Saturday, January 18, 2025
Homeलेख"माध्यम पन्नाशी" : १७

“माध्यम पन्नाशी” : १७

सुहासिनीबाईंची शिकवण

सुहासिनी मुळगावकरांची मुलाखत माहेर मे १९८१ च्या अंकात छापून आली आणि “अनोळखी पाऊलवाटा” या दीर्घकाळ चालणाऱ्या सदराचा शुभारंभ झाला. ज्या अंकात मुलाखत छापून आली तो अंक त्यांना देण्यासाठी मी दूरदर्शनच्या कार्यालयात त्यांना भेटायला गेले. सुहासिनीबाईंनी माझ्यासमोरच मुलाखत वाचली. त्यांना ती खूप आवडली. एक-दोन सूचनाही त्यांनी परखडपणे केल्या. मी जायला उठले तसं पुनश्च मला बसवत त्या म्हणाल्या, “पुढच्या अंकात कोणाची मुलाखत घेत आहेस तू ?”
“अजून नक्की ठरलं नाही” पण ——-
‌”मी नुकतीच लष्करी अधिकारी नीला पंडित यांची मुलाखत ‘सुंदर माझं घर ‘मध्ये घेतली आहे. सैन्यातील त्या पहिल्या फळीतील अधिकारी ! त्यांचे अनुभव अतिशय रोमहर्षक आहेत. मी त्यांचा फोन नंबर देते तुला. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना माझा रेफरन्स दे. देतील तुला त्या मुलाखत !”

मी अक्षरशः खुर्चीत खिळून बसले. माझ्या डोळ्यांसमोर एक दोन नांव होती. पण मी अद्याप कोणाशीच संपर्क साधला नव्हता. आदल्या दिवशीच पुढच्या मुलाखतीची विचारणा करणारं बेहेरे साहेबांचं पत्र आलं होतं. त्यांना काय उत्तर द्यावं या विचारात असतानाच सुहासिनीबाईंनी लष्करी अधिकारी नीला पंडित यांचे नाव सुचवलं
परीटघडी कडक शिस्तीच्या सुहासिनीबाई मनाने किती उमद्या आहेत, ते जाणवलं आणि त्यांच्या विद्वत्तेविषयी मला असलेला आदर आता द्विगुणीत झाला
नीला पंडितांची मुलाखत छापून आली. कृतज्ञ भावनेने सुहासिनीबाईंना अंक देण्यासाठी मी दूरदर्शन ला गेले.

सुहासिनीबाईंना माझी ही कृती मनापासून आवडली. त्यांनी तसं बोलून दाखवलं. आता त्यांचा माझ्याशी बोलण्याचा स्वर आणि सूर थोडा मवाळ आणि ऋजु झाला होता. त्या स्वतःहून मला म्हणाल्या, “हे बघ आकाशवाणीसाठी कार्यक्रम करणं निराळं आणि दूरदर्शनसाठी कार्यक्रम करणं निराळं ! कॅमेराची एक लेन्स समोर येते आणि बाकी स्टुडिओ रिकामा. लाखो न दिसणारे लोक आपल्याला बघत आहेत, हा जो एक जबरदस्त तणाव मनावर येतो तो सोपा नाही. तिथेच तुमच्या आत्मविश्वासाची कसोटी लागते. मी जे मघाशी तुला म्हणाले की आत्मविश्वास ही फार मोठी मोलाची गोष्ट आहे ते ह्यासाठी की मी गाणाऱ्या लोकांना नेहमी सांगत असते, तुम्ही सात सूर गाताना एक आठवा सुरू महत्त्वाचा असतो तो म्हणजे “आत्मविश्वास”! हा पहिला सूर आणि तिथून सप्तक सुरू करा. सा रे ग म प ध नी सा कोणत्याही गोष्टी शब्द, वाङ्ममय, कला सर्वच प्रांतात हा स्वर पहिला! मग बाकी सर्व .आत्मविश्वास विलक्षण महत्त्वाचा आणि तो आत्मविश्वास ज्ञानाने येतो . त्यासाठी त्या ज्ञानाची प्रचंड उपासना तेवढ्याच निष्ठेने करावी लागते. तेवढी‌ तपश्चर्या तुम्ही केलेली असली, ते ज्ञान मिळवलेलं असलं की तुम्हाला त्याची परिपूर्ण माहिती असते. शहाण्या माणसाला ठाऊक असतं ऐवढ्या निष्ठेने आणि कष्टाने आपण जी विद्या मिळवलेली आहे ती खोटी नाही.
क्रमशः

— लेखन : माधुरी ताम्हाणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on एक घास त्यांच्यासाठी..
Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय