Wednesday, October 9, 2024
Homeसेवामाध्यम पन्नाशी : ८

माध्यम पन्नाशी : ८

आकाशवाणीच्या प्रत्येक विभागाचं काम हे आगळवेगळं आहे. वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक कामाच्या स्वरूपानुसार ते काम करण्याची पद्धत बदलते. ही बदलत जाणारी पद्धत अत्यंत साक्षेपीपणे टिपणारं संवेदनशील मन लाभलं, त्या कामाच्या स्वरूपानुसार स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची लवचिकता अंगी बाणवली, तर आकाशवाणीचं हे माध्यम प्रत्येक कलाकाराचं इथे मनापासून स्वागत करतं.

आकाशवाणीतील प्रत्येक कामाच्या स्वरूपात किती सूक्ष्म फरक असतो. पहा ना ! साधी गोष्ट. अनाउन्सर Live उदघोषणा करते तेव्हा ती वस्तूतः प्रत्येक वेळी समोरच्या कागदावरचा मजकूरच वाचत असते. पण त्यात यांत्रिकपणा, शुष्कपणा येऊ नये यासाठी प्रत्येक कार्यक्रमाच्या संकल्पनेनुसार भाषेचा लहेजा‌ व स्वर बदलून सादरीकरणात ती जिवंतपणा आणते. वैविध्य आणते.

अनाउन्सर Live उदघोषणा करते आणि न्यूज रीडरही Live बातमीपत्राचं वाचन करते. दोन्हीचं स्वरूप वर वर पाहता सारखंच असतं. स्टुडिओ तोच. माइक तोच. फेडर्स तेच. तरीही कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार मजकूर बदलतो. बातमीतला मजकूर आणि अनाउन्सरच्या संहितेतला मजकूर याचा बाज वेगवेगळा असतो. त्यात “गाता रहे मेरा दिल” यासारखा एखाद्या विशिष्ट संकल्पनेवर कार्यक्रम सादर करताना तर मजकूर ते सादरीकरणाची पद्धत सगळंच वेगळं होतं. वैशिष्ट्यपूर्ण होतं. त्यासाठी एखादी थीम घेऊन, त्यावर अभ्यास करून, विचारपूर्वक त्या संकल्पनेची आंखणी करून तो कार्यक्रम सादर करावा लागतो. अनाउन्सरची खरी कसोटी इथेच लागते.

संहितेतला मजकूर लिहितानाच सादरीकरणाचा बाज कसा असेल याचा विचार करावा लागतो. हा मजकूर प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवून, त्यांना त्यांत गुंतवून ठेवण्यासाठी आवश्यक तो भाषेचा लहेजा स्वीकारून, संहितेचं वाचन करणं या सर्व गोष्टी अत्यंत तरल आणि सूक्ष्म असतात. कार्यक्रमाच्या आवश्यकतेनुसार स्वतःच्या अंगभूत लकबी व संवयी यांच्यामध्ये बदल घडवता आला, तर प्रत्येक कार्यक्रम सादर करण्यात कलाकार मनापासून रंगून जातो. मात्र त्यासाठी “स्व”ला विसरून, त्या माध्यमाचं होता आलं पाहिजे. त्याचा रंग लेवून माईक समोर उभं राहता आलं पाहिजे. तरच कार्यक्रम सादर करण्यातला आनंद कलाकार मनमुराद उपभोगतो. कार्यक्रम सादर करणारा कलावंत जेव्हा स्वतः त्या कार्यक्रमात रंगून जातो तेव्हाच श्रोतेही आपोआप त्या कार्यक्रमात गुंतून जातात. रमतात. रंगून जातात आणि मग श्रोते आणि कलावंत दोघांचीही अवस्था “अवघा रंग एक झाला” अशी होते.
‌या अश्या सर्व काही सूक्ष्म, तरल गोष्टींचं भान ठेवावं लागतं. तसंच कांही व्यावहारिक संकेतसुद्धा पाळावे लागतात.

एकदा एक कथा लिहून थेट रेकॉर्डिंगला स्टुडिओत गेले. कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करण्यासाठी निर्माती स्वतःच स्टुडिओत हजर होती. मी कथेचं वाचन सुरू केलं. वाचताना नादात कथेतील एक वाक्य बोलून गेले, “कविताने आपले दागिने गोदरेजच्या कपाटात ठेवले आणि चावी फिरवली”. संकेत ते पाहत होता. त्याने तिला थांबवलं.”
“थांब. थांब. माधुरी”. निर्माती काचेपलीकडून बोलली. तिने ताबडतोब रेकॉर्डिंग थांबवलं. मला कळेना, नेमकं झालं तरी काय ? मी वाचन तर बिनचूक केलं होतं. न थांबता. न अडखळता. कथा वाचताना आवाजात योग्य तो भावनावेग सुद्धा होता.. मग रेकॉर्डिंग का बरं थांबवलं गेलं ? निर्माती मंदाकिनी पांडे आंत आल्या. म्हणाल्या, “अगं तू तुझ्या कथेंत ‘गोदरेजचे कपाट’ असा उल्लेख केलायस. आपण कोणत्याही प्रॉडक्टचं नाव संहितेत घेत नाही. तू नुसतं, तिने कपाटात दागिने ठेवले असं बोल”.

हा एक नवा धडा मी गिरवला. पुढील काळात संहिता लिहिताना कोणत्याही प्रॉडक्टचं आपण नाव घेत नाही ना याचं नेमकं भान ठेवलं. माध्यमातल्या कलावंताने किती दक्ष आणि जागृत रहायला हवं ते शिकवणारा असाच आणखी एक प्रसंग. त्याचं असं झालं, मी ‘कामगार सभा’ सेक्शनसाठी कॅज्युअल आर्टिस्ट म्हणून काम करत होते. स्टाफ आर्टिस्ट विमल जोशी या रजेवर होत्या. त्यांचं थोडाफार काम मी बघत होते. एक दिवस मी सकाळी अकरा ते साडे अकरा दरम्यान “कामगार सभा” या कार्यक्रमात वाजवण्यात येणाऱ्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स निवडण्यासाठी रेकॉर्ड लायब्ररीमध्ये गेले. रेकॉर्ड लायब्ररीचे प्रमुख होते सुप्रसिद्ध गायक श्री. शरद जांभेकर. रेकॉर्ड्स काढण्याच्या कामात ते मला खूप मदत करत. काम करता करता अनेकदा ते मैफिलींचे व श्रोत्यांचे बहारदार किस्से सांगत. शास्त्रीय गायनातल्या काही खाचाखोचा समजावून सांगत.

म्युझिक सेक्शन मध्ये काम करत असताना रेकॉर्डिंगच्या वेळी कोणतीही अडचण उदभवली तर शरद जांभेकर तत्परतेने माझ्या मदतीला धावून येत आणि माझी अडचण दूर करत. अनेकदा वडीलकीचा सल्लाही मला देत. मी नेहमीप्रमाणे शरद जांभेकरांना कामगार सभेसाठी कोणती गाणी पाहिजेत त्याची यादी दिली. दिवस सरत्या पावसाळ्याचे होते. नारळी पौर्णिमा जवळ आली होती. म्हणून मी त्या कार्यक्रमासाठी सगळी बहारदार, लोकप्रिय कोळीगीतं निवडली होती. ड्युटी ऑफिसरकडे सगळ्या रेकॉर्डस् सुपूर्द केल्या. आवश्यक ती लिखापढी केली आणि आपण एक मस्त कार्यक्रम सादर केल्याच्या आनंदात घरी गेले.

एक आठवड्यानंतर विमल जोशी कामावर रुजू झाल्या. ड्युटीवर येताच त्यांनी मला समोर बसवलं. मला जरा नवल वाटलं. इतक्या दिवसांनी आम्ही भेटलो तर खरं म्हणजे कॅन्टीनमध्ये कॉफी प्यायला चल असं म्हणण्याऐवजी मला थेट समोर का बरं यांनी बसवलं असेल ? मी असा विचार करत त्यांच्यासमोर बसले. विमल जोशी गंभीरपणे म्हणाल्या, “गेल्या शनिवारच्या कामगार सभेच्या कार्यक्रमातल्या रेकॉर्ड्स कोणी काढल्या ? तूच ना ?” मी होकार दिला. त्या गंभीरपणे पुढे म्हणाल्या, “शनिवारचा पेपर वाचला होतास तू ?”
“नाही” मी प्रामाणिकपणे कबूल केलं.
“शनिवारच्या पेपरमध्ये पहिल्या पानावर मोठी बातमी होती. माहीम कोळीवाड्यातल्या मच्छीमारांच्या काही बोटी समुद्राला उधाण आलं होतं, त्यांत सापडल्या आणि बुडाल्या. त्यांत काही मच्छीमारांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. माहीम कोळीवाड्यावर शोककळा पसरलेय. अशा परिस्थितीत त्या दिवशी तू कामगार सभेत आनंदी मूडची कोळीगीतं लावलीस हे किती विसंगत आणि चुकीचं आहे. अगं कामगार सभेचा हा सकाळचा गाण्यांचा कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे. सर्वदूर तो ऐकला जातो. त्या वसाहतीतल्या मच्छीमारांना त्या दिवशी ही अशी हॅप्पी मूड ची गाणी ऐकून काय वाटलं असेल सांग बरं ?” “सॉरी विमल मावशी. पण मी खरंच त्या दिवशी सकाळी पेपर बघितला नव्हता.”

“इथून पुढे अशी बेसावधपणे कधीही वागू नकोस. सकाळी वृत्तपत्रातल्या बातम्यांवर अवश्य नजर फिरवत जा. कधी कधी काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या असतात किंवा काही तत्कालीन घटनांचे पडसाद आपल्या कार्यक्रमांवर पडू शकतात. त्यांची सजगपणे नोंद घेणं क्रमप्राप्त असत. आकाशवाणीत काम करताना असं चालू घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. आपल्या कार्यक्रमात तसे उल्लेख करावे लागतात. आपल्या कामाचा तो भाग आहे! अगं एरवी सुद्धा आपण ‘दिनविशेष’ बघतोच ना ! प्रत्येक महिन्यातले सणवार, जयंती, पुण्यतिथी, वर्षातील काही महत्त्वाचे दिवस, जस १ मे कामगार दिन, २ ऑक्टोबर गांधी जयंती, १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिन, दसरा, दिवाळी या सारखे महत्वाचे सण अश्या दिनविशेषांची दखल घेऊन आपण त्यानुसार कार्यक्रम करतो ना ? तसंच चालू घडामोडींवर ही आपल्याला लक्ष ठेवाव लागतं. त्यांचीही कार्यक्रमात नोंद घ्यावी लागते हे नेहमी लक्षात ठेव. हातात सकाळच्या प्रहरी चहाचा कप असण्यापेक्षा वर्तमानपत्र असणं आपल्यासाठी अधिक महत्त्वाच आहे.”

आकाशवाणी या माध्यमात काम करताना चौफेर विचार करणं, वर्तमानाचं भान ठेवणं आणि दैनंदिन जीवनांत अत्यंत सावध आणि जागरूक असणं किती अत्यावश्यक आहे ते यानिमित्ताने अधोरेखित झालं.
आकाशवाणीतल्या कामाच्या निमित्ताने या सर्व छोट्या छोट्या गोष्टी शिकता आल्या. रोजच्या व्यावहारिक जगांत वावरताना त्यांचा अंगीकार करता आला. किंबहुना एकूण व्यक्तिमत्त्वात प्रगल्भता येण्यासाठी या सर्व गोष्टींचा पुढील आयुष्यात खूपच उपयोग झाला.
क्रमशः

— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. माधुरी वहिनी, “माध्यम पन्नाशी”ने आता अधिकाधिक मार्गदर्शक आणि रंजक वळण घेतलं आहे.संहिता लिखाण,तिचे सादरीकरण ह्याबाबत छान माहिती मिळत आहे.तसेच आकाशवाणीवरील तुमच्या ह्या प्रवासात तुम्हाला वेळोवेळी उत्कृष्ट मार्गदर्शन मनमोकळेपणे करणार्‍या,सतत दक्ष आणि जागरूक रहाण्याचा वडिलकीच्या नात्याने सल्ला देणार्‍या त्या काळातील महान व्यक्तींना शतश: नमन! हल्लीच्या काळात अशा स्वभावाच्या व्यक्ती दुर्मिळ झाल्या आहेत……….

  2. माधुरी अप्रतिम शब्दांकन. वृत्त निवेदकांना किंवा कार्यक्रम सादर करणाऱ्यांना किती बारीक सारीक गोष्टींचं अवधान ठेवावं लागतं याची श्रोत्यांना, हा लेख वाचताना
    कल्पना येईल. नवोदितांना तर यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments