Wednesday, October 9, 2024
Homeलेखमाझी जडण घडण : ११

माझी जडण घडण : ११

श्रावण

श्रावण आणि बालपण यांचं अतूट नातं आजही माझ्या मनात मी जपलेलं आहे. आम्ही एका गल्लीत राहत होतो. ज्या गल्लीत एकमेकांना चिकटून समोरासमोर घरं होती आणि तो असा भाग होता की एकमेकांना लागून आजूबाजूलाही अनेक लहान मोठ्या गल्ल्याच होत्या. कुठल्याही प्रकारचं सृष्टी सौंदर्याचं वातावरण तेथे नव्हतंच म्हणजे श्रावणातली हिरवा शालू नेसलेली अलंकृत नववधूच्या रूपातली धरा, श्रावणातलं ते पाचूच बन, मयूर नृत्य असं काही दृश्य आमच्या आसपासही नव्हतं. फारतर कोपर्‍यावरच्या घटाण्यावर हिरवं गवत मोकाट वाढलेलं असायचं. आमच्या घराच्या मागच्या गॅलरीतून खूप दूरवर धूसर अशी डोंगरांची रांग दिसायची आणि वर्षा ऋतूत त्या डोंगरावर उतरलेलं सावळं आभाळ जाणवायचं.

श्रावणातल्या ऊन पावसाच्या वेळी आकाशात उमटलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य मात्र आम्ही डोळा भरून पाहायचो. लहानपणी आम्हाला श्रावण भेटायचा तो तोंडपाठ केलेल्या बालकवी, बा. भ. बोरकर, पाडगावकर यांच्या कवितांतून. नाही म्हणायला काही घरांच्या खिडकीच्या पडदीवर कुंडीत, किंवा डालडाच्या पत्र्याच्या डब्यात हौशीने लावलेली झाडं असायची. त्यात विशेष करून झिपरी, झेंडू, सदाफुली, तुळस, कोरफड, मायाळू क्वचित कुणाकडे गावठी गुलाबाच्या झाडावर गुलाब फुललेले असायचे. गल्लीतलं सारं सृष्टी सौंदर्य हे अशा खिडकीत, ओसरीवर पसरलेलं असायचं. ज्या घरांना परसदार होतं त्या परसदारी अळूची पानं, कर्दळ, गवती चहाची हिरवळ जोपासलेली असायची पण मुल्हेरकरांच्या परसदारी मात्र मोठं सोनचाफ्याचं झाड होतं ते मात्र श्रावणात नखशिखान्त बहरायचं त्या सोनचाफ्याचा सुगंध सर्वत्र गल्लीत दरवळयचा. या दरवळणाऱ्या सुगंधात आमचा श्रावण अडकलेला असायचा. या सुवर्ण चंपकाच्या सुगंधात आजही मला बालपणीचा श्रावण कडकडून भेटतो.

श्रावणातील रेशीमधारात मात्र आम्ही सवंगडी मनसोक्त भिजलोय. “ये ग ये ग सरी माझे मडके भरी” नाहीतर “येरे येरे पावसा तुला देतो पैसा ” ही धम्माल बडबड गीतं पावसाच्या थेंबांना ओंजळीत घेऊन उड्या मारत गायली आहेत. गल्लीतले रस्तेही तेव्हा मातीचे होते. पावसात नुसता चिखलच व्हायचा. चिखलाचं पाणी अंगावर उडायचं. खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडतानाचा तो बालानंद अनुभवला. श्रावणातली हिरवळ आमच्या मनाच्या कोपऱ्याकोपऱ्यात अशा रितीने बहरायची. आमच्या मनातला श्रावणच पाचूचं बन होऊन उतरायचा. एकीकडे ऊन आणि एकीकडे पाऊस.. “आला रे आला पाऊस नागडा” करत मस्त भिजायचे.
संस्कार, परंपरा, त्यातली धार्मिकता, श्रद्धा, त्यामागचं विज्ञान, हवामान, ऋतुमान, विचारधारा या सर्वांचा विचार करण्याचं आमचं वयच नव्हतं. श्रावणातले सगळे विधी, सण सोहळे, पूजाअर्चा, व्रतं, उपवास हे आमच्यासाठी केवळ आनंदाचे संकेत होते आणि गल्लीत प्रत्येकाच्या घरी कमी अधिक प्रमाणात ते साजरे व्हायचेच.

माझे वडील निरीश्वरवादी होते असं मी कधीच म्हणणार नाही पण आमच्या कुटुंबात काही साजरं करण्यामागे कुठलाही कर्मठपणा नसायचा, सक्ती नसायची पण श्रावण महिना आणि त्यात येणारे बहुतेक सर्व सण आमच्या घरात आनंदाने साजरे व्हायचे. आज हे सगळं आठवत असताना माझ्या मनात विचार येतो की अत्यंत लिबरल, मुक्त विचारांच्या कुटुंबात, कुठल्याही कठीण नियमांना बिनदिक्कत, जमेल त्याप्रमाणे अथवा सोयीप्रमाणे फाटे फोडू शकणाऱ्या आमच्या कुटुंबात श्रावण महिन्याचं त्या अनुषंगाने येणाऱ्या रितीभातींचं उत्साहात स्वागत असायचं आणि या पाठीमागे आता जाणवते की त्यामागे होतं पप्पांचं प्रचंड निसर्ग प्रेम ! निसर्गातल्या सौंदर्याचा रसिकतेने घेतलेला आस्वाद आणि जीवन वाहतं रहावं म्हणून केलेला तो एक कृतीपट होता. धार्मिकतेचं एक निराळं तत्त्व, श्रद्धेच्या पाठीमागे असलेला एक निराळा अर्थ आमच्या मनावर कळत नकळत याद्वारे बिंबवला गेला असेल आणि म्हणूनच आम्ही परंपरेत अडकलो नाही पण परंपरेच्या साजरेपणात नक्कीच रमलो. तेव्हाही आणि आताही.

श्रावण महिन्यात घरी आणलेला तो हिरवागार भाजीपाला.. त्या रानभाज्या, ती रानफळे, हिरवीगार कर्टुली, शेवळं, भुईफोडं, मेणी काकडी, पांढरे जाम, बटाट्यासारखी दिसणारी अळू नावाची वेगळ्याच चवीची, जिभेला झणझणी आणणारी पण तरीही खावीशी वाटणारी अशी फळे, राजेळी केळी, केवड्याचे तुरे या साऱ्यांचा घरभर एक मिश्र सुगंध भरलेला असायचा. तो सुगंध आजही माझ्या गात्रांत पांघरलेला आहे.

श्रावण महिन्यातले उत्सुकतेचे वार म्हणजे श्रावणी शनिवार आणि श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवारी शाळा ही अर्धा दिवस असायची. सकाळच्या सत्रात उपास म्हणून चविष्ट, खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, लिंबू पिळलेली साबुदाण्याची खिचडी आणि संध्याकाळचे सूर्यास्ताच्या थोडं आधी केलेलं भोजन. शनिवारचा आणि सोमवारचा जेवणाचा मेनूही ठरलेला असायचा. सोवळ्यात चारी ठाव स्वयंपाक रांधायचा. त्या स्वयंपाकासाठी आईने आणि आजीने घेतलेली मेहनत, धावपळ आता जाणवते.

शनिवारी वालाचं बिरडं, अळूच्या वड्या, पंचामृत, अजिबात मीठ न घालता केलेली पिवळ्या रंगाची मूग डाळीची आळणी खिचडी आणि पांढरे शुभ्र पाकळीदार ओल्या नारळाच्या चवीचे गरमागरम मोदक, शिवाय लोणचं, पापड, काकडीची पचडी हे डाव्या बाजूचे पदार्थ असायचे आणि त्या दिवशीचं वैशिष्ट्य म्हणजे हिरव्यागार केळीच्या पानावर मांडलेला हा पाकशृंगार. सभोवती रांगोळी आणि मधल्या घरात ओळीने पाट मांडून त्यावर बसून केलेलं ते सुग्रास भोजन! पप्पाही ऑफिसमधून लवकर घरी यायचे. ते आले की आम्ही सगळे एकत्र जेवायला बसायचो, उदबत्तीच्या सुगंधात आणि वदनी कवळ घेताच्या प्रार्थनेत आमचं भोजन सुरू व्हायचं. आई आणि जीजी भरभरून वाढायच्या. त्या वाढण्यात भरभरून माया असायची. तसं आमचं घर काही फार मोठं नव्हतं पण झेंडूच्या फुलांनी सजलेला देव्हारा आणि भिंतीवर आणि चुलीमागे तांदळाच्या ओल्या पीठाने काढलेल्या चित्रांनी आमचं घर मंदिर व्हायचं. पप्पा आम्हाला जेवताना सुरस कहाण्या सांगायचे. एका आनंददायी वातावरणात जठर आणि मन दोन्ही तृप्त व्हायचं.

श्रावणी सोमवारही असाच सुगंधी आणि रुचकर असायचा. त्यादिवशी हमखास भिजवून सोललेल्या मुगाचे बिर्ड असायचे. नारळाच्या दुधात गूळ घालून गरमागरम तांदळाच्या शेवया खायच्या, कधीकधी नारळ घालून केलेली साजूक तुपातली भरली केळी असायची आणि त्या दिवशी जेवणासाठी केळीच्या पानाऐवजी दिंडीचं मोठं हिरवगार, गोलाकार पान असायचं. या हिरव्या पानात आमचा श्रावण आणि श्रावण मासातल्या त्या पारंपरिक पदार्थांचा सुगंध भरलेला असायचा. विविध पदार्थांचा आणि विविध फुलांचा सुगंध ! आणि या सगळ्या उत्सवा मागे कसली सक्ती नव्हती, परंपरेचं दडपण नव्हतं.. मनानं आतून काहीतरी सांगितलेलं असायचं म्हणून त्याचं हे उत्साही रूप असायचं. आमच्या जडण घडणीच्या काळात या परंपरेने आम्हाला जगण्यातला आनंद कसा टिकवावा हे मात्र नक्कीच शिकवलं. या इथे मला आताही— आमच्या वेळेचं आणि आत्ताचं— कालच आणि आजचं याची कुठेही तुलना करायची नाही. फक्त या आज मध्ये माझ्या कालच्या आनंददायी आठवणी दडलेल्या आहेत हे मात्र नक्की.

नागपंचमीला गल्लीत गारुडी टोपलीत नाग घेऊन यायचा. आम्ही सगळी मुलं त्या भोवती गोळा व्हायचो. गारुडीने पुंगी वाजवली की टोपलीतून नाग फणा काढून बाहेर यायचा. छान डोलायचा. मध्येच गारुडी त्याच्या फण्यावर टपली मारायचा. गल्लीतल्या आयाबाया नागाची पूजा करायच्या. एकाच वेळी मला भीती आणि त्या गारुड्याचं खूपच कौतुक वाटायचं.
जन्माष्टमीला आई देव्हाऱ्यातला एक लहानसा चांदीचा पाळणा सजवायची आणि त्यात सॅटीनच्या पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची वस्त्रं घातलेला लंगडा बाळकृष्ण ठेवायची. यथार्थ पूजा झाल्यानंतर आई सोबत आम्ही,

श्रावण अष्टमीला देवकी पोटी
आठवा पुत्र जन्माला आला
छकुला सोनुला तो नंदलाला
जो बाळा जो जो जो जो रे कृष्णा… असे गीतही म्हणायचो. त्यानंतर लोणी, दहीपोह्याचा, डाळिंबाचे लाल दाणे पेरून केलेला सुंदर दिसणारा आणि असणाराही प्रसाद मनसोक्त खायचा. एखाद्या जन्माष्टमीला आम्ही कुणाकडे होणाऱ्या संगीत मैफलीलाही हजर राहिलो आहोत. रात्रभर जागरण करून ऐकलेलं ते भारतीय शास्त्रीय संगीत कळत नसलं तरी कानांना गोड वाटायचं. ताई आणि पप्पा मात्र या मैफलीत मनापासून रंगून जायचे.

मंगळागौरीच्या खेळांची मजा तर औरच असायची.कुणाच्या मावशीची, मोठ्या बहिणीची अथवा नात्यातल्या कुणाची मंगळागौर असायची. फुलापानात सजवलेली गौर, शंकराची बनवलेली पिंडी, दाखवलेला नैवेद्य, सारंच इतकं साजीरं वाटायचं !
नाच ग घुमा कशी मी नाचू
अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई
एक लिंबं झेलू बाई अशा प्रकारची अनेक लोकगीतं आणि झिम्मा, फुगड्या, बस फुगड्या, जातं, गाठोडं असे कितीतरी खेळ रात्रभर चालायचे. मंगळागौरीच्या आरतीने समारोप झाला की झोपाळलेले डोळे घेऊन पहाटेच्या अंधारात घरी परतायचे. या साऱ्यांमध्ये एक महान आनंद काठोकाठ भरलेला होता.

दहीकाल्याच्या दिवशी टेंभी नाक्यावरची सावंतांची उंच टांगलेली दहीहंडी बघायला आमचा सारा घोळका पावसात भिजत जायचा. यावर्षी कोण हंडी फोडणार ही उत्सुकता तेव्हाही असायची पण पैसा आणि राजकारण याचा स्पर्श मात्र तेव्हा झालेला नव्हता.
राखी पौर्णिमेला तर मज्जाच यायची. बहीण भावांचा हा प्रेमळ सण आम्ही घरोघरी पहायचो पण आम्हाला भाऊ नाही याची खंत वाटू नये म्हणून स्टेशनरोडवर राहणारी आमची आते भावंडं आवर्जून आमच्या घरी राखी बांधून घ्यायला येत. गल्लीतल्याच आमच्या मित्रांनाही आम्ही राख्या बांधलेल्या आहेत. मी तर हट्टाने पप्पांनाच राखी बांधायची. भावाने बहिणीचे रक्षण करावे म्हणूनच ना राखी बांधायची मग आमच्या जीवनात आमचं रक्षण करणारे आमचे बलदंड वडीलच नव्हते का? त्या अर्थाने ते दीर्घायुषी व्हावेत म्हणून मी त्यांना राखी बांधायची. माझ्यासाठी मी रक्षाबंधनाला दिलेला हा एक नवीन अर्थ होता असे समजावे वाटल्यास.. याच नारळी पौर्णिमेला आम्ही सारे जण कळव्याच्या खाडीवर जायचो. खाडीला पूर आलेला असायचा. समस्त कोळी समाज तिकडे जमलेला असायचा. घट्ट गुडघ्यापर्यंत नेसलेलं रंगीत लुगडं, अंगभर सोन्याचे दागिने आणि केसात माळलेला केवडा घालून मिरवणाऱ्या त्या कोळणी आजही माझ्या नजरेसमोर आहेत.

समिंदराला उधाण आलंय
सुसाट सुटलाय वारा
धोक्याचा दिला इशारा
नाखवा जाऊ नको तू दर्याच्या घरा..

अशी गाणी गात, ठेक्यात चाललेली त्यांची नृत्यं पाहायला खूपच मजा यायची. आम्ही खाडीत नारळ, तांब्याचा पैसा टाकून त्या जलाशयाची पूजा करायचो आणि एक सुखद अनुभव घेऊन घरी यायचो. घरी सुगंधी केशरी नारळी भात तयारच असायचा. तेव्हा जाणवलं नसेल कदाचित पण या निसर्गपूजेने आम्हाला नेहमीच निसर्गाजवळ ठेवलं असावं.
श्रावणातला शेवटचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या. दिवे अमावस्यानंतर श्रावण सुरू होतो आणि पिठोरी अमावस्येला तो संपतो. अंधाराकडून प्रकाशाकडे— हेच ते तत्त्व. तो असतो मातृदिन.
आमची आई देवापाशी बसून डोक्यावर हिरव्या पानात केळीचे पाच पेटते दिवे घेऊन आम्हाला विचारायची, “अतित कोण?”
मग आम्ही म्हणायचो, “मी”
असं आई चार वेळा म्हणायची आणि पाचव्या वेळी विचारायची, “सर्वातित कोण ?”
तेव्हाही आम्ही म्हणायचो, “मी”
काय गंमत असायची ! माय लेकीतल्या या तीन शब्दांच्या संवादाने आम्हाला जीवनात एकमेकांसाठी कायमस्वरूपी प्रेम आणि सुरक्षितताच बहाल केली जणू.

सर्वात हृद्य सोहळा असायचा तो माझी आजी डोक्यावर दिवा घेऊन पप्पांना विचारायची “अतित कोण?” तेव्हांचा. सोळाव्या वर्षापासून वैधव्यात काढलेल्या तिच्या उभ्या जन्माची एकमेव काठी म्हणजे आमचे पप्पा. आईच्या हातून दिवा घेताना पप्पांचे तेजस्वी डोळे पाणावलेले असायचे. तिच्या सावळ्या, कृश, कायेला त्यांच्या बलदंड हाताने मीठी मारून ते म्हणायचे,
“सर्वातित मीच”
या सर्वातित मधला श्रावण मी कसा विसरेन आणि कां विसरू ?
क्रमश:

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. खूप छान श्रावणाचे वर्णन केले आहेस तू!! त्या वेळचा सगळा श्रावण ,त्यावेळचा निसर्ग , तो शृंगार, ती श्रावणातली संध्याकाळ कितीतरी गोष्टी डोळ्यासमोर आल्या आणि नकळत मी माझ्या पण लहानपणा मध्ये जाऊन पोहोचले …परत एकदा माझ्या माहेरच्या अंगणातून ,परसूतून, घरातून चक्कर मारून आले ..माझ्या वहिनींच्या कितीतरी मंगळागौरी आठवल्या !!!किती छान दिवस होते ते!! त्या पारंपारिक श्रावणाच्या सुरेख आठवणी हेच आपलं या वयातलं श्रेयस..

  2. वडिलांबद्दलचा असणारा अभिमान आणि घरातले प्रत्येक व्यक्तीच्या कृतीतून दाखवून दिलेल्या प्रेम हे शब्दात वर्णन करणं कठीण असतं पण खूप छान पद्धतीने मांडल आहे श्रावणाचा डौल फारच योग्य शब्दातून आणि भावना जागृत करेल असाच मांडला गेला आहे घरातील प्रत्येक व्यक्तीची भावना आणि परिचय यातून होत जातोय

  3. साहित्य आणि माध्यमांतून जसा आकर्षक आणि देखणा निसर्ग दिसतो, तसा भोवताल ताईंना लहानपणी दिसला नाही.मात्र बालपणीच्या रम्य आठवणी,वडिलांचे कर्मकांडाला डावलून निसर्ग प्रेमाने साजरे करणारे विविध सण,त्या निमित्ताने खाणं हे लहानपण सुंदर बनवत होतं

  4. ताई,
    नेहमीप्रमाणेच हा लेखदेखील छान उतरला आहे. स्त्री लेखिकांसाठी असे विषय म्हणजे “फ्री हीट” ! आणि हा विषय माहेर व बालपण या दोन जिव्हाळ्यांनी ओतप्रोत भरलेला ! मग ठरवून सुद्धा कमअस्सल न होणारा. लहानपणीच्या आठवणी एवढ्या तपशीलवार जागवता येणे हे देखील कौतुकास्पद. छान, छान, अशाच लिहित राहा. शुभेच्छा तर चिरंतन आहेतच.

  5. तुमच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे तुमचं घर, आसपासचा परिसर, त्या गल्ल्या, भरती आलेली खाडी हे सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. हे सगळं आठवून ते जसच्या तसं शब्दात उतरवणं हे फार मोठं कौशल्य आहे

  6. राधिकाताई खूप भावनिक शब्दांत व्यक्त झाल्या आहात. बालपणीच्या आठवणी आपल्या मनात रूंजी घालत असतात. तुमचा लेख वाचल्यानंतर मलाही श्रावण महिन्यातले दिवस आठवले. माझी आई नोकरी करूनही
    श्रावण महिन्यातील सण उत्साहाने साजरी करायची.
    सुंदर लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments