Thursday, January 16, 2025
Homeलेखमाझे घराणे : माझा आदर्श

माझे घराणे : माझा आदर्श

आपले आईवडील आपले पहिले गुरू असतात, असे म्हटल्या जाते. निदान माझ्या बाबतीत तरी हे खरेच ठरले आहे.

माझी आई, कै.सौ.मंगला मदन फडणीस आणि वडील, कै. काॅम्रेड एडव्होकेट मदन फडणीस तसेच माझे आजी – आजोबा (कै. सौ. सरस्वतीबाई गजानन फडणीस आणि कै.गजानन दत्तात्रय फडणीस) यांच्या जीवनाचा, विचारांचा माझ्यावर अमीट ठसा उमटला आहे. त्यांच्या मुळेच माझे जीवन घडले आहे. माझे आईवडीलच माझे आदर्श, माझे गुरू आहेत.

माझी आई कै. सौ.मंगला फडणीस हिने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत हजारो विद्यार्थ्यांचेच नव्हे, तर अनेक शिक्षिकांचेही जीवन घडवले. ठाणे शहरातील पहिली माॅन्टेसरी शाळा “बाल विकास मंदिर” ह्या शाळेची सन १९४९ मध्ये स्थापना करून आपल्या निधनापर्यंत म्हणजेच नोव्हेंबर, १९९३ पर्यंत सलग ४९ वर्षे शिक्षणाची मशाल तेवत ठेवली. माॅन्टेसरी शाळेपासून ते पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक वगैरे वर्ग वाढवत तिने शाळेची प्रगती तर केलीच; पण त्याचबरोबर स्वतः सुद्धा मॅट्रीकच्या पुढचे शिक्षण घेऊन पदवी व शिक्षण क्षेत्रातील आवश्यक अशा पदविका व पदव्या मिळवत प्री-पीटीसी, पीटीसी, एस. टी.सी. आणि बी.टी. (आत्ताचे बी एड.) सारखे शिक्षण तिच्या स्वतःच्या संस्थेचा व्याप आणि संसार व आमचे म्हणजेच स्वतःच्या मुलींचे शिक्षण सांभाळून पार पाडले.

आईच्या “बाल विकास मंदिर” ह्या संस्थेमध्ये मुले-मुली सर्वच शिक्षण घेत होते, तरीही शिक्षकवर्ग आणि कर्मचारी वर्ग हा केवळ महिलांचाच होता. म्हणूनच १९६० च्या दशकात केवळ महिलांच्या प्रगतीसाठी चालवत असलेली, साधारण तीस पेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी असलेली ही ठाण्यातील संस्था ठाण्याच्या सामाजिक जीवनात विशेष स्थान बाळगून होती. ठाणे शहर व जिल्ह्यातील एक आदरणीय समाजसेविका म्हणून माझ्या आईने अनेक सामाजिक व शासकीय पुरस्कार मिळवले.

शासकीय शिक्षण समित्यांवर कार्य करत शिक्षणक्षेत्रात अनेक बहुमोल वैचारिक व शैक्षणिक बदल घडवून आईने अनेक “गुरुसन्मान” प्राप्त केले. आईच्या ह्या थोर कार्याला मी सादर वंदन करते.

माझे वडील कै. मदन फडणीस हे तरुण वयातच स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्यासाने झपाटलेले आणि स्वातंत्र्य चळवळीत उतरलेले उमदे व्यक्तिमत्त्व ! स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी स्वतःला कामगार चळवळीला वाहून घेतले. त्यासाठी मानाची शासकीय नोकरी आणि उच्च पदावरील स्थान ग्रहण करण्याची लालसा सोडून आपले संपूर्ण जीवन कामगारांच्या हितासाठी समर्पित केले. कामगारांना न्याय्य हक्क मिळवून देता यावेत, ह्यासाठी त्यांनी माझ्या जन्माच्याही नंतर “एल.एल.बी.” ही कायद्याची पदवी घेतली आणि आपल्या ह्या शिक्षणाचा उपयोग केवळ कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठीच केला.

माझ्या वडिलांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, देशांतर्गत आणीबाणीतील राजकीय विरोध, ह्या सारख्या कारणांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुद्धा तुरुंगवास झेलला; पण अशा कठीण परिस्थितीत सुद्धा तुरुंगातूनही ते कामगारांच्या केसेस लढवत राहिले.
स्वतःच्या तीन कन्यांचे जीवन घडवत असतानाच बाबांनी लाखो कामगारांची कुटुंबे उभी केली. कामगार विषयक कायदेपंडित म्हणून त्यांचे नाव आज निधनोपरांत १५ वर्षे उलटून गेल्यावरही सन्मानाने घेतले जाते, हेच त्यांच्या जीवनाचे फलित !

माझ्या आई वडिलांकडूनच मी समाजकार्याचा वारसा घेतला आणि माझ्या हातून जितकी होईल तेवढी समाजसेवा मी करत आहे, ती त्यांच्याच आशीर्वादाने ! माझ्या ह्या सामाजिक क्षेत्रातील गुरूंना आज मी सादर वंदन करते.

माझी आजी कै. सौ. सरस्वतीबाई गजानन फडणीस, हिच्या बाळबोध आणि तरीही पुरोगामी विचारांच्या संस्कारांमध्ये मी लहानाची मोठी झाले. पोथीपुराणात वाचलेल्या धार्मिक कथा सांगण्यापासून ते पाहिलेल्या मराठी-हिंदी चित्रपटांच्या कहाण्या रंगवून सांगत ती ज्या पद्धतीने ते प्रसंग डोळ्यासमोर साक्षात उभे करायची, तीच निवेदन शैली माझ्या लेखनामध्ये उतरली आणि तरुणपणी मी लेखिका बनले. आजीने दगडी पाटीवर लिहून ठेवलेल्या कविता मी शाळेतून आल्यावर कागदावर उतरवून ठेवण्याचे काम करायचे, तेव्हा मला ही जाणीवही नव्हती की मी एका साहित्यिकेची नात आहे आणि तिचा लेखनाचा समृद्ध वारसा मी पुढे चालवणार आहे.

पण एक दिवस तो चमत्कार घडला आणि आजीच्या सूचनेवरून मी माझ्या आयुष्यातील पहिले कविता-लेखन केले आणि सुदैवाने ते आजपर्यंत चालत आहे. माझ्या ह्या काव्यगुरुंची थोरवी माझ्या दृष्टीने सन्माननीय बहिणाबाई चौधरी सारख्या महान कवयित्री सारखीच आहे. या वर्षी माझ्या सुदैवानेच गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशीच म्हणजे तारखेप्रमाणे दिनांक २१ जुलै रोजी आजीचा स्मृतीदिन होता आणि तिच्या पुण्यतिथीनिमित्त तिला माझी गुरू ह्या नात्याने सादर वंदन करण्याची सुसंधी मला प्राप्त झाली. माझ्या आजीला एक कवयित्री ह्या नात्याने विनम्र अभिवादन.

आणि सरतेशेवटी, पण आमच्या कुटुंबातील प्रमुख स्थान भुषवणारे (Last, But Not The Least… in fact, the Most Important Person in Our Lives) माझे आजोबा कै. गजानन दत्तात्रय फडणीस, उर्फ भाईसाहेब फडणीस, ज्यांच्या केवळ अस्तित्वातूनच आमचे संपूर्ण कुटुंब घडले, शिकले, तरले आणि आजही एकत्र राहून आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहे, अशा माझ्या आजोबांचे पुण्यस्मरण ! ब्रिटिश काळात पोलीस खात्यात नोकरीत राहून उच्च पदावर प्रगती करत गेलेल्या ह्या व्यक्तीने आमच्या कुटुंबालाच नव्हे, तर अनेक परिचितांनाही सचोटी आणि निष्ठा ह्यांचे पाठ शिकवले.

आपली मुले (थोरली कन्या प्रभा, मदन, शरद) स्वातंत्र्य लढ्यात उतरून देशासाठी काही कार्य करत आहेत, ह्याचा सदैव अभिमान बाळगला आणि त्यांना स्वबळावर उभे राहण्याची ताकद दिली. पोलीस खात्यात काम करूनही आपली रसिक आणि खिलाडू मनोवृत्ती जागृत ठेवून क्रिकेट सारख्या खेळात प्रावीण्य मिळवले आणि नाटके, नाट्यसंगीत ह्याची आवड जोपासली. मुख्य म्हणजे “सातच्या आत घरात” अशी पाबंदी असलेल्या कालखंडात आपल्या मुली-सुना ह्यांना आपापल्या नोकरीत व कार्यक्षेत्रात सदैव प्रोत्साहन देत प्रगती करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या संस्कारांमध्ये घडलेली आम्ही त्यांची मुले, नातवंडे, पंतवंडे, त्यांच्या निधनानंतर इतकी वर्षे उलटून सुद्धा एकत्र कुटुंबाचा आनंद उपभोगत आहोत. कौटुंबिक सुखाचा ताळमेळ राखून प्रत्येकाला यथोचित स्वातंत्र्य कसे द्यायचे आणि त्यातून प्रगतीचा मार्ग कसा खुला करायचा, ह्याचे संस्कार त्या काळात आजोबांनी माझ्यावर केले. आज व्यवस्थापन शास्त्र शिकूनही जे ज्ञान उपलब्ध होत नाही, असे प्रचंड प्रात्यक्षिक ज्ञान मला देणारे माझे आजोबा माझ्यासाठी वंदनीय आहेत. पण माझ्यावर घडलेले त्यांचे संस्कार म्हणजे त्यांच्याजवळील “भावार्थ दीपिका”, “दासबोध” सारखे अनेक संत साहित्याचे ग्रंथ वाचनाची मला अगदी लहान वयात नकळत लागलेली गोडी, आजोबांच्या प्रोत्साहनामुळेच पुढच्या आयुष्यात वाढत गेली आणि माझ्यावर काव्य लेखनाचे संस्कार होण्यास मार्गदर्शक ठरली. मी खूप लहान असतानाही, माझी आवड आणि इच्छा पाहून ते मला ह्या ओव्या व श्लोकांचे अर्थ सटीक समजावून द्यायचे. सुमारे साठ वर्षांपूर्वीचे ते संस्कार आजही मला कवितेच्या क्षेत्रात मार्गदर्शन करत आहेत. मी आमच्या भाईसाहेबांना म्हणजेच आदरणीय आजोबांना विनम्र अभिवादन करते.

ह्या सर्वांच्या व्यतिरिक्त एकत्र कुटुंबासोबत राहिल्याने सर्वच काका, आत्या व त्यांचे जीवनसाथी आणि मोठ्या आत्ते बहिणी वगैरेंच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव मनावर पडत गेला आणि माझे व्यक्तिमत्त्व घडत गेले.

घराचा इतका समृद्ध वारसा जरी मला लाभला असला तरी माझ्या जडण घडणीत माझे शाळेतील शिक्षक, शिक्षिका,
महाविद्यालयातील प्राध्यापक यांचे योगदान ही अमूल्य आहे.
पण त्यांच्या विषयी पुन्हा कधी तरी सविस्तर लिहीन.

— लेखन : सौ. मृदुला राजे. जमशेदपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय