१४ दिवसांच्या कॉन्ट्रॅक्टवर सही करताच “तिळा तिळा दार उघड” म्हणत एका आगळ्या अनुभव विश्वाचं जणू दार उघडतं. आता प्रत्येक दिवस नवा धडा शिकवून जाऊ लागतो.
रोजचं काम सुरू झाल्यावर लक्षात येतं की रेकॉर्डिंग, डबिंग, डूरेशन घेऊन कार्यक्रमाची तयार टेप निर्मात्याकडे अथवा ड्युटी ऑफिसरकडे सुपूर्द करणं ही सर्वच कामं अत्यंत जबाबदारीने पार पाडावी लागतात.
मग असं असताना आपल्या पहिल्या कथेची टेप कशी बरं पुसली गेली ? जिथे वेळेपासून मजकुरापर्यंत प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक तपासली जाते, तिथे अनवधानाने कां होईना ब्रॉडकास्टची टेप कशी बरं पुसली जाऊ शकते ? कोणाकडून तरी अशी कशी ईरेज होऊ शकते ?
कॉन्ट्रॅक्टचे तेरा दिवस संपतात आणि चौदाव्या दिवशी या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळतं.
त्याचं असं झालं होतं की माझी पहिलीवहिली कथा अत्यंत उत्साहाच्या भरांत मी भराभर वाचली होती. अगदी ‘वंदे भारत’ स्पीडने ! कुठेही पूर्णविराम, अर्धविराम, उद्गारचिन्ह— काहीही नव्हतं. आवाज एकसूरी ! त्यांत चढ-उतार नव्हते. भावनांचे अविष्कार नव्हते. १४ दिवस स्टुडिओतील रेकॉर्डिंगचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर आकाशवाणीसाठी कसं लिहावं आणि कसं बोलावं याचा आदर्श वस्तूपाठ त्या पुसल्या गेलेल्या टेप मधील कथेने मला अचूक दिला आणि आवाजाचं महत्व ठळकपणे अधोरेखित केलं.
आकाशवाणीच्या संहिता तिच्या ब्रीदाप्रमाणे ‘बहुजन हिताय’ असतात. त्यामध्ये बरेचदा चालू घडामोडींचा परामर्ष घेतलेला असतो. विज्ञान, तंत्रज्ञान, अद्ययावत माहिती श्रोत्यांना पुरवण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्या लिहिलेल्या असतात. हे खरं असलं, तरीसुद्धा त्या संहितांमध्ये कुठेही कृत्रिमता येऊ नये याची विशेष दक्षता घ्यावी लागते. या संहितांचं स्वरूप कथा, ललित लेख, संवाद, श्रुतीका अथवा रूपक —– कांहीही असू शकतं. मात्र आकाशवाणीसाठी लिहिलेल्या या संहिता उद्बोधक असल्या तरी रटाळ असू नयेत, उत्कंठावर्धक असल्या तरी उथळ असू नयेत, माहितीपर असल्या तरी क्लिष्ट असू नयेत, रंजक असाव्यात याचं भान लेखकांना ठेवावं लागतं.
या संहितांमधला मजकूर कोणत्याही विषयांवरचा असला तरी त्यांत भावनांचं सौम्य प्रकटीकरण करणारे शब्द हवेत. त्या शब्दांनी आवाजाचा साज चढविला की तेच संवाद श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतात. या संहितांमध्ये भावनांचे योग्य प्रकटीकरण करण्यासाठी आवश्यक अशा उद्गारवाचक, प्रश्नार्थक वाक्यांची पेरणी असावी लागते. भाषा दर्जेदार असली तरी रोजच्या वापरातील सहज सुलभ हवी. क्लिष्ट शब्दबंबाळ भाषेमुळे संवादातील सहजता हरवते याचं लेखकाला नेमकं भान असावं लागतं.
एकूण काय ? केवळ आणि केवळ आवाजाच्या माध्यमातून आकाशवाणीच्या करोडो श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मुळांत कोणतीही संहिता तंत्रशुद्ध हवी. चोख हवी. त्यानंतर तिचं वाचन ! ते ही तितक्याच उत्कटतेने, भावनांचं यथायोग्य अविष्कार घडवणारं असावं लागतं. समोरच्या कागदांवरील संहितेचं कोरडं वाचन नव्हे, तर श्रोत्यांशी हितगुज करत, संवाद साधत त्या संहितेतील भाव आणि मजकूर श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान आकाशवाणी कलावंताला पेलावं लागत. तेव्हाच ती संहिता आकाशवाणीच्या करोडो श्रोत्यांना या माध्यमाशी बांधून ठेवते. आजवर अनेक लेखकांनी आकाशवाणीसाठी असं तंत्रशुद्ध, चोख लेखन केलेलं आहे. तसच अनेक नामांकित कलाकारांनी त्याचं यथायोग्य सादरीकरण आकाशवाणीच्या कार्यक्रमांमधून प्रत्यही केलेलं आहे. आजही करत आहेत. ‘प्रपंच’, ‘पुन्हा प्रपंच’ सारखे संवादात्मक कार्यक्रम वर्षांनुवर्ष गाजले ते लेखक- कलावंत द्वयींमुळेच ! नीलम प्रभू, बाळ कुरतडकर, प्रभाकर जोशी हे कलाकार आपल्या आवाजाच्या जादूमुळेच अजरामर झाले. त्यांनी सादर केलेले कार्यक्रम श्रोत्यांनी आपल्या स्मरणरंजन कुपींत आजवर जपून ठेवले आहेत. विविध वाहिन्या आणि समाजमाध्यमांच्या जंजाळात आकाशवाणी हे माध्यम अद्यापही घट्ट पाय रोवून उभं आहे त्याचं हेच गमक आहे.
अनेकदा “पुन्हा प्रपंच”च्या रेकॉर्डिंगसाठी मी स्टुडिओत हजर असे. कागदावरील संवाद नीलम प्रभू आणि सहकलाकार इतके जिवंत करत की रेकॉर्डिंग करताना आम्हालाही हसू अनावर होई. त्यांच्या सादरीकरणातील जिवंतपणामुळे अक्षरशः ते संवाद लोकांच्या मनी मानसी मुरले. त्यांतली मिने—- मिने— मिने अशी तिहेरी साद पुढे श्रोत्यांसाठी संस्मरणीय ठरली. वनिता मंडळातली ताई- माईची जोडी ही जणू घराघरांतलं बहिणींचं मनोहर नातं द्रुगोचर करीत असे. त्यामुळे त्यांचे आपसातले संवाद श्रोत्रूभगिनींना आपलेसे, आपल्या घरातलेच वाटत. अशीच आणखी एक घुमारदार आवाजातली साद श्रोत्यांच्या कानांत आणि मनांत आजही घुमते. रेडिओ सिलोनवरील “बिनाका गीतमाला” सादर करणारे प्रख्यात निवेदक स्व.अमिन सयानी यांची ! “आवाज की दुनिया के दोस्तो”! “बहनो और भाईयों !” अमीन सयानी यांचा हा घुमारदार भारदस्त आवाज श्रोत्यांच्या कानांत आजही गुंजन करतो. हे खरे आवाजाच्या दुनियेचे जादूगार !
अशीच एक आवाजाची विलक्षण जादूगिरी एकदा अनुभवली आणि केवळ आवाजातून नाट्यमय सादरीकरण किती उत्कटपणे करता येतं हे प्रत्ययास आलं.
एकदा “अखेरचा सवाल” नाटकाचं रेकॉर्डिंग चालू होतं. निर्मातीची सहाय्यक म्हणून मी रेकॉर्डिंगला मदत करत होते. मोठ्या स्टुडिओमध्ये नाटकातील कलाकारांचा संच उभा होता. आम्ही पलीकडच्या दालनातून त्यांचे संवाद रेकॉर्ड करत होतो. मध्ये मध्ये निर्मात्या त्या नाटकातील कलाकारांना काही सूचना करत होत्या. नाटकाच्या एका अंकात वंदना गुप्ते यांचं अत्यंत तीव्र भावनावेग असलेलं स्वगत होतं. स्वगत सुरू झालं आणि संपूर्ण स्टुडिओतल वातावरण गंभीर झालं. टांचणी पडली तरी आवाज यावा इतकी शांतता स्टुडिओत पसरली. फक्त आणि फक्त आवाजाचा हुकमी वापर करत वंदना गुप्ते स्वगत बोलत होत्या. रंगमंच नाही. नेपथ्य नाही. मेकअप नाही. कायिक अभिनय नाही.
फक्त एक रिकामा स्टुडिओ. समोर माईक्स. आणि वंदनाताईंच उत्कट स्वगत ! पलीकडील स्टुडिओत ते रेकॉर्ड करत असताना निर्मात्या मंदाकिनी पांडे, मी स्वतः, तंत्र सहाय्यक सगळ्यांच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या होत्या. अंगावर रोमांच उभे राहत होते. आम्ही ते उत्कट स्वगत भान हरपून ऐकत होतो. केवळ आवाजाच्या माध्यमातून वंदनाताईंनी रंगमंचावरील नाटक, त्यांतील भूमिका साक्षात उभी केली होती.
त्यादिवशी आवाजाचं सामर्थ्य काय असतं ते मी पहिल्यांदा अनुभवलं. आकाशवाणी हे आवाजाचे माध्यम ! श्रवणीय माध्यम ! पंचेंन्द्रियांच्या जाणिवा जागृत करणारं माध्यम ! या माध्यमाची तीव्र ताकद जाणविल्यामुळे त्याचा मनावर खोल परिणाम झाला. त्याचवेळी आपल्याला अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे याचीही अंतर्मनाला स्पष्ट जाणीव झाली.
क्रमशः
— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
माधुरी ताम्हणे, यांनी माध्यम पन्नाशित्तून, ह्या सदराद्वारे केलेल्या लेखनातून, अतिशय मेहनत घेऊन केलेला आकाशवाणीचा प्रवास थक्क करणारा आहे. आम्ही लहानपापासूनच रेडिओवरील कार्यक्रम ऐकत ऐकत मोठे झालो. पण ते कार्यक्रम नुसतेच साकारणं नव्हे तर त्यातले बारकावे लक्षात घेऊन ते सादर करण हे तुमच्या सहजरीत्या सुंदर लेखणीतून उमगले. आज रेडिओवरील कार्यक्रमाच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद!!! पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!!!
अतिशय सहज आणि सुंदर लिहिलंय.
कामे करता करता रेडिओ ऐकायचा वां रेडिओचा कार्यक्रमावर आपली कामे आ टपायची उदा.दाढी, आंघोळ,देवपूजा,ऑफिसला निघणे वगैरे किती सहजपणे अंगवळणी पडलेले दिनमान पण त्या सादरीकरणा मागे एव्हढे प्रयास,तांत्रिक बाबी आणि कलाकार तंत्रज्ञांनी त्यांच्या आयुष्याच्या बदल्यात कमावलेली निपुण ता असते हे माधुरी तम्हणेंच्या माध्यम पन्नाशी मुळे आम्हा आकाशवाणी च्यa श्रोत्यांना (येता जाता ऐकणाऱ्या) कळाले. धन्यवाद. छान लेखमाला.
रेडियोच्या जुन्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या. टेकाडे भाऊजी, मीना वहिनी अश्या अनेक व्यक्तिरेखा, ज्यांना बघितलं नाही पण ऐकलं आहे, त्या सर्व डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. त्या काळात पडद्यामागे काय घडत होते हे तुम्ही इतक्या छान पद्धतीने लिहिले आहे की मीच तिथे होतो आणि ते सर्व बघत होतो असा भास झाला. आता वाट बघतोय पुढच्या भागाची….
खूप छान लिखाण, माधुरी ताई तुमचा अनुभव वाचताना असे वाटते की हे सगळे आता आपल्या डोळ्यादेखत घडून गेले आहे. सुंदर तपशिलवार लिहिले आहे. माझ्या लहानपणी आम्ही रेडियो वरील बर्यापैकी कार्यक्रम ऐकायचो. पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या
पुन्हा प्रपंच मधील पंत,मीना वहिनी,टेकाडे भाऊजी तसेच वनिता मंडळातील ताई-माई आणि बिनाका गीतमाला हा अत्यंत आवडीचा कार्यक्रम …पूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला…
खूप छान शब्दांकन. तुम्ही म्हणता ते खरं आहे. निवेदकाला श्रोत्यांशी सहजपणे संवाद साधता यायला हवा.