स्त्रियांचा आदर, सन्मान, महानता, कौतुक बाळगूनही म्हणेन, ”पण त्या काळाच्या प्रवाहाबरोबर आनंदाने वाहत जाणाऱ्या स्त्रियांमुळेच आपली कुटुंब संस्था टिकली. नात्यांची जपणूक झाली. माणूस माणसाला बऱ्या वाईट परिस्थितीतही जोडलेला राहिला आणि हेच संचित त्यांनी मागे ठेवलं.” असं वाटणं गैर आहे का ? मागासलेपणाचं आहे का ? जीवनाला शंभर पावले मागे घेऊन जाणार आहे का ? माहीत नाही. कालची स्त्री आणि आजची स्त्री यांचा तौलनिक विचार करताना माझ्या मनात प्रचंड गोंधळ या क्षणीही आहे. कुणाला झुकतं माप द्यावं हे मला माहीत नाही. संसाराचं भक्कम सारथ्य करणार्‍या या स्त्रियांमध्ये मी युगंधराला पाहते.

एकेकाळी खेळीमेळीत, आनंदाने, सौख्याने, आहे त्या परिस्थितीत समाधानाने राहणाऱ्या या कुटुंबात अनपेक्षितपणे गृहकलह सुरू झाले होते. भाऊ, पपी (कुमुदआत्याचे धाकटे भाऊ) यांचे विवाह झाले. कुटुंब विस्तारलं. नव्या लक्ष्म्यांचं यथायोग्य स्वागतही झालं. पण त्याचबरोबर घरात नवे प्रवाह वाहू लागले. अपेक्षा वाढल्या, तुझं माझं होऊ लागलं. नाती दुभंगू लागली. घराचे वासेच फिरले. एकेकाळी जिथे प्रेमाचे संवाद घडत तिथे शब्दांची खडाजंगी होऊ लागली. जीवाला जीव देणारे भाऊ मनाने पांगले. पाठीला पाठ लावून वावरू लागले. घरात राग धुमसायचा पण चूल मात्र कधी कधी थंड असायची. अशावेळी कुमुदआत्याच्या मनाची खूप होरपळ व्हायची. कित्येक वेळा तीच पुढाकार घेऊन भांडण मिटवायचा प्रयत्न करायची. जेवणाचा डबा पाठवायची.म्हातार्‍या आईवडिलांची, भावांची, कुणाचीच उपासमार होऊ नये म्हणून तिचा जीव तुटायचा. पण त्या बदल्यात तिचा उद्धारच व्हायचा. अनेक वेळा तिला जणू काही आई-वडिलांच्या घरातली आश्रित असल्यासारखीच वागणूक मिळू लागली होती. नव्याने कुटुंबात आलेल्यांना कुटुंबाचा पूर्वेतिहास काय माहित? हे घर वाचवण्यासाठी या पोरे दांपत्याने आपलं जीवन पणाला लावलं होतं याचा जणू काही आता साऱ्यांना विसरच पडला होता पण इतकं असूनही कुमुदआत्याने मनात कसलाही आकस कधीही बाळगला नाही. भाऊच्या किरणवर आणि पप्पी च्या सलील वर तर तिने अपरंपार माया केली. घरातल्या भांडणांचा या मुलांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून त्यांना सतत मायेचं कवच दिलं. कुमुदआत्या अशीच होती. कुठल्याही वैरभावानेच्या पलीकडे गेलेली होती. तिने फक्त सगळ्यांना मायाच दिली.

जेव्हा जेव्हा प्रातिनिधिक स्वरूपात मला कुमुदआत्याची आठवण येते तेव्हा सहज वाटतं, ”जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकच धर्म ” हे निराळेपणाने तिला कधी शिकवावेच लागले नाही. प्रेम हा तिचा स्थायीभाव होता. मी कुमुदआत्याला कधीच रागावलेलं, क्रोधित झालेलं,वैतागलेलं पाहिलंच नाही. नैराश्याच्या क्षणी सुद्धा ती शांत असायची. कुणावरही तिने दोषारोप केला नाही. खाली उतरून झोपाळ्यावर एक पाय उचलून शांतपणे झोके घेत बसायची.
तशी ती खूप धार्मिक वृत्तीची होती. मी तिच्याबरोबर खूपवेळा कोपीनेश्वरच्या मंदिरात जाई. तिथल्या प्रत्येक देवाला, ती प्रत्येकवेळी पायातली चप्पल काढून मनोभावे नमस्कार करायची. साखरेची पुडी ठेवायची. मला म्हणायची हळूच, ”अग ! सार्‍या देवांना खूश नको का ठेवायला ?” तिच्या या बोलण्याची मला खूप मजा वाटायची. उपास तर सगळेच करायची. आज काय चतुर्थी आहे. आज काय एकादशी आहे. नाहीतर गुरुवार, शनिवार… जेवायची तरी कधी कोण जाणे ! पपा तिला खूप चिडवायचे, कधीकधी रागवायचेही पण ती नुसतीच लडिवाळपणे मान वळवायची. अशी होती ती देवभोळी पण प्रामाणिक होती ती !

लाडकी लेक होती, प्रेमळ बहीण होती, प्रेमस्वरुप, वात्सल्यसिंधू आई होती, आदर्श पत्नी होती. तिच्या झोळीत आनंदाचं धान्य होतं त्यातला कणनिकण तिने आपल्या गणगोतात निष्कामपणे वाटला होता.

आजही माझ्या मनात ती आठवण आहे. प्रचंड दुःखाची सावली आमच्या कुटुंबावर पांघरलेली होती. आमच्या लाडक्या कुमुदआत्याला कॅन्सर सारख्या व्याधीने विळख्यात घेतलं होतं. मृत्यू दारात होता. काय होणार ते समजत होतं. जीवापाड प्रेम करणारा नवरा, अर्धवट वयातली मुलं, म्हातारे आई-वडील आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणारी सारीच हतबल होती. त्याचवेळी आमच्या ताईचा जोडीदारही तितकाच आजारी होता. रोगाचे निदान होत नव्हतं. डॉक्टरही हवालदील झाले होते. पदरी दहा महिन्याचं मूल, संसाराची मांडलेली मनातली स्वप्नं, सारंच अंधारात होतं. कुठलं दुःख कमी कुठलं जास्त काही काही समजत नव्हतं.

इतक्या वेदना सहन करत असतानाही कुमुद आत्या म्हणत होती, ”मला अरुला भेटायचंय. बोलवा तिला. मला तिला काहीतरी सांगायचंय.”
कुमुदआत्या इतकी लाडकी होती आमची की ताई त्या चिंतातुर मन:स्थितीतही तिला भेटायला स्वतःच्या छातीवरचा दुःखाचा दगड घेऊनच आली. तिला पाहून कुमुदआत्याचे डोळे पाणावले. तिच्या हातांच्या अक्षरश: पिशव्या झाल्या होत्या पण तिने ताईच्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवला.
“अरु ! बिलकुल काळजी करू नकोस, विश्वास ठेव, हिम्मत राख, अरुण (ताईचे पती) बरा होईल. मी माझ्या देवाला सांगितलंय “माझं सारं आयुष्य अरुणला दे.. त्याला नको नेऊस मला ने! बघ देव माझं ऐकेल आणि अगं! माझं जीवन मी छान भोगलं आहे. नवऱ्याचं प्रेम, हुशार समंजस मुलं आणि तुम्ही सगळे काय हवं आणखी ? अरु बाळा! तुझं सगळं व्हायचंय. जाता जाता माझ्या आयुष्याचं दान मी तुझ्या पदरात टाकते.”

त्यानंतर दोन दिवसांनीच कुमुदआत्या गेली. ती गेली तेव्हाचे बाळासाहेबांचे (कुमुदआत्याचे पती) शब्द माझ्या मनावर कोरले गेलेत.
“कुमुद तुझ्याविना मी भिकारी आहे.”
मृणाल शांतपणे कोसळलेल्या आपल्या वडिलांच्या पाठीवर हात फिरवत होती.
आपलं माणूस गेल्याचं दुःख काय असतं याची जाणीव प्रथमच तेव्हा मला झाली होती.

कुमुदआत्या गेली आणि अरुणच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा दिसू लागली.तो औषधांना, उपचारपद्धतींना साथ देऊ लागला होता. कालांतराने अरुण मृत्यूला टक्कर देऊन पुन्हा जीवनात नव्याने माघारी आला. ईश्वरी संकेत, भविष्यवाणी, योगायोग या साऱ्यांवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आलेल्या अनुभवांना तार्किक किंवा बुद्धिवादी अर्थ लावत बसण्यापेक्षा त्यांना जीवनाच्या एका मौल्यवान कप्प्यात जसेच्या तसेच बंदिस्त करून ठेवावे हेच योग्य.

आज ६०/६२ वर्षे उलटली असतील पण मनातल्या कुमुदआत्याची ती हसरी, प्रेमळ, मधुरभाषी, मृदुस्पर्शी छबी जशीच्या तशीच आहे.

जेव्हा जेव्हा तिचा विचार मनात येतो तेव्हा एकच वाटते,
“जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला”…..
क्रमश:

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. कुमुद आत्या वाचून शांत बसून मनामध्ये त्यांचे चित्र उभे राहिले फोटो वरून स्वभावाची कल्पना येतेच पण त्यांनी वाहून दिलेलं जीवन केवळ गणगोत सांभाळणे हे एकच ध्येय उराशी बाळगून फक्त प्रेम आणि माया याच गोष्टींना प्राधान्य दिलं आणि श्रद्धाळू प्रेमळ माणसं खरोखरच तोंडातून ईश्वरी संकेत असल्यासारखे उद्गार काढतात आणि ते खरे ही होतात.
    आत्या ही एक प्रेमळ आणि भावाचं चांगलंच व्हावं अशी इच्छा करणारी एकमेव व्यक्ती आहे जी आपल्या भावाच्या संसारातही त्याच्या पाठीशी उभी असते एक आधार म्हणून आईच्या जागी आईच्या मायेने
    इतक्या प्रकारचे आणि इतकं मन सामर्थ्य आणि वागणुकीचा आदर्श असलेल्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या यामुळे जडणघडण ही चांगलीच होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९
शारदा शेरकर on अंदमानची सफर : ९