“कामगार सभा”
विभागाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि कॉलेजच्या परीक्षेच्या तयारीला लागले. हातांत जेमतेम पाऊण महिना होता. पण अभ्यासात लक्ष लागेना. डोळ्यांसमोर सतत आकाशवाणीचा स्टुडिओ, ती रेकॉर्डिंगची मशीन्स, माइक्स, फेडर्स हेच येत राहिलं. तिथल्या जिवंतपणाने इतकं झपाटून टाकलं की अभ्यासाची वह्या पुस्तकं निरस आणि रटाळ वाटू लागली. श्रोत्यांशी सुखसंवाद साधताना मजा येत होती. त्याऐवजी पुस्तकांच्या निर्जीव सहवासात मन काही केल्या रमेना. आईच्या चतुर नजरेने ही घालमेल अचूक ओळखली. आपली तरुण मुलगी प्रेमात पडलेय——- या माध्यमाच्या प्रेमात पडलेय आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करतेय हे ओळखून एक दिवस तिने चांगलं लेक्चर झोडलं.
आई स्वतः सुशिक्षित. वडीलांचं शिक्षण त्या काळांत बीकॉम एलएलबी. सिडनऍम कॉलेजच्या पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी ! तेव्हा लेकीने किमान एम.ए. पर्यंत शिकायलाच हवं हा उभयतांचा आग्रह ! त्यांना कसं समजवणार की पुस्तकं वाचण्याइतकच माणसांना वाचणं मनोज्ञ असतं ! पुस्तकांतून मिळणारं ज्ञान आयुष्य आशयघन करतं हे खरंय ! पण आकाशवाणीच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटणारी विविध क्षेत्रांतील माणसं, त्यांचं अनुभवसिद्ध आणि आव्हानात्मक आयुष्याचं प्रांजळ कथन, उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षमय जीवन कहाण्या, दिग्गज साहित्यिक आणि त्यांचं दर्जेदार साहित्य, विविध क्षेत्रातले कलाकार आणि त्यांनी सादर केलेले कलाविष्कार या सर्वांचा आस्वाद घेतल्याने आयुष्य अधिक समृद्ध होत. संपन्न होतं. पुस्तकी ज्ञानापेक्षा कलेच्या रसास्वादातून मिळणारा आनंद आणि समाधान उच्च कोटीचं असतं. ऐन तारुण्यात या अशा दिग्गज व्यक्तीमत्त्वांचा थेट परिचय झाल्यामुळे आपलेही व्यक्तिमत्व नकळत विकसित होतं. अर्थात अभिजात कलेच्या सम्यक आस्वादासाठी शिक्षणाची बैठक ही लागतेच. त्याशिवाय वैचारिक प्रगल्भता केवळ अशक्य ! पण वेड वय हे मानतं थोडच ?
त्यामुळे वार्षिक परीक्षेला अवघे पंधरा दिवस उरलेले असतानाही न्यूज सेक्शनचं कॉन्ट्रॅक्ट हातांत पडल्यावर थेट आकाशवाणी केंद्र गाठलंच. अर्थात तत्पूर्वी आईची मिनतवारी करून तिला चांगल्या मार्कांनी पास होईन हे आश्वासन दिल्यावरच सुटका झाली ती गोष्ट वेगळी ! मात्र त्यासाठी आकाशवाणीतून घरी येताच विचारपूर्वक आंखणी केलेल्या अभ्यासाला जुंपून घ्यावं लागत असे. आज जाणवतं, आयुष्यभर यशस्वीपणे राबवलेल्या अशा दुहेरी कार्यपद्धतीची (multi tasking) ची सुरुवात बहुधा तेव्हापासूनच झाली असावी !
आता कामगार सभेच्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमामुळे लाईव्ह कार्यक्रम करण्याचा धीर चेपला होता. त्यामुळे न्यूज सेक्शन मध्ये न्यूज रीडर म्हणून काम करायला मिळतंय याची एक्साईटमेंट होती आणि थोडासा आत्मविश्वासही गाठीशी होता.
जुन्या जाणत्या न्यूज रीडर कुसुम रानडे, ललिता नेने यांच्याकडून काम शिकायला सुरुवात झाली. टेलीप्रिंटरवर आलेल्या बातम्यांची रीळं तपासणं, इंग्रजी आणि हिंदीमधील बातम्यांचे भाषांतर करणं, नंतर त्या बातम्या ठराविक पद्धतीने लिहिणं हे सर्व काही शिकून घेतलं आणि एक दिवस न्यूज सेक्शनचे प्रमुख संपादक श्री. मनोहर पडते साहेब यांनी संध्याकाळचं बातमीपत्र वाचायला मला सांगितलं.
मनातून जरा घाबरले होते. पण आता पूर्वीची अस्वस्थ धास्ती मात्र मनांत नव्हती. बातमीपत्राची वेळ होताच स्टुडिओत जाऊन बसले. अनाउन्सर कडून फेडर्स समजावून घेतले. बरोबर वेळेवर स्टुडिओच्या दारावरचा लाल लाईट लागला. क्यू करताच फेडर ऑन केला आणि कागदावरच्या बातम्या वाचायला सुरुवात केली.
न अडखळता, शांतपणे बातमीपत्राचं छान वाचन केलं. मनांतल्या मनांत स्वतःला शाबासकी दिली आणि बातमीपत्र संपवून न्यूज सेक्शन मध्ये आले. आंत येताच निरोप मिळाला. पडते साहेबांनी बोलवलय. बहुतेक पहिलच बातमीपत्र चांगलं वाचलं अशी शाबासकी देण्यासाठी बोलावलं असावं. मी मनातल्या मनात खूशीची गाजरं खात त्यांच्या खोलीत प्रवेशले.
“बसा”. त्यांचा गंभीर औपचारिक स्वर ! आजचं बुलेटिन तुम्ही वाचलं ना ? ओपनिंग अनाउन्समेंट न देता डायरेक्ट बातम्या वाचायला सुरुवात केलीत तुम्ही ! ही केवढी मोठी चूक आहे !”
मी चपापले. अरे खरंच की ! “आकाशवाणी मुंबई केंद्र. माधुरी प्रधान बातम्या देत आहेत.” ही ओपनिंगची अनाउन्समेंट न करताच मी थेट बातम्या वाचायला सुरुवात केली होती. खरोखर गंभीर चूक होती. आता ह्याची शिक्षा काय मिळणार ? न्यूज सेक्शनमधून हकालपट्टी ? मी खाली मान घालून बसून राहिले. पडतेसाहेब थोडसं हंसले. म्हणाले, “मला वरिष्ठांकडून जाब विचारण्यात आला. पण मी स्पष्टीकरण दिलं की आमची आजची न्युज रीडर नवी आहे. कॅज्युअल आर्टिस्ट आहे. तिचं हे पहिलंच बातमीपत्र होतं. पुन्हा अशी चूक होणार नाही. नाही ना करणार अशी चूक पुन्हा ?”
माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं. ते हंसले. म्हणाले, “घाबरू नकोस. उद्याचं बुलेटीन तुलाच द्यायचंय. तेव्हा अशी चूक करू नकोस. न्यूज रीडिंग करताना अत्यंत composed असावं लागतं. शांत चित्ताने, एकाग्रतेने बातमीपत्रातला प्रत्येक शब्द श्रोत्यांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेत बातम्या द्यायच्या असतात हे लक्षांत ठेव. आकाशवाणीवरून देण्यात येणाऱ्या बातम्यांवर श्रोत्यांचा विश्वास असतो. तो विश्वास आधी तुमच्या शब्दांतून आणि आवाजातून श्रोत्यांपर्यंत पोहोचायला हवा. त्यासाठी दमदार आवाजाइतकाच त्या आवाजातला ठामपणा श्रोत्यांना स्पर्शून जातो. देवकीनंदन पांडे, सुधा नरवणे, नंदकुमार कारखानीस यांची बातमीपत्रं तू ऐकली आहेस ना ? ते कसं बोलतात, कुठे पॉज घेतात, कुठे नेमका श्वास घेतात ते समजून घे. कोणत्या शब्दांवर समेवर येत श्वासाची लय जुळवायची हे तंत्र आत्मसात कर. सगळ्या जाणत्या न्यूज रीडर्सच्या बातम्या ऐकत गेलीस की तुला न्यूज रिडींगचे कंगोरे नेमके कळत जातील. ऑल द बेस्ट !”
पुन्हा एकदा धडपडणाऱ्या एका नवोदित न्यूज रीडरला मनोहर पडतेंसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समंजसपणे सावरलं होतं. शिकवलं होतं. ही अशी माणसं उमेदवारीच्या काळांत मला भेटली ज्यांनी नाउमेद न करता सावरलं. सांभाळलं. म्हणूनच आत्मविश्वासाने पुढची वाटचाल मी करू शकले. त्याबरोबरच मला भेटलेल्या या अशा दिलदार माणसांमुळेच कोणालाही क्षमाशीलतेने सावरून घेण्याचा गुण अंशतः माझ्यात रुजला असेल कां ?
असंच आणखी एक बातमीपत्र. माझी न्यूज रीडरची ड्युटी होती संध्याकाळी. मी दुपारी घरून निघाले व्हिटीच्या दिशेने ! लेडीज डब्यांत अत्यंत तुरळक स्त्रिया होत्या. जवळपास संपूर्ण ट्रेन रिकामी. मात्र व्हीटीहून ठाणे/ कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या प्रवाशांनी भरभरून वाहत होत्या. त्याला कारणही तसंच होतं. मुंबईवर स्कायलॅब कोसळणार अशी बातमी होती. त्यामुळे घाबरून सर्वजण ऑफिसमधून लवकर निघून घरी परतत होते. अर्थात त्यामुळे व्हिटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या अगदी रिकाम्या होत्या. अशाच एका रिकाम्या गाडींत मी जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते. पण मला आकाशवाणीत वेळेवर पोहोचणं अत्यावश्यक होतं. आकाशवाणीच्या त्या संध्याकाळच्या बातमीपत्राकडे सगळ्यांचे कान लागले होते. त्या रिकाम्या डब्यांतून भयकंपीत करणाऱ्या वातावरणात प्रवास करताना मनाचा थरकाप होत होता. पण बातमीपत्र वेळेवर प्रसारित होणं याला सर्वोच्च महत्त्व होतं.
मी वेळेवर आकाशवाणीत पोहोचले. संध्याकाळचं बातमीपत्र दिलं. मुंबईवर आकाशातून काही स्कायलॅब कोसळलं नाही. पण भीतीच्या स्कायलॅबने मात्र मुंबईला हादरवलं होतं. रात्री घरी परतताना रस्त्यामध्ये शुकशुकाट होता. एरवी गर्दीने ओसंडून वाहणारं व्हिटी स्टेशन सुनसान होतं. वातावरणात एक अनामिक भय दाटून राहिलं होतं. त्या दिवशी रिकाम्या ट्रेन मधून प्रवास करताना गर्दीचं महत्व पहिल्यांदा जाणवलं. या प्रसंगाने आणखी एक निखळ सत्य ठळकपणे जाणवलं. अंवतीभवतीची परिस्थिती आणि स्वतःची मन:स्थिती कितीही विपरीत असली, तरी माध्यमांच्या या जगांत show must go on हेच अंतिम सत्य! पुढे वेळोवेळी अशा अनेक अवघड प्रसंगांतून जावं लागलं. त्या प्रत्येक वेळी परवलीच वाक्य एकच होतं. show must go on !
क्रमशः
— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
व्वा!छान!आकाशवाणीवर वृत्त निवेदनही केलत.सुरेख लिखाण!
माधुरी ताईंचा हा लेख खूपच वाचनीय, खरच स्कायलॅब पडणार,म्हणून शाळा,कॉलेजेस पण बंद ठेवले होते,लोक खूप घाबरलेले होते,ते सगळे ह्या लेखामुळे आठवले.
खूप ओघवत्या लेखणीमुळे आपण इतकं माधुरी ताईंच्या लेखात गुंग होऊन जातो की अरे,संपला पण लेख,असे होते,अजून वाचायला मिळायला हवे,असे वाटत राहते.
खरच अश्या आणीबाणीच्या वेळी पण मीडिया किंवा अत्यावश्यक सेवा मध्ये काम करणाऱ्यांना काहीही सबबी सांगून चालत नाही, खरचं शो मस्ट गो ऑन,हे मनात ठेवून पुढे चालत राहावे लागते,सलाम ह्या लोकांसाठी.
तुमचं ओघवत्या भाषेतलं लिखाण म्हणजे प्रत्यक्ष संवाद साधत आहात असंच वाटतंय.
बापरे…. खरंच ओपनिंग अनाउन्समेंट न देता बातम्या देणे ही किती मोठी चूक आहे हे तुमच्यामुळे कळलं. माणूस समोर दिसत नसल्यामुळे त्याचे नाव, त्याचा आवाज हीच त्याची ओळख आणि तेच राहून जाणे म्हणजे किती मोठी उणीव आहे ते आत्ता जाणवले. शिवाय स्कायलॅब मुंबईवर कोसळणार ह्या घटनेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला तुमच्यामुळे. मला आठवतंय त्याप्रमाणे ते पावसाळ्याचे दिवस होते बहुतेक आणि रात्री खूप पाऊस पडत होता. माझे बाबा 2nd शिफ्ट करून रात्री घरी येणार होते पण तोपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. मी खूप लहान होतो पण त्यावेळी घाबरून झालेली माझी अवस्था मला आज पुन्हा आठवली. त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला म्हणून सुद्धा खूप छान वाटलं.